मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

किंवा Versus आणि !


मानवी जीवनाशी क्लिष्टता जसजशी वाढत चालली तसतसं माणसाच्या सद्सदविवेकबुद्धीचं काम कठीण होत गेलं. पुर्वी एखादी गोष्ट एकतर चांगली असायची किंवा वाईट! मधली नसायची. त्यामुळं चांगली माणसं चांगल्या गोष्टी करत, वाईट माणसं वाईट गोष्टी करत. आळशी माणसं आळस करीत आणि उद्योगी माणसं कामात गर्क राहत. म्हणजे तुम्ही एकतर चांगले असायचात किंवा वाईट! उद्योगी असायचात किंवा आळशी !
आयुष्य कसं सोपं असायचं. म्हणजे एकदम सोपं नसायचं .. कधी काय व्हायचं की माणसाच्या आयुष्यात एखादी मोठी घटना घडायची आणि मग एखादा वाईट माणुस अचानक सुधारायचा आणि चांगला बनायचा वगैरे वगैरे !

पुढे काळ बदलला, तंत्रज्ञान विकसित झालं, यश आणि पैसा ह्यांच्या व्याख्या एकत्रित होऊ लागल्या आणि मग सगळ्या गोष्टीतील सीमारेषा धुसर होऊ लागल्या. चांगुलपणा, उद्योगीपणा, हुशारी हे गुण आपल्याजवळ असणं किंबहुना त्याचा भास निर्माण करणं आवश्यक आहे ह्याची जाणीव सर्वांना झाली. चांगुलपणाच्या वर्तुळात खरोखरीची चांगली माणसं आणि चांगुलपणाचा भास निर्माण करणारी माणसं एकत्र आली. तीच गोष्ट बाकी सर्व सद् गुणांच्या  बाबतीत झाली.  त्यामुळं मग ह्या गुणांच्या ठिकाणी गर्दी झाली. मग तिथं आधीच वास्तव्य करणारी माणसं गोंधळून गेली. पुर्वी त्यांना ह्या गुणांच्या शुद्ध रुपात यश साध्य करता यायचं. आता केवळ यश पुरेसं नसुन त्याचं पैसा मिळविण्याच्या क्षमतेत रुपांतर करणंसुद्धा त्यांना आवश्यक वाटू लागलं. मग काही काळापुरता ही मंडळी सद् गुणांचे वर्तुळ सोडुन आपला कार्यभाग आटपुन परत स्वगृही परतु लागली. म्हणजे काय झालं की किंवा  चे रुपांतर आणि / हे सुद्धा मध्ये झालं.  

हे सर्व सुचायचं कारण की एका Leadership प्रशिक्षणात Or Versus Both/And  ह्या तत्वाची ओळख करुन देण्यात आली. कार्यालयात तुम्हांला तुमच्या दररोजच्या कामाचा रगाडा तर वाहायचा आहेच पण त्याच वेळी तुम्हांला नवीन तंत्रज्ञानसुद्धा आत्मसात करायचं आहे. बऱ्याच वेळा तुम्हांला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. तुमच्या समोरील असलेल्या दोन पर्यायातील कोणता एक बरोबर नसतो; दोन्हीतील चांगल्या गोष्टी निवडुन पुढं जायची तारेवरची कसरत तुम्हांला पार पाडायची असते. ह्या उदाहरणांद्वारे मला पहिल्या परिच्छेदातील वागण्याचं समर्थन करायचं नाहीय. पण त्यामागची मानसिकता विशद करायची आहे. हीच गोष्ट तुमच्या मुलांच्या संगोपनात सुद्धा लागु होते. संस्कृतीचं शिक्षण आणि आधुनिकतेशी जोड ह्यांचा शक्य तितका योग्य मिलाफ तुम्हांला घालायचा असतो. 

हे सर्व काही ठीक पण एकंदरीत मनुष्यजमातीच्या उत्क्रांतीच्या दृष्टीनं विचार केलात तर एक चिंतेची बाब नकळत घडत आहे. चांगुलपणाच्या व्याख्येच्या शुद्धतेचे  Baseline (पायाभुत पातळी) काहीशी धुसर होत आहे. म्हणजे समजा आमच्या पिढीनं जी काही चांगुलपणाची शुद्धता लहानपणी पाहिली त्यात काही प्रमाणात तडजोड करण्याची मानसिकता आम्ही दाखविली. ह्या तडजोडीनंतर नवनिर्मित अशी शुद्धता आताच्या पिढीची मुलभूत पातळी बनली. आणि ह्या शुद्धतेच्या विरळीकरणाचा वेग झपाट्यानं वाढला. 

आपल्या पुर्वजांनी कलियुग येणार असं म्हणुन ठेवलं आहे. ते काही अचानक एके दिवशी उजाडणार नाही. शुद्धतेच्या पायाभुत पातळीच्या विरळीकरणाची प्रक्रिया हळुहळू हे कलियुग आपल्या भोवती आपल्या नकळत आणुन ठेवत आहे. आणि आपण मात्र आपल्याला Both / And चा Concept समजला म्हणुन मनातल्या मनात आनंदी होत आहोत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...