मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ११- सॅन मॅरिनो

२२ जून २०२४ 

एक आटपाट नगरी होती.  ही नगरी काहीशी डोंगराळ भागात वसली होती.ह्या देशावर राजाराणी राज्य करत होते. सर्व प्रजा सुखानं नांदत होती.  ह्या देशाला सर्व बाजुंनी एका मोठ्या देशानं वेढले होते. ह्या धाटणीची गोष्ट आपण बालपणी वाचली असेलच. गोष्टीचा प्रवास पुढे व्हायचा असेल तर ह्या दोन देशांमध्ये काहीतरी वैमनस्य असायला हवंच.  छोट्या देशाच्या राजाला सैन्य वगैरे घेऊन मोठ्या देशात जंगलातून प्रवेश करायला हवा. थकला भागला राजा घनदाट जंगलातील निळ्याशार पाण्याच्या तळ्याकाठी विश्रांती घेत असताना त्याला एखाद्या सिंहाच्या तावडीत सापडलेल्या मोठ्या राज्याच्या राजकन्येची किंकाळी ऐकू येते.... ही कथा पुढे कधीतरी!

ह्या गोष्टीला साजेशी अशी सॅन मॅरिनो आणि इटलीची गोष्ट!  मरिनो म्हणा, कोणी मारिनो म्हणा किंवा कोणी मॅरिनो म्हणा! आश्चर्याची गोष्ट म्हणजे इटलीने सॅन मॅरिनोला पूर्णपणे वेढलं  असून सुद्धा ह्या दोन्ही देशांचं अगदी व्यवस्थित चाललं आहे. दोन्ही देशातील नागरिक अगदी हसतखेळत एकमेकांच्या देशात प्रवेश करतात,  काही दिवस वास्तव्य करून  पुन्हा आपल्या देशात परत येतात. 

हॉटेल ऍडमिरल मधील स्वादिष्ट नाश्त्याचा आस्वाद घेऊन आमची बस आता सॅन मॅरिनोच्या दिशेनं निघणार होती. जॅकला पुन्हा चालकत्व मिळाल्यानं तो खुशीत होता. आपली जबाबदारी संपल्यानं खुशीत असलेल्या एडिन (कालच्या संध्याकाळचा बदली चालक) आणि अतुलचं छायाचित्र !


तुम्हांला एखाद्या काहीशा वेगळ्या धाटणीच्या देशाविषयी माहिती करून घ्यायची असेल तर सॅन मरिनो हे एक उत्तम उदाहरण आहे. हा जगातील फक्त तीन अशा देशांपैकी एक आहे, ज्यांना पूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढले आहे.  (दुसरा देश व्हॅटिकन सिटी ज्याला सुद्धा इटलीने वेढलेले आहे.  लेसोथो हा तिसरा देश ज्याला दक्षिण आफ्रिकेने वेढलेले आहे). व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको नंतर हा युरोपमधील तिसरा सर्वात लहान देश आहे आणि जगातील पाचवा सर्वात लहान देश आहे.  व्हॅटिकन सिटी - इटली, सॅन मॅरिनो - इटली ह्या देशांतील संबंध सौहार्दपूर्ण आहेत, लेसोथो - दक्षिण आफ्रिका संबंधामध्ये दक्षिण आफ्रिका थोडीफार दादागिरी करत असावा असं मानण्यास वाव आहे.   

सॅन मॅरिनोच्या संविधानातील तरतुदीनुसार लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कायदेमंडळ, ग्रँड आणि जनरल कौन्सिल दर सहा महिन्यांनी 'कॅप्टन रीजेंट' म्हणून ओळखले जाणारे दोन राज्यप्रमुख निवडतात. ते एकाच वेळी आणि समान अधिकारांसह सेवा करतात. इथं एकंदरीत सर्व काही सौहार्दपूर्ण कारभार दिसतोय. सॅन मॅरिनो हा भूपरिवेष्टित देश आहे; तथापि, त्याचे ईशान्य टोक एड्रियाटिक किनाऱ्यावरील इटालियन शहर रिमिनीच्या दहा किलोमीटर (सहा मैल) आत आहे. देशाचे राजधानीचे शहर, सॅन मारिनो मॉन्टे टिटानोच्या वर स्थित आहे, तर त्याची सर्वात मोठी वस्ती डोगाना सेर्रावले नगरपालिकेत आहे. सॅन मारिनोची अधिकृत भाषा इटालियन आहे.

सध्याच्या क्रोएशियामधील रब या तत्कालीन रोमन बेटावरील सेंट मारिनस ह्या पाथरवटाच्या (पाथरवट हा व्यवसाय आहे!!) नावावरून या देशाचे नाव पडले आहे. पौराणिक अहवालांनुसार, त्याचा जन्म इसवीसन २७५ साली झाला होता.  लिबर्नियन समुद्री चाच्यांनी रिमीनी शहर बेचिराख  केल्यानंतर ह्या शहराच्या पुनर्बांधणीत सेंट मारिनस ह्यांनी मोलाची भूमिका बजावली. नंतर इसवीसन ३०१ मध्ये मॉन्टे टिटानोवर स्वतंत्र मठ समुदायाची स्थापना केली होती.  अशा प्रकारे, सॅन मारिनो सर्वात जुने विद्यमान सार्वभौम राज्य, तसेच सर्वात जुने घटनात्मक प्रजासत्ताक असल्याचा दावा करते. 

१७९७ साली नेपोलियनच्या सैन्याच्या आगेकुचीमुळे सॅन मारिनोच्या स्वातंत्र्याला एक छोटासा धोका निर्माण झाला.  परंतु देशातील एक रीजंट अँटोनियो ओनोफ्रीने नेपोलियनशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि देशाचे स्वातंत्र्य गमावण्याचा धोका टाळला. ओनोफ्रीच्या हस्तक्षेपामुळे, नेपोलियनने, शास्त्रज्ञ आणि फ्रान्स सरकारचे विज्ञान आणि कलेचे कमिशनरी गॅस्पर्ड मोंगे यांना पत्र लिहून, प्रजासत्ताकच्या स्वातंत्र्याची हमी आणि संरक्षण देण्याचे वचन दिले, त्याच्या गरजेनुसार ह्या देशाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव सुद्धा दिला. इतर राज्यांच्या पुनर्वसनवाद्यांकडून भविष्यात सूड उगवला जाईल या भीतीने रीजंट्सनी हा प्रस्ताव फेटाळला. 

एकोणिसाव्या शतकात इटालियन एकीकरण प्रक्रियेतील  नंतरच्या टप्प्यात, सॅन मारिनोने एकीकरणाला पाठिंबा दिल्याने रोष पत्करलेल्या ज्युसेप्पे गॅरिबाल्डी आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यासह  अनेक लोकांना आश्रय दिला. कालांतरानं गॅरिबाल्डीने सॅन मारिनोला स्वतंत्र राहण्याची परवानगी दिली. सॅन मॅरिनो आणि इटलीने १८६२ मध्ये मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केली.

मराठी माध्यमातील नववी, दहावी इयत्तेतील इतिहासाच्या पुस्तकातील एखादा पाठ वाचतो आहोत असं तुम्हांला वाटल्यास नवल नाही. सॅन मॅरिनो इटलीमध्ये कसा काय गुण्यागोविंदानं नांदू शकतो असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्यानं थोडीफार माहिती विकिपीडियावर मिळविली त्याचा हा परिणाम !

हॉटेल ऍडमिरल ते सॅन मॅरिनो ह्या प्रवासात सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या इटलीचे दर्शन होत होते. 








सॅन मॅरिनो देशाला वीणा वर्ल्डच्या युरोप सहलीच्या वेळापत्रकात अगदी नुकतंच समाविष्ट करण्यात आलं आहे. आपल्या सहलीत  बारा - तेरा दिवसांत इतके देश समाविष्ट करतो अशी जाहिरात करण्यासाठी सहल कंपनीला सॅन मॅरिनोसारखे इवलेसे देश हातभार लावतात. पर्यटकांच्या दृष्टीनं सुद्धा सॅन मॅरिनोला भेट देणं हा नक्कीच एक वेगळा अनुभव आहे.

इथं आम्ही बराच वेळ चढणीच्या रस्त्यानं चालणार होतो. वृक्षांची छाया सदैव उपलब्ध असेल ह्याची शाश्वती देता येणार नव्हती. त्यामुळं ज्यांना हा तास - दीड तासाचा फेरफटका झेपणार नाही असं वाटत होतं त्यांना बसून राहण्यासाठी  एका कॅफेच्या बाह्यभागात अतुलने सोय करून ठेवली होती. आमची स्थानिक मार्गदर्शक पॅट्रिशिया आमच्या सोबतीला होती. नेहमीप्रमाणं तिनं दिलेल्या माहितीकडं लक्ष देण्याचा माझा कसोशीचा प्रयत्न आरंभीच्या काही मिनिटांतच फोल ठरला. 

ही चढणीची वाटचाल मनोरंजक होती. अनेक चिंचोळ्या मार्गांचे दर्शन होत होते. 


विविध आकर्षक वस्तूंची दुकानं होती. त्यांची छायाचित्रं घेण्याचा मोह आवरला नाही. अचानक एक खऱ्याखुऱ्या बंदुकी, काडतुसांचं दुकान सुद्धा सामोरे आले. त्याचं छायाचित्र घेण्याचं टाळलं असलं तरी एका भयाण वास्तवाची जाणीव मनाला स्पर्शून गेली. 



अगदी काही मिनिटांतच क्रॉसबोमनच्या खाणीचं मनोहारी दर्शन झालं. 


आरंभीच्या काळात खाण म्हणून वापरली गेलेली ही जागा १९६० पासून इटालियन पद्धतीच्या क्रोसबो ह्या आयुधांच्या खेळासाठी वापरली जात आहे.  


दरवर्षी ३ सप्टेंबर रोजी इथं Palio dei Balestrieri हा सण आणि स्पर्धा आयोजित केली जाते.  पुढील वाटचालीत वैविध्यपूर्ण शिल्पं, नजराणे दिसत राहिले. 







थोड्याच वेळात आमचं आगमन Piazza della Libertà ह्या सॅन मॅरिनोच्या मुख्य चौकात झालं. छायाचित्रणासाठी ही एक उत्तम संधी होती. परंतु उन्हात बराच वेळ चालल्यानं चेहऱ्यावरील टवटवीतपणा काही प्रमाणात लोप पावला होता.  इथल्या मुख्य वास्तूला Palazzo Pubblico ह्या नावानं संबोधिले जाते. इटालियन भाषेतून इंग्लिश भाषेत भाषांतर करण्यासाठी हा एक सोपा शब्द आहे. इथं सार्वजनिक समारंभ आयोजिले जातात; त्याचसोबत अधिकृत शासकीय समारंभाचं सुद्धा आयोजन करण्यात येतं. 




बराच वेळ फेरफटका मारून झाल्यावर आम्ही खाली कॅफेमध्ये थांबलेल्या आमच्या सहप्रवाशांना भेटलो. त्याच कॅफेमध्ये आम्ही इटालियन जेवणाचा आस्वाद घेणार होतो. युरोपियन देशांत सुद्धा भारतीय जेवणांचाच सतत आस्वाद (?) घ्यावा लागल्यानंतर आता इटालियन पद्धतीचं जेवण दिलं जाणार ह्या बातमीनं निर्माण झालेली हास्यमुद्रा ! 


इथं थ्री कोर्स जेवण होतं. प्रथम आला तो tortellini पास्ता ! हा बंदिस्त पास्ता असतो. सहसा ह्यात मांसाहारी पदार्थ भरले असले तरी आमच्यासाठी खास शाकाहारी आवृत्ती बनविण्यात आली होती. 


त्यानंतर आलं ते वांगं ! आता हे असं आपल्याला वसई - बोरिवलीत आणून दिलं असतं तर आपण ह्याकडं ढूंकूनसुद्धा पाहिलं नसतं. पण सॅन मॅरिनोमध्ये एक खास इटालियन नव्हे सॅन मॅरियन शेफ आपल्याला हे आणून देतोय ह्या विचारानेच आनंदी होऊन आम्ही हे वांगं खुशीने ग्रहण केलं.  त्यानंतर अमर्यादित पिझ्झा आणून देण्यात आला. परंतु बहुदा तीन स्लाइस नंतर त्यांचा पिझ्झा संपला. पण एकंदरीत एक वेगळा अनुभव !




मुख्य आचारी अगदी हसऱ्या मुद्रेचा होता. सोहमला "त्याच्यासोबत फोटो घे!" अशी मी केलेली विनंती सोहमने थोड्याच वेळात मान्य केली. १९९० सालच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या दरम्यान  मी इटालियन फुटबॉल संघाचा आणि खास करून रॉबेर्तो बाजिओचा चाहता होतो. हा शेफ त्याच्यासारखा दिसतोय अशी मनाची समजूत करून मी हे छायाचित्र संग्रही ठेवणार आहे. 


बाकी काही म्हणा ह्या वांगीं समाविष्ट इटालियन जेवणाने पोट काही फारसं भरलं नाही. त्यानंतर बराच वेळ आम्ही इथं दुकानांत खरेदीसाठी भटकलो. माझ्यासारख्या माणसानं सुद्धा इथं थोडीफार खरेदी केली. ह्यावरून इथल्या काही दुकानातील वस्तुंचा भाव खरोखर माफक असावा ! 


आता आम्ही बसमध्ये बसून रोमच्या दिशेनं प्रस्थान केलं. हा साधारणतः  साडेतीनशे किलोमीटर अंतराचा पल्ला होता. ह्या प्रवासात आरंभीच्या काळात ऍंड्रियाटिक समुद्राने आमची साथ दिली. ह्या समुद्राचं पाणी अगदी निळंशार, नितळ होतं. कधी पाण्याच्या दोन तर कधी तीन छटा बसमधून सुद्धा स्पष्ट दिसत होत्या. कोकणात आरे वारे इथं समुद्राच्या अशा छटा दिसल्या होत्या असं प्राजक्ता म्हणाली. मला कोकणातील जेवणाव्यतिरिक्त फारसं काही आठवत नसल्यानं मी मान डोलावली. 



ह्या प्रवासातील दोन व्हिडीओ आणि काही चित्रं !







ऍंड्रियाटिक समुद्र







इटालियन शेती ! 
युरोपातील  थंड भागांना अन्नधान्याचा पुरवठा करायचा म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना मेहनत तर करावी लागणारच !



कापणी केलेल्या शेतांमध्ये शिस्तीनं उभे राहिलेले बाल वृक्ष ! त्यांनाही दररोज न्हाऊ घालून, त्यांचे केस वगैरे विंचरून त्यांच्या मातांनी इथं उभं केलं आहे की काय असा संशय यावा इतकं त्यांचं नीटनेटकं रूप !


रोमच्या जवळ आल्यानंतर दिसलेली काही सुंदर फुलं !



आमचं रोममधील हॉटेल शहराच्या बाह्य भागात होतं. रोम शहराच्या ह्या बाह्य भागाचं  प्रथम दर्शन तरी काही फारसं आकर्षक नव्हतं. 



हॉटेल आणि सायंकाळचे भारतीय हॉटेलमधून मागविलेलं जेवणसुद्धा साधारण दर्जाचं होतं. जेवणानंतर आम्ही फेरफटक्यासाठी बाहेर पडलो. परिसर निसर्गसौंदर्यानं नटलेला नसला तरी सायंकाळच्या वेळची जाणवणारी एक हुरहूर इथंही जाणवत होती. ऐतिहासिक रोम शहरात प्रवेश केल्याचा आनंद एकीकडं मनाला सुखावत होता, त्याचवेळी आता ह्या एका संस्मरणीय सहलीचे केवळ दोनच दिवस बाकी राहिल्याची भावना कुठंतरी चुटपुट निर्माण करत होती. 


ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
श्री मनोहर राय - सहलनोंदी 
विकिपीडिया / माहितीमायाजाल 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 

(क्रमशः )
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...