मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

गुलाबजाम !!


दृष्टिकोन १ - आयुष्यात अचानक आलेली आपत्कालीन परिस्थिती! त्यामुळं जीवनातील सर्व आनंद, सुख बाजुला सारुन केवळ दैनंदिन जीवन कसबसं जगणं हेच केवळ जीवनाचं ध्येय बनवुन जगणारी एक तिशीतील स्त्री! मनातील बाकी सर्व भावनांना मुरड घालुन, जनसंपर्क जमेल तितका टाळणारी ! अचानक तिच्या आयुष्यात जबरदस्तीनं शिरकाव करणारा विशीतला युवक! त्याची संवेदनशीलता तिला भावते. एकटीनं वाळवंटासारखं आयुष्य जगणं विरुद्ध आयुष्याच्या लढ्यात एका पुरुषाची साथ लाभणं ह्यातील फरक प्रथमच ती अनुभवते. आयुष्याच्या ज्या स्थितीवर ती असते तिथं केवळ कोणताही एक पुरुष तिला त्यातुन बाहेर काढु शकला नसता, केवळ ह्या पुरुषाची संवेदनशीलता तिला ह्यातुन बाहेर काढण्यास हातभार लावते. ह्या सुखद अनुभवाला सामोरं जात असताना नकळत आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या ह्या तरुणात गुंतत जाते आणि अशा वेळी अचानक तिच्यासमोर ह्या युवकाच्या खऱ्या स्वप्नाचा उलगडा होतो. आणि तिचा मोठा भ्रमनिरास होतो. पण ह्या युवकाने तिला एका गर्तेतून बाहेर काढलं असतं आणि त्यामुळं समाजाच्या प्रवाहात ती सामील होण्यास अधिक सक्षम बनली असते. 

सारांश १- नवयुवका, तुझं स्वप्न कितीही भव्यदिव्य असो, ते साध्य करत असताना ह्या सर्व प्रकारात एका स्त्रीच्या भावजीवनाशी आपण खेळत आहोत ह्याची जाणीव ठेवायला हवी!  

दृष्टिकोन २ - कॉर्पोरेट जगतातील एक स्वप्नवत नोकरी आणि ती सुद्धा लंडनसारख्या शहरात, एका सुंदर तरुणीशी लग्न जमलेलं - अशा परिस्थितीत केवळ आपलं मराठमोळ्या खाद्यपदार्थाचा प्रसार करण्याचं स्वप्न पुर्ण करण्याची आस घेतलेला एक देखणा तरुण सर्व  सुखांचा त्याग करुन मराठमोळ्या पदार्थाच्या पाककृती शिकण्यासाठी पुण्यात येऊन धडकतो. आपल्या रुमपार्टनरच्या डब्यातील रुचकर भाजीचा शोध घेत एका बाह्यदर्शनी विक्षिप्त अशा मध्यमवर्गीय स्त्रीकडं जाऊन पोहोचतो. तिनं आपल्याला शिष्य म्हणुन स्वीकारावं म्हणुन तिचं सर्व तऱ्हेवाईक वागणं सहन करतो. ह्या सर्व प्रवासात तिची दुःख जाणुन घेतो आणि तिला तिच्या कोषातून बाहेर येण्यास मदत करतो. योग्य वेळ येताच तिला तिच्या समवयस्क तरुणाशी गाठ घालुन देतो आणि एक विस्कटलेल्या आयुष्याची घडी घालून देण्यास हातभार लावतो. 

सारांश २- ह्या तरुणाच्या मनात त्या स्त्रीविषयी नक्की काय भावना आहेत हे तोच जाणे ! कदाचित ती जरी त्यात गुंतली गेली असली तरी तो तिच्यात गुंतला गेला आहेच असं १००% म्हणू शकत नाही. आणि जरी गुंतला गेला असला तरी आपली ध्येयं पाहता, वयातील अंतर पाहता आपण तिला योग्य न्याय देऊ शकु ह्याची त्याला कदाचित खात्री नसावी. त्याच्या वागण्याचं मुल्यमापन करताना त्याच्या मनातील द्वंद्वाचा विचार करायला हवा! 

एक उत्तम चित्रपट ! पुन्हा एकदा विचार करायला लावणारा ! मराठी चित्रपटांची वाटचाल खरोखर चांगल्या दिशेनं चालु आहे. वरकरणी संथ वाटत असला तरी संपुर्ण चित्रपट कथेच्या दृष्टीनं वेगानं पुढे सरकत असतो. मराठी खाद्यपदार्थांची मोहक दृश्ये मनाला भावतात, त्यात खरोखर मेहनत घेतली गेली आहे. डायल-अ-शेफची संकल्पना आवडली. सोनाली कुलकर्णीचा अभिनय लाजवाब ! त्या विशिष्ट परिस्थितीत सापडलेल्या स्त्रीच्या मनातील संवेदना संपुर्ण शुन्य नसतात त्या कशा स्वरुपात चेहऱ्यावर आणायच्या हे तिनं अप्रतिमपणे साकारलंय ! सिद्धार्थ चांदेकर एक देखणा अभिनेता आणि त्यानं आदित्याची भुमिका सुरेख साकारली आहे. चित्रपटाच्या आरंभी रुम पार्टनरच्या डब्यातील पदार्थाचा पहिला घास घेताना आपण ज्याच्या शोधात आलो आहोत ते आपल्याला सापडलं हे ज्याप्रकारे त्यानं चेहऱ्यावरील हावभावाद्वारे व्यक्त केलं ते अप्रतिमच ! ह्यापुढं गुलाबजाम खाल्ल्यावर कसं मस्त वाटलं हे चेहऱ्यावरील हावभावाद्वारे दाखवायचं आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे हा ट्रेंड येणार हे माझं भाकीत ! 

शनिवार - ते सोमवार सकाळ - दोन चित्रपट / तीन ब्लॉग पोस्ट्स - Time to go back to work Aditya Patil!! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...