मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १४ मे, २०१७

लिंक रोड - दीडेक तास किशोरजींच्या सोबत



आपांनी घड्याळाकडं नजर टाकली. रात्रीचे सव्वानऊ झाले होते. मग त्यांनी आपल्या 'To Do List' कडे नजर टाकली. सकाळपासून त्यातील दोन गोष्टी  संपल्या होत्या आणि चार वाढल्या होत्या. अजुन कार्यालयात थांबण्यात काही अर्थ नाही हे उमजून घेऊन आपा खाली उतरले. 

गोरेगाव स्पोर्ट्स संकुलापर्यंत आपण ताशी पंधरा किलोमीटरचा वेग गाठू शकलो ह्याबद्दल आपा मनातल्या मनात खुश झाले. असंच एकदा मोकळ्या रस्त्यावर 
'मुसाफिर  हूँ  यारों , ना घर हैं ना  ठिकाना 
मुझे  बस चलते जाना हैं,  बस  चलते जाना' !!

हे गाणं गात जावं अशी इच्छा त्यांच्या मनी प्रकट झाली. 

लिंक रोडवर पोहोचण्यासाठी वाहनांची लागलेली रांग पाहून आपा हिरमुसले झाले. पण शेवटी त्यांनी मागचा रस्ता पकडण्याऐवजी हाच रस्ता धरला. काही वेळानं डावीकडे वळण्याचा हिरवा सिग्नल नेमकी आपांची गाडी येताच लाल झाला. तेव्हा दूरवरून त्यांना किशोरचे सूर ऐकू आले. 

'ये लाल रंग  कब मुझे  छोड़ेगा 
मेरा  गम कब तलक मेरा दिल तोड़ेगा '

डावीकडे वळण घेण्यासाठी वाट बघत असलेल्या आपांना रस्त्याच्या कोपऱ्यात दबा धरून बसलेला ट्रॅफिक पोलीस दिसला. लाल सिग्नलवर आपण हे वळण घेतल्यावर त्यानं आपल्याला कसं पकडलं होतं ह्याच्या आपांच्या क्लेशदायक स्मृती जागृत झाल्या. किशोरजी एव्हाना आपांच्या बाजूलाच विराजमान झाले होते. किशोरजींनी बहुदा आपांच्या मनातल्या ट्रॅफिक पोलीसांविषयीच्या भावना ओळखल्या असाव्यात. 

खिज़ा के फूल पे आती कभी बहार नहीं 
मेरे नसीब पे मेरे दोस्त तेरा प्यार नहीं! 

किशोरजी गुणगुणत असलेलं हे गाणं आपल्या मनातील ट्रॅफिक पोलीसाविषयीच्या भावना कशा बरोबर व्यक्त करतं ह्याविषयी आपांच्या मनात समाधान निर्माण करुन गेलं. 

लिंक रोड तुडुंब भरुन गेला होता. दुचाकीस्वार, रिक्षावाले आपांच्या गाडीपासून दोन्ही बाजूला ५० मिमी अंतर ठेवून आपली वाहनं पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत होते. आपांची गाडी आपांप्रमाणं दडपणात आली होती. शेवटी एका बाइकनं तिला हळुवार स्पर्श करुन पुढे मुसंडी मारली. आपांचा अनावर झालेला संताप किशोरजींच्या ह्या गाण्यामुळं काहीसा निवळला. 

छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा !

तरीपण गाडीच्या सर्व बाजूला पडलेले ओरखडे पाहून लोक काय म्हणतील हा विचार त्यांच्या मनात आलाच. किशोरजी गाऊ लागले. 

कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम हैं कहना 
छोडो बेकार की बातों को कही बीत न जाये रैना!!

इंफिनिटी मॉल केवळ ३० ते ४० मीटर वर होता. कधी कधी आपण गाडी आणत नाहीत तेव्हा हेच अंतर आपण पाच मिनिटात चालत जातो ह्याची आपांना आठवण आली. पण हल्ली आपण कारनेच आलो हे त्यांना आठवलं. किशोरजींनी काहीशी खूण केली. अचानक लताजींच्या सुमधुर आवाजात गाणं ऐकू आलं. 

आज कल पाँव जमीं पर नहीं पड़ते मेरे।  

ती खूण हे मी लताजींचं गाणं ऐकवतो आहे ह्यासाठी होती हे आपांना आता कळलं. लताजींची दुसरी ओळ आपांच्या मनात दुसराच विचार आणून गेली. 

बोलो देखा हैं कभी तुमने मुझे उड़ते हुए!

आपली कार हवेत उडू लागली तर किती बरं होईल ह्या विचारानं आपा थोडे उत्साहित झाले. 

त्यांनी किशोरजींकडे नजर टाकली. 

मंज़िले अपनी जगह हैं रास्तें हैं अपनी जगह 
अगर कदम (ट्रैफिक) साथ ना दे तो मुसाफ़िर क्या करें!

किशोरजींचं गुणगुणणे सुरूच होतं. आज ट्रॅफिक खूपच भयंकर होता. दोन आठवड्यापूर्वी आपण इथंच उबेरमध्ये पन्नास मिनिटं अडकलॊ होतो ह्याची त्यांना आठवण झाली. किशोरजींनी तात्काळ गाणं बदललं.  

वो शाम कुछ अजीब थी  ये शाम भी अजीब हैं 
वो  (ऑटोरिक्षा) कल भी पास  पास  थी  वो  आज भी करीब हैं।  

तीस मिनिटं झाली तरी आपा इन्फिनिटी मॉलपर्यंत पोहोचले नव्हते. मध्येच संतापानं त्यानं एका रिक्षावाल्याला कोपऱ्यात चेपून आपली कार पुढे दामटली. रिक्षावाल्यानं नजरेनं त्यांना जबरा खुन्नस दिली. किशोरजींचं लक्ष रिक्षावाल्याकडं गेलं. 

आपकी आँखोमे कुछ महके हुए से राज हैं 
आपसे भी खूबसूरत आपके अंदाज हैं। 

किशोरजींनी  रिक्षावाल्यासाठी इतक्या चांगल्या गाण्याची निवड करावी ह्याचा आपांना तीव्र खेद वाटला. आणि आपा स्वतः गुणगुणू लागले  

मै शायर (ड्रायव्हर) बदनाम ओ मै चला 
महफ़िल से नाकाम मैं चला।  

किशोरजीनी आपांचा मूड ओळखला. आणि ते गाऊ लागले. 

बड़ी सुनी सुनी हैं जिंदगी ये जिंदगी।  

बराच  वेळ शांततेत गेला. किशोरजीनी मग गाण्यास सुरुवात केली. 

कहाँ तक ये मन को अँधेरे छुएंगे 
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे। 

खरंतर मे महिन्यापासून नेहमी आपा पावसाची वाट पाहायला सुरुवात करीत. पण ह्यावर्षी पावसाळ्यात ट्रॅफिकची काय हालत होणार ह्या विचारानं त्यांना खूप चिंताग्रस्त केलं होतं. किशोरनी त्यांच्या मनातील भावना नेमक्या ओळखल्या. 

चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाये 
सावन जो अगन लगाए तो उसे कौन बुझाये।

इन्फिनिटी कसाबसा पार झाला होता. घड्याळ्याच्या काट्यांनी दहा ओलांडले होते. किशोरजींची झोपण्याची वेळ झाली असावी. 

चला जाता हूँ किसी की धुन में 
धड़कते दिल के तराने लिए।  

ह्या ओळी गुणगुणत हा मस्त कलंदर कलाकार माझ्या गाडीबाहेर पडला. वाहतूक मंदगतीनं का होईना पुढे सरकत होती. पण किशोरजींच्या जाण्यानं मन खूप उदास झालं होतं. अशा ह्या ट्रॅफिकमध्ये आपल्यासोबत कोणी नाही हे जाणवलं होतं. 

कोई हमदम ना रहा कोई सहारा न रहा 
हम किसीके ना रहे कोई हमारा ना रहा !

क्या बताऊँ मैं कहा यूही चला जाता हूँ 
जो मुझे राह दिखाए वो सितारा ना रहा।  

ह्या गाण्याच्या ओळी हवेत विरतात न विरतात तोच आपांचा भ्रमणध्वनी खणखणला. "काय अजून ऑफिसातून निघाला की नाही!" आपल्या धर्मपत्नीच्या ह्या सुस्वरातील धमकीवजा प्रश्नानं आपांची सर्व उदासी दूर झाली होती. मिठचौकी पार पडली होती आणि 'पल पल दिल के पास' हे गाणं गुणगुणत आपा भरवेगानं घराकडं निघाले होते!

1 टिप्पणी:

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...