मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

या चिमण्यांनो परत फिरा रे !


आमची गॅलरी चिमण्यांना आवडते असं दिसतंय. हल्ली पहाटे लवकर उजाडत असल्यानं सव्वा सहाच्या सुमारास येऊन त्या चिवचिवाट करू लागतात. चिमण्यांच्या चिवचिवाटाने येणारी जाग एक प्रसन्नतेची चाहुल घेऊन येते. असंही सकाळची वेळ  रात्री झोपताना मनात असलेल्या चिंता दुर सारण्याची क्षमता बाळगुन असते, त्यावर हा चिमण्यांचा चिवचिवाट एक प्रसन्नतेचा शिडकावा पसरवुन जातो.  हिवाळ्यात ज्या वेळी ह्यांना थंडी वाजत असे (हा माझा कयास!) त्यावेळी त्यातील चिमणी बराच वेळ एका जागी बसुन समोरील झाडांकडं पाहत समाधिस्थ होत असे.  हा फोटो ज्यावेळी फेसबुकवर टाकला त्यावेळी मित्रानं 'कधी तिने मनोरम रुसणे' अशी टिपण्णी केली ज्यामुळं ह्या सुप्रसिद्ध काव्यपक्तींना उजाळा मिळाला! 

कधी तिने मनोरम रुसणे

कधी तिने मनोरम रुसणे

रुसण्यात उगिच ते हसणे
रुसण्यात उगिच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
म्हणून ते मनोहर रुसणे

पुरुषांच्या मनात ज्या काही मोजक्या गोष्टींची दहशत असते त्यात ह्या तथाकथित रुसण्याचा अग्रक्रम आहे. ह्याची प्रामुख्यानं दोन कारणं! हा रुसवा निर्माण होण्यास आपण कसे कारणीभुत आहोत ह्याचा बहुतांश वेळी अजिबातच थांगपत्ता नसणे हे पहिलं आणि हा रुसवा दुर करण्याचे आपण जे प्रयत्न करीत आहोत त्यामुळं हा रुसवा अधिकच वाढत जातो ह्याचा पुरुषांनी घेतलेला धसका! त्यामुळं ह्या रुसण्याकडं पुर्णपणे दुर्लक्ष करण्याचं धाडस जे पुरुष दाखवतात त्यांना माझा सलाम! वरच्या छायाचित्रातील चिमणा बहुदा त्याच वर्गातील असावा !

हे सर्व काही प्रसन्न असताना ह्या आठवड्यात टाइम्स मध्ये एका कोपऱ्यात एक दुःखद बातमी आली.  मध्य प्रदेशात आलेल्या अवकाळी वादळी पावसानं भरोली आणि अमायान गावांतील सात किलोमीटर पट्ट्यात हजारो चिमण्या मृत्युमुखी पडल्या. बहुदा ह्या अचानक आलेल्या पावसानं त्यांना आडोश्याला जाण्याची संधीच मिळाली नाही! बातमी वाचुन झालेल्या तीव्र दुःखाचा  जीवनरगड्याच्या संघर्षात काही तासांतच विसर पडला. अवकाळी पावसानं उद्ध्वस्त झालेल्या शेतांच्या / संसाराच्या बातम्या वाचुन त्या शेतकऱ्यांच्या विषयी आपल्या मनात क्षणभर तरी अनुकंपा निर्माण होत असावी का हा प्रश्न निर्माण व्हावा इतके आपण असंवेदनशील बनलो आहोत, तर ह्या बिचाऱ्या चिमण्यांच्या जीवाचं काय? 

ही बातमी वाचल्यानंतर मुंबईच्या काँक्रीट जंगलात आपला निवास शोधणाऱ्या आमच्या चिमण्यांकडं पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. त्यांना हिरव्यागार शेतात दाणे टिपायला मिळत नाही ह्याचं मला आधी दुःख वाटत असे. आता मात्र किमान त्या ह्या काँक्रीट जंगलात आपला जीव सुरक्षित ठेवू शकतात असं वाटुन गेलं. गावातली माणसं काय किंवा चिमण्या काय त्यांच्या व्यथा सारख्याच! जगाच्या काही भागात माणसांची चिमणी बाळे सुद्धा हकनाक आपला जीव गमावुन बसताहेत! त्यांच्याविषयी आपली अनुकंपा जर का असेल तर तिलासुद्धा  आपला जीवनरगड्याचा संघर्ष अल्पकालीन ठरवत आहे किंबहुना जीवनरगड्याचा संघर्ष ही ढाल पुढं करून आपण अधिकाधिक स्वकेंद्रित बनत चाललो आहोत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

या चिमण्यांनो परत फिरा रे !

आमची गॅलरी चिमण्यांना आवडते असं दिसतंय. हल्ली पहाटे लवकर उजाडत असल्यानं सव्वा सहाच्या सुमारास येऊन त्या चिवचिवाट करू लागतात. चिमण्यांच्या चि...