आमची वसई अगदी हिरवीगार! पावसाळ्यात तर अगदी नयनरम्य! घरी बसावं आणि चांगलंचुंगलं खात पीत आजुबाजूच्या निसर्गाचा आनंद लुटावा ह्या बाबतीत अगदी उत्तम! पण सर्व काही कधीच परिपुर्ण नसतं. वसईत राहायचं म्हटलं तर काही तडजोडी कराव्या लागतात. मुंबईपासुन दुरवर दररोज गर्दीत प्रवास करावा लागतो आणि हो अनियमित विद्युतपुरवठ्याशी सामना करावा लागतो!
पूर्वी वसईत मंगळवार आणि मग शुक्रवारी हमखास वीजपुरवठा काही तास खंडित व्हायचा! सध्या पावसाळ्यात तो कधीही खंडित होतो. जोराचा पाऊस सुरु झाला आणि झाडं विजेच्या तारांवर पडली किंवा पडण्याची भिती निर्माण झाली की मग तात्काळ वीजपुरवठा खंडित होतो. मग आमच्या शाळेचा whatsapp ग्रुप अगदी गजबजुन जातो. आमची लाईट आता पाच मिनिटांपूर्वी गेली, तुमच्याकडे आहे का? वगैरे वगैरे! आपले समदुःखी शोधण्याचा प्रयत्न चालु असतो. माझ्यासारखे काही मुंबईत स्थलांतरित झालेले, ह्या चर्चेकडे अगदी मन लावुन लक्ष देत असतात. वर वर पाहता आम्ही सुखी आणि अंधारात असलेले आमचे वसईकर दुःखी असा भास होत असला तरी खोलवर पाहिलं तर परिस्थिती उलट असल्याचं जाणवतं.
रात्रीचा अंधार आपल्याला मनन करण्याची, आपल्या घरातील मंडळींशी गप्पा मारण्याची संधी देतो. त्यावेळी भ्रमणध्वनी मात्र दूर ठेवावा! आपण आदिमानवापासुन कितीही लाखो करोडो वर्षे दूर आलो असलो तरी आपल्या मनात त्याचा छोटासा अंश असावा असं माझं मत आहे. निसर्गाच्या सानिध्यातील अंधारात आकाशाकडे पाहत आपल्या मनातील ह्या अंशांशी जोडण्याचा प्रयत्न करावा! आकाश जर निरभ्र असेल आणि कृष्ण पक्षातील चंद्र आकाशात येण्यास जर वेळ असेल तर वसईत रात्री आकाशात छोटे ठिपके प्रवास करताना दिसतात. हे मानवनिर्मित उपग्रह असतात. मुंबईतील फार कमी लोकांना हे उपग्रह पाहण्याचं भाग्य लाभलं आहे. मी अजूनही आकाशात सप्तर्षी ओळखू शकतो.
अगदी आदिमानवापर्यंत जायचं नसेल तर आजुबाजूला वावरणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाचा आनंद लुटावा. पावसाळा येण्यापूर्वी यंदा वसईच्या काही भागात काजव्यांनी आपल्या नयनरम्य ज्योतींनी बहार आणली होती!
आदिमानव, रातकिडे वगैरे झालं की मग अंतर्मनाकडं वळावं! प्रत्येक दिवशी आपण भावनांच्या वादळातून जाण्याची शक्यता हल्ली वाढीस लागली आहे. माझा एक मित्र शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसास भावनांचा चालताफिरता प्रेशर कुकर म्हणतो! जर ह्या भावना मोकळ्या करण्यासारखं माणूस तुमच्या आसपास नसेल तर त्यांचा उद्रेक होऊ शकतो. जर कोणी माणुस नसेल तर आपल्या अंतर्मनाला ह्या अंधारात आतल्या आत मोकळं होऊन द्यावं. सुरुवातीला ह्या भावना फसफसून बाहेर निघतात. हा काहीसा खळबळीचा वेळ तुम्ही जर का यशस्वीरित्या परतवुन लावलात तर मग मात्र अगदी शांतपणे मन आपल्याशी संवाद साधतं. दिवसातील प्रत्येक घटना अगदी स्पष्टपणे नजरेसमोर ठाकते! मग आपण झोनमध्ये जातो आणि मग वेगानं आयुष्याच्या मागच्या वर्षांत डोकावत राहतं.
तुमच्या आयुष्यात सुखदुःखाच्या घटना तर चालुच असतात. तुमचं मन कोणता भाजक (denominator) घेऊन ह्या घटनांकडे पाहतं आहे त्यावर ह्या सुखदुःखाच्या घटनांमुळे तुमच्या मनात होणाऱ्या भावनांची तीव्रता अवलंबून राहते. जर तुम्ही एखाद्या दुःखाच्या घटनेसाठी संपुर्ण आयुष्यच भाजक वापरला तर त्याची तीव्रता नक्कीच कमी होते. म्हणजे आपण जन्माला आलो तर आयुष्यात काही दुःखद घटनांचा सामना करावाच लागणार. अशी एक घटना आज घडली असे विश्लेषण आपण करु शकतो आणि मग मन लवकर पूर्वपदावर येण्याची शक्यता वाढीस लागते. आनंदाच्या क्षणी मात्र एका दिवसाचाच भाजक लावावा! Live that moment to the fullest!
आता मला सांगा की अंतर्मनाशी इतका खोलवर संवाद लाईट असताना होऊ शकेल काय? तर मननाची इतकी मोठी संधी देणाऱ्या वसईच्या विद्युतबोर्डाचे जाहीर आभार! आणि ह्या विषयी नेहमी व्हाट्सअँपवर आपलं मन मोकळं करणाऱ्या सुगंधाताई आणि न्यू इंग्लिश स्कुलच्या मित्रमंडळींचे खास आभार! जाता जाता उल्लेख ह्या ग्रुपवरील खास मित्राचा! त्यालासुद्धा हा अंतर्मनाशी संवाद खूप आवडत असावा! अगदी मुंबईत राहून सुद्धा त्याचं विद्युतबिल पाचशेच्या वरती कधी जात नाही! त्यावर पोस्ट लिहिण्याची उबळ मी किती दिवस दाबुन ठेऊ शकतो हे पाहुयात!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा