मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, १६ जून, २०१७

विक्रम आणि वेताळ


दिवसभराच्या कामानं थकला भागला अजेय एकदाचा आपल्या कारमध्ये विसावला. ड्रायव्हरनं गाडी सुरु केली. आता तासभर निवांत मिळेल म्हणुन अजेय सुखावला. 

"जिंकलास का आजचा तुझा लढा ?" अचानक आवाज आला. क्षणभर अजेयनं दचकुन ड्रायव्हरकडे दचकुन पाहिलं. तो बिचारा ट्रॅफिकमधुन आपला मार्ग काढण्याच्या खटाटोपात गढला होता. 

"कोण बोलतंय ?" अजेय पुटपुटला. 

"कोण बोलतंय हे महत्वाचं नाही! काय बोलतोय हे महत्वाचं आहे !" तो आवाज म्हणाला. 

"ओ. के.  - आजचा लढा म्हणजे नक्की काय?" अजेय म्हणाला. ह्या सर्व प्रकाराचा ड्रायव्हरला सुगावा लागता कामा नये ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे हे त्याचं अंतर्मन त्याला बजावत होतं. 

"तुझी मासिक, वार्षिक ध्येयं (टार्गेट) पुर्ण करण्याच्या दृष्टीनं आजच्या दिवसात जे काही करता येणं शक्य होतं ते सर्व काही केलंस का? " आवाज वदला. 

हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही हे अजेय एव्हाना समजुन चुकला होता. 

"हो ना,  आज एका मोठ्या संभाव्य क्लायंटला जबरदस्त प्रेझेन्टेशन देऊन आलोय मी. तो बहुतेक २५ कोटीची ऑर्डर देईल आम्हांला! वर्षाचं ५०% टक्के टार्गेट एका झटक्यात पुर्ण करीन मी!" अजेय आत्मविश्वासानं म्हणाला. 

"मग तु आज पुर्ण समाधानी असशील ना !" आवाजाचा प्रत्येक प्रश्न अधिकाधिक आपल्या मनःशांतीच्या भंगाच्या दिशेनं जातोय हे अजेयला जाणवत होतं. 

त्या प्रेझेन्टेशन मध्ये केलेले आपल्या प्रॉडक्टविषयीचे दावे किती पोकळ आहेत, हे प्रेझेन्टेशन सादर करण्याची संधी आपल्यालाच मिळावी म्हणुन जगन्नाथला आपण कसं डावललं हे अजेयला आठवलं. तो गप्पच बसला. 

"हं.. जगन्नाथ तुझा खास मित्र ना !  अजेय गप्प असला तरी त्याच्या मनातील विचार त्या आवाजानं ओळखले होते. 

"पण माझ्या करियरसाठी हे आवश्यक होतं आणि जगन्नाथनं सुद्धा असले प्रकार आधी माझ्या बाबतीत केले आहेत!" अजेय म्हणाला. 

"ओ. के. तुझ्या करियरमधली तुझी नक्की ध्येये कोणती?" अजेयचा बचावात्मक पवित्रा पाहुन विषय बदलण्यासाठी आवाज म्हणाला. 

एक तासभर निवांत घालविण्याचे आपले सर्व मनसुबे धुळीस मिळाले आहेत हे मनातल्या मनात अजेयने स्वीकारलं होतं. 

"ध्येये म्हणजे उच्चपद, पैसा " मनातल्या मनात अजेय म्हणाला ते आवाजाला आपण काय विचार करतोय हे समजतंय ह्याची जाणीव ठेवुनच!

"पाच वर्षापूर्वी तुझं सध्याचं पद, सध्याचा पगार हे तुझं ध्येय होतं नाही का अजेय!" आवाजानं शांतपणे विचारलं. 

"पण सतत वर जात राहणं हा इथला नियमच नाही का? जो थांबला तो संपला!" अजेयने कुरकुर सुरु केली. 

"नियम बनवला कोणी? आणि त्याला अपवाद तुला दिसत नाहीत का?" आवाज शांतपणे म्हणाला. 

अजेयकडं उत्तर नव्हतं तो क्षणभर शांत बसला. 

"आणि अजेय तू ह्या दुनियेचे सर्व नियम पाळतोयस आणि लौकिकार्थानं तु यशस्वी सुद्धा आहेस! पण तू समाधानी आहेस का? आवाज म्हणाला. 

"बस कर तुझं हे व्याख्यान ! मी समाधानी नसलो तरी बहुतांशी दुनियेच्या सोबत मुख्य प्रवाहात आहे ही भावना मला सुखावते. मी माझ्या मुलांना महागड्या शाळेत प्रवेश देऊ शकतो, त्यांचे बरेचसे आग्रह पुरवू शकतो! " अजेयच्या संतापाचा उद्रेक झाला. 

"गावाकडं जाऊन शांत शेती करावी असं मला आणि माझ्यासारख्या माझ्या अनेक मित्रांना वाटतं. पण पुढील पिढीचे अनेक पर्याय माझ्या असल्या निर्णयानं कायमचे बंद होतील हे भय मला वाटतंय ! आणि केवळ हे घडू नये म्हणुन ह्या जीवघेण्या शर्यतीत मनाविरुद्ध धावतोय! " अजेयचा उद्रेक सुरूच होता. 

"तुझ्यासारखे प्रवचन देणारे अनेक असतील, तुम्ही देखील पुर्ण सुखी आहात काय? आम्ही उपभोगणाऱ्या  भौतिक सुखांची तुम्हांला कधीच आस नव्हती काय हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता काय? "

"हा केवळ माझा संघर्ष नाही तर ह्या युगात जन्माला आलेल्या आणि सारासार विवेकबुद्धी असलेल्या प्रत्येकाचा हा संघर्ष आहे! " अजेयचं कडाडणं सुरूच होतं.  

आवाजही संभ्रमात पडला होता. अजेयाच्या बोलण्यात त्यालाही तथ्य वाटत होतं. 

"साहेब उद्या सकाळी किती वाजता येऊ?" ड्रायव्हर विचारत होता. अजेय पुन्हा एकदा नेहमीच्या विश्वात परतला होता. 
पत्नीनं घराचं दार उघडलं होतं. छोटा अखिल टीव्हीवर मालिका पाहत होता. वेताळाच्या प्रश्नानं निरुत्तर झालेल्या विक्रमाला एकटं सोडून विजयी मुद्रेनं उडून जाणाऱ्या वेताळाचा आवाज त्याला काहीसा परिचित वाटला. 

२ टिप्पण्या:

  1. The quality of your life is not determined by the bank balance you hold. Rather, it depends upon how peaceful and joyous you are inside. There is difference between wealthy and wellbeing.

    Wealth is one of tool of wellbeing.

    Peace and joy gets from sharing.
    Ajay children learning in international school. But in this country only there are 98% children learning in govt school or trust school. Where no toilet, no drinking water, not proper schooling. In this envoirnment children spend half of their day. How we will build next generation for this nation.
    Our forefathers realised that and made there efforts even we were under british rule. There vision still not come true.

    Ajay not realise one thing. "Tale rakhi to pani chakhi." Todays world technogy and corporates control capital market. Those who are in top in this word hierarchy, they are in control of this money TAP.
    Where Ajay is very few people are there compared to mass.

    If there in real world so much deprivation rich and poor. Ajay has most poweful tool with him wealth and knowledge.

    Instead of just fooling inner sound in name of vetal, if he must put some effective actions towards society well being. That will definitely give him peace and real joy and made him well being PERSON with his own personality.

    उत्तर द्याहटवा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...