उदरनिर्वाहाचे साधन शोधण्यासाठी आपलं मूळ गाव सोडून दुसऱ्या गावी स्थिर होण्याची गरज मनुष्याला पूर्वापार भासत आली आहे. कालांतराने ह्या स्थलांतराची व्याप्ती देशाटनापर्यंत पोहोचली. व्यापार, नोकरी ह्या निमित्ताने लोक परदेशात जाऊन पोहोचली. ह्या ब्लॉग पोस्टची व्याप्ती भारतातील लोकांनी केलेल्या देशांतरापुरती मर्यादित आहे.
व्यापारासाठी देशांतर केलेल्या लोकांना बऱ्याच वेळा कायमच परदेशात राहावं लागतं. कारण इतका जमलेल बस्तान सोडून अचानक मायदेशी परत येणे शक्य होत नाही. पण नोकरीवाल्यांचे मात्र तसं नसतं. त्यांना नोकरीचे ठिकाण बदलण्यासाठी तुलनेने कमी धडपड करावी लागण्याची शक्यता असते.
बऱ्याच वर्षापासून भारतीय युवक मंडळी विविध क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन राहिले. नंतर काही वर्षांनी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच भारतीयांना परदेशी जाऊन रहायची संधी मिळाली. काही प्रांतातील भारतीयांनी व्यापारउदिम करण्यासाठी परदेशात जाऊन वास्तव्य केलं. अशा विविध कारणांसाठी परदेशात जाऊन राहणाऱ्या भारतीयांची संख्या प्रचंड आहे.
मध्यंतरी अपर्णा वेलणकर ह्यांचं "For Here Or To Go?" हे पुस्तक वाचलं होतं. पुस्तकाचं शीर्षक मॅकडोनाल्ड मधल्या विक्रेता ग्राहकाला जो प्रश्न विचारतो त्यावर आधारित आहे. काउंटर ऑर्डर दिल्यावर तिथला माणूस आपल्याला विचारतो, "बाबा रे! तुला हे इथे खायचं आहे की घरी जाऊन तू ह्याचा आस्वाद घेणार आहे!" त्याचप्रमाणे परदेशात राहून जमा केलेली संपत्ती, शिक्षण, सामाजिक स्थान ह्याचा आपण तिथंच आनंद घेणार आहोत की आपल्या देशात परतून? असा प्रश्न परदेशात काही काळ राहिलेल्या प्रत्येक माणसास पडतो. लेखिकेने परदेशात जाऊन वास्तव्य केलेल्या बहुतांशी मराठी लोकांशी भेटून त्यांचं मनोगत जाणून घेतलं होतं. त्यांनाही असा प्रश्न पडलाच होता. हा निर्णय घेण्यामागे असणाऱ्या विविध घटकांचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न!
१> परदेशात आणि भारतात मिळणाऱ्या उत्पन्नाची किंबहुना बचतीची तुलना. जर तुम्हांला भारतात मनासारखं उत्पन्न मिळत असेल तर तुम्ही परदेशात जाऊन स्थायिक होण्याचा विचार करण्याची शक्यता कमी होऊ शकते. काही लोकांच्या बाबतीत परदेशात तुम्हांला भारतात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या किती पट उत्पन्न मिळू शकते ह्यावर हा निर्णय असतो. जर त्यांना दुप्पट उत्पन्न मिळत असेल तर ते कदाचित जाणार नाहीत पण जर हाच आकडा चारपट झाला तर बहुदा त्यांचा निर्णय बदलेल! ह्यात अजून एक घटक येतो. भारतात समजा दोघंही नोकरी करत असतील तर परदेशात सुद्धा करू शकतात का?
२> तुमच्या क्षेत्रात परदेशात आणि भारतात असणाऱ्या उपलब्ध संधींची तुलना. असं म्हणतात की संशोधन करायचं असेल तर अमेरिका वगैरे देश उत्तम! अशा क्षेत्रात भारतात खूप संघर्ष करावा लागतो.
३> कौटुंबिक जबाबदारी! आई वडिलांची आणि भावंडांची जबाबदारी असल्याने काहीजण परदेशात कायम वास्तव्य करू शकत नाहीत. ह्यात काही वेळा निर्णय अगदी सोपा असतो तर काही वेळा काठावरचा असतो. अशा वेळी आई वडिलांचा, बाकीच्या नातेवाईकांचा समजूतदारपणा ह्या निर्णयात महत्वाचा घटक बनतो.
४> नातेवाईकांच्या गोतावळ्यात राहण्याची सवय असल्यास आपण मनाला किती लगाम घालू शकतो हा ही महत्वाचा घटक बनतो. परदेशात राहत असलं तर महत्वाच्या समारंभाला वर्षातून एकदा नक्कीच भारतभेट करू शकतो! आणि हल्ली संगणकाच्या माध्यमातून दररोज परदेशात राहूनसुद्धा आपल्या प्रिय व्यक्तींना पाहण्याची सोय आहेच! परदेशात राहताना बऱ्याच मित्र मैत्रिणी बनतात. त्या नातेवाईकाची जागा १०० टक्के नसली तरी बऱ्याच प्रमाणात घेऊ शकतात.
५> परदेशातील हवामान! वर्षभर अतिथंड हवामान असल्यास निराशावादी विचार येऊ शकतात. ह्या अतिथंड हवामानासोबत हिवाळ्यातील अगदी लहान दिवसांचा सामना करावा लागतो. ह्यात तुमची मानसिक कणखरता महत्वाची भूमिका बजावते. आपण इथे आपल्या नोकरी व्यवसायासाठी आलो आहोत, पैसा कमवत आहोत, त्यामुळे त्यासाठी आपल्याला बाकीच्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला तरी हरकत नाही अशी स्वतःची समजूत घालता आली पाहिजे.
६> परदेशात आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टीत स्थैर्य निर्माण होते. कमी वाहतूक, प्रदूषण, जीवनावश्यक गोष्टींची मुबलकता आणि चांगला दर्जा! कमी तणावाचे मुलाचं शालेय शिक्षण, चांगल्या दर्जाच्या घर गाड्या आणि सुरक्षितता! ह्या सर्व घटकांमुळे परदेशात गेलेली मंडळी तिथल्या राहणीमानाच्या प्रेमात पडतात. जसजसा काळ पुढे जातो तसतसं त्यांना परत गेल्यावर सामना कराव्या लागणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीच अधिकाधिक दडपण येऊ लागतं आणि त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता कमी होत जाते. त्याच बरोबर मुलं जन्मापासून तिथंच वाढली असल्याने त्यांच्यासाठी भारतात परत येणे हा मोठा निर्णय ठरू शकतो. कारण त्यांनाही मोठी जुळवणूक करावी लागणार असते.
७> काहीजण मुलं १४ - १५ वर्षांची झाली की परत येतात. कारण परदेशात बॉय फ्रेंड - गर्ल फ्रेंड ह्यांचं प्रस्थ मोठं असतं आणि आपल्या मुलांच्या बाबतीत असले प्रकार घडू नयेत अशी ह्या पालकांची आशा असते. हल्ली भारतात सुद्धा हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने ह्या घटकाचा निर्णय घेण्यातील वाटा काहीसा कमी झाल्याचं आढळून येत.
८> म्हातारपण परदेशात घालवू शकण्याची मानसिक तयारी! कमीत कमी म्हातारपणी तरी आपल्या मित्र नातेवाईकांसोबत काल व्यतीत करता यावा अशी काही जणांची अपेक्षा असते. परंतु त्याच वेळी मुलांच्या संसारात त्यांची किती भावनिक गुंतवणूक आहे हा एक महत्वाचा निर्णय बनतो.
९> काही माणसं दीर्घकालीन परदेश वास्तव्यानंतर बदलून जातात. त्यांचा मूळ गाभा, आत्मा बदलून जातो. त्यांची मायदेशाशी असलेली नाळ तुटते. अशी माणसं कधीच मग मायदेशी परत येत नाहीत.
१०> आता शेवटचा पण काहीसा वादास्पद मुद्दा! मी माझा देश चांगला बनविण्यासाठी काही हातभार लावणार का? मध्यंतरी मी एक लेख वाचला होता, बहुदा लोकसत्तेच्या चतुरंग मध्ये. त्यात लेखिकेचा मुलगा अमेरिकेत होता आणि तिने आपल्या देशातील सर्वोत्तम बुद्धिमत्तेची तरुण माणसं अमेरिकेत जातात असं म्हटलं होतं. त्यासाठी तिनं क्रीम असा शब्दप्रयोग केला होता. जरी थेट म्हटलं नसलं तरी इथे स्वदेशात राहिलेली लोक त्या प्रतिभेची नाहीत असंच सुचित होत होतं. मला ते लागलं, खूप लागलं. दुसऱ्याने बनविलेल्या अनुकूल परिस्थितीत जाऊन चांगली कामगिरी करण्याची शक्यता नक्कीच जास्त असते. पण कधीतरी कोठेतरी पूर्णपणे स्वाभिमानाने / स्वातंत्र्याने जगता येत नाही ह्याची खंत वाटतेच. आणि हल्लीच्या स्थितीत ठरवून भारतात राहिलेली बुद्धिमान मुलं आहेतच की! बदल आपसूक घडत नाही त्यासाठी आपला स्वतःचा देखील हातभार आवश्यक असतो. जर अधिकाधिक बुद्धिमान मुलं भारतात राहायला सुरवात झाली तर मग परिस्थिती बदलणार नाही का? हो त्यासाठी थोडे कष्ट तर घ्यावे लागतील. चकचकीत घरात राहायला सर्वांनाच आवडतं, पण ते दुसऱ्याने बनविलेलं आयतं हवं कि आपलं जुनं घर चकचकीत बनवायचा प्रयत्न करायचा? आपलं जुनं घर दुसऱ्याच्या घराइतक कदाचित कधी सुंदर होणार नाही किंवा आपल्या जिवंतपणी ते सुंदर झालंही नसेल पण आपल्या इथल्या वास्तव्याने इथल्या परिस्थितीत एक सहस्त्रांश जरी फरक पडला तरी धन्य वाटून घ्यायला काय हरकत आहे?
वरील मुद्दे माझ्या नजरेसमोरील! अजून अनेक असणारच आणि त्यांची क्लिष्टता पातळी सुद्धा अधिक असणार!
सारांश इतकाच - निर्णयात फक्त राहायचं की परत जायचं असे दोनच पर्याय असले तरी घेतल्या जाणाऱ्या त्या निर्णयामागची घालमेल मात्र ज्याची त्यालाच कळते!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा