मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ११ मे, २०१७

Trapped - अंतिम भाग



आधीच्या भागाच्या लिंक्स 

भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 

भाग सहावा 
 http://patil2011.blogspot.in/2016/11/trapped.html

भाग सातवा
http://patil2011.blogspot.in/2017/01/trapped.html

भाग आठवा
http://patil2011.blogspot.in/2017/02/trapped.html
  

परस्वामीचा संताप अनावर झाला होता. योगिनी, नवस्वामी अगदी आनंदात दिसत होते. आणि त्याचा आर्यन त्या दोघांच्या ताब्यात होता. महत्प्रयासाने त्यानं योगिनी आता नवस्वामींची होणार ह्या गोष्टीचा स्वीकार केला होता.  पण आर्यनविषयी मात्र आता त्याला अनावर प्रेम दाटून आलं होतं. परंतु तो आता हतबल होता. त्याच्याकडं आता मानवी देह नव्हता आणि त्यामुळं आपल्या भावनांना कृतीत परिवर्तित करण्यासाठी त्याच्याकडं माध्यमाची कमतरता होती. 

आर्यननं त्याचं अस्तित्व केव्हाचं ओळखलं होतं आणि त्यामुळं तो खिदळत होता. पण ह्यावेळी योगिनी आणि नवस्वामीसुद्धा खिडकीच्या दिशेनं पाहत होते. योगिनीकडेसुद्धा आपलं ह्या रूपातील अस्तित्व ओळखण्याची क्षमता निर्माण झाली आहे ह्याविषयी आता परस्वामीला तिळमात्र शंका राहिली नव्हती आणि तिनं हे सारं नवस्वामीकडे उघड केलं ह्याचाही त्याला प्रचंड खेद होत होता. 

अत्यंत निराश मनःस्थितीत त्यानं तिथुन निघून जाण्याचा निर्णय घेतला. कापसासारखं त्याचं ते अस्तित्व रस्त्याच्या पलीकडच्या भागात आलं आणि त्याची नजर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या वेड्याकडं गेली. हा वेडा इसम त्याच्या परिचयाचा होता. त्याच्याच जमातीने त्याच्या मदतीसाठी ह्याचा मेंदु ताब्यात घेतला होता. अधुनमधून खबरीसाठी परस्वामी त्याचा वापर करायचा. त्याला पाहून अचानक  त्याच्या मनात एक भयंकर कल्पना आली. 
भावनेच्या उद्रेकात वाहुन गेलेल्या परस्वामीनं आपलं सर्व कौशल्य पणाला लावलं. सुरुवातीला त्याला अपयश आलं. पण त्यानं आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 

योगिनीने नवस्वामीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. पण काही वेळातच आर्यन शांत झाला आणि काही वेळ खेळून निघून गेला. आता खिडकीबाहेर योगिनीला कसलंच अस्तित्व दिसत नव्हतं. तिनं सुटकेचा निश्वास टाकला. आजच्या रात्रीपुरता तरी हा निघुन गेला असावा असं तिनं स्वतःलाच आश्वासक स्वरात समजावलं. ह्या क्षणाला तिला नवस्वामींच्या मानसिक आधाराची गरज होती. पण तो मात्र काही वेळ जागा राहून झोपी गेला होता. आपलं हे उद्विग्न मन असंच शांत करत झोपायचा ती प्रयत्न करत होती. 

अचानक तिला बाल्कनीबाहेर काही चाहुल लागली. नको त्या शंकेनं तिच्या मनात काहूर माजवलं. नवस्वामीला उठविण्याचा विचार तिनं कसाबसा हाणून पाडला. काही क्षण शांततेत गेले. शेवटी तिला राहवलं नाही. ती हलक्या पावलाने बाल्कनीच्या दिशेनं गेली. 

. . . 
. .. 

तिनं दाराच्या नॉबला हात लावला तोच दार बाहेरून जोरात ढकललं गेलं. त्या आघातानं योगिनी जमिनीवर जोरात पडली. खरंतर नवस्वामी गाढ झोपणारा, पण आज तोही काहीसा अस्वस्थ असावा. ह्या आवाजानं त्याला लगेचच जाग आली. पाहतो तो काय, योगिनी जमिनीवर पडली होती. तिला बराच मुका मार लागला असावा. वेदनेनं तिचा चेहरा अगदी रडवेला झाला होता. आणि एक वेडा इसम हातात मोठा दगड घेऊन हिंस्त्रक नजरेनं नवस्वामीकडे पाहत होता. योगिनीला सारं काही उमजायला वेळ लागला नाही. 

"परस्वामी आहे तो !!" ती आर्त स्वरात किंचाळली. नवस्वामी प्रचंड हादरला. पण त्याच्याकडं वेळ कमी होता. त्यानं क्षणाचाही  विलंब न लावता खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्याकडं झेप घेतली. तिथं लाकडाचं एक शिल्प होतं. योगिनीला अशा कलात्मक गोष्टींची फार आवड होती. एक सहस्त्रांश सेकंद त्यानं योगिनीकडे पाहिलं. हे तिचं आवडतं शिल्प तो हाणामारीसाठी वापरणार होता आणि त्याला त्यासाठी योगिनीची परवानगी हवी होती. अशा परिस्थितीतही योगिनीला त्याचं हे वागणं प्रचंड आवडलं. 

परस्वामी मोठ्या असूयेनं त्या दोघांचा हा मूक संवाद पाहत होता आणि त्यामुळं त्याच्यात काहीसा गाफीलपणा आला होता. आणि त्यामुळंच वेगानं त्याच्या डोक्यावर आलेलं हे शिल्प त्याला फार उशिरा दिसलं. त्यानं शेवटच्या क्षणी दूर व्हायचा प्रयत्न केला पण तोवर उशीर झाला होता. ते वजनदार शिल्प त्याच्या डोक्यावर आदळून गेलं. वेडयाच्या देहातील परस्वामीला प्रचंड वेदना झाल्या. त्यातच नवस्वामी वेगानं त्याच्या अंगावर झेपावला. त्याही परिस्थितीत काही मिनिटं परस्वामीने त्याच्याशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला पण सदैव भुकेल्या असणाऱ्या आणि मस्तकाला मार बसलेल्या एका वेड्याच्या देहाच्या माध्यमातून हा लढा लढणं त्याला कठीण जात चाललं होतं. 

एका क्षणाला परस्वामीने निर्णय घेतला. त्यानं नवस्वामींच्या पकडीतून कशीबशी आपली सुटका केली आणि बाल्कनीतून तो बाहेर पडला. नवस्वामी जोरजोरात "चोर चोर!" असा आरडाओरडा करु लागला. खाली असलेला गुरखा वेगानं परस्वामीच्या दिशेनं धावला. त्याला चुकविण्यासाठी परस्वामीने रस्त्यावर धाव घेतली. 

कर्रर्रर्र ... भरदार वेगानं जाणाऱ्या तवेराच्या ब्रेकच्या आवाजानं सर्व वसाहतीला जाग आली. 

. . 
. .. 

... 

रस्त्यावरील दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचं पाणी झालं होतं. त्या चोराचा  संपूर्ण देह छिन्नविच्छिन्न झाला होता. गाडीचं चाक त्याच्या डोक्यावरून गेलं होतं. 

... 

... 

ह्या वेड्याला गेले काही महिने दररोज पाहणारी  लोक मात्र हा चोरीचं काम करत असेल ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. पण नवस्वामी, गुरखा आणि मुख्य म्हणजे CCTV च्या पुराव्यानंतर त्यांचाही पूर्ण विश्वास बसला. 

रस्त्यावर झेप घेताना आपल्या दिशेनं वेगानं येणारी तवेरा पाहून परस्वामीनं स्वतःला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण तोवर खूप उशीर झाला होता. चाक मेंदूवरून गेल्यानं त्याचं हे आभासी अस्तित्वालाच इजा झाली होती. त्याच्या त्या अस्तित्वाचा प्रकाश क्षणाक्षणाला क्षीण होत चालला होता, एका विझत चाललेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणं! कोट्यावधी प्रकाशवर्षे दूरच्या विश्वातून आलेला आणि केवळ योगिनीसाठी आपल्याच जमातीविरुद्ध 
पेटून उठलेला परस्वामी आज आपलं अस्तित्व गमावून बसला होता. 

पोलीस चौकशीमुळे योगिनी आणि नवस्वामींचे पुढील काही दिवस अगदी व्यस्त गेले. महिनाभरात  सर्व काही आलबेल झालं. योगिनीसुद्धा हळूहळू सावरली. परस्वामीचा काही वावर जाणवला नव्हता. शेवटी अशाच एका मोकळ्या सायंकाळी तिनं न राहवुन नवस्वामीकडं विषय काढला. ज्या प्रकारे तो वेडा इसम अपघातात ठार झाला त्यानुसार परस्वामी आपलं अस्तित्व पूर्ण गमावून बसला असेल अशी आपल्या मनातील आशा तिनं स्वामीला बोलून दाखवली. स्वामीला तेच वाटत होतं. एक क्षणभर त्यानं योगिनीकडं पाहिलं आणि मग दोघंही एकमेकांच्या मिठीत घट्ट विसावले. आकाश पूर्णपणे निरभ्र झालं होतं. योगिनीचा लढा संपला होता. 

(संपूर्ण)

P.S. स्वामीच्या बाहुपाशातून दूर झालेल्या योगिनीची नजर आर्यनकडे गेली. त्याची नजर तिला वेगळीच वाटली. तिच्या देहातून एक विजेची लहर प्रचंड वेगानं गेली. खरोखर मी मुक्त झाले का? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तिला किती थांबावं लागणार होतं कोणास ठाऊक?

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...