Sunday, October 12, 2014

दुरावा - ८

 

 रात्रभर इवाच्या डोळ्याला डोळा लागला नाही.  म्हटलं तर चूक तिचीच होती. सर्जीप्रकरण इतकं पुढं गेलं असता तिनं आईला थोडीतरी कल्पना देऊन ठेवावयास हवी होती. आईचं काय? गावात बसून शहरात राहणाऱ्या आपल्या मुलीच्या भवितव्याची काळजी नाही करणार तर मग ती आई कसली? आणि मग तिने आपल्या पद्धतीने आंद्रेई आणि इवाची ओळख करून द्यायचा घाट घातला होता. पहाटेच्या सुमारास इवाला कशीबशी झोप लागली. स्वप्नात सर्जी यावा आणि त्याने असेच आपल्याला उचलून न्यावे अशी तिची फार इच्छा झाली होती. अगदी सर्जीच्या अरसिकपणाला पूर्ण स्वीकारायची तिची आज तयारी होती.
अचानक बाहेरच्या दरवाज्यावरील जोरदार खटखटाने तिची झोप मोडली गेली. खोलीतील घड्याळाकडे तिचे लक्ष गेलं. केवळ सात वाजले होते. "इतक्या सकाळ सकाळी कोण आलं" असा विचार इवाच्या मनात आला. तिने हळूच कानोसा घेतला. आंद्रेई आणि आईचं बोलणं चाललं होतं. आंद्रेईने त्याच्या शेतावर ह्या तिघांना बोलावलं होतं. २० किमी अंतरावर त्याचं गव्हाचं फार मोठं शेत होतं. काही मिनिटात तो निघून गेला. बहुदा त्याला आईने नकार दिला असावा असं समजून इवाला हायसं वाटलं. आणि तिने डोक्यावरून जाडी घोंगडी ओढून घेतली. दोन तीन मिनिटात तिला खोलीत पावलांचा आवाज आला. तरीही तिनं घोंगडी डोक्यावरून बाजूला केली नाही. मग एक मिनिटाने वगैरे "इवा" अशी तिच्या वडिलांची हाक तिच्या कानी आली. वडील आपल्या खोलीत आले हे जाणवताच इवा पटकन उठून बसली. "झोप लागली का पोरी!" वडिलांच्या ह्या प्रेमळ स्वराने तिला अगदी लहानपणाची आठवण झाली. "हो लागली!" वडिलांना बरं वाटावं म्हणून तिने बळेबळे खोटंच उत्तर दिलं. एव्हाना आईचं सुद्धा खोलीत आगमन झालं होतं.
आईच्या आगमनाने वडिलांच्या चर्येत थोडा फरक पडला होता. "पोरी, आंद्रेई आपल्या सर्वांना त्याच्या शेतावर बोलवायला आला होता. तासाभरात त्याच्या जीपमधून आपण निघुयात!" वडील तिची नजर चुकवत म्हणाले. केवळ वडील समोर होते म्हणून इवाने आपल्या रागावर आवर घातला. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. मग इवाने शांत होऊन आपल्या विचारांना शब्दरूप दिलं. "तुम्ही आंद्रेईला आधीच शब्द देऊन मोकळं झाला आहात काय?" तिच्या ह्या रोखठोक प्रश्नाने वडील थोडे हादरले. मग आई त्यांच्या मदतीला धावली. "अग म्हणजे अगदी शब्द वगैरे दिला नाही, पण येत्या काही दिवसात आम्ही नक्की काय ते सांगू असे मी त्याच्या आईला म्हणाले" आई म्हणाली. "अरे वा म्हणजे हे प्रकरण त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचलं वाटत!" इवाने मनातल्या मनात विचार केला. "माझी सर्जी नावाच्या एका मुलाबरोबर सध्या खास मैत्री चालू आहे!" इवाच्या ह्या शब्दांनी आश्चर्यचकित होण्याची पाळी आता तिच्या आईवडिलांची होती. वडिलांना तर काय बोलावे हे कळेना आणि ते खोलीबाहेर गेले. आईसुद्धा मिनिट - दोन मिनिट सुन्न होऊन तशीच बिछान्यावर बसून राहिली. मग उठून जड पावलांनी ती ही बाहेर गेली. आता बिछान्यातून उठण्याची इवाला अजिबात इच्छाच राहिली नव्हती. थोड्या वेळाने वडील पुन्हा खोलीत आले. "मुली, आपण असं आज न जाणं योग्य दिसणार नाही! आजचा दिवस तू कसाबसा निभाव! मग तू परत गेलीस की आम्ही त्यांना कळवू!" वडिलांच्या ह्या शब्दांनी'तिला खूप बरं वाटलं. त्यांनी जसा आपला विचार केला तसा आपणही त्यांचा करायला हवा ह्याची जाणीव होऊन ती बिछान्यातून उठली. "आता कशी माझी शहाणी मुलगी!" असे म्हणत वडिलांनी तिला जवळ घेतलं. आपल्या अश्रूंनी त्यांचा शर्ट ओला होतोय हे कळताच इवा तयारीचं निमित्त काढून त्यांच्यापासून दूर झाली.
तयारी करायला तसा कमीच वेळ होता पण इवाने घाईघाईत तयारी आटपत आणली. तरीही ती केस विंचरत असतानाच जोरात दार ढकलून आंद्रेई घरात प्रवेश करता झाला. दुसऱ्याच्या घरात प्रवेश करायची ही काही पद्धत झाली असा विचार करणाऱ्या इवाच्या चेहऱ्याकडे आंद्रेई पाहतच राहिला. "तू खूप सुंदर दिसते आहेस!" आंद्रेईच्या ह्या उद्गाराने एक शतांश सेकंद सुखाची भावना, त्यानंतर काही क्षण रागाची भावना इवाच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर मात्र आपल्याला आयुष्यभर नाही पण आजच्या दिवस तरी ह्याची सवय करून घ्यावी लागणार अशी तिने स्वतःला मनोमन जाणीव करून दिली.
थोड्याच वेळात सर्व मंडळी आंद्रेईच्या जीपमध्ये बसली. आंद्रेईचे आईवडील शेतावरच बाजूला असणाऱ्या घरात सध्या मुक्कामाला होते. शेतीची काम खूप जोरात असली की ते तिथे राहत. आंद्रेई सुद्धा तिथं राही पण ह्या तिघांना घेण्यासाठी म्हणून तो गावातल्या घरात आला होता. इवाला आंद्रेईच्या बाजूच्या सीटवर बसवायचा विचार आईने सध्या सोडून दिला होता. पोरींना शहरात नोकरीशिक्षणासाठी पाठवू नये असे जुन्या बायक्या म्हणत तेच खरं असंच तिला मनोमन वाटत होतं. अपेक्षेप्रमाणे आंद्रेई धुमशान गाडी पळवत होता. एव्हाना गावाकडचा रस्ता सुरु झाल्याने अधूनमधून खडबडीत रस्ते लागत. तरीही आंद्रेई जीपचा वेग कमी करायचं नाव घेत नव्हता. शेवटी एकदाचं शेतावर पोहोचल्यावर "तरुण माणसा! आम्हांला सुखरूपपणे इथपर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद!" वडिलांच्या ह्या उद्गारांनी सर्वजण हसले. आणि वातावरणात असणारा आणि ह्या तिघांनाच जाणवणारा अदृश्य तणाव काहीसा निवळला.
मंडळी शेतातील घराकडे जाऊ लागली. वातावरणात खूप थंडावा होता. गव्हाची कापणी आटोपली होती आणि आता ट्रकमध्ये हा गहू भरून शहरात पाठविण्याचं काम सुरु आहे अशी माहिती आंद्रेईने दिली. अजूनही गुश्यातच असणारी इवा ह्या शेताच्या दर्शनाने मात्र खूप खुश झाली होती. पण आपली ही ख़ुशी चेहऱ्यावर दिसणार नाही ह्याची पुरेपूर काळजी तिने घेतली. मंडळींना येताना पाहून आंद्रेईचे आईवडील स्वतःहून बाहेर आले. त्यांनी ह्या तिघांचे स्वागत केले. इवाला पाहून आंद्रेईच्या डोळ्यात उमटलेले खुशीचे भाव जसे इवाच्या नजरेतून सुटले नाहीत तसेच आंद्रेईच्यासुद्धा!
सर्वजण त्या छोटेखानी घरात स्थिरस्थावर होत नाहीत तितक्यात शेतावरील एक कामगार धावतच आला. एक गहू वाहून नेणारा ट्रक बंद पडला होता. त्याने दिलेली ही बातमी ऐकताच आंद्रेई ताडकन उठला. "सॉरी, मंडळी! मला जावं लागेल!" आणि तात्काळ आपल्या जीपला सुरु करून दिसेनासा देखील झाला. "ह्या हिवाळ्यात अडचणींना काही तोटा नाही!" आंद्रेईची आई चेहऱ्यावर कसनुसं हसू आणून म्हणाली. परंतु बहुदा त्यांना असल्या प्रकाराची सवयच असावी. सर्वजण मग गप्पांत गढून गेले. आंद्रेईच्या आणलेल्या स्वादिष्ट नास्त्यावर सर्वजण तुटून पडले.  आंद्रेईचे आईवडील दोघेही अगदी मितभाषी होते. आईमध्ये तर गावाकडची मृदुलता पुरेपूर उतरली होती. सर्वांचा नास्ता आटोपल्यावर घराबाहेर असलेल्या सायकलकडे बोट दाखवत  "मुली, तू ह्या सायकलवरून आंद्रेईला नाश्ता नेऊन देशील का?" असे तिने इवाला विचारलं. "दमली असशील तर राहून दे! जाईन मी पटकन!" असेही ती पुढे म्हणाली. आपण इतका नाश्ता केला, आणि आंद्रेईला पूर्णपणे विसरून गेलो अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनात निर्माण झाली. आणि त्यातच तिने "हो मी जाते!" असे उत्तर दिले. तिच्या ह्या उत्तराने तिच्या आईला मात्र खास आश्चर्य वाटलं.
सायकल जरी असली तरी थंड हवेत इतके अंतर कापायला इवाला थोडा वेळ लागला. बऱ्याच दिवसाने इतक्या मोकळ्या हवेत सायकल चालवायचा अनुभव तिला हवाहवासा वाटत होता. तिला सायकलवर येताना पाहून आंद्रेई बराच विस्मयचकित झाला. ट्रक अजूनही चालू होत नव्हता. इवाने जवळच सायकल ठेवली आणि नाश्त्याचा डबा घेऊन ती ट्रकजवळ पोहोचायला आणि ट्रक सुरु व्हायला एकच गाठ पडली. "ओह, धन्यवाद! तुझ्या येण्याने हा नाठाळ ट्रक सुद्धा सुरु झाला!" आंद्रेई ह्यावेळी मात्र अगदी शांतपणे बोलला. "आणि हो नाश्ता आणल्याबद्दल सुद्धा धन्यवाद!" "यु आर वेलकम!" इवा म्हणाली.   थोड्याच वेळात आंद्रेईने नाश्ता संपवला. आणि हो त्याने इवाला सुद्धा विचारलं. "माझा आताच झालाय!" इवा म्हणाली.
इवाची आता सायकलवरून परतायची तयारी सुरु झाली होती. इतक्यात शेतावर येणारे काही कामगार येणार नसल्याचा निरोप आला. आंद्रेईची चिंतातूर बनलेली मुद्रा इवाच्या नजरेतून सुटली नाही. "माझ्या थांबण्याने काही मदत होत असेल तर मी थांबते इथे!" इवाच्या ह्या उद्गाराने आंद्रेईला हायसं वाटलं नसतं तरच नवल!

(क्रमशः)No comments:

Post a Comment

खार, पिकलेला आंबा आणि दुष्ट आदित्य

आपलं आयुष्यात कोणासोबत मॅटर होऊ शकतं ह्याविषयी काही सांगता येत नाही.  तरीही सध्या घरुन काम करत असल्यानं रिक्षावाल्यांसोबत मॅटर होत नाहीत. घर...