मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २४ जून, २०१८

मनःशांती



मान्सुनपुर्व पावसाच्या सरी आणि खरा मान्सुन यांच्यातला गोंधळ काल संपला असावा. ज्याप्रकारे पाऊस पडत होता त्यावरुन खरोखरीच्या मान्सुनला काल सुरुवात झाली असावी असं म्हणायला हरकत नाही. वातावरणात छानसा गारवा आला होता आणि त्यामुळे मन शांत काहीसं झालं. आणि मन शांत झालं की मग चांगले विचार येतात.  थंडावा अनुभवताना मागच्या डिसेंबरातील अमेरिकावारीची आणि तिथल्या थंडाव्याची आठवण झाली. 

२००१ ते २००७ या कालावधीत बराचसा वेळ अमेरिकेत व्यतित केला होता. २००५ नंतर व्यवस्थापकीय भूमिका बजावताना काही जेष्ठ अमेरिकन व्यवस्थापकांशी जवळून संपर्क आला होता. या सर्वांची दैनंदिन जीवनशैली ऐकून आणि काही प्रमाणात प्रत्यक्षात बघून थोडीफार समजून घेतली. या सर्वांतील महत्त्वाचा घटक म्हणजे ही लोकं जमेल तितका जीवनात शांतपणा ठेवण्यासाठी प्रयत्न करतात असं मला वाटलं. आधी म्हटल्याप्रमाणे हे सर्व जेष्ठ अमेरिकन व्यवस्थापक असल्यामुळे त्यांच्या बाबतीत आलेला अनुभव खरोखर संपुर्ण अमेरिकन जीवनसरणीचे प्रतिनिधित्व करेल असं मी म्हणणार नाही.  तरीदेखील त्यांच्या काही गोष्टी मला खूप आवडल्या.  सकाळी आठ वाजताच्या सुमारास ऑफिसात पोहोचणार. आठ ते चार किंवा आठ ते पाच या वेळात झपाटून गेल्यासारखं काम करणार आणि मग पाच वाजता उगाचच ऑफिसात न रेंगाळता थेट आपल्या घरी पोहोचणार. शांतपणे सहा-साडेसहा वाजता रात्रीचे जेवण आटपून निद्राधीन होणार ही अशी त्यांची जीवनशैली होती. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे डिसेंबरातील अमेरिका भेटीत कोलंबस इथे माझ्या अमेरिकन व्यवस्थापकासोबत मी एका हॉटेलात थांबलो होतो.  त्याच्याबरोबर ऑफिसात जाण्या-येण्याची सोय असल्यामुळे औपचारिकतेची काही पुटं काही काळापुरता गळून पडली होती.  त्यामुळे रात्रीच जेवण सुद्धा त्याच्यासोबत एक-दोन वेळा हॉटेलात घेतले.  त्यावेळी सहा-साडेसहा वाजताच्या रात्रीच्या जेवणाची पुन्हा एकदा आठवण झाली आणि ते अनुभवलं सुद्धा!! आणि त्या भागातील हवामान सुद्धा ह्या शैलीला अनुकूल होते. संध्याकाळी पाच वाजता अंधार होत असल्यामुळे आणि कडाक्याची थंडी असल्यामुळे लवकर झोपण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण होत असे. 
आता हे सर्व अनुभवताना शांततेसोबत एका श्रीमंतीचासुद्धा अनुभव येतो. ही सर्व उच्च दर्जाची हॉटेल्स, तिथे उपलब्ध असलेल्या उच्च दर्जाच्या सोयीसुविधा, हॉटेल्सच्या रेस्टॉरंटमध्ये पार्श्वभूमीवर वाजणारे  मंद असे संगीत ह्या सर्वांमुळं एकंदरीत आपल्याला जीवनाविषयी बरं वाटायला लागतं. आपण आपल्याला काहीसे कोणीतरी समजायला लागतो. अशावेळी मग एखादा जिवलग मित्र आपल्या गावापासून हजारो मैलावर भेटतो आणि मग गप्पा रंगतात. 

ह्या सर्व गोष्टींमुळे मग २००७ सालापर्यंतच्या वास्तव्याची आठवण आली. 
वास्तव्याच्या काळात शेवटचे काही महिने एक संभ्रम निर्माण झाला होता. हे सर्व सुख महत्त्वाचे की आपले जिव्हाळ्याच्या लोकांमध्ये संघर्षाचे जीवन महत्त्वाचे. त्यावेळी भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता तो योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा इथे प्रयत्न करणार नाही. परंतु तिथलं हे सुख एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आम्हांला झेपलं नव्हतं हेच खरं!

आता वळुयात ते कालच्या विचारांकडे!! पावसाने निर्माण झालेल्या थंडाव्यात मन बराच विचार करत होतं. आपल्याकडे वातावरणात थंडावा नसतो, सर्वच धूळ असते, सर्वत्र गर्दीचे वातावरण आहे, ट्रॅफिक जॅम असतात आणि आपल्या कार्यालयीन वेळा खूप रात्रीपर्यंत असतात.  आपण संध्याकाळी साडेसहा वाजता रात्रीच्या जेवणाऐवजी दिवसातला चौथा पाचवा चहा ढोसत असतो. या सर्व घटकांमुळे आपलं मन एका विचलित स्थितीत जात असावं. त्यामुळे रात्री नऊ-दहा वाजता घरी परतल्यावरसुद्धा एकदम शांत स्थितीत जाण्यास हे मन तयार नसतं. आपण वायफाय वापरून डेटा अधाशासारखा भक्षण करीत राहतो. आपल्या वार्षिक सुट्ट्यासुद्धा दूरच्या ठिकाणी असतात. जिथे पोहोचेपर्यंत आपण फार मोठी कार्बन फूटप्रिंट निर्माण करतो. प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यातील आपले क्षण फार कमी असतात. 

हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या मनाला शांततेचे फार मोजके क्षण देत असतो. आपण ज्या प्रकारची शहरातील जीवन संस्कृती गेल्या काही वर्षात विकसित केली आहे, ती एक समाज म्हणून आपल्या प्रगतीच्या या टप्प्यापर्यंत ठीक होती. परंतु समाजातील ज्या लोकांनी प्रगतीचा हा टप्पा गाठला आहे त्या लोकांनी दैनंदिन जीवनात मनःशांतीचे क्षण कसे आणता येतील याचा विचार करणे आवश्यक आहे. ही भोगवादी संस्कृती एका धोकादायक वळणाकडे पोचत आहे. आक्रस्ताळेपणाने बातम्या देणारे निवेदक, सहावा चेंडू टाकला जात नाही तितक्यात झपाट्याने आपल्यावर जाहिरातीचा मारा करणाऱ्या वाहिन्या या सर्व गोष्टी या जगात सर्वत्र अस्तित्वात नाहीयेत त्या आपणच विकसित केल्या आहेत आणि आपण त्या अजुन भयानक रुपाकडे नेत आहोत.  

पाऊस पडला, वातावरणात थंडावा आला की तेलकट, तिखट खाऊन मदिराप्राशन हा एक उपलब्ध पर्याय असला तरी मंद दिव्याच्या प्रकाशात शांत शास्त्रीय संगीत ऐकणं हा सुद्धा एक पर्याय असु शकतो ह्याची जाणीव ठेवा. मनाला शांत क्षणांची सवय असु द्यात नाहीतरी कायमस्वरूपी मानसिक अस्वास्थाकडे आपली वाटचाल अटळ आहे. 

अमेरिकेच्या मागील भेटीतील काही शांत क्षण!! 




































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...