दिवाळीच्या सुट्टीनंतर ऑफिसात परतताना कसा कंटाळा येतो. इतकी वर्षे झाली, इतके मोठे झालो तरी मुक्त वातावरणातून बंधनात शिरताना कंटाळा येतोच. एका अर्थी चांगलं लक्षण आहे ते! अजूनही मन पूर्ण यांत्रिकरित्या वागू न लागल्याचं लक्षण! वसईतील दिवाळी अतिउत्तम! पण खरं म्हटलं तर नोव्हेंबरातील दिवाळीची मजा ऑक्टोबरमधल्या दिवाळीला नाही. नोव्हेंबरात थंडी कशी मस्त पडते! असो आपलं पंचांग खूपच जुनं आहे आणि त्यामुळे त्यात बदल करणं वगैरे शक्य नाही.
दिवाळीच्या एक आठवडा आधी अंगणात कणगा काढण्याची पद्धत आहे. पूर्वी तो चुलीच्या राखेने काढत. हल्ली चुली कोणी वापरत नाही, मग रांगोळीनेच काढावा लागतो. लहानपणी हा कणगा काढला की खूप मजा यायची, दिवाळीच्या आगमनाची सूचना मिळायची. बहुदा सहामाही परीक्षा आटोपलेल्या असायच्या. आणि मुलं हुंडारायला मोकळी व्हायची. आई आणि महिलावर्गाची फराळाची धांदल सुरु असायची. मुलांना दुसरा काही उद्योग नसल्याने अंगणात सुई आणि चतुर पकडण्यात त्यांचा वेळ जायचा.
ह्या दिवाळीत सुद्धा काहीसं असंच वातावरण पाहायला मिळालं. सुरवंटानी कहर केला होता. अंगणात तर एका वेळी चार पाच सुरवंट दिसत होती. ही बिचारी अगदी सूक्ष्म दोरीने खाली उतरतात. मोठीआई ह्यांना खूप घाबरते. आणि दिसली रे दिसली की निष्ठुरपणे त्यांना चिरडून ठार करते. दिवाळीतील एका सकाळी लवकर उठल्यावर वाडीत काढलेलं सुरवंटाच हे एक छायाचित्र!
बाकी ही सुरवंट फुलपाखरात रुपांतरीत झाल्यावर सुरेख दिसतात.
धनत्रयोदशीला मोठ्या श्रद्धेने कपाटांची पूजा केली जाते. खरी दिवाळी सुरु होते ती नरकचतुर्दशीला. आमच्या घरातील वातावरण तसं कडक! पूर्वी फार कडक तर आता त्या कडकपणाच्या काही खुणा शिल्लक राहिलेल्या! नरकचतुर्दशीला सर्वांना पाचच्या आसपास उठवत! एकत्र कुटुंबात मग अंघोळीसाठी नंबर लावायची धावपळ उडे! मी तितक्यात आकाशात चतुर्दशीचा चंद्र कोठे दिसतो काय हे पटकन पाहून येत असे! उटणं, तेल वगैरे लावून मग अभ्यंगस्नान पार पडे. आंघोळीच्या वेळी चिराटे पायाखाली फोडून आम्ही आनंद व्यक्त करू. हे चिराटे कधी कधी पहिल्या फटक्यात फुटत नसे. ते फुटल्यावर मनात होणारा आनंद बोंब मारून व्यक्त करण्याची अनिवार इच्छा होई. चिराटे फुटायच्या वेळी "नरकासूर को मार दिया!" अशा काहीशा अरसिक ओळींचा मग जन्म झाला. सोहम बिचारा लहानपणापासून ह्या ओळी माझ्या तोंडून ऐकत आल्याने बहुदा हा ही दिवाळी परंपरेचा भाग आहे अशी त्याची समजूत असावी असा मला दाट संशय आहे. उटण्यानंतर साबण लावावा कि नाही हे मला पडलेलं तेव्हापासूनच कोडं! मग सर्व मंडळींच्या आंघोळी आटपेस्तोवर मोकळा वेळ असे. मग मी आणि बंधू (मोठा भाऊ) जाऊन ड्युकच्या चेंडूने क्रिकेट खेळत. केव्हातरी मग फराळासाठी आम्हांला खाली बोलावलं जाई. सर्वजण एकत्र असताना फराळ ही एकत्र बनवला जाई. त्यामुळे फराळाच्या प्लेटची गर्दी नसे. नंतर मग सर्वांच्या वेगवेगळ्या प्लेटा येऊ लागल्या. काळ बदलत गेला तसे मग बाहेरील मिठाईच्या बॉक्सने सुद्धा शिरकाव केला. फराळ झाल्यावर बाकी काही काम नसे. बुधवार, शुक्रवार अथवा रविवार असला तर वसईच्या परंपरेनुसार पावले होळीच्या मासळीमार्केट कडे वळत. "दिवाळीच्या सुद्धा!" हा सोहमने ह्या वर्षी विचारलेला प्रश्न मी फारसा मनावर घेतला नाही. वसईकरांची परंपरा काही वेगळीच!
काही दिवाळीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकत्रच येई. त्यामुळे दुपारनंतर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरु होई. धाकटे काका दाजी ह्यांच्याकडे बरीच वर्षे लक्ष्मीपूजनाची जबाबदारी होती. दुपारी चार वाजल्यापासून सर्वजण तयारीला लागत. घरी बरीच जुनी नाणी आहेत. काही एकोणिसाव्या शतकातील सुद्धा. ती ह्या दिवशी घासून चकचकीत केली जात. पारनाक्यावर जाऊन बत्तासे वगैरे आणले जात. हॉलमधील सर्व फर्निचरची फेरमांडणी करून पूजेसाठी व्यवस्थित जागा केली जात असे. मग नवीन सतरंजी आणि लोड ह्यांच्या मदतीने लक्ष्मीपूजनाची मांडणी केली जाई. दाजी अगदी शास्त्रोक्त पद्धती चांगली तास दोन तासभर पूजा करीत. मोठे काका अण्णा मात्र इतका वेळ पूजा चालल्याने बेचैन होत. मध्येच आम्हांला फटाका फोड असे नजरेने खुणवत. पण आम्ही तशी आज्ञाधारक पोरे असल्याने कोणत्या दिवशी कोणाचे ऐकायचे हे आम्हांला चांगले माहित होते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरभर पणत्या लावल्या जात. आजी ९९ साली गेली. त्याआधी तिच्या चारही सुना एकत्र ह्या दिवेलावणीचे काम करत. मागच्या वाडीत, उंबराच्या झाडाखाली, ब्रह्म्याला (आमच्या घराच्या मागे असणारं नारळाचे झाड - जे आमच्या पूर्ण कुटुंबांच श्रद्धास्थान आहे) दिवा लावला गेला आहे की नाही ह्याची ती जातीने तपासणी करत असे. सर्वांना अत्तर वगैरे लावलं जाई. मी लहान असताना नवीन कपडे घालून हॉलमधील मंडळीसमोर आल्यावर कोणीतरी कौतुक करेल अशी जबरदस्त आशा असे. मंडळी सुद्धा हे ओळखून असत त्यामुळं माझा प्रवेश होताच अण्णा, भाई वगैरेपैकी कोणी एक "मस्त शर्ट आहे" असे बोलत. अजूनही ही आशा मनात कोठेतरी तग धरून असते! लक्ष्मीपूजन झाल्यावर मग आम्हांला फटका वाजविण्याची सूचना केली जाई. फटाका वाजवून आल्यावर हात स्वच्छ धुवून मग बत्तासे, तीर्थप्रसाद मिळे. दाजी मग चोपड्याचे वाटप करीत.
बाकी मग गेल्या दोन तीन वर्षापूर्वी दाजींनी प्राजक्ताकडे लक्ष्मीपूजनाच्या जबाबदारीचे हस्तांतरण केले. म्हणजे आता घरात चार वेगळ्या पूजा होतात. गेल्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनाचा हा फोटो!
नंतर येते ती बलिप्रतिपदा! ह्या ही दिवशी लवकर उठायचं असतं. ह्या दिवशीची परंपरा म्हणजे भल्या पहाटे उठून संपूर्ण घराचा केर काढायचा. तो एका टोपल्यात भरायचा. मग घरातल्या एका पुरुषाने ते टोपलं, जुना झाडू, एक पणती घ्यायची, हातात काठी घ्यायची. एकदा का हे सर्व हातात घेतलं ही त्याच्या मागे घरात त्याच्या पत्नीने लाटण्याने ताटावर जोरात आवाज करत तो पुरुष घराबाहेर निघेतोवर त्याला साथ द्यायची. आमच्या घरी गेले कित्येक वर्षे दाजी - दादी ह्या भूमिका पार पाडत. बाहेर पडल्यावर त्या पुरुषाने एकही शब्द उदगारायाचा नाही की मागे वळून पाहायचं नाही. हा घरातील सर्व कचरा गावाच्या वेशीजवळ नेउन ठेवायचा. आताच्या काळात गावची वेस म्हणजे आमच्या गल्लीच्या तोंडाशी असलेली कचरापेटी. तिथून परत आल्यावर दाजी घराच्या गेटपाशी येऊन काठी जोरात आपटत आणि "बळी तो कान पिळी! बळीचे राज येवो!" असे जोरजोरात ओरडत. आणि मग एक फटाक्याची माळही फोडत, इतक्या सगळ्या प्रकारानंतर उरलीसुरली झोपलेली मंडळी निमुटपणे उठत. गेले दोन वर्षे आता मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. बिछान्यात झोपेत असलेला सोहम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मेंदूत नोंदत असतो. संस्कृतीचे हस्तांतरण व्हायला हवं हीच इच्छा!
सर्वांच्या आंघोळी आटोपल्या की पाडव्याच्या ओवाळण्या होतात. आई मुलांना आणि पत्नी पतीला ओवाळतात. सगळं कसं प्रसन्न प्रसन्न वाटत असतं. पूर्वी गोठ्यात गाई होत्या. त्यांना ह्या दिवशी करंजी खाऊ घालत. त्यांना बहुदा विस्तवावरून उडी मारायला लावायची पण पद्धत होती आणि त्यांच्या अंगावर लाल गेरूचे ठसे काढले जात. काहीशी ऐकीव आणि फार लहानपणी पाहिलेली ही प्रथा त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी!
वसईतील वाडवळ अर्थात पानमाळी ही आमची ज्ञाती. दिवाळीच्या दिवसात रवळी आणि तवळी असे दोन प्रकार करण्याची ह्या ज्ञातीत प्रथा आहे. रवळीला पानमाळ्यांचा केक असेही संबोधले जात. माझ्या आई आणि वडील ह्यांच्या दोघांच्या आई वसईतील घरत कुटुंबातल्या. ह्या दोन्ही घरत कुटुंबीयांनी जुन्या प्रथा खूप टिकवून ठेवल्या आहेत. दरवर्षी ते रवळी बनवितात. त्यातील एका घरची विनम्रने खास आणून दिली. अति स्वादिष्ट होती ती! आणि दुसऱ्या घरची मानसने फेसबुकवर टाकली. त्या रवळीचा हा फोटो!
बाकी घरची काकी अजूनही तवळी बनविते. हा केळीच्या पानात काकडी वगैरे टाकून केला जाणारा पदार्थ. ह्याची सुद्धा खास एक चव असते. ह्या वर्षी पुन्हा मंडळी फराळाला एकत्र आली. हल्ली सतत गोड खाण्याची क्षमता कमी झाल्याने बटाटवडे सुद्धा आणण्यात आले. अनारसं सुद्धा बनविण्यात आली होती. अनारसं हा सुद्धा बनविण्यास एक कठीण प्रकार, पण जर जमला तर मस्त लागतो!
पुन्हा एकदा मोकळी सकाळ त्यामुळे वाडीत जाऊन छायाचित्रण केलं.
ऑक्टोबर महिन्यात आलेला आंबामोहोर टिपला. किती दिवस टिकतो ते पाहायचं!
नारळावर बसलेली पोपटांची जोडी!
शेवटचा दिवस भाऊबीजेचा! पूर्वी तीन पिढ्यांची भाऊबीज व्हायची. वडील आणि तीन काका असे मिळून चार भाऊ आणि तीन आत्या. ताई वसईत, जिजी मालाडला तर बेन दहिसर. बेन चिंचणीची भाऊबीज आटपून येत. आई आणि काकू मंडळींची सुद्धा भाऊबीज दिवसा आटपे. दोघी जणी माहेरी जाऊन येत तर दोघींचे भाऊ घरी येत. सायंकाळ होऊ लागे तसे सर्वजण घरी जमू लागत. चुलीवरच्या कोंबडी (पूर्वी चिकनला कोंबडी म्हणत आणि बहुदा ती गावठी असे!) आणि मटणाच्या वासाने मंडळी सुखावत. सोबतील वडेही तळले जात असत. जेवण आटोपली की मग तीन पिढ्यांची भाऊबीज सुरु होई. ह्यात बहिण भावांची अनेक कॉम्बिनेशन्स होत. आणि मजेदार गप्पांना ऊत येई. अगदी भराच्या काळात पन्नासेक मंडळी घरी जमत. दहानंतर मुंबईकर मंडळी परतायची तयारी करू लागत. त्याहून आधीच्या काळात ते मुक्कामाला राहायचे सुद्धा. अकरा वाजले की मग कडक आजी झोपण्याची सोय काय आहे ह्याची चौकशी चालू करे. हॉलमध्येच बिछाने घातले जात. बच्चेमंडळी फारच उदास झालेली दिसली की मोठी मंडळी अजून देव दिवाळी (तुळशीचं लग्न) आहे असे सांगून त्यांची समजूत घालत. आता ही सर्व मजा हळूहळू कमी होत चालली. मागच्या काही भाऊबीजेतील हे फोटो!!
असे हे दिवाळीचे दिवस!! परंपरांचे आणि नव्याने अविस्मरणीय क्षणांचा ठेवा देणारे! परंपरा जमतील तितक्या पुढे न्यायच्या बाकीच्या जतन करायच्या - काही अशा लिखाणातून तर काही मनाच्या एका कोपर्यात!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा