मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ७ जून, २०१८

वो शाम कुछ अजीब थी - भाग ३ विद्या सिन्हा



हिंदी चित्रपट संगीताचे काही खरोखरीचे जाणकार  रसिक असतात. मी अशा  जाणकारपणाच्या फार फार दूर आहे. उगाचच या विषयावर पोस्ट लिहून मी स्वतःला जाणकार समजु लागलो आहे असा कोणाचा (आणि माझाही) गैरसमज होता कामा नये, म्हणुन हे स्पष्टीकरण ! बाकी जरी मी सध्याच्या घडीला  जाणकार नसलो तरी ज्या वेगाने सध्या जाणकारपणाचं अवमुल्यन होत आहे, तो वेग पाहता पन्नास वर्षांनंतर लोक या ब्लॉगकडे पाहुन आदित्य पाटील हे हिंदी चित्रपट संगीताचे अत्यंत जाणकार व्यक्ती होते असे भाष्य करतील केवळ या आशेवर you tube च्या सहाय्यानं  एकेक कलाकारांना नजरेसमोर ठेऊन किंवा एखादी विशिष्ट थीम घेऊन मी या मालिकेचे एकेक पुष्प गुंफत आहे. आणि काही जणांच्या गतकालीन स्मृतींना उजाळा मिळत असल्यानं त्यांना ह्या पोस्ट्स आवडण्याची शक्यता वाढीस लागते. 
आजच्या पोस्टचा विषय आहे विद्या सिन्हा या गुणी अभिनेत्रीवर चित्रित केलेली काही गाणी! प्रत्येक क्षेत्रात काही अनाम वीर असतात. इंग्लिश मध्ये त्यांना unsung heroes संबोधण्याची प्रथा आहे. विद्या सिन्हा सुद्धा हिंदी चित्रपट सृष्टीतील मधील अशीच एक unsung  नायिका आहे. ह्या प्रकारात पद्माकर शिवलकर हे एक असेच नाव सदैव डोळ्यासमोर येत राहतं. तुम्ही कोणत्या काळात जन्मला आहात आणि त्या काळात एखादी महान व्यक्ती त्या क्षेत्रावर अनभिषिक्त सत्ता गाजवत असेल तर तुमच्या बाबतीत असं घडू शकतं. 

चित्रपटात नायकांना सहाय्यक अशी काहीशी, थंड वाऱ्याची सुखद झुळूक म्हणता येईल अशी भूमिका निभावण्यात विद्या सिन्हाचा हातखंडा होता.  संपुर्ण चित्रपट अथवा पडदा व्यापून टाकणाऱ्या भूमिका साकारणं हा तिचा केव्हाच प्रांत नव्हता. आता वळुयात विद्या सिंहाच्या गाण्यांकडे! तिचे अमोल पालेकर सोबतचे रजनीगंधा आणि छोटीसी बात हे चित्रपट गाजले. आणि त्यातली काही गाणी सुद्धा कायमची लक्षात राहण्याजोगी होती. 

जानेमन जानेमन तेरे दो नयन हे गाणं खरंतर चित्रित झालंय धर्मेंद्र आणि हेमामालिनीवर ! चित्रपटगृहात बसुन अमोल आणि विद्या हे गाणं पाहत असतात आणि मग स्वतःला बहुतेक त्या दोघांच्या जागी कल्पित असतात. ह्यात दोन प्रेमिकांचा खट्याळपणा टिपला गेला आहे.  

ह्या चित्रपटातील दुसरं लक्षात राहण्याजोगं गाणं म्हणजे न जाने क्यु होता हैं ये जिंदगी के साथ ! हिंदी चित्रपटातील गीतकार प्रेमी युगलांचे विविध भाव टिपण्यात कुशल आहेत. न जाने क्यु होता हैं गाण्यात आतापर्यंत न व्यक्त झालेल्या प्रेमाची कथा आहे. प्रेम स्वतःशी सुद्धा कबुल केलेलं नाही पण कोणाची गैरहजेरी मात्र बेचैनी निर्माण करत रहाते.  


रजनीगंधा फुल तुम्हारे हे गाणं, त्यातील भाव अतिसुरेख ! रजनीगंधाच्या फुलांचा सुगंध जसा वातावरणात दरवळत राहतो त्याचप्रमाणे माझ्या प्रियकराच्या आठवणी माझ्या मनात सदैव दरवळत राहतात आणि मला प्रसन्न ठेवतात. पुर्वीच्या काळातील नायिका स्वतःचे मन नायकांच्या प्रति समर्पित करीत असत.  माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर नायकाचा अधिकार मी मान्य केला असं नायिका म्हणते. स्त्री मुक्ती संघटनांनी ह्या प्रकाराकडं लक्ष देऊन ही गाणी परत लिहून घ्यायला हवीत. 


तुम्हे देखती हूँ तो लगता हैं ऐसे हे देखील अत्यंत सुरेख गाणं ! इथं सुद्धा नायकाप्रती समर्पित होण्याची भावना गीतकारानं प्रकर्षानं मांडली आहे. अगर तुम हो सागर मैं प्यासी नदी हूँ ! वगैरे वगैरे 

ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए अंताक्षरी खेळताना ठ आल्यावर मदतीला येणारं हे गाणं!  गाण्यातील विशेष भूमिका उघड्याबंब संजीवकुमारची त्यामुळं विद्याला ह्या गाण्यात फारसा वाव नाही असं माझं मत !

समय तु धीरे धीरे चल - प्रेमात आकंठ बुडाल्यावर साऱ्या जगाने कालचक्रात पुढं निघुन जावं आणि आपण दोघांनी मात्र मागं थांबुन राहावं ह्या भावना सांगणारं हे गीत ! राजेश खन्ना आणि विद्यावर चित्रित केलं गेलेलं !

विद्या सिन्हा ! एक गुणी अभिनेत्री, शांतपणे आपल्या भुमिका निभावून जशी आली तशीच ह्या चित्रपटसुष्टीतून निघुन सुद्धा गेली! मात्र बासू चॅटर्जी आणि अन्य गीतकारांनी तिच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी साधीसरळ, आशयघन गीते तिच्यासाठी लिहिली! 

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...