मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६

लवचिकता

व्यावसायिक जग वाटतं तितकं पुर्णपणे कठोर नसतं, त्यातही क्वचित का होईना पण हृदयस्पर्शी क्षण येत राहतात. असाच एक क्षण गेल्या आठवड्यात आला. जिम (नाव बदललं आहे) ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अमेरिकेत निवृत्त झाला. ह्या निमित्ताने भारतातील सर्व टीमने त्याच्यासोबत विडीयो कॉल केला. आपली ६० जणांची टीम समोर पाहून जिम बराच भावनाविवश झाला. सुरुवातीला नक्की काय बोलावं हे त्याला सुचेनासं झालं. मग मात्र त्याने स्वतःला सावरलं. 
खरं तर जिम उच्चपदस्थ! पण अमेरिकन संस्कृतीप्रमाणे सर्वजण त्याला एकेरीतच संबोधित होते. "जिम , उद्या सकाळी उठल्यावर तुला कसं वाटेल?" एकाने इथून विचारलं. आपल्या विचारांची सुसंगती लावण्यासाठी जिमने एक क्षणभर घेतला. मग त्याने आपलं मनोगत मांडलं. "रात्री बेरात्री, सुट्टीवर क्रुझवर असताना, कोण्या परिचिताच्या अंत्यविधीला असताना सुद्धा महत्वाच्या बाबींमध्ये निर्णय घेण्यासाठी त्याला फोन येत असत. सकाळी ७ वाजल्यापासुन मिटींग्स सुरु होत. ह्या कामाच्या सर्व रगाड्यात दिवस अगदी कसा निघून जाई हे सुद्धा कळत नसे! आणि उद्यापासून सकाळी पूर्ण दिवस कसा घालवायचा हा यक्षप्रश्न त्याच्यासमोर ठाकणार होता. बायकामुलांना जिम दिवसभर बाहेर असण्याची सवय होती. जिमला समुद्रकिनाऱ्याची खुप आवड होती. पण किती दिवस समुद्रकिनारा घेऊन बसणार?" जिमने पुन्हा एकदा एक क्षणभराचा विसावा घेतला. "कोणास ठाऊक दोन वर्षांनी मी कदाचित पुन्हा नोकरीच्या शोधात असेन!" जिमचे मनोगत पुढे काही काळ चालु राहिलं पण त्याच्या मनोगताचा हा भाग माझ्या चांगलाच लक्षात राहिला. 
आपलं सुद्धा असंच काही होत असतं. मोकळेपणाचे आयुष्य बालवाडीत कधीतरी संपल्यानंतर आपणही कधीतरी ह्या साचेबंध आयुष्याचे गुलाम होत जातो. साचेबंध आयुष्यासोबत एका ठराविक वैचारिक पद्धतीचे सुद्धा गुलाम होत जातो. आपल्याला विशिष्ट गोष्टी एका विशिष्ट पद्धतीनेच केलेल्या आवडतात कारण त्यातील एखादा भाग आपणास आवडत असतो. पण हा आवडता भाग, ही आवडती बाब वगळता बाकीच्या गोष्टींचे मुल्यमापन करण्याची आपण बऱ्याच वेळा तयारी दाखवत नाही. 
माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला मुंबईची रहदारी आवडत नाही. म्हणून भली पहाट किंवा ऐन दुपार अशा कमी गर्दीच्या वेळा निवडून मी माझा प्रवास करण्याचं ठरवतो. आणि मग होतं काय की मी माझा कौटुंबिक वेळ कमी करतो. 
असंच म्हटलं तर सकाळी अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत! माझ्या मुलावर सुद्धा हीच सवय लावण्याचा मी आटोकाट प्रयत्न अगदी हल्ली हल्ली पर्यंत केला. 
आता आपण सवयीचे गुलाम का बनतो? एका विशिष्ट वयानंतर आपण आपलीच स्वतःविषयी एक अप्रत्यक्ष प्रतिमा बनवून घेतो. आणि मग ह्या प्रतिमेशी सुसंगत असे वागण्याचा प्रयत्न करीत राहतो. जीवनाच्या प्रवासात ह्या प्रतिमेचे आणि अनुषंगाने बनलेल्या आपल्या जीवनपद्धतीचे पुन्हा विश्लेषण करण्याचा आपण क्वचितच प्रयत्न करतो. 
जीवनप्रवास पुढे सरकत राहतो. काही लोकांशी आपलं अगदी मनापासून पटतं, काही लोकांशी आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो तर काही लोकांना मात्र आपण चक्क टाळतो. त्या लोकांविषयींच्या गैरसमजांचं ओझं घेऊन आपण जीवन व्यतित करत असतो. ह्या गैरसमजांची सुरुवात कधी झाली हे पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा असं आढळून येतं की आपण थोडा का होईना पण काही काळ हा एका सीमारेषेवर काढला असतो. एका बाजुला असतो विश्वास तर दुसऱ्या बाजूला गैरसमज! जर ही व्यक्ती खरोखर महत्वाची असेल तर गैरसमजांना पुर्णपणे टाळण्यासाठी तो एक अधिकचा मैल चालुन जाणे आवश्यक असतं. अशा वेळी थोडी लवचिकता दाखवणं आवश्यक असतं. 
आजच्या पोस्टचा मुख्य मुद्दा हाच! व्यावसायिक जीवनात लवचिकतेची हद्द दाखविणारे आपण वैयक्तिक जीवनात मात्र इतके अट्टाहासी का बनतो? 

ह्या सर्व विचारशृंखलेला चालना देणाऱ्या जिमचे आभार! त्याला दोन- तीन महिन्यानंतर संपर्क करुन समुद्रकिनाऱ्याचा कंटाळा आला आहे की काय हे विचारण्याचा माझा मानस आहे. जर त्याने स्वयंपाकघरात बायकोला मदत करण्यास सुरुवात केली तर लवचिकतेच्या ह्या परीक्षेत तो यशस्वी झाला असे म्हणता येईल!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...