मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३० जुलै, २०१६

टोमणे

ह्या आठवड्यात एक मनाला खूप चुटपूट लावणारी बातमी वाचनात आली. एक विशीतला तरुण! विमानतळावरुन घरासाठी रिक्षा पकडली. घरी परतल्यावर सुट्ट्या पैशावरून रिक्षावाल्याशी थोडा वादविवाद झाला. शेवटी तो मिटला सुद्धा! पण मग जाता जाता रिक्षावाल्याने काही अपमानास्पद शब्द उच्चारले. घराकडे जायला निघालेल्या ह्या मुलाला हे शब्द ऐकताच भयंकर राग आला. धावत्या रिक्षाच्या मागे हा ही धावत सुटला आणि त्याने रिक्षाला पकडण्याचा प्रयत्न केला. हाती आला तो फक्त रिक्षाचा लोखंडी रॉड! रिक्षाचे संतुलन गेलं आणि धावती रिक्षा नेमकी ह्या तरुणाच्या अंगावर पडुन ह्याचा हकनाक जीव गेला. 

दुसऱ्याला घालुन पाडून बोलणारी माणसं सदैव आपल्या अवतीभोवती वावरत असतात. जगातील प्रत्येक माणसाची किमान एक दुखरी नस असते. ही दुखरी नस घेऊन प्रत्येकाला वावरावं लागतं. भोवतीच्या बऱ्याच जणांना ही बाब माहित असते. मग कधी वादाचे प्रसंग ओढवतात आणि अशा वेळी समोरच्या माणसाच्या ह्या नाजुक गोष्टीवर काही कुत्सित उद्गार काढण्यात मग काही माणसं धन्यता मानतात. समोरच्या माणसाला राग आला पाहिजे, त्याची मनःस्थिती बिघडली पाहिजे इतकाच नीच हेतु अशा उद्गारांमागे असतो. काही वेळा उद्गारांऐवजी राग येऊ शकणाऱ्या कृतीचा वापर केला जातो.

अशा वेळी शांत राहणं कितीही कठीण असलं तरी ते खूप आवश्यक असतं. एका क्षणाच्या टोकाच्या प्रतिक्रियेपायी आयुष्यावर विपरीत परिणाम झाल्याची कित्येक उदाहरणं आपण वैयक्तिक / व्यावसायिक जीवनात पाहत असतो. ही बातमी आली त्यावेळी बातमीबरोबर अशा वेळी मन शांत राखण्याचे काही उपाय तज्ञांनी दिले होते. पण बहुतेक सारे प्रवासातील होते. रिक्षावाल्यांशी, सहप्रवाशांशी प्रवासाच्या सुरुवातीपासून संवाद वगैरे साधा वगैरे वगैरे! 

आता नेहमीच्या आयुष्यात वापरण्याची काही तंत्रे! हल्लीच्या भ्रमणध्वनीला ओळखण्यापायी दिवसरात्र खर्च करण्याच्या काळात मनाशी संवाद साधण्यावर मेहनत घेणारी माणसे कमी होत चालली आहेत. ह्यातील बहुतांशी तंत्रे अशा वेळी आपल्या मनाशी संवाद साधण्याशी संबंधित असतात.  ज्या क्षणी अशा प्रसंगी आपला तोल जात आहे असे वाटलं तर खालील संवाद आपल्या मनाशी साधा.


१) समोरच्या माणसाच्या कितीही टोकाच्या कुत्सित शेऱ्याने, कृतीने आपलं कोणतंही व्यावहारिक नुकसान होत नसतं. जर आपण शांत राहू शकलो तर तो समोरचा माणुसच आपला वेळ घालवत असतो. 

२) बऱ्याच वेळा जी माणसे प्रत्यक्षात आपलं काही बिघडवू शकत नाही अशीच माणसं ह्या कुटिल तंत्रांचा वापर करतात. कल्पना करा की तुमच्या ऑफिसातील बॉसला तुमचा राग आला तर तो तुम्हांला काही खोचक टोमणे मारेल का? अर्थातच नाही! तो थेट अशी काही कृती (जी तुम्हांला कदाचित जाणवेल किंवा जाणवणार सुद्धा नाही) करेल की त्याचे परिणाम तुम्ही काही काळ भोगत बसाल! त्यामुळे प्रत्यक्ष काही बिघडवू न शकणारी माणसेच अशा तंत्रांचा वापर करतात हे मनाला समजावा! 

सारांश काय तर - लक्ष नको देऊस टोमणे मारणाऱ्याकडे; कारण तुझं आहे तुजपाशी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...