मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ११ जून, २०१७

वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ३




आधीच्या भागाच्या लिंक्स 
पहिला भाग 

दुसरा भाग 

आजचा दिवस युनिव्हर्सल स्टुडिओ, Sea aquarium आणि मग त्या नंतर मुस्तफा मार्केटला भेट देण्याचा होता. वीणा वर्ल्डच्या सहल व्यवस्थापकास बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. जर समजा ग्रुपला ९ वाजता बसने  निघायचं असेल तर दोन तास आधी वेकअप कॉल देण्याची पद्धत आहे. एक तास तुमच्या तयारीला आणि एक तास नाश्त्याला! सर्व गटाला न चुकता वेकअप कॉल देणं ही मोठी जबाबदारी! आपल्या कुटुंबास तयारीसाठी किती वेळ लागतो हे आपणास माहित असणं आवश्यक आहे. त्यामुळं बरेचजण सागरच्या वेकअप कॉलच्या आधीच उठून तयारीस लागायचे! ह्या बरेचजणांत  कोणाकोणाचा समावेश होत असेल हे सुज्ञास सांगणे न लगे! 


युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये अधिकाधिक राईड कशा घेता येतील ह्यासाठी सागरने आम्हांला बऱ्याचशा टिप्स देऊन ठेवल्या होत्या. दरडोई ५० डॉलर्स अधिक देऊन एक्प्रेस पास घेणं, सिंगल रायडर म्हणुन एक वेगळी रांग असते त्यात आपला नंबर लावणं आणि सुरुवात पार्कच्या अगदी शेवटच्या टोकाच्या राईड पासुन करणं ह्या क्लुप्त्यांचा समावेश होता.  

आदल्या दिवशी रात्री जेवणाच्या वेळी सागरनं आम्हां सर्वांना युनिव्हर्सल आणि Sea aquarium च्या परिसराची तोंडओळख करुन दिली होती. कोणत्या ठिकाणी एकत्र जमायचं, युनिव्हर्सलला समजा मध्येच बाहेर पडुन परत आत यायचं असेल तर रि-एंटरचा शिक्का कसा मारुन घ्यायचा, दरडोई १५ डॉलर्सची जेवणाची कुपन्स कोणत्या उपाहारगृहात चालणार, त्याचे सुट्टे परत मिळणार नसल्यानं त्याच्या महत्तम उपयोग कसा करून घ्यायचा ह्याची त्यानं बरीच माहिती दिली होती. त्यामुळं ह्या भागातील देशांच्या इमिग्रेशननं दिलेल्या चिठोर्याइतकं नसला तरी त्याच्याशी तुलना करु शकणारा एखादा काही क्लिष्ट प्रकार असु शकतो ह्याची आम्हांला जाणीव झाली. 

सकाळी पुन्हा एकदा चांगला कॉंटिनेंटल नाश्ता झोडपून आम्ही युनिव्हर्सलच्या दिशेनं प्रस्थान केलं. एव्हाना बसमधील दिलेले आसनक्रमांक धाब्यावर ठेवून आपल्या मर्जीनं आसन काबीज करण्यास आम्ही सुरुवात केली होती. बसप्रवास मर्यादित असल्यानं विशिष्ट् आसनांबाबतीत कोणीही जास्त आग्रही नव्हतं.  

युनिव्हर्सलचे आरंभीचे सोपस्कार आटपुन आम्ही एकदाचे आत शिरलो. थोडीफार चर्चा करून आम्ही 'Revenge Of The Mummy' आम्ही ह्या राईडची आम्ही निवड केली. 



२००२ साली ज्यावेळी आम्ही ही (किंवा सदृश्य) राईड लॉस अँजेलिसला घेतली होती त्यावेळी एका अंधारमय मार्गात आम्हांला चालायचं होतं. भयप्रद आवाज, दृश्यं आमच्यासमोर पेश केली होती. मध्येच एकदा सर्व मार्ग रोखुन धरण्यात आले होते. परंतु माझ्यावर फारसा काही फरक पडला नव्हता, प्राजक्ता त्यावेळी थोडीफार घाबरली होती आणि शेवटी राईडच्या बाहेर पडताना उभ्या असलेल्या महाकाय ममीने तिला 'हॉ' करुन अजुन घाबरवलं होतं. 

ह्यावेळी बैठ्या बाकांची आसने आमच्यासमोर आली. त्यानंतर नेहमीप्रमाणं डोक्यावरून एक दांडा आला आणि त्यानं आम्हांला बंधक बनवलं. बाकी सर्व जणांनी आपल्याजवळील मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये ठेवल्या होत्या. मी मात्र बहुदा मागच्या ममीची आठवण करत माझं वॉलेट आणि भ्रमणध्वनी माझ्याच जवळ ठेवला होता. ह्या सर्व राईडमध्ये एक समान धागा असतो. सुरुवातीला आपल्या मनात भय निर्माण करणारे बरेच मोठमोठाले संदेश ते गंभीर आवाजात बजावतात. ही राईड घेण्याआधी तुम्ही विचार केला आहे ना? पुढे बिकट प्रसंग येणार आहे वगैरे वगैरे! लहानपणी आई, शिक्षक ह्यांच्या धमक्या आणि त्यानंतर अभियांत्रिकी जीवन ज्यांनी पार पाडलं आहे त्यांच्यावर ह्या घोषणांचा फारसा फरक पडत नाही. ही राईड सुरुवातीला ठीक वेगानं चालली होती. मग एका ठिकाणी मात्र बंद दरवाजा आला. आमची बैठक मागं आली आणि एकाच वेळी अंधार होऊन मग मात्र प्रचंड वेगानं आमच्या बैठकी पुढं फेकल्या गेल्या. आतापर्यंत जो प्रवास एका नियंत्रित वेगानं चालला होता ते चित्र एका सेकंदात पालटलं होतं. ट्रॉली भयानक वेगानं पुढं चालली होती, सभोवताली किट्ट अंधार होता. असल्या राईडमध्ये मध्येच आपले फोटो काढले जातात. कोण किती भेदरला आहे ह्याचा पुरावा म्हणून! आमचा पण फोटो काढला गेला. पण तो घ्यायचा राहून गेला. ह्या सर्व प्रकारात माझ्या खिशात राहून गेलेलं माझं वॉलेट आणि मोबाईल माझ्या मनात प्रचंड चिंता निर्माण करत होता. एकदाची ती राईड संपली आम्ही सर्वांनी हुश्श्य केलं. मी सर्वांच्या नकळत माझा खिसा चाचपुन पाहिला. वॉलेट आणि मोबाईल दोघांनी प्रतिसाद दिला. मी पुन्हा एकदा हुश्श्य केलं. जणु काही त्या अंधाऱ्या मार्गिकेत विजेरीच्या साहाय्यानं ह्या दोघांचा शोध घेण्याचं दिव्य टळलं होतं!

काही मिनिटांतच इंद्रजित हे सुद्धा ही राईड घेऊन निहारिकासोबत बाहेर आले. आम्ही सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं. अमिता ह्या मुळच्याच धाडशी! त्या वेगानं लूप असणारी रोलर कोस्टर राईड घेण्यास गेल्या होत्या. Battlestar Galactica takes to the sky again at Universal Studios Singapore असं काहीतरी ह्या ह्या राईडचं नाव आहे. एका डोळ्यानं वेगानं जाणाऱ्या त्या राईडकडे आणि दुसऱ्या डोळ्यानं आताच बाहेर पडलेल्या ममीकडे पाहत आम्ही ह्या रोलर कोस्टरचा विचार सोडून दिला. 

त्यानंतर होता तो Shrek ४ D  चा शो! हा अगदी बच्चे मंडळींसाठीचा शो होता. मुख्य खेळ सुरु होण्याआधी तुम्हांला छळ (Torture) सहन करावं लागेल वगैरे फंडे उभे राहुन देण्यात येतात. "बाबांनो, हिंमत असेल तर गर्दीच्या वेळी तुमच्या ह्या श्रेकला विरार ट्रेनला घेऊन या म्हणावं!" मी मनातल्या मनात म्हणालो. मग आम्ही आसनस्थ झालो. थोडीफार सीट मागेपुढं जाणं, हवेत पाण्याचे फवारे उडविले जाणं असले प्रकार पाहून आम्ही मग बाहेर आलो. 

थोडावेळ मग आमचा आपण युनिव्हर्सल मध्ये नक्की कोठे आहोत आणि ह्यावेळी आपण कोणती राईड घेणं इष्ट राहील ह्यावर विचारविनिमय करण्यात गेला. मग आमचा मोर्चा जुरासिक पार्कच्या राईडकडे वळला.  ह्या राईडला भलती मोठी रांग होती. नगरकरांनी योग्य वेळी सिंगल रायडर म्हणून जाण्याची सुचना केली आणि त्यामुळं आम्हां सर्वांना तुलनेनं बऱ्याच लवकर ही राईड घेता आली. परंतु निहारिकाला मात्र सिंगल रायडर म्हणून जाण्यास परवानगी न मिळाल्यानं इंद्रजित आणि डायनासोर ह्यांचा मुकाबला टळला. ह्या दोघांची  सिंगापुरात भेट झाली असती तर जागतिक इतिहासाला कोणतं वळण लागलं असतं ह्यावर केवळ तर्कवितर्क लढविणंच हेच आता आपल्या हाती आहे! जुरासिक पार्कच्या राईडमध्ये सर्वात शेवटी आपल्याला डायनासोरच्या जरा जवळपास नेलं जातं, आणि मग अचानक दोन तीन मजल्याच्या उंचीवरून खाली सोडलं जातं. 

आता जेवणाची वेळ झाली होती. १५ डॉलरमध्ये सेट मेनु होता. आम्ही तंदूर चिकनच्या एका पर्यायाची निवड केली. दीड वाजत आला होता आणि आमची पावलं झपाट्यानं वॉटरवर्ल्डच्या दिशेनं वळली. आधीच्या राईडमध्ये छायाचित्रणास वाव मिळाला नव्हता किंवा आम्ही आधुनिक गॅजेट्स खराब होण्याच्या भयास्तव छायाचित्रणाचा प्रयास केला नव्हता. आता मात्र भ्रमणध्वनीच्या साहाय्याने छायाचित्रणाची संधी होती. इथं समुद्रीचाच्यांची अनाकलनीय मारामारी सुरु होती. मंडळी उंचीवरील टॉवरवर चढत होती, तिथुन बुक्काबुक्की होऊन त्यांना उंचावरून पाण्यात ढकलून दिलं जात होतं, मध्येच मंडळी बोट घेऊन एका टोकावरून दुसऱ्या टोकाला वेगानं येत होती. समोरच्या सीटवर बसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर बोटीनं पाण्याचे फवारे उडवीत होती. थोडा तोचतोचपणा आला की आगीचे गोळे निर्माण करण्यात येत होते. कथानकात खलनायक होता, नायक होता आणि नायिका सुद्धा होती. ही बारीक चणीची नायिका कमालीची फिट होती आणि उपलब्ध असलेला जल आणि भूभाग आपल्या धावपळीनं व्यापून टाकत होती. खलनायक नायकाला अधूनमधून बडवत होता आणि प्रेक्षकांकडे पाहुन गुरगुरत काहीबाही बोलत होता. त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर बसले असल्यानं प्रेक्षक (आणि मी सुद्धा) त्याला उलट उत्तरं देत होतं आणि थम्स डाऊनच्या खुणांनी खिजवत होता. भारतीय मंडळी सोडली तर बाकीची चिनी मंडळी हा सर्व प्रकार मनापासून एन्जॉय करत होती असं वाटून गेलं. आणि हो मध्येच एक जलविमान सुद्धा येऊन गेलं!


 















हा सर्व लुटुपुटीचा खेळ आटपुन आम्ही बहुचर्चित आणि मोठी अपेक्षा निर्माण केलेल्या transformers ride च्या दिशेनं निघालो. ह्या राईडच्या बाहेर उगीचच ६० मिनिटांचा प्रतीक्षावेळ असं लिहिण्यात आलं होतं. जुरासिक पार्कच्या सिंगल रायडरच्या अनुभवानं प्रेरित होऊन इथंही आम्ही सिंगल रायडर म्हणून गेलो आणि आतली परिस्थिती पाहून दांडुके ओलांडून कौटुंबिक मार्गिकेत शिरलो. डॉक्टर नगरकरांनी मात्र एकला चलो रे धोरणाचा अवलंब करीत राईड घेतली. इथं आम्ही तिघेजण बसल्यावर माझ्या एका बाजुला तीन चार वर्षांचा छोटा चिनी मुलगा आला. त्याचे वडील पुढील बाकड्यावर बसले होते. ह्यात आपलं बाकडं ममीच्या राईडसारखं प्रचंड वेगानं कुठं जात नाही पण केवळ दोन ठिकाणी हलतं पण तिथं मात्र Visual इफेक्ट्स द्वारं आपल्याला आपण भयंकर वेगानं उंचावरून खाली, मग खालून वर वगैरे जात आहोत आणि आपल्यावर अस्त्रांचा मारा वगैरे होत आहे असा आभास निर्माण केला जातो. बाजूचं पोरगं सुरुवातीला बरंच घाबरलं होतं. बाकड्याखाली जायचा प्रयत्न करत होतं. त्याला मग मी हातानं थोपटलं, त्याचा परिणाम म्हणा किंवा सरावानं मग मात्र ते शांत झालं आणि नंतर त्यानं चक्क राईड एंजॉय केली. transformers ची राईड इतकी झपाट्यानं संपल्याच्या आनंदाच्या प्रीत्यर्थ आम्ही लगेच 'Light Camera Action with Steven Spielberg' हा शो पाहायला गेलो. इथं सुद्धा लगेचच आमचा नंबर लागला. इथं केवळ स्पेशल इफेक्ट्स द्वारे वादळवारं इत्यांदींचा प्रभाव स्टुडिओत कसा निर्माण केला जातो ह्याचा अनुभव आम्हांला देण्यात आला. 



एव्हाना बरीच चालपीट झाली होती. स्टारबक्स कॉफीच्या आसऱ्याला आम्ही गेलो. तिथं कॉफीचे घुटके घेतले. आणि छायाचित्रण सुद्धा!


 


आता वेळ झाली होती ती SEA AQUARIUM ची! इथं पुन्हा एकदा तिकिटांचा थोडा गोंधळ झाला. हरवलेल्या एका तिकीटाची पुनर्खरेदी करून आम्ही ह्या मत्स्यालयात प्रवेश केला. पुढील तास दीड तास एका अद्भुत विश्वात आम्ही वावरत होतो. माशांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात मुक्त संचार करताना पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. विविध रंगाचे, विविध आकारांचे मत्स्य आपल्याच धुंदीत विहार करत होते. विविध दालनांत मत्स्यांच्या विविध प्रजाती होत्या. माशांकडं पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन हे मत्स्यालय आम्हां सर्वांना देत होतं. 






























































भ्रमणध्वनीमध्ये आपण विविध अँप्स आणुन ठेवत असतो. त्यातलं एक दिवसाला किती पावलं टाकली ह्याचा जमाखर्च आपल्याला देत असतं. ते मला दिवसात दहा हजार पावलं पुर्ण केल्याबद्दल माझं अभिनंदन करत होतं. ते अँप मनातल्या  मनात हा आळशी गृहस्थ असा अचानक सक्रिय कसा बनला ह्याविषयी आश्चर्य व्यक्त करत असणार! 

ह्यानंतर आम्ही मुस्तफा मार्केटच्या दिशेनं निघालो. हा भारतीय लोकांनी गजबजलेला भाग ! रविवारी संध्याकाळ असल्यानं हा अधिकच गजबजला होता. आमची एक बॅग नाकामी झाल्यानं ह्या मार्केटातुन आम्ही एका बॅगची खरेदी केली आणि सोबत छोटीमोठी खरेदी केली. खरंतर बायकांची खरेदी हा समस्त नवरेवर्गाचा नावडीचा आणि टिंगलटवाळीचा विषय! पण प्राजक्ताने मात्र अगदी थोडक्यात ही खरेदी आटपली. त्याबद्दल तिचं मनःपुर्वक आभार!

आम्ही जवळच्याच भारतीय उपहारगृहात रात्रीच्या जेवणासाठी शिरलो. तिथं सर्व्ह केलेलं चिकन हे डक असावं अशी शंका आमच्या गटात निर्माण झाली होती. 

सायंकाळी माझी पंकज आणि मिलिंदसोबत फोनवर बातचीत सुरु होती. आपल्या धावपळीच्या जीवनातून सुद्धा खास वेळ काढून हे दोघंजण मला भेटायला येणार होते. पंकज थेट उपहारगृहात आला. आमच्या गटाला हाय हॅलो करुन मग तो आणि मी मग रस उपहारगृहाच्या दिशेनं निघालो. पंकज आणि मी अभियांत्रिकी पुर्ण झाल्यानंतर प्रथमच भेटत होतो. रस उपहारगृहाची त्याची निवड उत्तम होती. सिंगापूरच्या एका उच्चभ्रू भागातील हे उपहारगृह! आणि एकंदरीत अँबियन्स पण उत्तम ! थोड्या वेळात मिलिंदसुद्धा आला. अभियांत्रिकीनंतरचा काहीसा struggle पिरियड, त्यानंतर आयुष्यात घेतलेलं विविध निर्णय, व्यावसायिक जीवनाची सद्यस्थिती ह्यावर खूप गप्पा मारल्या. मिलिंद structural इंजिनीरिंग मधला हुशार मुलगा! पाचव्या सत्रात त्यानं मिळविलेले १०० गुण माझ्या अजून लक्षात आहेत. त्याची आठवण करुन देताच त्याचा चेहरा खुलला! रात्री जवळपास पावणेअकरापर्यंत आम्ही गप्पा मारल्या. परतीच्या प्रवासात पंकजने मला सिंगापूरच्या जीवनाविषयी, तिथल्या शिक्षणपद्धतीविषयी, सरकारविषयी बरंच काही सांगितलं. 

पंकज, मिलिंद -  ही एक संस्मरणीय भेट सदैव लक्षात राहील! 

रूमवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. सकाळी हाँगकाँगला निघण्यासाठी  पाच वाजता हॉटेल सोडायचं होतं म्हणजे साडेतीनला उठावं लागणार होतं. जुन्या बॅगेतील सर्व सामान प्राजक्ताने नवीन बॅगेत स्थलांतरित केलं होतं. ऋणानुबंध जुळलेल्या त्या जुन्या बॅगेला परक्या देशात सोडून येताना आम्हांला गलबलून आलं होतं 

(क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...