मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १७ जून, २०१७

अजातशत्रू, अष्टपैलू व्यक्तिमत्व - उज्ज्वल !



व्यक्ती आणि वल्ली श्रुंखलेतील हे तिसरं पुष्प ! दुसऱ्या आणि तिसऱ्या पुष्पांमध्ये  बराच कालावधी गेला ह्याला विविध कारणं आहेत. आज ज्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंचं वर्णन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे तो प्रयत्न कितपत झेपणार ह्याविषयी असलेली साशंकता हे ह्यातील मुख्य कारण! फारशी पुर्वतयारी न केल्यानं पहिल्या दोन व्यक्तिमत्वांवर सुद्धा काहीसा अन्याय झाला आहे त्या चुकीची दुरुस्ती भविष्यात केव्हातरी!

आजचं व्यक्तिमत्व आहे श्री. उज्ज्वल म्हात्रे.  एखादी व्यक्ती प्रसिद्ध होण्यामागं त्या व्यक्तीचं व्यावसायिक यश, सामाजिक कार्य, मनमिळाऊपणा , उमदं व्यक्तिमत्व, कुटुंबवत्सल वृत्ती, एखाद्या व्यक्तीच्या मदतीसाठी सर्वस्व झोकुन देण्याची वृत्ती असे गुण कारणीभूत असतात. बऱ्याच वेळा एक व्यक्ती एक गुण असा आपणास अनुभव येतो. पण उज्ज्वल ह्यांच्या बाबतीत मात्र हे सर्व गुण एकत्र सामावलेले दिसुन येतात. 

ह्या ब्लॉगपोस्ट मध्ये उज्ज्वल ह्यांना संबोधित करताना आदरार्थी एकवचन वापरावं की त्यांचा उल्लेख एकेरी करावा ह्याबाबतीत मोठा द्विधा प्रसंग निर्माण झाला आहे. परंतु उज्ज्वल ह्याचा स्वभाव लक्षात घेता मी त्याला एकेरी संबोधण्याचं स्वातंत्र्य घेत आहे.   

सामाजिक कार्य 

वसईत विविध सामाजिक स्तरांवर उज्ज्वल कार्यरत असतो. स्वतः जरी अंधेरीला राहत असला तरी तो बहुतांशी सर्व कार्यक्रमांसाठी जातीनं वसईला हजर राहतो. सुरुची बाग समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहीम असो, डिजिटल इंडिया मोहिमेच्या निमित्तानं वसईतील कोळीवाड्यातील कोळी बांधवाना कॅशलेस व्यवहाराचं प्रशिक्षण असो किंवा वसईतील आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना सोशल नेटवर्किंगचं माहात्म्य सांगण्याचं व्यासपीठ असो ह्या सर्वांमध्ये त्याचा सारख्याच उत्साहानं सहभाग असतो. 

डिजिटल इंडिया मोहिमेच्या निमित्तानं त्यानं आपल्या कंपनीतील बराचसा व्यवसाय स्थानिक उभरत्या उद्योजकांना देऊन एक नेक उदाहरण सर्वांसमोर ठेवलं.  

वसईच्या सामाजिक जीवनातील तीन महारथी पहा इथं एकत्र आले आहेत त्या समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतामोहिमेनिमित्त ! 





सामाजिक कार्य करून झाल्यानंतर नक्कीच ह्या माशाचा आस्वाद घेण्याइतकी रसिकवृत्ती उज्ज्वल बाळगुन आहे.  




डिजिटल माध्यमातुन कोळीणीला पेमेंट करताना तिच्याशी माशाच्या भावाविषयी घासाघीस कशी करायची ह्या विषयी मित्रमंडळींना  मार्गदर्शन करण्यासाठी उज्ज्वल एका व्हाट्सअँप ग्रुपची स्थापना करणार असं मी ऐकून आहे.

व्यासपीठावर आपलं ज्ञान सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीनं उज्ज्वल मांडतो आणि त्यामुळं त्याला वसईतील कार्यक्रमांत आग्रहाचं बोलावणं असतं. 



म्हणतात ना की एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळू नये! उज्ज्वलनं केलेली अनेक सत्कार्य अनामिक राहण्याच्या त्याच्या निर्णयाचा आदर म्हणून मी इथं उद्धृत करत नाही. 

आपल्या भोवताली असलेल्या आपल्या मित्रमंडळींच्या अज्ञानाविषयी उज्ज्वलला बरीच तळमळ आहे. त्यामुळं तो त्यांना अधुनमधून जीवनविषयक सल्ले देत असतो. परंतु ही अज्ञानी बाळे ज्ञान मिळविण्याच्या अमुल्य संधीचा वापर न करता उज्ज्वलला बाबाजी म्हणून संबोधितात. परंतु हताश न होता उज्ज्वल आपलं ज्ञानवाटपाचं कार्य व्हाट्सअँपवर अखंडपणे चालू ठेवतो. 


उमदं व्यक्तिमत्व 

हॉलिवूड, बॉलिवूड आणि मराठी चित्रपट ह्या तिन्ही सिनेउद्योगात लीलया सामावुन जाण्यासारखं व्यक्तिमत्व उज्ज्वलला लाभलं आहे. 

हॉलिवूडमधील नायकासाठी  फिट होणारे त्याचे हे फोटो ! 





बॉलीवूडमधील नायकासाठी फिट होणारा त्याचा हा फोटो!



आणि हा खास मराठमोळा उज्ज्वल! 



बहुदा ह्यातील कोणत्या व्यवसायाची निवड करावी ह्याविषयी खात्री न झाल्यानं उज्ज्वल चित्रपटव्यवसायापासून दूर राहिला असावा आणि त्यामुळं चित्रपटसृष्टी एका देखण्या अभिनेत्याला मुकली. 

कुटुंबवत्सल वृत्ती

व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात हिरिरीनं पुढाकार घेणारा उज्ज्वल तितकाच कुटुंबवत्सल आहे. आपल्या बिझी कार्यभारातून कुटुंबासाठी वेळ काढण्यासाठी तो तितकाच आग्रही असतो. 




मध्यंतरी त्याच्या मुलानं आपल्या पित्याविषयी आपल्या भावना खालील शब्दांत व्यक्त केल्या. 



I keep coming back to one thought. Never will you meet a man who more faithfully lived his values.

My father is a teacher of all things. His method is simple and "street forward". He teaches by example. 

At any age, when faced with an ethical dilemma, after reflection, study, or even rationalization, I find myself coming back to one simple question. What would Dad do? His character is the foundation of my concise.

My father is strong in body, in spirit, and in commitment. My father never let another man down. He fulfills every obligation he ever undertakes. His word is his bond.


परवाच दहावीचा निकाल लागला त्यात उज्ज्वलचा भाऊ प्रीतम म्हात्रे ह्याच्या मुलानं म्हणजेच पौरसनं ९८.८०% टक्के मिळवुन संपुर्ण वसई तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याबद्दल पौरस, त्याचे मातापिता, उज्ज्वल  आणि संपुर्ण म्हात्रे परिवाराचं मनःपुर्वक अभिनंदन !

व्यावसायिक यश 



उज्ज्वल हा ओरिएंट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेच्या डायरेक्टर ह्या पदावर कार्यरत आहे. ह्या कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीचा देशभर आणि जगभर खप वाढविण्यासाठी तो आणि त्याची सेल्स टीम सतत झटत असते. गेल्या पंचवीस वर्षात ह्या कंपनीला काही मोठी, बहुमान्य अशी अनेक डील्स जिंकून देण्यात उज्ज्वलने मोठा वाटा उचलला आहे. कंपनीचे धोरणआखणी, व्यवस्थापनीय सल्लागार ह्या बाबतीत उज्ज्वलने  गेल्या २२+ वर्षांत आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या कामानिमित्त त्याने चाळीसहुन अधिक देशांचा प्रवास केला आहे. इतके सर्व देश पाहिल्यावर उज्ज्वल जेव्हा "गड्या आपला देशच बरा!" असं मोठ्या अभिमानानं म्हणतो त्यावेळी त्याच्या ह्या म्हणण्याला नक्कीच वजन असतं.   

ओरिएंट टेक्नॉलॉजी ही एक आपल्या कर्मचारी वर्गाच्या हितासाठी झटणारी कंपनी आहे. ह्या कंपनीनं आपल्या कर्मचारीवर्गाला वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांना बदलत्या काळासोबत आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचं बाळकडू दिलं आहे. ह्या कंपनीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी उज्ज्वल स्वतः कंबर कसुन जोमानं मेहनत घेतो.  

उज्ज्वलनं पंचवीस वर्षांपूर्वी जी दूरदृष्टी दाखवली ती अत्यंत कौतुकास्पद आहे. ज्या काळात बहुतांशी मध्यमवर्ग नोकरीच्या मागे धावत असे त्याकाळात त्यानं संगणकीय क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा दूरगामी निर्णय घेतला आणि तो आपली बुद्धी आणि मेहनत ह्याच्या जोरावर यशस्वी करुन दाखवला. आपण मोठ्या मेहनतीनं मिळविलेल्या स्थानाचा वापर करत त्यानं अनेक होतकरू मध्यमवर्गीय मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.  


क्रिकेट  

आम्ही शाळेत माजी विद्यार्थ्यांची स्पर्धा NPL (New English School Premier League) आयोजित करत असतो. ह्या आयोजनाच्या वेळी उज्ज्वलचा खूप आधार असतो. उज्ज्वल स्वतः एक जबरदस्त फलंदाज आहे. २०१२ साली NPL सुरु होण्याआधी १९८३, ८५ आणि ८८ ह्या तीन बॅचनी काही ओव्हरआर्म सामन्यांचे आयोजन केलं होतं. ८३ विरुद्ध ८८ ह्या सामन्यात त्यानं आघाडीला फलंदाजीला जाऊन जबरदस्त आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केलं होतं. परंतु बाकीच्या ८३ च्या सहकाऱ्यांनी साथ न दिल्यानं त्याचा संघ सामना हरला. त्यानंतर मात्र त्यानं प्रत्येक सामन्यात ८८ ला पराभूत केलं आहे. बाकी सर्व संघांशी जोमानं खेळणारा ८८ चा संघ ८३चे अमोल आणि उज्ज्वल सामोरे आले की गडबडून जातो हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. पुढील वर्षी तुझ्या बाबांच्या संघाला थोडीफार संधी देऊ हे त्यानं सोहमला ह्या NPLच्या वेळी दिलेलं आश्वासन तो कितपत पाळतो हे पाहुयात! 

उज्ज्वलच्या क्रिकेटकौशल्याची वर्णनं करताना आम्ही सर्वजण आपल्या मराठी भाषेतील कौशल्य पणाला लावतो! ही पहा घारीसारखी तीक्ष्ण नजर!



२०१७ च्या NPL मधला त्यानं चित्त्याची धाव घेऊन केलेला धावबाद हा NPL
च्या इतिहासात १००० वर्षे संस्मरणात राहील ह्यावर सर्वांचं एकमत आहे. 

यंदाच्या NPL स्पर्धेच्या विजेत्या १९८३ संघासोबत उज्ज्वलचा हा फोटो ! 




मनमिळाऊ व्यक्तिमत्व  

उज्ज्वलला जो कोणी भेटतो तो त्याच्या मनमिळाऊ स्वभावाचं सदैव गुणगान करत राहतो. कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही सामाजिक / आर्थिक स्थरातील लोकांशी उज्ज्वल सारख्याच मोकळेपणानं मिसळू शकतो. कोणत्याही विषयावर एखादं Engaging Conversation (गुंगवून ठेवणारं संभाषण) करण्यात फार मोजकी लोक उज्ज्वलचा हात धरू शकतील. 

अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तो माझ्यासोबत जे. पी. मॉर्गनच्या व्यवसायाविषयी सहजपणं तासनतास बोलू शकतो पण सामाजिक माध्यमात कंपनीविषयी काही बोलायचं नाही ही ढाल पुढे करून मी माझं सव्वा लाखाची झाकली मूठ तशीच ठेवतो. त्याचप्रमाणं दरवर्षी NPL निमित्तानं त्याची आणि माझ्या मुलाची सोहमची मैत्री द्विगुणित होत चालली आहे. सोहमला असलेलं गाड्याचं आकर्षण लक्षात घेऊन तो त्याच्याशी सुद्धा पाच दहा मिनिटं गप्पा मारण्यात व्यतीत करतो. 

एखाद्याला दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत उज्ज्वल पाळतो हे मी ऐकून होतो. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला मी घरी काही मित्रांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं त्यावेळी आला. केवळ मला दिलेला शब्द पाळण्यासाठी तो अंधेरीहून रात्री १० वाजता आला आणि केवळ १० मिनिटं आमच्यासोबत घालवुन पुन्हा आपल्या कामासाठी निघून गेला.   

इतक्या व्यग्र वेळापत्रकात सुद्धा उज्ज्वलची विनोदबुद्धी कार्यरत असते. सोशल मीडियावर कोणी अगदी गंभीर उपदेश करणारा मेसेज वगैरे टाकला असेल तर वरवर निरागस वाटणारा पण खरंतर मिश्किल असणारा प्रश्न विचारण्यात उज्ज्वलचा हातखंडा आहे. म्हात्रे कुटुंब विरुद्ध पाटील कुटुंब वगैरे काल्पनिक लढे निर्माण करुन मला तो शाब्दिक लढ्यासाठी प्रवृत्त करत असतो.  

त्याच्याविषयीच्या ह्या काही परिचितांच्या /  मित्रगणांच्या प्रतिक्रिया 

१> He is very nice person at heart and easy to get along with, easily approachable, down to earth. So many Good qualities he has..

२> Energetic; any time ready for any work for others. 

३> उज्ज्वल जितक्या सहजरित्या लवकर लोकांशी मिक्स होतो ते अत्यंत कौतुकास्पद आहे. 

४> उज्ज्वल आणि माझी ओळख फक्त तीन चार वर्षांपुर्वी शाळेत झाली पण त्याच्याशी बोलताना असं कधी जाणवलं नाही की आताच ओळख झालीय! असं वाटत राहतं की कित्येक वर्षांपासुन आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. 

बाकी लिहिण्यासारखं अजुन बरंच आहे उज्ज्वलविषयी ! मला पामराला जितकं जमलं तितकं लिहिलं! मित्र उज्ज्वल सर्वांच्या चुकांना मोठ्या मनानं माफ करतो ह्याविषयी मी निःशंक आहे! 

१३ टिप्पण्या:

  1. As usual , a nice article .... so in future there can be a book which will have collection of these articles ...

    उत्तर द्याहटवा
  2. Really it is inspiring character !! God Bless you Ujjwal !! We are proud of you !!

    उत्तर द्याहटवा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...