मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३० जून, २०१८

वसंतास पत्र!




चि. प्रिय वसंतास,
सप्रेम आशिर्वाद. 

तुझं कॉलेज सुरु होऊन एव्हाना एक महिना होत आला. आताशा तुझं तिथं नीटसं बस्तान बसलं असावं. हल्लीच्या काळात पत्रलेखनाचा प्रकार मागे पडला आहे.  त्यामुळे हॉस्टेलवर माझे हे पत्र बघुन तुझ्या मित्रमंडळींना काहीसं आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. मी सध्या भ्रमणध्वनीचा वापर कसा करायचा हे शिकण्याच्या प्रयत्नात आहे. ते जमलं की मी तुला नक्कीच त्या माध्यमातून संपर्क करीन. परंतु पत्रलेखनाचा गोडवा काही वेगळाच! या माध्यमातुन ज्या व्यक्तीने आपल्याला पत्र लिहलं आहे ती व्यक्ती आपल्या जवळपासच वावरत आहे असा भास होतो. 

इथं यंदाच्या वर्षी पावसाला उत्तम सुरुवात झाली आहे. आपल्या शेतात सुद्धा पेरणीची कामं जोराने चालू आहेत. पावसानंतर कोकणातील विहंगम निसर्गाची तुला नक्कीच आठवण येत असावी. परंतु तु ज्या कार्यासाठी ज्या ध्येयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आला आहेस त्यावर तु लक्ष केंद्रित केलं आहे असा तर्क आम्ही काढला आहे. तु तसा जिद्दी आहेस आणि ह्याचा आम्हांला अभिमान आहे! 

मुंबईमध्ये पावसाळ्यात विविध प्रकारचे रोग थैमान घालतात. लेप्टोस्पायरोसिस, डेंगू यासारखे आजार हे अस्वच्छ पाणी आणि मच्छर यांच्या उपद्रवामुळे होतात. त्याविषयी थोडी जाणीव बाळगणे आणि काळजी घेणे हेच सर्वात उत्तम!! साचलेल्या पाण्यातून पायी चालणे टाळणे उत्तम! मच्छरदाणी लावणे हा काहीसा जुनाट प्रकार मानला जात असला तरी सुद्धा डासांपासून संरक्षणांसाठी हा उपाय उत्तम आहे. मित्रमंडळींना मच्छरदाणीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित कर! आपल्या भोवतालच्या मंडळींना एखाद्या योग्य गोष्टीसाठी प्रवृत्त करणे ही कला भविष्यातील आयुष्यात तुला उपयोगी पडेल. 

शहरातील महाविद्यालयातील शिक्षणपद्धती हे आत्तापर्यंत तू अनुभवलेल्या शिक्षणाच्या पद्धतीपेक्षा काहीशी वेगळी असणार. तिच्याशी जमवून घेण्यासाठी थोडा वेळ लागला तरी हरकत नाही. आपल्या भोवतालच्या मित्रमंडळींसोबत आपण ज्या गोष्टीत काहीसे अडखळलो आहोत त्या गोष्टींविषयी चर्चा करण्यास करण्यात काहीही गैर नाही. याप्रकारे आपण वैचारिक वैविध्य अनुभवतो आणि एखादा चांगलं उत्तर मिळण्याची शक्यता वाढीस लागते!

बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळण्याचा कल तू दर्शविला आहेस.  खरं सांगायचं तर या विषयात मला फारसं काही कळत नाही. शेजारचे जंजिरे गेल्या रविवारी घरी आले होते. त्यांचा मुलगा पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजातून शिक्षण पूर्ण करून नोकरीस लागला आहे. त्यांनी चर्चेमध्ये काही उत्तम गोष्टींचा उल्लेख केला. सध्याची परिस्थिती पाहता कोणती  एक अभियांत्रिकी शाखा पुढील अनेक वर्ष मागणीत राहील असं छातीठोकपणे कोणीच सांगू शकणार नाही असं ते म्हणाले. परंतु एक गोष्ट मात्र खरी आपण जी कोणती शाखा निवडू त्यात सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न कर! हा दृष्टिकोनच तुला आयुष्यात उपयोगी पडेल!!

तुझ्या आयुष्यातील पुढील काही वर्षे महत्वाची असणार आहेत. तसं म्हणायला गेलं तर सर्वांना आयुष्यभर मेहनत करावी लागते परंतु महाविद्यालयीन जीवनात केलेली मेहनत तुम्हाला तुला एका योग्य दिशेने प्रवास सुरू करण्यास मदत करु शकते. मी माझं पुर्ण आयुष्य शेतीमध्ये घालवलं आहे. कोकणासारख्या निसर्गरम्य परिसरात शेती उद्योगांवर उपजीविका करण्यासारखा आनंद नाही. आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या की जीवन सुंदर भासू शकते. ही झाली जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी! दुसऱ्या दृष्टीने पाहायचं झालं तर कोकणापासून काही तासांच्या अंतरावर मुंबईसारखी सर्व प्रकारच्या उत्कर्षाच्या संधी  उपलब्ध करून देणारी महानगरी आहे. या शहराने उपलब्ध करून दिलेल्या संधींचा वापर करुन आपल्या आयुष्याला कलाटणी देता येते. कोकणातील आयुष्य की मुंबईतील आयुष्य याविषयीचा निर्णय तू तुझ्या आयुष्याच्या विविध वळणांवर घेऊ शकतोस.  परंतु एकंदरीत शिक्षण प्राप्त करून घेतल्यानंतर जर  तू हा निर्णय घेतला तर ते योग्य राहील असं माझं वैयक्तिक मत!

मुंबई शहर तुझ्यासमोर असंख्य आकर्षणे उभी ठेवेल. ह्या आकर्षणांपासून दूर राहून आपलं कर्तव्य बजावणं हे काही प्रसंगी कठीण होऊ शकते. या गोष्टीमध्ये आपली संगत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तू आता मोठा झाला आहेस आणि तुझ्या प्रत्येक निर्णयात आमचा सहभाग असावा असे आम्ही बंधन घालून देणार नाही. परंतु ज्या क्षणी तुला आमच्या सल्ल्याची आवश्यकता वाटेल त्यावेळी नक्कीच आम्ही तुझ्यासाठी उपलब्ध असू. 

आईला तुझी खुप आठवण येते. फोनवरुन तुझा आवाज ऐकून तिचं थोडफार समाधान होतं. जेवणाची व्यवस्थित काळजी घेत रहा. बाहेर कितीही चमचमीत पदार्थ उपलब्ध असले तरी ते वारंवार खाऊ नयेत.  आपल्या तब्येतीचे बरेचसं नियंत्रण आपला आहार करतो. त्यामुळे नियमित आहार ठेवत जा. पावसाळ्यामध्ये उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळत जा. आपल्या गावाकडे रात्री लवकर झोपून सकाळी अभ्यासाला उठण्याची तुझी सवय आहे.  ती सवय जमेल तितकी चालू ठेव.  अभ्यासासाठी सकाळच्या वेळेसारखी प्रसन्न वेळ नाही. ह्या वेळी एकाग्रता सुरेख होते. ही सवय मुंबईत चालू ठेवण्यासाठी तुझ्या रुम पार्टनरच्या अभ्यासाच्या वेळा त्याच्याशी मिळतीजुळत्या असणं काहीसं आवश्यक असतं. याबाबतीत आवश्यक असल्यास त्याच्याशी चर्चा कर. काही बाबतीत आपण बदलायचं आणि काही बाबतीत त्याला बदलाची विनंती करायची. 

मुंबईतील गणेशोत्सव हा फार नावाजलेला आहे. हा गणेशोत्सव पाहण्यासाठी दुरवरुन लोक येतात. तुझ्या मनातसुद्धा मुंबईतील गणेशोत्सवाविषयी उत्सुकता असेलच. आपल्या कोकणात सुद्धा थोड्या दिवसातच गणपतीचे वारे वाहू लागतील. तुझ्या महाविद्यालयाला गणपतीच्या काळात पाच-सहा दिवस सुट्टी असावी अशी आम्हाला आशा आहे.  तसे असल्यास तु गावाला यायचा प्रयत्न कर. 

सतत अभ्यास करुन जर कंटाळा आला तर मित्रांसोबत मुंबईदर्शन सुद्धा कर! मुंबई ही एक मोठी नगरी आहे आणि त्यात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. 

बाकी आम्ही सर्व ठीक आहोत. मी ज्यावेळी शहरात शिकण्यास गेलो होतो त्यावेळी मनीऑर्डरची वाट पाहायचो. हल्ली तो प्रसंग येत नाही.  तरीसुद्धा कधी अचानक पैशाची गरज लागली तर तसे कळव! मी भ्रमणध्वनीच्या शिक्षणामध्ये पैसे नेट बँकिंगच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यास शिकत आहे. 

तु सुद्धा आम्हाला पत्रांना उत्तर द्यायचा प्रयत्न कर !


सर्व मित्रमंडळींना प्रणाम व आशीर्वाद.
रत्नाकर !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...