मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २३ मे, २०१७

घोंघावणाऱ्या शक्यतांचं भेंडोळं !



म्हटलं जातं की अज्ञानात सुख असतं! ह्या मागील मुख्य मतितार्थ असा की सत्य परिस्थिती ज्ञात असणं वर्तमानकाळात आनंदानं जगण्यासाठी बऱ्याच वेळा अडथळा बनु शकतं. एकंदरीत जगात धडपडणाऱ्या करोडो लोकांत आपलं नेमकं स्थान कोणतं, आपल्या भविष्यात नेमकं पुढं काय वाढून ठेवलं आहे ह्या बाबतीत सत्य परिस्थितीची जाणीव असणं नेहमीच आनंददायी असतं असं नव्हे. म्हणुन ह्या घटकांविषयीचं अज्ञान सद्यकाळात माणसाला आनंदानं जगू देतं !

आता घोंघावणं म्हटलं म्हणजे मधमाशा आल्या आणि भेंडोळं म्हणजे त्रिमितीय वर्तुळाकार! म्हणून पोस्टच्या आरंभीच्या दोन प्रतिमा! खरंतर ह्या दोघांची मिळुन एक प्रतिमा बनवायला हवी! जन्मापासुन मनुष्याभोवती अनेक शक्यता घोंघावत असतात. बालक कोणत्या देशात, धर्मात जन्मलंय, त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी आहे ह्यावर ह्या शक्यतांच्या भेंडोळ्याचं वैविध्य अवलंबुन असतं. लहानपणी ह्या शक्यतांमधील नेमकी कोणती प्रत्यक्षात साकार होणार आहे ह्याविषयी क्लिष्टता थोडी कमी असते. म्हणजे पोरगं कोणत्या माध्यमाची कोणती शाळा निवडणार, कोणत्या खेळात सहभागी होणार वगैरे वगैरे! 

हळूहळू मग ह्या शक्यता क्लिष्ट रूप धारण करू लागतात. शालेय शिक्षण संपुन महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना कला, वाणिज्य आणि विज्ञान अशी तीन पुर्णतः वेगळी भेंडोळी बालकाभोवती घोंघावू लागतात. कोणतीही एक निवड बालकास अगदी वेगळ्या मार्गावर घेऊन जाणारी असते. मग बारावी नंतर समजा अभियांत्रिकीची कोणती शाखा निवडायची हा मोठा यक्ष प्रश्न येतो. पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी, धंद्यातील प्राथमिक निवड ही आपल्याला अगदी वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जाते. तसंच मग जीवनसाथीची निवड! 

ह्या विविध प्रसंगी आपल्याभोवती विविध शक्यता असल्या तरी आयुष्य एकच असतं. त्यामुळे प्रत्येकवेळी ह्या वेगवेगळ्या भेंडोळ्यातील केवळ एकच पर्याय आपल्याला निवडता येतो आणि आपण एकच पर्याय निवडलेला असतो. ह्या प्रत्येक Decision Point (निर्णयबिंदूंना) जोडून आपल्या आयुष्याची प्रवासरेषा बनलेली असते. 'इस मोड़ से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राहे!' हे गाणं केवळ भविष्यात मी ही पोस्ट लिहिणार आहे म्हणुन गुलजार ह्यांनी लिहिलं आहे हा माझा दावा आहे! मोकळ्या वेळात ह्या प्रत्येक milestone च्या वेळी समजा आपण वेगळा निर्णय घेतला असता तर काय झालं असतं ह्या शक्यतांच्या भेंडोळ्यांचं कल्पनाचित्र रंगवणं हा माणसांचा आवडता छंद असतो. 

वाढत्या वयानुसार माणसं काहीशी हेकेखोर मनोवृत्ती धारण करतात. भोवती असलेल्या अनेक शक्यतांपैकी बऱ्याचशा शक्यता ते सरळसरळ धुडकावून लावतात, कारण एकच की मला ह्या वयात अशी तडजोड करणं जमणार नाही. आणि मग आयुष्याच्या कोणत्याही क्षणी आयुष्य पुनर्रव्याखित होऊ शकतं हा सिद्धांत निरभ्र आकाशात दूरवर दिसेनासा होतो. हेकेखोर मनोवृत्तीला आपण आपल्यासोबत बाळगत असलेलं baggage (किंवा लोखंडी वजनदार गोळा) असं समजायला हरकत नाही. 

अजून एक मिती! भुतलावर विविध आजार, अपघात ह्या शक्यतांचं भेंडोळं प्रत्येक माणसाभोवती असतंच. काळजी घेऊन ह्यांची शक्यता कमी करणं आपल्या हातात असतं पण ती आपण पूर्णपणे शून्यावर आणू शकत नाही. त्यामुळं जीवनातील ह्या अशाश्वततेबद्दल भान असु देणं इतकंच आपल्या हाती असतं! आता रिमा लागू अचानक गेल्या. आपल्या सगळ्यांना अगदी हुरहूर लावुन गेल्या. त्यांना कधी ह्या शक्यतेच्या अस्तित्वाची जाणीव झाली असेल काय?  

जाता जाता समजा ह्या विश्वाचा जो कोणी सूत्रधार असेल तो ह्या सर्व शक्यता ह्या विश्वात अशा मुक्त स्वरूपात सोडून देत असेल. आणि जी शक्यता एखाद्या जीवाच्या, वस्तुच्या किंवा वास्तुच्या बाबतीत प्रत्यक्षात साकार होत असेल ते त्या जीवाचं, वस्तूचं वा वास्तूचं प्रारब्ध!! विश्वातील अगणित ग्रहांपैकी केवळ पृथ्वीवर जीवनसृष्टी निर्माण व्हावी आणि बाकी ग्रहांवर होऊ नये हे ही शक्यतांच्या भेंडोळ्याचेच उदाहरण! 

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...