मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

शाळा - मिलिंद बोकील



 
बरेच दिवस नवीन पुस्तक वाचन झालं नव्हतं.  एक शालेय मित्र अधूनमधून नवीन  पुस्तकांची शिफारस करत असतो. परंतु कामाच्या बोज्याचा बहाणा करून ही पुस्तकं वाचायची राहून जातात. पण गेला शनिवार चांगला उजाडला. दिवाळीच्या निमित्ताने  हल्ली जी काही अनेक ट्रेड फेयर निघतात त्यातील एकात आपण जाऊयात अशी फर्मानवजा विनंती करण्यात आली. आता शनिवारी सायंकाळी अशी विनंती नाकारण्याचे दुष्परिणाम अनुभवाने माहित झाल्याने मी निमुटपणे निघालो.  आणि हे प्रदर्शन आमच्या समाजाच्या सभागृहात असल्याने आपल्या ज्ञातीतील ओळखींची उजळणी होण्यास मदत होते हा एक साईड बेनिफिट!!
सर्वत्र महिलावर्गाच्या कपड्यांचे, पर्सचे, रंगीबेरंगी पणत्यांचे वगैरे ठेले लागले होते. मध्येच मसाल्याचा, आवळासुपारीचा सुद्धा ठेला लागला. त्यात खरेदी करताना विविध प्रकारच्या सुपारींचा आनंद मी घेतला. अशा वेळी केवळ फुकट स्वाद घेऊ नये ह्या न्यायाने आम्ही तीन चार प्रकारची सुपारी खरेदी केली. अचानक तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पुस्तकांच्या ठेल्याकडे माझे लक्ष वेधले गेले.  मग मी पुढील तासभर त्याच स्टॉलवर होतो. बराच वेळ मी जीए आणि रत्नाकर मतकरी ह्यांच्या विविध कथासंग्रहात डोकावण्यात वेळ व्यतीत केला. ह्या दोन्ही लेखकांची पुस्तके म्हटली म्हणजे दर्जाविषयी तर शंकाच नाही. पण मला नक्की कोणतं पुस्तक / पुस्तके घ्यावीत ह्याचा निर्णय करता येत नव्हता. अचानक माझं लक्ष मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा ह्या पुस्तकाकडे गेलं. ह्या पुस्तकाची काही पान चाळली आणि लगेचच निर्णय झाला की हे पुस्तक घ्यायचच!
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरी परतलो आणि पुस्तक पहिल्या पानापासून वाचायला घेतलं. ह्या पुस्तकाच वातावरण आणीबाणीच्या काळातील एका गावातलं! कथानक फिरतं ते लेखक आणि त्याच्या मित्रमंडळी भोवती.  ही सर्व मंडळी नववीत शिकणारी. वयानुसार ह्यांच्या मनात नव्यानेच प्रेमभावना निर्माण झाल्या आहेत. प्रत्येकाला एकेक प्रेमपात्र आहे. ह्यातील काहीजण हे मनातल्या मनात ठेवून आहेत तर काहीजणांमध्ये ही प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करण्याचं धारिष्ट्य आहे. वयानुसार शिक्षकांची खोडीसुद्धा ही मंडळी काढतात. वर्गात अभ्यासू मुलं जशी आहेत तशी केवळ टवाळक्या करणारी सुद्धा आहेत. चिवचिव करणाऱ्या मुली आहेत.
त्या काळाच्या प्रथेनुसार मुलामुलींनी एकमेकांशी बोलायचं नाही ही पद्धत! पण जर एखादी मुलगी आपल्या भागात राहत असेल किंवा तिच्या आईची आणि एखाद्या मुलाच्या आईची ओळख असेल तर मात्र शाळेबाहेर अशा मुली मुलांशी बोलत! लेखकाला प्रथमच हे जेव्हा कळत तेव्हा त्याला अशा मुलांचा खूप खूप हेवा वाटतो. त्याचा एक मित्र आहे फावड्या. आता त्याचे दोन दात पुढे आले म्हणून त्याचं नाव फावड्या! पूर्वीची ही टोपणनाव ठेवण्याची पद्धत अगदी उदाहरणानुसार लेखकाने मस्त टिपली आहे. ह्या फावड्याकडे वर्गातील मुली भाजी घ्यायला आल्या की अगदी मोकळेपणाने त्याच्याशी बोलत. तेव्हा त्याच्याविषयी वाटणारा हेवा लेखक त्याला बोलून दाखवतो तेव्हा आपल्याच वर्गातील मुलींसमोर भाजी विकतानाचा वाटणारा अपमान फावड्या त्याला बोलून दाखवतो. शाळेत काही स्थिरस्थावर झालेली प्रेमप्रकरण आहेत. त्यातील मुलीने कधी मुलांची चुगली केल्यास मुले तिला इंगा दाखविण्यासाठी मराठी व्याकरणाच्या तासाला कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगात तिच्या प्रेमपात्राचा वापर करून तिला कसे हैराण करतात हे खासच! लेखकाची मोठीबहिण खाष्ट असल्याने तिचं नाव अंबाबाई! तिच्या मैत्रिणी गावभर पसरल्याने लेखकाच्या कारवायांवर सतत तिच्या मैत्रिणींच्या हेरगिरीची दहशत!
लेखकाचा मामा नरूमामा! त्याच लग्न जमवायच्या खटपटीत असलेली लेखकाची आई! हा नरूमामा म्हणजे लेखकाचा मार्गदर्शक! लेखकाच्या मनातलं एक शिरोडकर नावाचं प्रेमपात्र! मामाला हे थेट सांगायची भीती वाटत असल्याने आपलीच गोष्ट लेखक मामाला आपल्या मित्राच्या म्हणजे मनोज देसाईच्या कहाणीच्या रुपात सांगतो. मी हे तीनशे पानाचं पुस्तक तसं तीन साडेतीन तासात वाचून काढलं. त्यामुळे काही भाग घाईघाईत वाचून काढला हे खरं असलं तरी लेखकाने शिरोडकरच्या पहिल्या नावाचा मात्र शेवटपर्यंत उल्लेख केला नाही. ही गोष्ट सुद्धा खासच!
लेखकाचे खास मित्र म्हणजे सुऱ्या, फावड्या, चित्रे. सुऱ्याच्या वडिलांनी एक इमारत बांधायला घेतली होती.  त्याचं बांधकाम सुरु असल्याने तिथे अभ्यासाच्या बहाण्याने ही मंडळी शाळेआधी तिथे एकत्र जमत आणि मग शाळेत येणाऱ्या मुलींना चिडवण्याचे उद्योग करीत. लेखक मात्र शिरोडकरच्या बाबतीत काहीसा लाजरा असल्याने ती येताना दिसली की तो अगदी चुपचाप होत असे. ह्या सर्वातील सुऱ्या म्हणजे एक गावरान माणूस. तोंडात शिव्यांचा मुक्त वापर आणि मनातील सर्व भावना अगदी मुक्तपणे बोलून दाखवणार! पौगंडावस्थेत नुकत्याच प्रवेश करत असल्याने त्या अनुषंगाने येणारे विषय सुद्धा लेखकाने गरज पडल्यास सांकेतिक शब्दांचा वापर करीत संयमितपणे हाताळले आहेत. सुऱ्याच्या अशा व्यक्तिमत्वामुळे आपलं शिरोडकर प्रकरण त्याच्यापासून लपवायचा लेखकाचा कल!
वर्गात जमेल तेव्हा लेखक शिरोडकरकडे पाहायचा. कोणाला संशय न येता पाहण्याच्या तंत्राला सुममध्ये असा शब्दप्रयोग लेखक करतो. तत्कालिन मुली हसताना तोंडावर हात किंवा रुमाल ठेवत. लेखक अगदी पारंपारिक विचाराचा. त्यामुळे शिरोडकर वर्गात जास्त पुढे पुढे करत नाही हे त्याला भावतं. सुरुवातीच्या काळात शिरोडकर कोठे राहते हे माहित नव्हतं. ती साधारणतः साठेवाडीच्या बाजूला राहत असावी अशी माहिती मिळाल्यावर त्याच्या अचानकपणे ध्यानात येतं की वर्गातील मिसाळसुद्धा त्याच बाजूला राहतो. मग लेखक काहीतरी बहाणा करून त्याच्या घरी जातो. मिसाळ हा अजागळ असल्याने त्याला आपला संशय येणार नाही असा लेखकाला विश्वास वाटत असतो. मध्येच एकदा नरूमामा लेखकाकडे येऊन जातो तेव्हा मनोज देसाईने त्या मुलीच्या मनात भरलं पाहिजे मगच ती मुलगी त्याला लाईन देऊ लागेल असा सल्ला देतो. त्यामुळे लेखक वर्गात मस्ती करणे वगैरे प्रकार करून पाहतो. त्यानंतर अचानक त्याला शिरोडकर शिकवणीला जात असल्याचं कळत. नाहीतरी अंबाबाई त्याच्या मागे शिकवणीसाठी लागलेलीच असते. त्यामुळे तो मग त्या शिकवणीला त्याच बॅचला जातो. नंतर कधी तिच्या घरच्या रस्त्यावर उभा राहतो. मग ती हळूहळू लेखकाशी बोलू लागते. लेखक बुद्धिबळात खास असतो. बुद्धिबळाची शालेय स्पर्धा तो जिंकून दाखवतो. लेखक आणि शिरोडकर स्काऊट आणि गर्ल्स गाईडच्या एकत्र शिबिरात जातात. तेव्हा शिरोडकर त्याला चॉकलेट सुद्धा देते. लेखकाकडे जुन्या हिंदी चित्रपटांच्या नावाचं एक पुस्तक असते त्याचा वापर करून तो मुलांना नेहमी चित्रपटाच्या नावांच्या भेंडीची स्पर्धा जिंकून देत असे. पण ह्यात शिरोडकर नेहमीच प्रभावित होणार नाही हे ही त्याला जाणवतं. मग मध्येच एकदा तो शिरोडकरला जिंकून देतो. हे प्रकरण असं प्रगती करत असताना पुढे काय असा लेखक शिरोडकरला प्रश्न विचारतो. "पुढे काय ते माहित नाही!" ती उत्तरते.
बाकी लेखक मग शाळेतील वक्तृत्वस्पर्धा, क्रिकेट सामने अशा प्रसंगांच्या वेळी मुलांनी केलेल्या गडबडीचे मस्त वर्णन करतो. अगदी मनापासून हसायला येतं. अचानक मग सुऱ्या त्याच्या प्रेमपात्राशी बोलायला जातो. आणि मग तिथं सारे काही फिस्कटून जाते. तिचे वडील मुख्याध्यापकांकडे जातात. सुऱ्यासोबत असणारा लेखकही त्यात गोवला जातो. ह्या सगळ्या प्रकरणात शिरोडकर दुखावली जाते. पुस्तकाचा शेवट मी काही इथे सांगणार नाही.
पुस्तक मला जबरदस्त आवडलं. संगणक, इंटरनेट वगैरेने शालेय जीवनावर जबरदस्त प्रभाव करण्याआधी बराच काळ मराठी माध्यमांच्या शाळेत जे काही वातावरण होते ते अगदी समर्थपणे लेखकाने आपल्या लेखणीतून साकार केलं आहे. हे वातावरण जवळजवळ सर्वच मराठी शाळांत आढळून येत असे आणि मुलामुलींचं जे एक विशिष्ट वागणं होत ते अगदी सुंदररीत्या लेखकाने शब्दांत पकडलं आहे.
आपल्या शालेय काळातील स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने विकत घेऊन वाचण्याजोगं पुस्तक!













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...