मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २३ जुलै, २०१६

देशमुखांचं पोर!

नुकताच अजुन एक प्रौढांसाठीचा तथाकथित विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या जाहिराती कुटुंबवत्सल मंडळी जी वर्तमानपत्रे वाचतात तिथं अगदी ठळकपणे झळकल्या. चित्रपटाची परीक्षणं सुद्धा छापुन आली आणि FM रेडिओवर अगदी जोरानं ओरडुन सांगण्यात आली. 

समाजातील प्रत्येक घटकांची विशिष्ट अशी गरज असते आणि त्यानुसार साहित्य, नाटकं, चित्रपट ह्यांची निर्मिती होत असते. हा असा जगाचा रितीरिवाज असताना मला ही वरील गोष्ट खटकायचे कारणच काय असा मुद्दा समोर येणार. मला ही गोष्ट खटकायची कारणं पुढीलप्रमाणे 

१) स्त्रियांची सामाजिक जीवनातील सुरक्षा हा सध्या ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. भले आपली घरं अगदी आलिशान असतील आणि आपण एखाद्या परकीय कंपनीच्या अत्याधुनिक कार्यालयात काम करत असु. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची मानसिकता आधुनिक असेल. पण सामाजिक जीवनात वावरताना मात्र अजुनही बराच हिस्सा मात्र खऱ्या अर्थाने स्त्रीकडे आदराने पाहायला शिकला नाही. 

पाश्चात्य देशात ह्यापेक्षाही वरच्या थराच्या प्रौढ कलाकृती असतील पण सामाजिक जीवनात मात्र स्त्रीकडे अशा अनादराने पाहण्याची कोणाचीही टाप होत नाही. घर ते कार्यालय हा टप्पा सुरक्षितपणे दिवस आणि रात्री स्त्रिया पार पाडू शकतील  अशी परिस्थिती भारतात बऱ्याच ठिकाणी राहिली नाही. असले चित्रपट समाजातील जो घटक अजुनही स्त्रीकडे आदरानं पाहायला शिकला नाही त्यांच्या मनोवृत्तीत खतपाणी घालतात. 

सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचु शकणाऱ्या माध्यमात दृश्य आणि शाब्दिक द्वयर्थीपणाच्या सीमा आखुन देण्यात याव्यात.

२) चांगल्या घरातील मुलांनी अशा चित्रपटात काम केल्यानं अशा द्वयर्थी संवादाची रेलचेल असलेल्या चित्रपटांना काही प्रमाणात सामाजिक मान्यता मिळते. स्त्रियांकडे आदरानं न पाहणाऱ्या समाजातील घटकांमध्ये अशा चित्रपटांमुळं आणि त्यात भुमिका निभावणाऱ्या मुख्य प्रवाहातील कलाकारांमुळे हे सारं काही आता राजरोसपणे चालु शकेल अशी भावना निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. 

३) वयात येणाऱ्या, कॉलेजातील मुलांवर असे चित्रपट सामाजिक जीवनात हा असला प्रकार म्हणजेच नॉर्म आहे अशी समजुत निर्माण करतात. अशी मानसिकता घेऊन वाढलेल्या पिढीचं पुढं कसं होणार अशी चिंता मनात निर्माण होते. 

समाजात सर्व प्रकारचे घटक पुर्वीपासून होते आणि राहणारच! पण पुर्वी सरळमार्गाने वागणाऱ्या घटकाने सामाजिक जीवनात वावरण्याचे संकेत बनवून ठेवले होते आणि बाकीचे घटक ह्या संकेतांना, रुढींना वचकुन राहायचे. हल्ली हे बाकीचेच असंस्कृत घटक सामाजिक जीवनाचा वेगानं ताबा घेत आहेत. आणि देशमुखांसारख्या  नामवंत घराण्यातील पोरं त्यात सहभागी होत आहेत. आपण ज्या घराण्यात जन्मलो आहोत त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी वागणूक सामाजिक जीवनात दर्शविण्याच्या जबाबदारीची जाणीव असल्या वाह्यात पोरट्यांना करुन द्यायची गरज आहे! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...