तुमच्या कळत नकळत तुमचं आयुष्य घडत असतं किंवा व्यतित होत असते. आयुष्य घडणे किंवा व्यतित होणे यामधील फरक काय असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. आयुष्य दोन प्रकार जगता येतं. पहिलं म्हणजे एक दीर्घ पल्ल्याचे उद्दिष्ट ठरवुन त्याचा पाठपुरावा करीत आयुष्य जगणं किंवा घडवणं आणि दुसरं म्हणजे आला दिवस घालवणं आणि अशी दिवसांची बेरीज करत आयुष्य व्यतित करणे.
प्रत्येकाला दीर्घ पल्ल्याचे उद्दिष्ट असणं अनिवार्य नाही. तुम्ही आला दिवस जसा तुमच्यासमोर उभा ठाकेल तसा घालविणे यात आनंदी राहू शकत असाल तर त्यात काहीही चुक नाही. परंतु जर तुम्ही आला दिवस ढकलणे या पद्धतीने आयुष्य जगत असाल आणि त्यामुळे जर तुम्हाला खंत वाटत असेल तर मात्र तुम्हाला काहीतरी उपाय योजणे आवश्यक आहे.
जीवनातील संघर्षाचे प्रमाण ज्यावेळी वाढत जाते त्यावेळी प्रत्येक दिवस यशस्वीरित्या पार पाडणे हेच एक मोठे दिव्य बनुन जाते. त्यामुळे जीवनातील दीर्घ पल्ल्याची जी काही उद्दिष्टे आपण डोळ्यासमोर ठेवली असतात त्यांचा पाठपुरावा दैनंदिन जीवनात करणे जवळपास अशक्यप्राय होऊन जाते. त्यामुळे बाह्य जगताने प्रभावित केलेल्या घटकांनी तुमचा दिवस निघून जातो. दिवसांचे परिवर्तन महिन्यांमध्ये, महिन्यांचे वर्षांमध्ये होत राहते आणि आयुष्यातील महत्त्वाची वर्ष कशी निघून गेली हे तुम्हाला समजत नाही.
बाह्य जगतातील घटक हे तुम्हांला कशाप्रकारे प्रभावित करतात हे पाहणे मनोरंजक होऊ शकते. वानगीदाखल मुंबईतील एखाद्या व्यावसायिकाचे दैनंदिन आयुष्य पाहुयात. त्याचे आयुष्य प्रभावित करणारे तीन घटक असतात. पहिलं म्हणजे त्याचं घर आणि सोशल मीडियावरील त्याचा अवतार. दुसरा घटक म्हणजे त्याचं घर ते कार्यालय हा प्रवास आणि तिसरा म्हणजे त्याचे कार्यालयीन आयुष्य. पहिल्या घटकांमध्ये असे आढळून येते की सोशल मीडियावरील तुमची थोडी देखील चांगली गोष्ट अगदी भव्यदिव्य रूपात प्रशंसित केली जाते आणि तुम्हाला कडवट गोष्टी आशा फारशा ऐकवल्या जात नाहीत. तुमच्या दैनंदिन प्रवासात तुम्ही एका महासागराचे भाग असतात आणि तिथे तुम्हाला वास्तवाची सदैव जाणीव करून दिली जाते. तिसरा भाग म्हणजे कार्यालयीन आयुष्य! इथं तुम्हाला प्रशंसा कमी आणि परीक्षण जास्त असला प्रकार अनुभवायला मिळतो.
आता दीर्घ पल्ल्याची उद्दिष्ट आणि हे तीन घटक यांचा संबंध काय असा विचार येण्याची शक्यता आहे. समजा तुमच्याकडे दीर्घ पल्ल्याची उद्दिष्ट शब्दरुपात बसवलेली आहेत तर तुम्ही पहिला टप्पा पार केला असे म्हणता येईल. दुसरा टप्पा म्हणजे तुमची या दीर्घ पल्ल्यांच्या उद्दिष्टांप्रति असलेली निष्ठा!! दैनंदिन जीवनातील तुमच्या आसपास वावरणारा प्रत्येक घटक हा तुमची दीर्घ पल्ल्याच्या उद्दिष्टांप्रति असलेली निष्ठा विरळ करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या प्रत्येक घटकाला तोंड देऊन ज्या क्षणी तुम्हाला मोकळा वेळ मिळतो त्यावेळी दीर्घ पल्ल्यांच्या उद्दिष्टांचे स्मरण करून त्यांच्या दिशेने अति सूक्ष्म का होईना परंतु एखादं पाऊल उचलणे आवश्यक आहे. एका मोठ्या समूहाचा भाग बनण्याची इच्छा मनात बाळगणे केव्हाही चांगले!! परंतु ही इच्छा बाळगत असताना आपण दीर्घ पल्ल्यांच्या उद्दिष्टांप्रति असलेल्या आपल्या मनीषेला तिलांजली देत नाही आहोत ना याचा विचार ठेवणे करणे हे इष्ट ठरते!
हे दीर्घ पल्ल्यांच्या उद्दिष्टांप्रति असलेल्या निष्ठेचे प्रकरण वाटते तितकं सोपं नाही. ही निष्ठा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेली की मग तिचा ध्यास तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर परिणाम करु शकतो. एखादा मोठा संशोधक, लेखक ह्यांची उदाहरणे पाहिली तर त्यांनी काही वेळा आपली वैयक्तिक आयुष्यं मागच्या शेगडीवर (Back burner वगैरे काय म्हणतात ते !) टाकलेली दिसतात. ह्या प्रवासात एका क्षणी ही व्यक्ती स्वप्रेमात पडून जाते !!
अजुन एक महत्वाचा घटक! जग आणि जगातील संदर्भ इतक्या झपाट्यानं सध्या बदलत चालले आहेत की बऱ्याच तपस्येनंतर जेव्हा कोणी आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करतो त्यावेळी त्या उद्दिष्टयांचं माहात्म्य, संदर्भ ह्यांनी मुळ स्वरुपापासुन फारकत घेतली असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. आणि त्यामुळं इतक्या मेहनतीनंतर, तडजोडीनंतर समाधान वगैरे मिळण्याचा जो प्रकार असतो त्या बाबतीत काहीशी निराशा पदरी पडू शकते.
एकंदरीत काय पैसा, समाधान, मानमरातब वगैरे गोष्टींची क्लिष्टता भयानक प्रमाणात वाढीस लागली आहे. ह्या बाबतीत किती डोकेफोड करायची ह्या बाबतीत आपल्या संकल्पना स्पष्ट ठेवणं फायद्याचं ठरु शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा