मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २९ जुलै, २०१७

वर्षा वसई

आमची वसई आधीच हिरवीगार आणि त्यात पावसाळ्यात ती अधिकच हिरवीगार होते. आणि विविध प्रकारची झाडं अगदी जीवनरसाने फोफावुन निघतात. आज सकाळीच वसईला आल्यावर तेरड्याची काही मनोवेधक रूपे कॅमेऱ्यात टिपली आणि फेसबुकवर टाकली. मोजक्याच लोकांनी पण मनापासुन प्रतिसाद दिला. त्यामुळं हुरूप येऊन आज सायंकाळी केलेलं हे भोवतालच्या परिसराचं छायाचित्रण ! ह्यात शब्द कमी असणार आणि चित्रातील झाडांनाच आपण बोलुन देऊयात !

तेरडा  



ही तशी रानटी झुडुपे पण त्यातील दिसणारं तंतुमय पांढऱ्या रंगांचं तण हे काही दिवसांनी येणाऱ्या चतुरांचं आवडतं खाद्य !



तेरड्याच्या बनातुन कसं दृश्य दिसत असेल ह्याच कुतुहूल क्षमविण्यासाठी मोबाईलला थेट तेरड्यांमध्ये कूच करण्यास सांगून काढलेला हा फोटो !



वसईची शान असणारी पानवेल आता नामशेष व्हायच्या मार्गावर आहे. पण मोठीआईने हा एक माडा असाच कारवीच्या आधारानं जपून वाढवला आहे.



केळीचं बन - हे सुकलं वगैरे काही नाही अगदी जोमानं वाढतंय !


एका फोटोत महत्तम हिरवाई टिपण्यासाठी घेतलेले हे दोन फोटो !


पुन्हा केळीचं बन !


नारळाची  तीन उंच झाडे !



प्रिय बावखल !


सालाबादप्रमाणे उन्हाळ्यात खाल्लेल्या आंब्यांचे बाठे पावसात रुजून उगवलेली ही आंब्याची बाळ झाडे !



उंच नारळांच्या झाडांशी स्पर्धा करणारं फणसाचे झाड ! थोडे कष्ट करावे लागतील ह्याला शोधायला !


वर्षोनुवर्षे गोडी जांब देणारं हे जांबाचे झाड !


मोठीआईच्या शब्दांत सांगायचं झालं तर अगदी बिनकामाचे हे झुडूप ! त्याचं नाव विचारलं तर ती रबडू वगैरे म्हणाली. तज्ञांनी नक्की करावं.  म्हणजे मोठी आई तज्ञच पण माझी ऐकण्यात वगैरे चूक झाली असेल तर !मुळगावचे तज्ञ विकास चौधरी जे सध्या कॅलिफोर्नियात वास्तव्य करुन आहेत त्यांनी ह्या झुडुपाचे नाव खरबु असल्याचा अमेरिकेतुन ताबडतोब खुलासा केला आहे! त्यामुळे ही दुरुस्ती ! मोठीआई सुद्धा खरबुच  म्हणाली होती. कान तपासुन घ्यायला हवेत . 


सणसणीत खाज आणणारा आगेठा ! ह्याच्या दाट गर्दीत चेंडू गेला की लहानपणी कसं जीवावर यायचं !


पुन्हा एकदा केळी पण ह्यावेळी लोंगरासहित !


गर्दी केलेलं आळु ! वडीचे का आमटीचे हे विचारु नका !!


हा माणुस केळीचे किती फोटो टाकणार हा विचार मनातच ठेवा !


पावसात जोमानं निघालेलं  सुरणाचे झाड ! जमिनीखालचा सुरण तयार झाला की नाही हे ह्याच्या पानांच्या स्थितीवरुन तज्ञ लोक सांगु शकतात . 


संधी मिळेल तिथं अगदी जोमानं वाढणारा हा कंदाचा वेल. ह्याची सुकलेली कंद फळे वापरून आणि नारळाच्या थोप्याचा बॅट म्हणुन वापर करुन लहानपणी क्रिकेट खेळल्याच्या कित्येक जणांच्या आठवणी असतील !


विहंगम दृश्य !


आधीचाच वेल  पण आता आभाळाकडं झेप घेणारा !


वाडीत जायच्या पायवाटेवर भाऊंनी लावलेली शोभेची झाडे !



सर्वांची आवडती टगर !



आणि ही अबोली !



आणि ही सदाफुली !


पावसाळ्यातील हिरवीगार तुळस !


मोठीआईच्या सांगण्यानुसार ब्रह्मकमळ ! मागील आठवड्यात ह्याला बरीच फुलं येऊन गेली अशी माहिती तिनं पुरवली. 


बन शब्द खरंतर ज्याच्यासाठी वापरायला हवा ते हे बांबूचं झाड !

कळ्या येणारा गुलाब !


 चिकूचे झाड !



रात्रीच्या वेळी वन्य पशु जिथं पाणी प्यायला येतात तो वळ ! 


No Comments :)



इतका वेळ दुर्लक्षलेली पपई !



दीदीने लावलेलं शोभेचं झाड !



नयनसुख देणारी जास्वंद !



ह्याच नाव विसरलो पण डास ह्याच्या आसपास टिकत नाहीत असं बहुदा ऐकलं होतं . पुन्हा  एकदा तज्ञ  विकास  चौधरी ह्यांचा खुलासा . ह्याच  नाव झिपरी !




कलिका धारण केलेली ही लाल जास्वंद !


पांढराशुभ्र सोनटक्का !

मर्यादित छायाचित्रण कौशल्याच्या आधारावर घेतलेलं सुर्याचं बावखलातील हे प्रतिबिंब ! 




अशी ही पावसाळ्यातील एक सुर्याच्या किरणांशी लपंडाव करणारी वसईतील एक प्रसन्न संध्याकाळ !

(All images are subject to Copyright of the Author)

1 टिप्पणी:

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...