मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

श्रीदेवी


आयुष्य जसजसं अधिकाधिक बिझी होत जातं तसतसं बालपणाच्या, कॉलेजजीवनातील आठवणी दुरवर जात असल्यासारख्या वाटतात. पण काही प्रसंग असे घडतात की त्या आठवणी, ते क्षण पुन्हा अगदी जवळुन अनुभवल्यासारखे सामोरे येतात. आज सकाळ सकाळी श्रीदेवी गेल्याची अगदी धक्कादायक बातमी ऐकली आणि तिच्या अनेक चित्रपटांच्या आठवणी जाग्या झाल्या. 

एक गोष्ट मान्य करायला हवी, माझं चित्रपटक्षेत्राचं ज्ञान मर्यादित आणि शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मी अगदी मोजके चित्रपट पाहिले होते आणि त्यामुळं श्रीदेवीसारख्या अत्यंत गुणी अभिनेत्रीच्या कारकिर्दीवर काही लिहायचं धारिष्टय खरतर मी करु नये. पण माझा बालमित्र आणि अगदी संवेदनशील माणुस RRR ने सकाळीच अगदी दुःखी होऊन म्हटलं काही तरी लिही. ह्याच्याबरोबर अगदी लहानाचा मोठा झालो आणि मागे राजेश खन्ना गेला तेव्हाही आम्ही दोघे दुःखी झालो होतो. बघायला गेलं तर ह्या कलाकारांना आपल्या गतआयुष्याला जोडणारे दुवे म्हणता येईल आणि त्यामुळं ते काळाच्या पडद्याआड गेले की आपल्याला खूप काही गमावल्यासारखं वाटतं. 

श्रीदेवीच्या अनेक दशके व्यापलेल्या चित्रपटकारकिर्दीचा विस्तृत आढावा घेण्याची ताकद माझ्यात नाही. त्यामुळं काही मोजक्या चित्रपटातील तिच्या रुपांचा इथं थोडाफार संदर्भ द्यायचा प्रयत्न करु इच्छितो.  

Julie - १९७५ सालच्या ह्या चित्रपटात श्रीदेवीनं बालकलाकाराची भुमिका केली होती. ह्या चित्रपटात मान्यवर कलाकार ओमप्रकाशसोबत 'My Heart is beating' ह्या गाण्यावर नाचणाऱ्या त्याच्या संपुर्ण कुटुंबातील छोटी श्रीदेवी चांगलीच लक्षात राहते. खरंतर हा चित्रपट पाहिला २००५ च्या आसपास आणि लक्षात राहिला तो त्यातील गाण्यांसाठी !
हिम्मतवाला / अकलमंद - जितेंद्र, जयाप्रदा आणि श्रीदेवी ह्यांनी बहुदा १९८३ - ८५ सालात आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता. काहीसे भडक रंगीबेरंगी कपडे, पुढच्या रांगेतील प्रेक्षकांसाठी लिहलेली गाणी ही ह्या चित्रपटांची वैशिष्टये होती. त्यात बिनधास्त भुमिका श्रीदेवीनं अगदी हुबेहूब वठवल्या होत्या. 
नगिना  - १९८६ साली आलेल्या ह्या चित्रपटाच्या वेळी आम्ही थोडेफार मोठे झालो होतो आणि केवळ एका गाण्यानं ("मैं तेरी दुश्मन , दुश्मन तु मेरा !") संपुर्ण राष्ट्राला वेड लावण्याची किमया श्रीदेवीनं इथं साध्य केली. 
MR. इंडिया - श्रीदेवीच्या बहुरंगी अभिनयक्षमतेची साक्ष देणारा हा चित्रपट. "हवा हवाई !" हे गाणं अजुनही लोकप्रिय आहे. ज्याच्या व्यक्तिमत्वावर चित्रपटाचं नाव ठेवलं गेलं तो अनिल कपुर, "मोगैम्बो खुश हुआ" हे भारतभर प्रसिद्ध झालेलं वाक्य बोलणारा अमरीश पुरी असताना खरा भाव खाऊन गेली ती श्रीदेवी ! 
असं म्हटलं जातं की श्रीदेवी येईपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी ही नायकप्रधान होती. नायिका केवळ सहाय्यक भूमिकेत असतं. MR. इंडिया पासुन श्रीदेवीनं ह्या संकल्पनेस धक्का देण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात केली असावी. तेजाबनंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या माधुरी आणि श्रीदेवी ह्या दोघींनी ९० च्या कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीवर आणि चाहत्यांच्या मनांवर राज्य केलं. काही काळ त्या दोघी एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हणुन ओळखल्या गेल्या.   
सदमा  हा चित्रपट माझ्यामते कमल हसनचा म्हणुन ओळखला जाईल. एका special child च्या रुपातील श्रीदेवीची काळजी वाहणारा आणि तिच्यात गुंतून गेलेला नायक त्यानं आपल्या समर्थ अभिनयाद्वारे यथासांग साकारला. पण त्या भुमिकेतील अल्लडपणा श्रीदेवीनं ज्या प्रकारे साकारला त्याला तोड नाही. रुळाला कान लावून आगगाडीची वाट पाहण्याचा क्षण तर कमालीचा !

श्रीदेवीनं कर्मा, सल्तनत ह्यासारख्या बहूकलाकारांनी नटलेल्या चित्रपटात सुद्धा आपला ठसा उमटवला. अमिताभबरोबर खुदागवाह मध्ये काम केलं. ह्या तीन चित्रपटात तिनं मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेयर करण्याची तयारी दर्शवितांनाच आपलं अस्तित्व कसं प्रभावीपणे दाखवून द्यायचं ह्या आपल्या क्षमतेची जाणीव करुन दिली.  
सीता गीताचा रिमेक असलेल्या चालबाज चित्रपटांत तिने दुहेरी भुमिका बजावली. ह्यात दोन टोकाच्या व्यक्तिमत्वाच्या बहिणींच्या भुमिका तिनं अगदी समर्थपणे साकारल्या.  
चांदनी, लम्हे ह्या दोन्ही चित्रपटांद्वारे तिनं उत्कट प्रेमिका ही भुमिका अगदी परिपूर्णतेने साकारली. युरोपच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या ह्या प्रेमकथांनी त्या दशकातील पिढीला वेड लावलं. लम्हेमध्ये आपल्यापेक्षा वयानं बऱ्याच मोठ्या असणाऱ्या अनिल कपूरच्या प्रेमात पडणाऱ्या प्रेमिकेचं रुप तिनं अगदी परिपूर्णतेनं निभावलं.    

त्या काळातील कॉलेजकन्यांनी श्रीदेवीत आपलं रुप पाहिलं असावं. तिनं साकारलेल्या बंडखोर, खट्याळ युवतीच्या छटा त्यांना स्वतःमध्ये जाणवल्या असाव्यात पण बंधनामुळं स्वतःला कदाचित त्यांना प्रत्यक्ष जीवनात त्या साकारता आल्या नसल्यानं त्यांनी श्रीदेवीला अगदी डोक्यावर उचलुन धरलं. तिनं साकारलेल्या प्रेमिकेच्या रुपात त्या तरुणींनी स्वतःला पाहिलं असावं आणि आपल्या प्रेमिकेच्या रुपात तरुणांनी तिला ! 

श्रीदेवीचं एक खास वैशिष्टय म्हणजे ती पाश्चात्त्य आणि भारतीय पारंपरिक ह्या दोन्ही वेशभूषेत अगदी सराईतपणे वावरायची !  

पुढं अचानक तिला संसार थाटावा वाटला आणि मग बोनी कपूरशी लग्न करुन मोकळी झाली. लग्नानंतर तिनं पत्नीची आणि आईची भुमिका अगदी मनापासुन निभावली. चित्रपटसृष्टीपासून तिनं दीर्घकाळ संन्यास घेतला. आपल्या मुलींना मोठं केलं.  

मुली जशा मोठ्या झाल्या तसं तिच्यातील अभिनेत्रीनं तिला परत साद दिली असावी आणि मग तिनं पुनरागमन करुन इंग्लिश विंग्लिश, मॉम ह्या चित्रपटांतुन गृहिणी आणि एका समर्थ आईची भूमिका साकारली. 

बालकलाकार, अल्लड युवती, प्रेयसी ह्या रुपानंतर आता गृहिणी, माता ही सर्व रुपं समर्थपणे पेलणारी श्रीदेवी अजुन बराच काळ आपल्या चाहत्यांना अभिनयाची मेजवानी देत राहील अशा समजुतीत असताना अगदी अचानकपणे काल रात्री आमच्यातुन तु निघुन गेलीस. 

चाहत्यांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणारे कलाकारांना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याकडे हवा तितका वेळ द्यायला मिळत नाही किंबहुना आपलं व्यावसायिक रुप राखण्यासाठी करावी लागणारी धडपड कदाचित त्यांना जीवघेणी ठरु शकते अशा आशयाचा संदेश व्हाट्सअँपवर आला. मेरा नाम जोकर मध्ये राज कपूर म्हणाला होता - 'Show Must Go On!"

श्रीदेवी - तु इतक्या लवकर जायला नको होतं !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...