मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

आम्ही शिफ्ट होतोय !


कालच आम्ही नवीन ऑफिसात स्थलांतर केलं. व्यावसायिक जगात भावनाविवश वगैरे कोणी होतं नाही पण आठवणी मात्र कोठंतरी जाग्या होतात. आमच्या ऑफिसात लोकांच्या Work Anniversary वगैरे साजऱ्या होताना ह्या माणसानं ह्या कंपनीत प्रवेश केला त्या वेळचं तंत्रज्ञान कसं होतं ह्याची आठवण सांगायची पद्धत आहे. अमेरिकेतील ऑफिसात लोक ३० - ३५ वर्षे आहेत त्यामुळं त्यांनी कंपनी जॉईन केली तेव्हा नुकताच मोबाईल आला वगैरे आठवणी सांगितल्या जातात. आम्ही इतके जुने नाही आहोत. पण हे ऑफिस बदलताना गेल्या सात वर्षातील आठवणी मात्र नक्कीच जागृत झाल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे सात वर्षांपुर्वी आपण व्यावसायिक शिडीवर कोठे होतो, सध्या कोठे आहोत ह्याचं आपसुकच मनानं विश्लेषण केलं. 

नवीन ऑफिसात जरा वेगळी संरचना आहे. आधी असलेली Cubicle संरचना बदलुन टाकुन सर्व काही मोकळं मोकळं करण्यात आलं आहे. आपल्या वरिष्ठतेचा चुकून तुम्हांला आभास झाला असेल तर तो आपोआप दुर होण्यास ह्या संरचनेमुळं मदत होते. आणि मुख्य म्हणजे आपल्या ऑफिसातील चोपड्या, कागदावळी ठेवण्यास अगदी मोजकी जागा पुरविण्यात आली आहे. त्यामुळं गेल्या आठवड्यात मागील सात वर्षात जमलेल्या सर्व कागदपत्रांची बऱ्यापैकी विल्हेवाट लावावी लागली. जी कागदपत्रे shred करण्याचा निर्णय घेण्यास गेली सात वर्षे चालढकल केली होती त्यांचा निर्णय एका मिनिटात घेतला गेला किंवा घ्यावा लागला. "तु काही न घेता आला आहेस आणि काही न घेता जाणार आहेस !" ह्या आयुष्यातील एका महत्वाच्या तत्त्वाची ह्या निमित्तानं आठवण झाली.  

काळ बदलत चालला आहे हे खरं ! पण आपण दोन वेगळ्या विश्वात वावरताना दिसत आहोत. शहर आणि गांव ह्या दोन ठिकाणी हा फरक अगदी प्रकर्षानं जाणवतो. मुंबईतील लोकांची मानसिकता हळुहळू सदैव बदलांसाठी अनुकूल अशी होत चालली आहे आणि त्यामुळं खास करुन नवीन पिढीला कोणत्याही गोष्टीविषयी फारसे भावबंध निर्माण होताना दिसत नाही. सतत नवीन विश्वाशी Catch up करण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. ह्याउलट गावात अजुनही अशी पिढी आहे जिनं आपलं संपुर्ण आयुष्य एका विशिष्ट पद्धतीनं व्यतित केलं आहे. आपल्या तत्त्वांशी, संस्कृतीशी असलेली पाळंमुळं अगदी घट्ट पकडुन ठेवली आहेत. शहरांतील लोकांना हे करायचं नाही असं नाही पण ते बाह्य परिस्थितीपुढं हतबल आहेत. सतत बदलाला तोंड देण्यासाठी त्यांना सदैव झटत राहावं लागतं. 

शहर असो वा गांव ! दोन्ही ठिकाणच्या जीवनपद्धतीत काही सुखद घटक आहेत तर काही प्रतिकुल ! जे काही चांगलं आहे त्याची जाणीव ठेवणं आणि जीवनमार्गात चालताना त्यातील जमेल तितकं वेचुन घेणं हेच आपल्या हाती आहे. जाता जाता MT च्या सात वर्षांच्या आठवणींना सलाम ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...