मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ३ जून, २०१८

वो शाम कुछ अजीब थी - भाग २



एखादं गाणं आपल्याला का आवडतं ह्याचं विश्लेषण करणं हा खरंतर वृथा प्रयत्न करू शकतो. एखादं गाणं मनाला किंवा हृदयाला का छेडून जातं हे बराच वेळा आपल्याला सहजासहजी उमगलं नसतं. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न तुमची गणना कंटाळवाण्या माणसांत करू शकतो याची जाणीव असणे आवश्यक आहे. तरी देखील या संभाव्य धोक्याची जाणीव ठेवून आजची गाणी मी या भागात मांडत आहे.  

ही आवडलेल्या गाण्यांची शृंखला आहे हा एक मुक्तछंद प्रकार आहे! ठरवून इतके इतक्या पोस्ट मी लिहीन असा काही प्रकार यात असणार नाही. आजचा दुसरा भाग असला तरी त्यानंतरचा भाग कितीही दिवसाने महिन्यांनी अथवा वर्षांनीसुद्धा येऊ शकतो. 

पहिलं गाणं दिल की गिरह खोल दो !आता हे गाणं मी पहिल्यांदा सहावी-सातवीत असताना छायागीत कार्यक्रमात पाहिलं होतं.  त्यावेळी ते मनात कुठेतरी उमटून राहिलं असणार! कारण पुढे मोठं झाल्यावर अचानक हे गाणं पुन्हा एकदा ऐकल्यावर ते जबदस्त आवडलं. हे गाणं आवडण्यात पार्श्वभूमीवर वाजवली जाणारी संगीताची धून (prelude) हे महत्त्वाचं कारण आहे.  या गाण्यातील वातावरण काहीशी गूढतेची भावना निर्माण करतं असं मला वाटतं.  दोघांनाही एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण झाल्यावर पुढाकार कोणी घ्यायचा हे एका गीत स्वरूपात इथं नायिकेने काहीशा हळुवारपणे सांगितलं आहे. 

दुसरं गाणं म्हणजे ये दिल और उनकी निगाहों के साये! उत्तरेकडच्या बर्फाच्छादित डोंगराळ भागात चित्रीकरण केलेले आणि दिलीप कुमार वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित केलेले हे गाणं सुद्धा माझ्या मनात भरलं आहे. पुर्वीच्या काळात नायिका एकटीच निसर्गरम्य परिसरात किंवा नदीत बोट घेऊन फिरतेय आणि नायक लांबवरुन तिचा पाठलाग करत तिच्यापर्यंत पोहोचतो अशी गाणी बऱ्याच वेळा पहायला मिळायची. ह्या गाण्यातील शब्द बरेच अर्थसुचक आहेत. माझ्याभोवती तुझ्या नजरेचे घेरे पडले आहेत आणि बहुदा माझी त्यातुन सुटका होणं कठीणच आहे असे नायिका सुचवत असावी. 

एखादं गाणं आपण अगणित वेळा ऐकु शकतो. दो नैना और एक कहानी  माझ्यासाठी हे असंच एक गाणं आहे. आपल्या आईपासून अगदी छोट्या वयात दुरावल्या गेलेल्या जुगल हंसराजची जशी ही कहाणी आहे, त्याचप्रमाणे आपल्या नवऱ्याच्या अचानकपणे सामोऱ्या आलेल्या प्रेमप्रकरणामुळं दुखावल्या गेलेल्या शबाना आजमीची सुद्धा ही कहाणी आहे. या गाण्याचे शब्द अत्यंत सूचक आहेत. आईच्या आठवणीत अत्यंत बेचैन झालेल्या जुगल हंसराजला रात्री खूप बेचैन करीत असाव्यात. त्यामुळे एक रात्र संपून तिच्या आठवणींतून कसंबसं बाहेर येत असताना दुसरी रात्र उंबरठ्यावर धडकते. ही कहाणी नैनितालच्या झिलमध्ये सदैव वाहत राहते.  जुगल हंसराजच्या दिवंगत आईच्या मनातील ही गाणी कोणी ऐको वा न ऐको, अशीच ऐकवली जात आहे. काही लिखित स्वरूपात तर काही केवळ शाब्दिक स्वरुपात! आपल्या नवऱ्याचं काही रूप आपल्याला कळलेलं तर काही न कळलेलं!शबाना आझमी ही माझी शालेय जीवनातील आवडती अभिनेत्री तिच्या डोळ्यातील भाव आणि अभिनय केवळ अप्रतिम!!

अजून एक गाणं म्हणजे तुम इतना जो मुस्करा रही हो ! जगजीत सिंह ह्यांच्या गझलचे  निष्ठावान चाहते खूप आहेत. मी निष्ठावान चाहता नक्कीच नाही पण मला त्यांच्या काही गझलेतील शब्द खूप आवडतात.  आता ही गझल पहा ! 

डोळ्यात अश्रू आणि ओठावर हसू!!! तुझी खरी काय परिस्थिती आहे तू काय दाखवू पाहतेस!!
तू तुझे अश्रू जे आतल्या आत लपवु पहात आहेस.  ते एक दिवशी तुला अगदी विषाप्रमाणे त्रास देतील. 
 ज्या जखमांना काळाने भरून टाकलं आहे त्या आठवणींना तो उकरून का बाहेर काढत आहेस?
हे गाणं त्या दिवशीच्या कंपनीच्या कार्यक्रमात गाण्याचा मी अयशस्वी प्रयत्न केला. साथीला तीन चार जणांना कोरससाठी बोलावलं ! परंतु जे काय म्हटलं किंवा जितका काही म्हटलं त्यावर मी मनातल्या मनात खुश झालोय! या गाण्याच्या यशामध्ये अत्यंत अर्थपूर्ण शब्दांसोबत शब्दांमधील संगीत मोलाचा वाटा बजावतं !

पत्ता पत्ता बूटा बूटा हे अजुन एक आवडतं गाणं ! हा चित्रपट काही मी पाहिला नाही. परंतु गाण्यांच्या एकंदरीत शब्दावरून या दोन प्रेमिकांना दुनियेचा प्रचंड विरोध सहन करावा लागत आहे असं सूचित होतं. या गाण्याचं चित्रीकरण आणि संथपणे एका जागी बसुन प्रेमात रंगून गेलेल्या अमिताभ आणि जया यांना निसर्गरम्य परिसराच्या पार्श्वभूमीवरील पाहणं हा एक नयनरम्य आणि श्रवणीय अनुभव आहे. 

फजा भी है जवां जवां हवा भी हैं रवा रवा  हे सलमा आगाच्या आवाजातील आणि तिच्यावर चित्रित केलेलं गाणं मला असंच आवडतं. भारदस्त उर्दु शब्दांनी अलंकारित हे गाणं प्रेमात डुंबून गेलेल्या प्रेमिकांची मनस्थिती सांगतं. यातील काही काही शब्दरचना जबरदस्त आवडण्यासारख्या आहेत !

पुकारते हैं दूर से वो काफ़िले बहार के !
हर एक पल को ढूँढता हर एक पल चला गया !

प्रत्यक्षातील जीवनातील प्रेम केव्हांही इतकं रोमांचक नसावं! पण आपल्या शब्दांच्या जादूद्वारे ह्या गीतकारांनी आणि ह्या शब्दांमध्ये चपखल बसणाऱ्या संगीताच्या धुनीमुळे ही अजरामर झालेली काही गीतं ! 

पावसाळा जवळ येतोय ! असाच धुवांधार पाऊस पडावा आणि अशा कुंद वातावरणात अशीच सदाबहार गाणी ऐकत ह्या श्रुंखलेचा पुढील भाग लिहायची इच्छा व्हावी हीच आशा!

(क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...