मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ११ जुलै, २०१७

यश, समाधान वगैरे वगैरे!

गेल्या १० - १५ वर्षात जे आधुनिक शाळांचं महाराष्ट्रात आणि भारतात पेव फुटलं, त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनात बरेच फेरफार घडवुन आणले. जणु काही "मुलांना आत्मविश्वासानं ओतप्रोत भरून टाकावं" हे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी आपल्या अभ्यासक्रमाची आणि शाळेतील विविध उपक्रमांची आखणी केली. मागच्या पिढीनं आपल्या पालकांनी शिकलेली दहावी बारावी ते आपण घेतलेलं पदवीचं शिक्षण हा प्रवास पार पाडला होता. त्यामुळं ह्यापुढील पायरी म्हणुन आपल्या मुलांनी पदव्युत्तर शिक्षण घेऊन व्यावसायिक जीवनात यशोशिखरं गाठावी हे स्वप्न उरी बाळगलं आहे. मध्यमवर्गीयांच्या ह्या स्वप्नांचा पुरेपूर वापर शिक्षणक्षेत्रातील नवनिर्मित संस्थांनी करुन घेतला आहे. 

व्यावसायिक जीवनातील पिरॅमिडची संकल्पना सर्वज्ञात आणि त्रिकालबाधित सत्य आहे. उच्चशिक्षित तरुणाची संख्या वाढली म्हणुन उच्चपदांची संख्या वाढणं शक्य नाही. आणि गेल्या काही महिन्यातील चर्चेचा ओघ पाहता ज्या नोकरींमध्ये  काही विशेष कौशल्याची गरज नाही अशा सर्व नोकऱ्या ऑटोमेशनने करून घेण्याकडं कंपन्यांचा कल राहील. मग तुम्ही घेतलेलं शिक्षण बाजुला राहून तुमच्या IQ, संभाषणकला ह्या सर्व बाबींवर तुमचं अस्तित्व अवलंबुन राहील. ह्यातही एक मुद्दा - ऑटोमेशनने नोकऱ्यांची संख्या एका विशिष्ट प्रमाणाच्या खाली गेली की मग तो सामाजिक आणि राजकीय मुद्दा होऊन एका विशिष्ट प्रमाणाच्या पुढं ऑटोमेशन करू देण्यास कंपन्यांना बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. 

एका विशिष्ट क्षेत्रात आयुष्यभर नोकरी करण्याची शक्यता कमी होत जाईल. प्रत्येक व्यक्तीला सतत बदलांना तोंड द्यावं लागेल आणि ह्या सर्व प्रकारांत तुमचं मानसिक स्वास्थ टिकवुन धरणं ही फार महत्वाची बाब ठरेल. खरंतर असं वर्गीकरण करणं चुकीचं ठरेल पण पुर्वी मराठी माध्यमात शिकलेली मुलं हल्लीच्या इंग्लिश माध्यमात शिकलेल्या मुलांपेक्षा अधिक समाधानी होती. आयुष्यातील साध्य करू शकणाऱ्या महत्तम यशाची जाणीव अगदी लहान वयातच ह्या पिढीतील मुलांना होते. आणि ह्यामुळं आपल्या क्षमतेइतके परिश्रम करुन मिळविलेलं यश सुद्धा त्यांना समाधान देत नाही. यश हे काही एकमितीय नसतं. कोणी एक व्यक्ती यशाच्या सर्व मिती एकत्र संपादन करू शकत नाही आणि दीर्घकाळ टिकवू शकत नाही. त्यामुळं आपल्याला यशाचे जे माप, जी मिती साध्य झाली त्यात समाधानी राहणं ही भावी काळात मोठी कला ठरणार नाही. मग काय अल्पसंतुष्ट राहायचं काय हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. उत्तर अर्थातच नाही. व्यावसायिक जीवनाच्या प्रवासात एका दोरीवर उंचावरून चालणाऱ्या डोंबाऱ्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. हातातील काठीच्या आधारानं व्यावसायिक यश आणि समाधान ह्यांचं संतुलन साधणे अगदी आवश्यक बनणार आहे.  

परवा गुरुपौर्णिमेच्या पुजेनिमित्त एकत्र जमलेल्या  मीत आणि अक्षुशी गप्पा मारताना गप्पांचा ओघ साधारणतः ह्याच  विषयाकडे वळला. मुलांना भावी काळासाठी कोणती शिकवण देणं आवश्यक आहे हा प्रश्नाच्या उत्तरावर "समोर आलेल्या परिस्थितीत समाधानी राहणं मुलांना शिकवा!" ह्या उत्तरावर आम्हां तिघांचं एकमत झालं. 

त्या चर्चेनंतर जीवनाचं मोठं रहस्य उलगडल्याच्या थाटात मी एक दोन दिवस होतो. पण मग जीवनातील वास्तवाचं भान आणून देणाऱ्या व्यक्तीसोबत (सुज्ञांस सांगणे न लगे !) ह्याची चर्चा आज सकाळी करताना ह्यातील काही कठीण बाबींची जाणीव झाली. मुलांना समाधानी राहण्याचा केवळ सल्ला देऊन चालणार नाही, त्यासाठी आपल्या वर्तवणुकीतून मुलांसमोर हा आदर्श उभा राहिला हवा. आणि समजा महत्प्रयासानं आपण असा आदर्श ठेवला आणि मुलांनी आपल्या उपदेशाची आणि बाह्यजीवनात त्यांना दिसणाऱ्या वास्तवाची तुलना केली आणि स्पष्ट शब्दांत आपणांस येऊन सांगितलं की तुम्ही आऊटडेटेड (कालबाह्य) झाले आहात तर!!!  मग पुन्हा एका मोठ्या चर्चेची तुमची तयारी हवी. मुलांसोबत दीर्घ चर्चेसाठी लागणारी चिकाटी हा सुजाण पालकत्वाचं भावी काळातील एक आवश्यक गुणधर्म ठरणार आहे! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...