ह्या आठवड्यात एका सुंदर फ्रेंच भाषेतील चित्रपटाचा काही भाग पाहण्यात आला. ऑफिसातुन आधीच उशिरा आल्यानं तो अधिक उशिरापर्यंत जागून पूर्ण पाहिला नाही. पण जितका काही भाग पाहिला त्यावर ही पोस्ट!
चित्रपटाचं कथानक एका प्रतिभावंत कलाकाराभोवती गुंफलं गेलं आहे. त्याची प्रतिभा लेखणीद्वारे झरझर व्यक्त होत असली तर प्रत्यक्षात मात्र त्याला ह्या भावना व्यक्त करण्यास जमत नसतं. त्यामुळं ह्या अडचणीवर मात करण्यासाठी परदेशातील चालीरितीनुसार तो ह्या क्षेत्रातील एका तज्ञ सल्लागाराची नेमणुक करतो. आता चित्रपट म्हटला म्हणजे ही सल्लागार एक स्त्री असणं ओघानं आलं. आणि अजुन रंगत आणायची म्हटली तर ही सल्लागारच आपल्या नायकात भावनिकदृष्ट्या गुंतणार हे ही आलंच.
काही हॉलिवुड चित्रपटातील संवाद खूप अर्थपूर्ण असतात. कथानक सरळसोपं असतं, पात्र मोजकी असतात. कथानक उलगडतं ते केवळ संवादांतून; कथेतील पात्रांच्या भावनांच्या गुंत्यातून हळुवारपणे आपली वाट शोधत! You've got a mail आणि बहुदा Harry met Sally हे ह्या धाटणीतील काही चित्रपट! हा चित्रपट सुद्धा काहीसा त्या धाटणीतील!
सुरुवातीला थिअरीचे पाठ झाल्यावर सल्लागारबाई नायकाला रोल प्ले करायला सांगतात.
सल्लागारबाई : - "तु रेस्तरॉमध्ये जातोस आणि अचानक तुला आवडणारी मुलगी एकटीच एका टेबलवर बसलेली दिसते, आता तू काय करशील ?"
नायक - (काही वेळ विचार करुन) "बहुदा मी माझं टेबल पकडून बसेन आणि तिचं माझ्याकडं लक्ष जातंय का ह्याची वाट पाहीन!"
सल्लागारबाई पुर्ण हताश!! त्यांच्या चेहऱ्यावरील हे भाव पाहून
नायक - "मी तिच्या टेबलापाशी जाईन!"
रोल प्ले
नायक - "आपली हरकत नसेल तर मी काही वेळ आपल्याला सोबत देऊ का?
नायिका - (एका सेकंदात त्याला आपादमस्तक न्याहाळून केवळ चेहऱ्यावर हावभावाद्वारे होकार देते ! हावभावाद्वारे पुढील भावना योग्यप्रकारे व्यक्त होतात - म्हणजे तुम्ही इथं बसावं अशी माझी मनापासुन इच्छा नाहीए! पण वेळ घालविण्यासाठी माझ्याकडं दुसरा सध्या उपलब्ध पर्याय नाही आणि तु तसा काही मला उपद्रव देशील असं तुझ्या चेहऱ्याकडं पाहुन मला वाटत नाही. )
नायक - "आपण इथं एकट्याच बसला आहात का?"
नायिका - ("दिसत नाही का तुला, डोळे तपासून घे " - मनातील हे भाव प्रचंड प्रयत्नांद्वारे लपवून ) - "हो मैत्रिणीची वाट पाहत आहे!"
नायक - "असं का? तुमची मैत्रीण ट्रॅफिक मध्ये अडकली असेल का?"
सल्लागार टाइमआऊटची खुण करते.
सल्लागार - "इथं मैत्रीण महत्वाची नाही. तू संवाद तुझ्या नायिकेभोवती केंद्रित कर! तिला काही कॉम्प्लिमेंट्स दे !"
रोल प्ले
नायक - "तुम्ही सुंदर दिसताहात!"
सल्लागार प्रचंड वैतागून टाइमआऊटची खुण करते.
सल्लागार - " This is too direct. तुम्ही आताच संवादाला सुरुवात केली आहे आणि तू असा थेट मुद्याला हात घालू शकत नाही. म्हणजे घालू शकतोस पण ते अप्रत्यक्षपणे व्यक्त व्हायला हवं!
रोल प्ले
नायक - "बाकी तुझं कसं व्यवस्थित चाललंय ना "
नायिका - (मला काय धाड भरलीय! मनातील हे भाव महत्प्रयासानं दूर सारून!) "ठीक चाललंय. जीवन बरंचसं एकसुरी बनून गेलंय. जीवनात काही happening असं होतंच नाहीए!"
नायक - (क्षणभर थांबून) - "गेल्या पाच मिनिटात माझं आयुष्य मात्र आमुलाग्र बदलून गेलंय! (इथं आमुलाग्र हा योग्य शब्द आहे का हा वादाचा मुद्दा) माझ्या जीवनात प्रचंड चैतन्य निर्माण झालंय. वगैरे वगैरे "
सल्लागार प्रचंड आश्चर्यचकित होऊन टाईमआउटची खुण करते. "हा संवाद अचानक कुठून ह्या पात्राला सुचला - ही भावना!"
बाकी क्षणापासुन मग कथानक, संवाद अधिक प्रगल्भ होत जातात. पुढील भाग म्हणजे त्याचा गोषवारा !
संवादात मुख्य जबाबदारी पुरुषावर असते. म्हणजे बरेचसे पुरुष ह्या बाबतीत मठ्ठ असतात. आणि स्त्रिया त्यांना तसंही स्वीकारतात! तरीपण खालील मुद्द्यांवर त्यांनी प्रयत्न करायला हरकत नसावी. आधुनिक स्त्रीला बौद्धिक पातळीवरील संवाद आवडतात. पुरुषास फॅशन, आर्ट, फिल्म, नाटक क्षेत्रांची माहिती असणं चांगलं. बाकी क्रीडा, राजकारण आणि ऑफिस ह्या विषयांवर स्त्रीने स्वतःहून रस दाखविल्याशिवाय चर्चा सुरु करू नये. फॅशन, आर्ट, फिल्म, नाटक ह्या विषयांवर स्त्रीच्या कम्फर्ट झोनची मर्यादा जाणुन घ्यावी आणि चर्चा त्यात मर्यादित ठेवावी. मधुनच स्त्रीला अप्रत्यक्ष दाद द्यावी आणि मग तिला ती दाद आवडल्यास बोलणं चालू ठेवावं. अशा वेळी ती बहुदा शांत राहुन ती दाद मनातल्या मनात घोळवत राहण्याची शक्यता गृहित धरावी. जर स्त्री बोलू लागली तर चांगल्या श्रोत्याची भूमिका निभावता यायला हवी. बोलत्या स्त्रीला मध्येच खंडित करण्याची अरसिकता दाखवेल तो पुरुष आपलं दुर्दैव आपल्या हातानं ओढवून घेतो!
सर्व काही ठीक झालं तर महाराष्ट्रात "हात तुझा हातात" किंवा फ्रांसमध्ये फ्रेंच व्हर्जनने भेटीची सांगता करावी.
चित्रपट पूर्ण काही पाहता आला नाही. महाराष्ट्रातील विवाहित पुरुषासाठी असं काही मार्गदर्शन मिळण्याची नितांत आवशक्यता आहे. "वांग्याची भाजी चांगली झाली" हे विधान कितीही मनापासुन केलं तर बायकोची संशयास्पद नजर आपला चेहरा निरखून पाहते हे कित्येक वर्ष मी अनुभवलं. त्यामुळं ही कॉम्प्लिमेंट असू शकत नाही. पण "वांग्याची भाजी चांगली झाली" ह्या वाक्यानंतर पॉझ घेऊन मग दबल्या आवाजात "तुझ्या मानानं" किंवा "तुझ्या परीनं " बोलावं. ह्यात तुमच्या विनोदबुद्धीला दाद मिळण्याची शक्यता जास्त असते हा स्वानुभव! बाकी धोकाही असतोच! पण धोका घेतल्याशिवाय दाद मिळणार थोडीच!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा