मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

अगम्य , अज्ञात ...

गेल्या रविवारी मन्मथच्या आईवडिलांनी लोकरंगमध्ये मन्मथला पत्र लिहुन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या पत्रातुन बऱ्याच गोष्टी समजल्या किंबहुना बरीचशी गृहितकं बनवली होती ती दूर झाली. त्या पत्रामुळं ही पोस्ट प्रेरित असली तरी ह्या पोस्टचा विषय मन्मथ हा नाहीय. ज्यांच्या बाबतीत ही घटना घडते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशा प्रसंगी डोकावुन पाहण्याचा आपल्या कोणालाच हक्क नाही.  

बऱ्याच वेळा पोस्ट लिहिताना अजाणतेपणी आपणास सर्व काही समजलं आहे आणि आपण वाचकांस उपदेश करीत आहोत अशी भावना निर्माण होण्याची शक्यता असते. बाकी पोस्टच्या वेळी ठीक आहे पण इथं खास खुलासा की अशी भावना अजिबात माझ्या मनात नाहीय. मी केवळ काही ठोकताळे इथं मांडत आहे. आणि ह्या विषयाची व्यापकता लक्षात घेता इथं ह्या विषयातील हे केवळ काही मुद्दे आहेत. 

आपण भोवतालच्या समाजाचे खरोखर घटक आहोत की नाही (Do I really belong here? ) ह्याविषयी प्रत्येक माणसाच्या मनात एक मुलभूत भावना असते. ह्या भावनेच्या आधारे आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या माणसांचं दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल. 

पहिल्या प्रकारातील माणसं, मुलं भोवतालच्या समाजाचे घटक बनण्यासाठी धडपडत असतात. ह्या समाजानं आपल्याला पुर्णपणे स्वीकारावं ह्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली असते परंतु आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे आपण समाजापासुन इतके दूर गेलो आहोत की कितीही प्रयत्न केले तरी ह्या आयुष्यात मुळ प्रवाहात स्वच्छ प्रतिमेसकट येणं अशक्य आहे असा समज त्यांनी करुन घेतला असतो. आणि हा समज दुर करण्यासाठी, त्यांचं म्हणणं ऐकुन घेण्यासाठी त्यांच्याजवळ कोणी श्रोता नसतो. 

आता दुसरा प्रकार ! हा प्रकार असा असतो की बहुदा सामान्यत्वाचा ह्यांना वीट आलेला असु शकतो. ह्यांची बुद्धी प्रखर असण्याची शक्यता अधिक असते. मानवी देह धारण करुन एका आयुष्यात ज्या काही महत्तम गोष्टी साधता येणं शक्य आहे ह्याचं ह्या लोकांनी आपल्या अफाट कल्पनाशक्तीद्वारे चित्र रेखाटून ठेवलं असतं. आणि हे चित्र त्यांना फारसं मोहित करत नाही. संपुर्ण आयुष्य जगुन केवळ इतकंच साध्य करायचं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असं त्यांना वाटत असावं. त्यामुळं ह्या मानवी देहातुन बाहेर पडून त्यापलीकडं जे काही विश्व आहे त्यात आपल्याला आकर्षित करण्यासाठी काही आहे का ह्याचा शोध घ्यावा अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होत असावी. आणि त्यामुळं मानवी देहाचं बंधन झुगारून देण्यासाठी ते हा आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असावेत. इथं माझा एकच मुद्दा - एखादा माणुस कितीही बुद्धिमान असला तरी मनुष्यजातीकडं एकत्रित संघ म्हणुन इतकं ज्ञान आहे की त्या बुद्धिमान माणसाला एक आयुष्य ज्ञानसंपदा आणि त्यातील कण वेचायला कमी पडेल.  

 ह्या विषयावर मित्रगणांशी आणि प्राजक्ताशी चर्चा करताना दोन मुद्दे आले. 
पहिला मुद्दा म्हणजे मैदानी खेळ ! मुलांनी मैदानी खेळ नक्कीच खेळावेत, शारिरीक फिटनेससाठी तर हे महत्त्वाचं आहेच पण त्याहून अधिक म्हणजे पराभव स्वीकारण्याची मानसिक क्षमता विकसित होण्यासाठी हे आवश्यक आहे. सोबत्यांकडुन पराभव स्वीकारावा लागल्यावर कधीमधी खेळकर टोमणे सुद्धा मिळतात. आयुष्यात कणखर बनण्यासाठी पराभवाचे हे डोस अत्यावश्यक आहेत.  
दुसरा मुद्दा ! आईवडिलांपलीकडील इतर नातेवाईकांशी जवळचा संवाद, जवळचं नातं हा एक अजुन एक मुद्दा ! आधुनिक पालकांच्या बालसंगोपनाच्या पद्धतीत बऱ्याच वेळा आढळणारी उणीव म्हणजे  सर्व काही परिपुर्ण आहे असा समज आपल्या पाल्यासमोर उभा करण्याचा अजाणतेपणी प्रयत्न त्यांच्याकडून होतो. कोणतेच पालक इतके समर्थ नाहीयेत की ते आपल्या पाल्याचं संपुर्ण आयुष्य परिपुर्ण करु शकतील. त्यामुळं आयुष्यातील इतर अनुभवांचं ज्ञान ज्यांच्याकडून मिळण्याची शक्यता जास्त आहे अशा नातेवाईकांसोबतचा सहवास महत्त्वाचा ! 

सारांश म्हणजे सामान्यत्वात समावेश होत नसल्याची अतीव खंत अथवा सामान्यत्वाचा उबग आल्यानं विशेषत्वाकडं झेप घ्यायची ओढ  ही दोन प्रमुख कारणे ! आधी म्हटल्याप्रमाणं हे केवळ ठोकताळे! प्रत्येक उदाहरणात प्रत्यक्ष काय घडलं असावं हे इथं बसुन लिहीत असताना समजणं अशक्य आहे. 

1 टिप्पणी:

  1. from manmanth letter it seems that he was extra ordinary intelligent person and always thinking about his own world ,heven and hell.hence it may be possible that he want to see his own world after death what he was predicted.....one of my thought

    उत्तर द्याहटवा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...