श्रीदेवीच्या अकाली मृत्युनंतर तिची आठवण म्हणुन पोस्ट लिहिली आणि जी एका ग्रुपमध्ये पोस्ट केली. तिथं एका अनाहुत स्त्रीने त्यावेळी काही जणांत लोकप्रिय झालेल्या आपण सैनिकांच्या मृत्यूची दखलसुद्धा घेत नाही आणि एका अभिनेत्रीवर मात्र भरभरुन प्रतिक्रिया देतो अशा स्वरूपाच्या दोन तीन कंमेंट्स माझ्या पोस्टवर टाकल्या. भारतीय सैन्याविषयी असलेला माझ्या मनातील जो अतीव आदर आहे तो सोशल मीडियावर मी व्यक्त करावा की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आणि त्यात दुसऱ्या कोणी दखल द्यायची खरं तर गरज नाही. आणि ज्याच्याशी ओळख नाही अशा दुसऱ्या माणसाच्या पोस्टवर अशी अनाहुत प्रतिक्रिया देणं हा उद्धटपणा होय. उद्धट माणसांच्या तोंडी मी चारचौघात लागत नसल्यानं मी गप्प बसलो. प्रत्येक गोष्टीतून शिकावं म्हणतात तसं आता उठसुठ सर्वत्र पोस्ट प्रसिद्ध करणं बंद हा ह्या प्रकरणातून घेतलेला धडा !
दुसऱ्या घटनेत मी in-depth मध्ये लिहत नाही अशी मला प्रतिक्रिया देण्यात आली. आणि ही प्रतिक्रिया देणारी व्यक्ती मला माझी बाजु मांडण्याची संधी न देता स्वतःचे म्हणणं बोलत राहिली. पण एक महत्त्वाचा मुद्दा त्यातुन सामोरा आला की माझ्यात सखोल लिहिण्याची क्षमता नाही असा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळं इथं एका गोष्टीचं स्पष्टीकरण देणं मी आवश्यक समजतो. मला ज्या विषयात जी काही थोडीफार माहिती आहे आणि ज्याच्या आधारावर मी चरितार्थ चालवतो त्याविषयावर मी सोशल मीडियावर लिहिण्यास मला परवानगी नाही आणि ह्या निर्णयाचा मी मनापासुन आदर करतो. मला जे वाटलं ते लिहावे ह्यासाठी ह्या ब्लॉगची स्थापना. आणि हे लिहिताना कोणी दुखावलं जाणार नाही ही काळजी घ्यायचा आटोकाट प्रयत्न!
तिसऱ्या घटनेत सोशल मीडियावरील मतभेद प्रत्यक्षातील जीवनात सुद्धा ओढले जातात ह्याचाही अनुभव आला.
ह्या सर्वात शिकण्यासारखं बरंच काही ! आपण सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा / ब्लॉग वगैरे लिहिण्याचा निर्णय घेतो त्यावेळी स्वतःला संपुर्ण नेटविश्वातील कोणत्याही माणसापुढं पुढं ठेवत असता! भले तुम्ही स्वतःचे कितीही नियम पाळा, समोरचा माणुस स्वतःच्या अकलेनुसार आणि शिष्टाचाराच्या पद्धतीनुसार तुम्हांला निर्णय देणार. जर तुम्हांला हे झेपत नसेल तर तुमचा सोशल मीडियावरील वावर तुम्ही मोजका ठेवायला हवा आणि जर तुम्ही खमके असाल तर समोरच्याला सुद्धा सडेतोड प्रत्त्युत्तर देता आलं पाहिजे !
एक गोष्ट मात्र खरी, सोशल मीडियाचा वापर स्वतःकडं लक्ष खेचुन घेणं, दुसऱ्यांचा अवमान करणं ह्यासारख्या कारणासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आणि ह्यातुन आपल्या भारतीय समाजाचं विनम्रतेकडून अथवा सौजन्याकडून दूरवर जाणं मोठ्या प्रमाणात अधोरेखित होत आहे !
जाता जाता सोशल मीडियापासुन दूर जाणं शांततेच्या दृष्टीनं चांगलं असतं हे मात्र गेल्या काही दिवसांत जाणवलं !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा