मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २ जून, २०१७

वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग १

वीणा वर्ल्डतर्फे आमची ही सहकुटूंब तिसरी सहल आणि त्याचसोबत ही प्रवासवर्णनाची तिसरी श्रुंखला! आधीच्या दोन श्रुंखलाची वर्णने खालील लिंकवर वाचता येतील. 


वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क

(ह्या पोस्टच्या शेवटी आधीच्या सर्व भागांच्या लिंक्स आहेत )

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड 

(ह्या पोस्टच्या शेवटी आधीच्या सर्व भागांच्या लिंक्स आहेत )

मागं वळून पाहता प्रवासवर्णन करण्याच्या माझ्या शैलीत काहीसा फरक झाल्याचं मला जाणवतंय. सिमला सहलीचं वर्णन लिहिलं त्यावेळी मी भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणाचं वर्णन, वाटेत लागलेली गावं ह्यांचं अचूक आणि विस्तृत वर्णन करण्यावर भर दिला होता. हल्ली मी माझ्या मनातील विचार आणि भोवतालच्या परिस्थितीवरील टिपणी ह्यावर जास्त भर देतो असं मला जाणवतं. 

वीणा वर्ल्डतर्फे आमचा हा पहिला परदेश प्रवास. वीणा वर्ल्डची कार्यपद्धती अगदी पक्की ठरलेली असते. जसं की सिंगापुरचा व्हिसासंबंधीचे सोपस्कार यशस्वीरित्या पार पडल्याचा संदेश प्रत्यक्ष सहलीच्या केवळ आदल्या दिवशीच तुम्हांला मिळणार, विमानतळावर तुमची तिकिटं, व्हिसा तुमच्या हातात प्रत्यक्ष उड्डाणाच्या केवळ ३ तास आधी पडणार, ही त्यांची कार्यपद्धती! अगदी काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेली असली म्हणून काय झालं, माझ्यासारख्या चिंतातुर जंतुच्या मनाची किती ते घालमेल करीत असणार हे त्यांना कसं ठाऊक! बाकी प्रवासात माझे आणि माझ्याहुन जास्त सोहमचे खास दोस्त बनलेले इंद्रजीत कुलकर्णी ह्यांना ज्या ज्या गोष्टींची चिंता वाटते ते पाहुन मला काहीसं बरं वाटलं. म्हणजे कसं तुम्हांला सोबत ही नक्कीच दिलासा देऊन जाते त्यातला हा प्रकार! 

सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी सर्वांनी गेट क्रमांक ४ समोर हजर राहावं असं आम्हांला सांगण्यात आलं होतं. उबेर वेळेत आली नाही, वेस्टर्न एक्प्रेस समजा गडबडला अशा सर्व विपरीत परिस्थिती एकत्रित आपल्यासमोर ठाकल्या तर उगाचच काही बाका प्रसंग ओढवायला नको म्हणून मी चिंतेत होतो. A380 विमान येणार म्हणून सोहमसुद्धा चार वाजल्यापासून घरात फेऱ्या मारत होता. पाटील कुटुंबियातील दोन पिढ्यांची ही बेचैनी पाहून प्राजक्ताने झटपट तयारी केली आणि त्यामुळं  सायंकाळी साडेपाचलाच मी उबेरला फोन करु शकलो. गडी नेमका आसपासच असावा, दोन मिनिटात उभा ठाकला! रस्तेसुद्धा अगदी कट केल्यानुसार मोकळे मिळाले. सव्वासहानंतर दोन मिनिटांत गेट चारसमोर उतरताना मी प्राजक्ताकडं न पाहता पटापट बॅगा उतरवायला लागलो. हल्ली ट्रॉली प्रकरण सोहम समर्थपणे सांभाळत असल्यानं मी टॅक्सीवाल्याला पैसे देण्यामागे लक्ष केंद्रित केले. बाकी प्रवासातील आमची गडबड ऐकून त्या मराठी टॅक्सीवाल्यानं आम्हांला कोणत्या एजेन्सीद्वारे जात आहात, दर माणशी खर्च किती आणि त्यात सर्व काही समाविष्ट आहे का अशा बऱ्याच चौकश्या केल्या. तो समजा का पुढं मागं वीणा वर्ल्डद्वारे प्रवासास गेला तर एक अधिक संतुष्ट ग्राहक वीणावर्ल्डला मिळवून देण्याचं श्रेय मी घेऊ इच्छितो. वीणाताई ही पोस्ट वाचत असल्यास पुढील सहलीत ह्या बाबीची योग्य ती दखल घ्यावी ही विनंती. घाईगडबडीत पाण्यानं भरलेली बाटली टॅक्सीतच राहिली. नवरे हे विसरभोळे, वेंधळे असतात किंबहुना ही विशेषणे खास नवऱ्यांसाठी मराठी भाषेतच अस्तित्वात आली असावी ह्या सिद्धांताला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला. 

पुढील दीड तास गेट ४ च्या समोर छायाचित्रण, भोवताली जमलेल्या वीणा वर्ल्डच्या संभाव्य सहप्रवाश्यांचे निरीक्षण करण्यात आम्ही घालवला. मावळत्या सुर्याचं हे एक मनोहारी दृश्य!



हा एक फॅमिली सेल्फी! 



तहान लागल्यानं आणि पाण्यानं भरलेली बाटली मुंबई प्रवासाला गेल्यानं मी साठ रुपयाची बाटली घेऊन आलो. 

सिंगापुरला जाणारे एकंदरीत १२० प्रवासी त्यादिवशी त्या विमानानं जाणार होते. त्यांचे केवळ सिंगापुर, सिंगापूर - थायलंड, सिंगापूर- हॉंगकॉंग असे तीन गटांत विभाजन झाले होते. पुढील सात दिवस ज्यानं आमची अगदी व्यवस्थित काळजी वाहिली त्या "सागा" म्हात्रेशी आमची पहिली भेट इथेच झाली. त्यानं आमचा व्हिसा, खाऊची पुडकी, पोंचो अशा जीवनावश्यक वस्तू आमच्या हातात सोपवल्या.  

चेक-इन बॅग्स सिंगापूर एअरलाईन्सच्या हातात सोपवून आम्ही सुरक्षातपासणीसाठी पुढे निघालो. त्यावेळी सिंगापूर इथं लागणाऱ्या इमिग्रेशनचा फॉर्म आमच्या हाती देण्यात आला. पुढील सात दिवस आमच्या हातात विविध देशांचे गंभीर मुद्रा धारण केलेले अधिकारी अशी कागदाची अनेक चिठोरी आमच्या हाती सोपवत होते, आणि "सागा" म्हात्रे ही सर्व चिठोरी व्यवस्थित सांभाळून ठेवा असे आम्हांला त्या अधिकाऱ्यांहून गंभीर मुद्रेनं सांगत होता. ह्या सात दिवसांत आम्हां सर्वांची ही चिठोरी गायब होत होती आणि नंतर सापडत होती. पतीपत्नीचे सत्तर ऐशी टक्के संवाद पासपोर्ट तुझ्याकडे आहे, चिठोरे माझ्याकडे आहे ह्याभोवती चालले होते. बाकी मग डॉक्टर नगरकर जोडप्यानं "तुझं आहे तुजपाशी" ह्या सूत्राचा यशस्वीरित्या अंगीकार केला पण प्राजक्तानं मात्र "तू भी क्या याद रखेगा!" च्या  आविर्भावानं माझ्याकडं पाहून माझी सर्व कागदपत्र स्वतः सांभाळण्याचं कबूल केलं. 

मासळीबाजारातील गर्दी परवडली असला प्रकार सुरक्षातपासणीसाठी होता. आपण मागं राहतो आणि आपली मौल्यवान बॅग मात्र सर्व तपासण्या पूर्ण करून अशीच बाहेर येऊन राहते असा अनुभव माझ्याच बाबतीत का घडतो हे आजवर मला न उमजेलेलं कोडं आहे. "चिंतातुर जंतू" दुसरं काय! नंतर मग अजून एक गंभीर चेहऱ्याचा इमिग्रेशन अधिकारी! त्याचा यशस्वीरित्या मुकाबला करुन आम्ही एकदाचे बाहेर पडलो. नेहमीप्रमाणं ह्या दोघांनी सबवेचं सँडविच आणि मी डोसा घेतला. त्यानंतर आम्ही चालत चालत इच्छित गेटपाशी येऊन स्थानापन्न झालो. सोहमची भिरभरती नजर ज्याला शोधत होती ते सिंगापुरवरून आलेलं A380 एकदाचं गेटपाशी आलं आणि सोहमचा जीव भांड्यात पडला. 


"अजि मी ब्रह्म पाहिले" च्या आविर्भावातील ही सोहममुद्रा !!  



विमानाने बऱ्यापैकी वेळेत उड्डाण केलं. त्यातील उदघोषणेनुसार  एकंदरीत २३ कर्मचारी वर्ग होता. त्यामुळं रात्रीचं जेवण वेळेत आलं. हिंदू व्हेज मील आणि हिंदू नॉन - व्हेज मील असले दोन प्रकार विमानात उपलब्ध असतात. त्यातील हिंदू नॉन - व्हेज मील पहिल्यांदा सर्व्ह केला जातो ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी! जमिनीवर असताना विशिष्ट दिवशी शाकाहार पाळणारा मी विमानात मात्र बऱ्याच वेळा मेनू पाहून हे निर्बंध धुडकावून देतो. इथं मदिरेचे काही प्रकार सुद्धा उपलब्ध असतात. त्यामुळं दर्दी रसिक मंडळींची चांगलीच सोय होते. 

विमान स्थानिक वेळेनुसार साडेसात वाजता सिंगापूरला उतरलं. इमिग्रेशन मध्ये फारसं काही टेन्शन नव्हतं. ते सोपस्कार पार पाडून आम्ही बाहेर आलो. वीणावर्ल्ड सारख्या मोठाल्या प्रवासकंपन्या मोजक्या दिवसात, वाजवी दरात  प्रवाशांना अधिकाधिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळवून देतात. त्यामुळं प्रवाशांनी सुद्धा काही बाबतीत सहकार्य दाखवावं अशी अपेक्षा असते. जसं की आमचं पहिल्या दिवसाचं चेकइन तीन वाजल्यानंतर असल्यानं आम्ही विमानतळावरच ताजतवाने व्हावं असं आम्हांला सांगण्यात आलं होतं. विमानतळावरच ताजतवाने होणं हा माझ्यासाठी अगम्य प्रकार आहे, मला तो अजिबात झेपत नाही. पण बाकीचे काही सहप्रवासी मात्र चांगले फ्रेश होऊन आलेले दिसत होते, बहुदा नवीन टी-शर्ट घातला की त्यांच्या मेंदूचा कप्पा त्यांच्या सर्वांगात "तू टवटवीत झाला आहेस! आता कसा हसतमुखानं वावर बरं!" असा संदेश पोचवत असावं. मधल्या काळात मी मात्र घरच्यांना सुखरूप पोहोचलो हे सांगण्यासाठी मोबाईल डेटा ऑन केला आणि एका मिनिटात दोनशे रुपयांचा फटका खाल्ला. 

विमानतळाबाहेर तौफिकने आमचं स्वागत केलं. स्थानिक कायद्यानुसार प्रत्येक प्रवाशी गटासोबत एक स्थानिक वाटाड्या असणं आवश्यक आहे. तौफिक भारदस्त व्यक्तिमत्वाचा वजनदार आणि गंमतीदार गृहस्थ आहे. रमादान रोझे दुसऱ्या दिवसापासून सुरु असल्यानं त्याची मुद्रा काहीशी चिंतीत असल्याचं मला उगाचच वाटत होतं. आम्ही प्रथम एका साध्या उपहारगृहात नास्ता केला. हे बऱ्यापैकी छोटंसं उपहारगृह होतं, आणि नक्की नाही पण आपल्या सिंगापूर वास्तव्यात मोदींनी इथंच भोजन घेतलं असं "सागा" किंवा "तोफी" म्हणाल्याचं मला स्मरतं. मग अमेरिकन मुद्रेला सिंगापूर डॉलरमध्ये  परिवर्तित करून आम्ही सिग्नेट ह्या कंपनीचं सिम कार्ड घेतलं. ह्यावर मला सिंगापुरचा स्थानिक क्रमांक आणि इंटरनेट वापरण्याचा परवाना मिळाला. आधीच्या आठवड्यात सिंगापुरी आलेला माझा मित्र सतीश ह्यानं ही माहिती दिली होती.  

मग आम्ही सिंगापूर नदीवर फेरफटका मारण्यासाठी कूच केलं. सिंगापूरमधील मोठमोठाल्या कंपन्यांची कार्यालयं ज्या भागात आहेत तिथं आम्ही हा फेरफटका मारला. वातावरण 
  




दूरवर singapore merlion ने आम्हांला दर्शन दिलं. फार पूर्वी सिंगापूरच्या राजाला हा merlion दिसला होता त्यानं राजावर हल्ला न करता तो तसाच तिथून शांतपणे निघून गेला ही कथा "सागा" ने सांगितली. 





बोटीची सफर संपेतोवर वातावरण कुंद होऊ लागलं होतं आणि अशा वातावरणात merlion अगदी खुलून दिसत होता. 


आम्हांला सोडून बस पार्किंगसाठी गेली होती. तिची वाट पाहत आम्ही सर्व पावसापासून आपला बचाव करण्यासाठी आडोशाला उभे होतो. सिंगापूरच डाऊनटाऊन आपला मनोहारी नजराणा आमच्यापुढं पेश करीत होतं. बस आली आणि आम्ही धावतच त्यात शिरलो ते 'Gardens By The Bay' भेट देण्यासाठी. मी सहसा अशा बोटॅनिकल गार्डनला भेट देण्यासाठी नाउत्सुक असतो आणि प्राजक्ता मात्र खूप उत्साही असते. परंतु आत शिरल्यावर मात्र माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. ह्या गार्डनचे छत म्हणजे स्थापत्यशास्त्रातील मनुष्यानं गाठलेल्या प्रगतीचं एक उत्तम उदाहरण आहे.   स्थापत्यशास्त्रातील कौशल्य आणि सौदर्यदृष्टी एकत्र आली म्हणजे काय सुंदर मिलाफ होतो हे ह्या गार्डनच्या संरचनेवरून एकंदरीत आपणास जाणवतं. इथं निवडुंगाचे असंख्य प्रकार आपणास पाहावयास मिळतात आणि सुंदर फुलेदेखील! इथं शब्दांनी त्यांचं सौदर्य टिपण्याचा प्रयत्न करण्याऐवजी चित्रांनाच बोलु देणं उचित ठरतं!

























"गार्डन बाय द बे" च्या भेटीनंतर आम्ही निघालो ते आमच्या भोजनस्थळी! खरंतर एक दिवस - एक पोस्ट असा माझा दंडक असतो. पण आदल्या दिवसापासून सुरुवात केल्यानं ह्या पोस्टपुरता इथंच थांबतो. 

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...