वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग २
वातावरण ढगाळ होतं आणि पावसास सुरुवात झाली होती. भोजनासाठी आम्ही एका हॉटेलापाशी आलो. वीणा वर्ल्ड आणि केसरी ह्या दोन्ही कंपन्या प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तम रेस्टारंटची निवड करतात. परदेशी अशी मोजकीच ठिकाणं असल्यानं ह्या दोन्ही कंपन्यांचे प्रवासगट बहुदा सारख्याच वेळी एका भोजनस्थळी येऊन थडकतात. भारतात सुद्धा असं होतं, परंतु भारतातील उपहारगृह प्रशस्त असतात आणि त्यामुळं हा कळीचा मुद्दा होत नाही. परंतु परदेशात मात्र होतो. अशा वेळी प्रत्येक ठिकाणच्या ज्या काही रितीभाती असतात त्या जाणुन घेऊन त्या पाळण्याचा प्रयत्न करणं, रांगेची शिस्त पाळणं ही किमान बाब आपण पाळू शकतो. सागर म्हात्रे हा आमचा सहल व्यवस्थापक! त्यानं ही वेळ चांगली निभावुन नेली. जेवण चांगलं होतं, परदेशात प्रत्येक वेळी वीणा वर्ल्डनं भारतीय जेवणाची सोय केली.
जेवणानंतर शेवटी एकदाचे आम्ही आमच्या हॉटेलपाशी पोहोचलो. चेकइन केलं आणि रूमवर पोहोचल्यावर आमच्या एका बॅगेची चेन तुटल्याचं आणि ती पुढील प्रवासासाठी निकामी ठरल्याचं आमच्या ध्यानात आलं. थोड्या वेळातच परत नाईट सफारीसाठी बाहेर पडायचं असल्यानं झटपट आंघोळ आटपून आम्ही परत बसमध्ये स्थानापन्न झालो. दुसऱ्या दिवशीची सकाळची वेळ मोकळी असल्यानं जुरॉग बर्ड पार्कला येण्यात किती लोकांना रस आहे ह्याची "सागा" आणि "तोफी" ह्यांनी चाचपणी केली. पण केवळ आठ लोकांनी ह्यात रस दाखविल्यानं हा बेत मागे पडला.
पाऊस थांबला होता आणि संध्याकाळची कोवळी उन्हं वातावरण आल्हाददायक बनवत होती. आम्ही आता सिंगापूर नाईट सफारीला भेट देत होतो. बसमध्ये सर्वांनी आपली ओळख करुन दिली. नाईट सफारीला आम्ही प्रत्येक कुटुंबाच्या गटागटानं बसलो. नाईट सफारी हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ह्यात फ्लेमिंगो, विविध प्रकारची हरिणे, सिंह, तरस, विविध जातीचे जंगली कुत्रे, जंगली डुक्करे, पाणघोडे, तेपीर (हत्तीसारखी सोंड असलेला डुकरासदृश्य प्राणी), हत्ती, वाघ, मोठी शिंग असलेले बैल, जाड्या कातडीचा गेंडा, अस्वल ह्या सारख्या वैविध्यपूर्ण प्राण्याचं दर्शन घडलं. स्लॉथ सुद्धा असावा पण आम्हांला मात्र दिसला नाही. रात्रीच्या अंधारमय वातावरणात छायाचित्रण करायचं असेल तर उत्तम कॅमेरा असावा लागतो. ह्या बाबतीत आम्ही चिकित्सक नसल्यानं आमच्या साध्या कॅमेरानं जे काही फोटो आले आहेत ते वाचकांनी गोड मानुन घ्यावेत ही विनंती !
ह्या सफारीत आपणांस जंगली प्राणी अगदी जवळुन पाहण्याची संधी मिळते. ह्यात मी जाणीवपुर्वक त्यांच्या नैसर्गिक वातावरणात असा शब्दप्रयोग केला नाही. स्पष्ट सांगायचं झालं तर मला हा प्रकार काहीसा कृत्रिम वाटला. फ्लॅश फोटोग्राफीला बंदी असली तरी ट्रेनच्या आवाजानं काही प्राणी विचलित होत होते. रात्र झाल्यामुळं रानटी कुत्र्यासारखे काही प्राणी झोपी गेले होते. केवळ आपल्याला हे प्राणी पाहायला मिळावेत म्हणून त्यांना बंदिस्त वातावरणात ठेऊन असल्या रात्रीच्या वेळी आपण त्यांना भेट देतो हा एकंदरीत अयोग्य प्रकार आहे असं मला वाटून गेलं. सफारीनंतर फायर शो होता. ह्यात दोघे कलाकार आगीच्या विविध खेळांचं मनोहारी प्रदर्शन करत होते.
फायर शो नंतर आम्ही उलु उलु सफारी रेस्टारंट मध्ये जेवणास गेलो. इथं नगरकर आणि कुलकर्णी ह्या कुटुंबासमवेत आम्ही भोजनाचा आस्वाद घेतला. माझ्यासारखा गंभीर माणूस सहलीसुद्धा कसले गंभीर विषय टेबलावर आणू शकतो हे त्यांनी अनुभवलं. इंद्रजित अधुनमधून चर्चेला हलकंफुलकं वळण द्यायचा प्रयत्न करत होता आणि त्यात तो शेवटी यशस्वी झाला!
थकले भागले जीव बिछान्यावर पडताच निद्राधीन झाले त्यावेळी रात्रीचे अकरा वाजून गेले होते. एका रात्रीची झोप आम्ही जवळपास स्किप (गाळली ) होती.
शनिवार २७ मे
सिंगापुर भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अडीच तास पुढं असल्यानं स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजेस्तोवर जाग आली नाही ह्यात नवल नव्हतं. तळमजल्यावर नाश्त्याची सोय होती. नास्ता कॉंटिनेंटल प्रकारातील होता. जगाच्या ह्या भागात शाकाहारी प्रकारात अंडी, कोळंबी आणि कधी कधी चिकनचा सुद्धा समावेश होऊ शकतो असा इशारा सागर ह्यानं आधीच दिला होता. आतापर्यंत आपण अजाणता एकदाही मांसाहारी पदार्थ खाल्ला नाही अशी छातीठोकपणे ग्वाही जगभर फिरणारा कोणताही शाकाहारी माणूस देऊ शकणार नाही. त्यामुळं मी सुद्धा फारसं टेंशन घेतलं नाही. विविध प्रकारचे ज्युस, croissant, पेस्ट्री, फळं ह्यांचा आम्ही फडशा पाडला.
सिंगापुरात आमच्या सरदार पटेल अभियांत्रिकीच्या १९९४ बॅचचे आशुतोष, पंकज, मिलिंद आणि रजनी असे चौघेजण वास्तव्य करुन आहेत. ह्यापैकी रजनी सध्या सिंगापुरात नव्हती, बाकी तिघांनी मला तू सिंगापुरात येत आहेस तर आपण नक्की भेटू असं मला सांगितलं होतं. शनिवार सकाळ मोकळी असल्यानं आशुतोष मला भेटावयास आला. पंकजचा आज वाढदिवस होता. त्यानं आणि मिलिंदनं रविवारी रात्रीच्या भोजनासाठी भेटण्याचं ठरवलं.
आशुतोष हा आधी IBM आणि सध्या Deutsche Bank मध्ये काम करणारा उच्चपदस्थ अधिकारी.
आपला मुलगा मिहीर ह्याला शिकवणीसाठी सोडून तो हॉटेलवर मला भेटण्यासाठी आला. येताना त्यानं MOVENPICK चे अत्यंत चविष्ट आईसक्रीम आणलं होतं. नाश्त्यानं पोट भरगच्च भरल्यानं केवळ चव घेऊन हे आईसक्रीम तसंच रूमवर सोडून त्याच्यासोबत आम्ही सिंगापूरच्या ह्या भागात फेरफटका मारण्यासाठी निघालो. सिंगापूरच्या ह्या भागाची ही काही छायाचित्रे!
फिरत असताना आशुतोषसोबत मस्त गप्पा रंगल्या. शाळा कॉलेजातील मित्रांसोबत गप्पा मारताना विषयांची व्याप्ती विस्तारित असते. आणि त्यामध्ये औपचारिकता अडथळा आणत नाही. 'घोंघावणाऱ्या शक्यतांचं भेंडोळं' सारख्या कसल्या गंभीर आणि अनाकलनीय विषयावर ब्लॉग लिहितोस ह्यावर सुरुवात करून मग चर्चा सिंगापूरमधील भारतीय आणि स्थानिक शिक्षणपद्धती, त्यांचं सखोल विश्लेषण, कॉलेजातील मित्रांची खबरबात, सिंगापुरातील सोशल लाईफ, मुलांचा अभ्यास अशा विविध विषयांना स्पर्शून गेली. आज संध्याकाळी चि व चि सौ का हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी थेटरात जाणार हे सांगून आशुतोषनं मला धक्काच दिला. हा चित्रपट इतक्या लवकर सिंगापुरात प्रसिद्ध व्हावा ह्याचं मला आश्चर्य आणि आनंदसुद्धा झाला. आमच्या बसची वेळ होत आली होती. आशुतोषनं मग आमचा निरोप घेतला.
आमचा पुढील थांबा होता सिंगापुर फ्लायर. तिथंच आसपास आमचं दुपारच्या जेवणाचं हॉटेल होतं. शनिवार सकाळ हा प्रकार सर्वात आल्हाददायी असतो. तौफी सुद्धा मजेत होता. बस सिंगापूरच्या आलिशान भागातुन फ्लायरच्या दिशेनं चालली होती आणि तौफी आजुबाजूला असणाऱ्या महागड्या दुकानात सुरु असणाऱ्या सेलची माहिती देत होता. "ती पहा किती उत्साहात चालणारी महिला, जणू काही संपुर्ण दुकान खरेदी करण्याच्या आविर्भावात चालली आहे ती!" एका रस्त्यावरून चालणाऱ्या स्त्रीकडे निर्देश करुन तो म्हणाला. आधी जेवण करावं की आधी फ्लायरने सिंगापूरचे आकाशातून आल्हाददायी दर्शन घ्यावं ह्याविषयी आमच्या मतांची चाचपणी करण्यात आली. हॉटेलात शनिवारी दुपारी होऊ शकणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता प्रथम भोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. भोजनाचे हे रेस्टॉरंट ठीकठाक होतं. वरणभात आणि इतर खाद्यपदार्थ होते. खरंतर भरपेट नास्ता आणि मग आशुतोषने आणलेलं आईस्क्रीम ह्यांचा आस्वाद घेतल्यानंतर हे साधं रेस्टॉरंट हा एक चांगला पर्याय होता. जेवणानंतर हॉटेलच्या मागील बाजूस फोटोग्राफी करण्यात आली. इंद्रजित, डॉक्टर विकास ह्यांच्यासोबतचं हे एक छायाचित्र!
त्यानंतर आम्ही फ्लायरच्या दिशेनं कूच केलं. सिंगापूर फ्लायर ही एक भक्कम संरचना आहे. फ्लायरचे बांधकाम २००८ साली पुर्ण झालं. ह्यामध्ये २८ वातानुकूलित कुप्या (कॅप्सुल्स) आहेत. एका कुपीत २८ पर्यटक सामावु शकतात. ह्या फ्लायरची उंची १६५ मीटर असुन एकेकाळी जगातील सर्वाधिक उंचीचा फेरी व्हील म्हणुन ह्याची ख्याती होती.
फ्लायरचा वेग एकंदरीत मर्यादित असल्यानं आम्हांला छायाचित्रणास प्रचंड वाव मिळाला. सेल्फी, जोडपीफोटो, ग्रुप फोटो सर्व काही प्रकार एकंदरीत ४५ मिनिटात आम्ही केले. सिंगापूरचे आकाशातून होणारे दर्शन नक्कीच विहंगम होते. मुंबईत नक्कीच असा फ्लायर उभारू नये ही कळकळीची विनंती सर्वांनी व्यक्त केली.
स्कायरनंतर आमचा मोर्चा केबलकारने ल्युजच्या (Luge) सॅन्टोसा बेटाच्या दिशेनं वळला. इथं जाण्यासाठी केबलकारचा प्रवास होता. ह्या प्रवासात चांगली हवाई फोटोग्राफी करण्याची संधी मिळाली.
ल्युज ह्या प्रकारात दोन घटकांचा समावेश होतो. पहिल्या फेजमध्ये आपण एका बैठ्या आगपेटी सदृश्य वाहनात बसुन उतारावरून आपलं वाहन जोरात चालवत नेतो.
ह्यावेळी प्रत्येकास वयोमानानुसार क्षणभर आपण फॉर्मुला १ मध्ये करियर करू शकतो किंवा का केले नाही असा आत्मविश्वास / खंत निर्माण होते. परंतु इथली आपली कामगिरी फारशी गंभीरपणे घेण्याचं कारण नाही हा अजुन एक अनुभवी सल्ला! बाकी एका ७९ वर्षाच्या आजीबाजींनी सुद्धा ल्युजची राईड घेतली होती हे सागर आणि तौफिक वारंवार आम्हांस सांगत होते.
आत्मविश्वासानं आपण आकाशात हिंदकोळे घेत असताना अचानक एक बैठा बाक आपणासमोर येतो. खाली इंटरनेटवरुन घेतलेल्या चित्रात एका वेळी चार जण बसलेले दाखविलेले असले तरी आमच्या वेळी मात्र बहुदा ह्यात दोघांनाच बसण्याची परवानगी देण्यात आली. ही फेज दोन ज्याला स्कायराईड म्हणून संबोधिले जाते.
सोहम त्याचे मित्र इंद्रजित ह्यांच्यासोबत गेला आणि मी प्राजक्तासोबत बसलो. लग्नानंतर इतक्या वर्षांनी केवळ बायकोसोबत हवाई सफर करण्याची संधी देणाऱ्या वीणा वर्ल्डचे आभार ह्यावेळी मी मानले. स्कायराईड मध्ये बसण्याचा हा क्षण! आपण बाकड्यावर बसायचं आणि वरून आपल्यावर एक रॉड येऊन आपणास बंधक बनवतो!
हा प्रकार जरी आरंभी निरुपद्रवी वाटला तरी वर गेल्यानंतर थोडी गंभीर परिस्थिती निर्माण होते. जवळपास चार पाच मजल्यांच्या उंचीवरून आपण एका बाकड्यावरून प्रवास करत असतो. आणि सोबतीला आपली पत्नी आपणांस फोटो काढण्याचा आग्रह करत असते. चुकून मोबाईल खाली पडला तर होणाऱ्या संभाव्य नुकसानाचा अंदाज आणि फोटो न काढला तर होणारे संभाव्य परिणाम ह्याची आपण तुलना करतो आणि मग फोटो काढतो.
ही बाकडयावरील सहल बऱ्यापैकी उंचीवर असताना अचानक थांबली. एक दोन मिनिटे हलेचना ! त्यावेळी मात्र समोर सोहम आपल्यासोबत नाही ह्याची प्रथम काळजी आणि मग इंद्रजित त्याच्या सोबत आहेत ह्यानं दिलासा वाटला. स्कायराईड मधून उतरल्यावर मात्र इंद्रजितलाच उंचीची भिती वाटते ह्या वास्तवाची जाण झाली आणि सोहम अजून त्यात इथून आपण पडलो तर वगैरे कॉमेंट्स करुन त्यांना अजून टेंशन देत होता हे कळलं. ज्याचा शेवट सुखदायक ते सर्व काही सुखदायक असा आपला समज करुन आमची पावलं madame tussauds ह्या मेणसंग्रहालयाकडे वळली. ह्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी नगरकरांची कन्या ऋचा हिचे तिकीट सापडत नव्हतं आणि ते आपणच हरविले असा तिचा समज झाला असल्यानं थोडी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पण नंतर हे तिकीट डॉक्टरांकडं सापडल्यानं परिस्थिती निवळली. madame tussauds संग्रहालयातील हे काही फोटो! ह्यात सोहम, प्राजक्ता आणि मी ह्यांनी विविध प्रसिद्ध व्यक्तींसोबत आपले फोटो काढून घेतले. बहुतांशी सर्व निरुपद्रवी होते!
पण हा मात्र काहीसा वादग्रस्त!
madame tussauds ची राईड संपली आणि मग आम्हांला सागरने आईसक्रीम आणि चहाचा पर्याय दिला. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही विंग्स ऑफ टाईम ह्या शो साठी समुद्रकिनारी कूच केलं. सिंगापुर हा एक उत्तम प्रशासनव्यवस्था असणारा देश आहे. इथल्या सार्वजनिक ठिकाणी नळाला येणारं पाणी पिण्यास योग्य असतं. आम्ही वेळोवेळी आपल्या रिकाम्या झालेल्या बाटल्यामध्ये हे पाणी भरून घेत होतो.
सिंगापुरात असल्यानं आम्हांस नवाकाळ, मुंबई सकाळ वगैरे पेपर वाचण्यास संधी मिळत नव्हती. पण बहुदा कुलकर्णी कुटुंबाच्या राशीत 'पुढील काही दिवसांत गर्दीच्या ठिकाणी चुकामूक होण्याची दाट शक्यता' असं म्हटलं गेलं असावं. आम्ही सर्व ह्या समुद्रकिनारीच्या शो साठी मोक्याच्या सीट्स पकडून स्थानापन्न झालो तरी इंद्रजित ह्यांचा पत्ता नव्हता. मग निहारिकास आमच्यासोबत सोडून अमिता इंद्रजित ह्यांचा शोध घेण्यास बाहेर पडली. काही वेळानं दोघं एकत्र येताना दिसल्यावर आमच्या सर्वांचा जीव भांड्यात पडला.
साडेसात वाजता सुरु झालेला हा लेझर शो अप्रतिम होता. ह्यात एका मुलाची आणि मुलीची कहाणी ह्या लेझर शोच्या माध्यमातून वर्णिली आहे. ही मुलगी काहीशी धाडशी वाटली आणि ती बरंच काही धुंडाळून पाहू इच्छित होती. दृक माध्यमातील आविष्काराच्या प्रभावाखाली कहाणीकडं आमचं काहीसं दुर्लक्ष झालं.
शो संपला आणि आम्ही गर्दीमय अशा मोनोरेलनं जेवणाच्या ठिकाणी गेलो. ही जागा प्रशस्त होती. सर्वाना आपापल्या ग्रुपनुसार बसता आलं. जेवताना सर्वांनी आपल्या आधीच्या प्रवासाचे अनुभव सांगितले. अमिता ह्यांनी युरोपातील आपल्या सहलीचे अनुभव विशद केले. जेवण आटपून आम्ही बसमध्ये बसलो. उद्याचा दिवस होता तो युनिवर्सल स्टुडिओ आणि sea aquarium चा! दिलेल्या वेळात अधिकाधिक राईड कशा घेता येतील हे समजावुन सांगण्यात सागर गढून गेला होता. आणि आम्ही दिवसाच्या आठवणी मनात घोळवण्यात रंगून गेलो होतो ! रूमवर परतल्यावर अगदी तुडुंब भरलेल्या पोटाने सुद्धा MOVENPICK चा मोह टाळता आला नाही. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही निद्राधीन झालो.
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा