सरकारने कायदे बनवायला सुरु केल्याच्या काळापासूनचे सर्व कायदे पाळण्याची जबाबदारी आपली आहे असे मानणारा वर्ग महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. साधारणतः सरकार जे काही कायदे बनविते त्यांचा आणि सर्वसामान्यांचा क्वचितच संपर्क येतो. परंतु २३ जून २०१८ हा दिवस मात्र येणाऱ्या भविष्यकाळात सर्वांच्या लक्षात राहणारा असेल. गेले एक दोन पिढ्या बाजारात जाताना लागलेली प्लॅस्टिक बॅग्सची सवय आता मोडुन काढावी लागणार आहे.
माणसं बाजारात जाताना भाजी खरेदी आणि मासे मटण खरेदी अशी दोन उदात्त ध्येयं डोळ्यासमोर ठेवून जातात. भाजीखरेदीच्या वेळी निर्माण होणारा पेचप्रसंग कप्पेवाली कापडी पिशवी बनवुन किंवा घरी येऊन भाज्यांचे वर्गीकरण करुन सोडवता येण्यासारखा आहे. परंतु मासे -मटण खरेदीसाठी थेट कापडी पिशवी वापरणे व्यवहार्य नाही. अशावेळी घरोघरी चिकन, मटण , मासे ह्यांच्यासाठी वेगवेगळे डबे अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यातील काही प्रसंगांचं हे काल्पनिक चित्रण. बहुतांशी प्रसंगात दोन शेजारणी आपल्या तिसऱ्या शेजारणीविषयी प्रत्यक्षात किंवा Whatsapp वर बोलत असल्याचं कल्पित करण्यात आलं आहे.
१>
पहिली शेजारीण - "अगं ऐकलं का शेजारचे पाटील आज स्टीलचा मोठा डबा घेऊन गेले. दोन किलो चिकन मावेल त्याच्यात !"
दुसरी शेजारीण - "आज पाव्हणे येणार असतील !!"
२>
पहिली शेजारीण - "त्या सावेंकडे म्हणे चिकन, मटण, माशाला एकच स्टीलचा डबा वापरतात."
दुसरी शेजारीण - "आमच्याकडं असला प्रकार नाही चालत ! आम्ही अगदी चिकन, मटण, कोळंबी, पापलेट सर्वांचे वेगवेगळे डबे बनविले आहेत !!"
३>
पहिली शेजारीण - " आज नेमके मी स्टीलचा डबा बाजारात न्यायचे विसरले. झाली ना मोठी पंचाईत !"
दुसरी शेजारीण - "अय्या मग काय केलं?"
पहिली शेजारीण - "करणार काय!! मग काय बाजुला मस्त्यगंधा स्टील रेंटल एजन्सी मध्ये गेले ! आधार कार्ड क्रमांक देऊन प्रतिदिनी २५ रुपये भाड्यानं स्टीलचा डबा घेतला आणि मासे आणले!
दुसरी शेजारीण - "डबा चांगला आहे का?"
पहिली शेजारीण - "हो ना !! पण भरभक्कम डिपॉसिट घेतलं मेल्यांनी ! डब्बा परत नेऊन दिला की उरलेली रक्कम बँक खात्यात जमा होणार !
४>
पहिली शेजारीण - " अग काल कुलकर्णीकडचं बारसं कसं झालं?"
दुसरी शेजारीण - काहीसं फणकारून "झालं ठीक!"
पहिली शेजारीण - "का ग!! काय झालं !"
दुसरी शेजारीण - "अग रिटर्न गिफ्ट म्हणुन मीच पंडितांना दिलेला स्टील डब्बा काल मलाच परत मिळाला !!"
५>
पहिली शेजारीण - "नाईकांनी म्हणे नवीन कार घेतली!"
दुसरी शेजारीण - "का नाही घेणार? चार गाड्या घेतील आता!"
पहिली शेजारीण - प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहते !!
दुसरी शेजारीण - "त्यांच्या जावयांचं स्टीलच्या डब्यांच्या विक्रीचे आणि भाड्यानं द्यायचं दुकान आहे !!
६>
पहिली शेजारीण - "ती डिसोझा म्हणे हल्ली नवनवीन साड्या नेसून मासळीबाजारात जाते "
दुसरी शेजारीण - "जाईल थोडे दिवस, येईल पुन्हा मार्गावर !"
पहिली शेजारीण - प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहते !!
दुसरी शेजारीण - "दररोज फेसबुकावर फोटो टाकायचे असतात ना ! स्टेटससहित - "Buying Bombil in Steel Dabba, Also note my kanjivaram saree !!
पहिली शेजारीण - "अरे मला कसं नाही सुचलं !! आताच तीन चार नवीन साड्या घेते मी !!"
थोडक्यात सांगायचं झालं तर पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असणारा हा निर्णय आपल्या सामाजिक जीवनातसुद्धा बदल घडवून आणणार आहे. ह्या निर्णयामुळं काही आर्थिक संधी उपलब्ध होणार आहेत. कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या युवकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा