मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २१ जुलै, २०१६

समय तू धीरे धीरे चल !






महत्प्रयासाने मागे सारलेली रविवार संध्याकाळ आणि सोमवार सकाळ सरते न सरते तोवर म्हणता म्हणता गुरुवार उजाडला. ऑफिसात कितीही क्लिष्ट काम असलं तरी एकदा का गुरुवार सकाळ वगैरे उजाडली की आयुष्य कसं आशादायी वाटु लागतं. म्हटलं तर आपण भारतीय लोकांनी अमेरिकन आणि पाश्चात्य लोकांना काही कार्यालयीन सवयींच्या बाबतीत बिघडविलं. सायंकाळी इमानेइतबारे चार पाच वाजता ओस पडणारी त्यांची कार्यालयं (विशषेतः माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील) सात वाजेपर्यंत गजबजत राहु लागली. पण एक मात्र खरं शुक्रवारी सायंकाळी ऑफिसातील सर्व तणाव विसरुन मनमोकळं करायची सवय मात्र आपल्या लोकांना खूप आवडली. विशेषतः परदेशी वास्तव्य असणाऱ्या आपल्या देशवासीयांनी ही सवय मनापासुन उचलली.

आठवड्यातल्या प्रत्येक दिवसाच्या माझ्या विशिष्ट मनःस्थित्या असतात. त्याविषयी नंतर कधी! पण बऱ्याच वेळा असं जाणवतं की अरे आताच रविवार सायंकाळ होती आणि अचानक शुक्रवार उजाडला सुद्धा! हा आठवडा गेला कसा हे काही कळलंच नाही बघा! मग हाच हिशोब महिन्याच्या बाबतीत लावला जातो. "अरे आता कोठे मे महिन्याची सुट्टी संपली आणि आता ऑगस्ट सुद्धा उंबरठ्यावर येऊन ठेपला बरं"! मग मन कसं मागं मागं जातं. वर्षाचा जानेवारी आठवतो, वर्षातील सहली आठवतात. आयुष्यात एकदाच येणारं २०१६ वर्ष बघता बघता सरत चाललं आहे ह्याची अस्वस्थ करणारी जाणीव मनाला चुटपुट लावुन जाते.

मन अजुनच भावुक असलं आणि ह्या विचारात गढून जाण्याची चैन परवडण्याइतका वेळ असेल तर मग मन कसं २०१०, २०००, १९९० असले टप्पे गाठत जातं. आपले शाळा, कॉलेजातील, आईवडिलांच्या मायेच्या छत्राखाली काढलेले पहिल्या नोकरीतील, परदेश वास्तव्यातील, मुलांच्या बालपणातील सारे सारे दिवस आठवत राहतात. दिवसाचं कसं असतं बघा ना! प्रत्यक्ष अनुभवताना कदाचित त्यातील सुख आपल्याला जाणवलं नसेल पण मागे वळुन पाहताना मात्र नक्कीच त्यातील सुखदता आता जाणवते. आणि ते सुख आपल्याला त्यावेळी का कळलं नाही अशी चुटपुट सुद्धा लागुन राहते. 
 
भौतिकशास्त्राच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर प्रत्येक सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष सारखाच वेळ घेतात. पण आपण ज्या मनःस्थितीतुन जात असतो त्यावर आपल्याला ही वेळेची एकक किती अल्पकाळ / दीर्घकाळ भासतात हे अवलंबुन असतं. सापेक्षतावादाचे स्पष्टीकरण देताना म्हटलं जातं की भट्टीजवळ बसलं असता एक मिनिटं सुद्धा युगासारखं वाटू शकतं तर सुंदर युवतीच्या सानिध्यातील तासभर सुद्धा एका क्षणासारखा वाटू लागतो. 
अभ्यासाचं किंवा पैसा कमवायचं टेन्शन जोपर्यंत नसतं तोपर्यंत आयुष्य रमतगमत चालतं. पूर्वी अभ्यासाचा तणाव नसल्याचं वय अगदी आठवी, नववी पर्यंत जायचं. हल्ली माहीत नाही! 

आज अचानक हे सारं आठविण्याचं कारण म्हणजे मी मागील काही वर्षात नक्की कायकाय झालं हे आठवायचा प्रयत्न करुन पाहत होतो. २०१२, १३, १४, १५ ही सारी वर्षे अगदी सारखीच वाटु लागली. ह्यातील एका वर्षाला दुसऱ्यापासून वेगळं करण्यासारखं काही खास वाटत नव्हतं. कारण स्पष्ट होतं. अगदी यांत्रिकपणे ही वर्षे गेली होती. पण हेच मागे वळून पाहता - १९८०, १९९० अगदी २००० च्या दशकातील बरीच वर्षे अगदी स्पष्ट आठवत होती.

निष्कर्ष बहुदा असाच की जोपर्यंत हा नोकरीधंद्याचा आणि कौटुंबिक जबाबदारीचा तणाव मागे लागणार तोपर्यंत हे कालचक्र असं घाईघाईत चालल्याचा भास होतंच राहणार. कारण आपण ह्यातील एकही क्षण खऱ्या अर्थानं अनुभवत नसणार.  आणि जेव्हा खऱ्या अर्थानं फुरसत मिळणार तेव्हा मात्र हा मोकळा वेळ खायला उठण्याची शक्यताच जास्त! सारं काही सापेक्ष हेच खरं! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...