आमच्या घरची यंत्रणा खूप शिस्तबद्ध आहे. बोरिवलीला रहात असलो तरी आम्हांला येणाऱ्या आठवडाभरातील शाकाहारी दिवसांची पुर्वसुचना (अलर्ट) देण्याचं काम आई, बहीण आणि सासुबाई अगदी मन लावुन करत असतात. बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे मांसाहाराचे दिवस! पण ह्या Business Rules ना override करणारे संकष्टी, एकादशी, श्रावण, नवरात्र असे दिवस, सप्ताह, मास (महिने) येत राहतात. मग मी ह्या कालावधीला तोंड देण्याची आपली मानसिक तयारी करतो. म्हणजे मी काही हाडाचा मांसाहारी वगैरे नाही पण नुसतं चवीला एखादी डिश असली की मी दोन घास जास्त जेवतो असं आईचं आणि आता बायकोचं म्हणणं असतं. हे सर्व आठवायचं कारण म्हणजे रविवारी गुरुपौर्णिमा आणि बुधवारी संकष्टी - त्यामुळं तांत्रिकदृष्टया पाहिलं तर सहा दिवस सतत शाकाहाराचे !
थोडे दिवसांनी श्रावण सुरु होईल! मग भाविक लोक उपवास सुरु करतात. काही टवाळ लोक उपवास करणाऱ्या लोकांची मस्करी करतात. "एकादशी आणि दुप्पट खाशी! " अशा म्हणींचे जनक पुर्वीपासून आहेत. पण मी मात्र ह्या उपवास करणाऱ्या लोकांकडे मोठ्या आदरानं बघतो. मला स्वतःला उपवास करणं जमत नाही किंबहुना मी आतापर्यंत तसला प्रयत्नसुद्धा केला नाही. उपवास करणाऱ्या लोकांचे परिस्थितीनुसार दोन प्रकार पडतात. म्हणजे लोक मुलतः त्या प्रकारातील नसतात. परंतु उपवासाचा दिवस कोणता आहे त्यानुसार त्या लोकांचं ह्यातील दोन प्रकारात वर्गीकरण होतं. पहिला प्रकार म्हणजे त्या दिवशी ज्यांना आपल्या कामकाजाची जबाबदारी नसते आणि पुर्णपणे घरी बसुन त्यांना उपवास पाळायचा असतो. दुसरा प्रकार म्हणजे ज्यांना गाडीघोड्यानं (हा शब्द किती दिवस अस्तित्वात राहील देव जाणो !) कार्यालयाला जाऊन आपले उद्योगधंदे पार पाडायचे असतात असली लोकं! दोन्ही प्रकारात काठिण्याची पातळी वेगवेगळी असते. पहिल्या प्रकारात घरातील बाकीचे लोक नेहमीचे चविष्ट पदार्थ हादडताना पाहुन देखील आपला संयम कायम ठेवणं हे महाजिकरीचं काम आहे. आता सर्वसामान्य मराठी घरात नेहमी बनणारं जेवण, खाद्यपदार्थ हे चविष्ट असतात हे विधान केल्याबद्दल अखिल महाराष्ट्रातील बहुसंख्य पुरुषमंडळी माझा मुकपणे निषेध करण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या प्रकारात तुम्ही दररोज इतकी ऊर्जा प्रवासात खर्च करत असता, तुम्हांला तुम्ही उपवास केला आहे म्हणुन कार्यालयीन जबाबदारीतून कोणी सुट देत नाही. ह्या सर्वांचा मुकाबला करत ही लोक उपवास पार पडत असतात.
साबुदाणा वडा वगैरे आकर्षक गोष्टींकडे लक्ष न देता लोक उपवास का करतात ह्या गोष्टीवर गंभीरपणं विचारमंथन केलं असता (मी उपवासाच्या बाबतीत केवळ इतकंच करू शकतो) काही गोष्टी लक्षात येतात. निर्बंधपणे जीवन जगण्याची सवय झाली असता उपवास आपल्या मनाला काही काळ आपल्या मोहांवर नियंत्रण ठेवण्याची संधी देतात. बहुदा ह्या कालावधीत आपलं नियंत्रण चांगलं झाल्यानं आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधु शकत असु आणि तिथुनच त्या सर्वशक्तिमानाशी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरु होत असावी. म्हणजे खरं कारण हेच की तुम्हांला अंतर्मनाशी, सर्वशक्तिमानाशी संवाद साधता यायला हवा. काहींना ही गोष्ट बाकी सर्व गोष्टी करुन सुद्धा साध्य होते तर काहींना ह्यासाठी जिव्हेद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या मोहांना दूर ठेवावं लागतं. उपवास ही शेवटी आपल्या मनावरील नियंत्रणाचा मार्ग आहे.
बाकी व्यवहारी आदित्यबाबांचा सल्ला - जर उपवासामुळं जर तुमच्या दैनंदिन कारभार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे असं तुम्हांला जाणवल्यास तुम्ही थोडा वेळ भावनिकदृष्ट्या विचार न करता तुमच्या उपवास करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करावा !
हे सर्व काही गुरुपौर्णिमा आणि संकष्टीच्या अलर्टपायी!
छान लिहीलय
उत्तर द्याहटवाMajeahir, pun kharay....
उत्तर द्याहटवा