मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १६ जुलै, २०१६

सरोगसी - एकल पालकत्व

आधुनिक विचारसरणी निःसंशयपणे अखंड भारतवर्षात वाढीस लागली आहे. आधुनिक विचारसरणी जितक्या आत्मविश्वासानं लोकांसमोर मांडता येते तितक्याच आत्मविश्वासानं जुनी मतं मांडता येतील की नाही असा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि जर आपल्या घरी टाइम्स ऑफ इंडिया सारखं वर्तमानपत्र येत असेल तर आपला हा संशय वाढीस लागतो!

प्रस्तावना अशासाठी की तुश्शार कपूरने सरोगसी तंत्राचा वापर करुन एका मुलाचं पितृत्व स्वीकारलं. एका पुरुषानं हा एकल पालकत्वाचा निर्णय घेतला त्यामुळं त्याचं काही प्रमाणात कौतुक सुद्धा झालं. माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासुन चुकचुकणाऱ्या संशयाच्या पालीने ह्यावेळी मात्र उघड रुप धारण केलं. हा संशय जुन्या विचारसरणीकडे झुकणारा असल्यानं काहीशा धाकधुकीतच ही पोस्ट लिहितोय! 

सरोगसी हा पालकांच्या दृष्टीनं पाहायला गेला तर एक आयुष्य पालटवून टाकणारा निर्णय असतो. काही तांत्रिक कारणास्तव ज्यांना नैसर्गिक पद्धतीनं पालकत्व मिळत नाही त्यांना तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलेली निःसंशयपणे ही मोठी सुवर्णसंधी आहे. सरोगसी पालकत्व स्वीकारलेल्या जोडप्यांच्या मुलांच्या दृष्टीतुन एक बाब ठीक आहे आणि ती म्हणजे अशा मुलांना माता आणि पिता अशा दोघांचीही माया मिळते. तरीसुद्धा माहितीजालावर काही संशोधन केलं असता अशा मुलांना आपण आपल्या आईशिवाय दुसऱ्या कोण्या स्त्रीच्या गर्भात वाढलो हा विचार काही वेळा भावनात्मक दृष्ट्या त्रासदायक ठरतो. 

ह्या पुढील पातळी म्हणजे एकल पालकत्व! आपल्या लहानपणी आई - वडील दोघांचीही माया मिळणं हा प्रत्येक बालकाचा हक्क असु शकतो की नाही? आता तुम्ही म्हणाल की असंख्य कुटुंबातील बालकांना जरी जन्मदाते आई वडील असले तरी विविध परिस्थितीमुळे कमी प्रमाणात त्यांना त्यांची माया मिळते. मुद्दा काही प्रमाणात ग्राह्य असला तरी ह्यामध्ये बदलता येण्यासारखी परिस्थिती किती असते ? आणि कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी माता पिता हे काही मोजके का होईना पण एकत्र वात्सल्याचे क्षण आपल्या पाल्यास देतातच! 

ज्या बालकानं एकल पालकत्व अनुभवलं आहे त्या बालकास पुढे मोठं झाल्यावर आयुष्यातील आई वडिलांच्या मिळुन अनुभवू शकणाऱ्या पालकत्वास आपण मुकलो अशी भावना निर्माण झाल्यास जबाबदार कोण?
एकल पालकत्व स्वीकारणारा माणुस भावनिक दृष्ट्या ह्या जबाबदारीस सक्षम आहे का ह्याची तपासणी होणं खरतरं आवश्यक आहे. केवळ पैसा हा घटक कोण्या व्यक्तीस एकल पालकत्व मिळवून देण्यास सक्षम बनवू नये.  

विवाहानंतर माणुस आपल्या साथीदाराशी जुळवून घेतो, बऱ्याच तडजोडी करतो. ह्या सर्व गोष्टी त्याला एक संयमी पालक म्हणुन बनवून देण्यास हातभार लावत असतात. पण एकल पालकत्वात अचानकपणे ही व्यक्ती पालकत्वाचं मोठं इंद्रधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करु पाहते. आणि समजा काही दिवसा, महिन्या किंवा वर्षात समजा ह्या व्यक्तीस जाणवलं की ह्या इतक्या मोठ्या जबाबदारीस आवश्यक असणारा संयम माझ्याकडं नाही, तर मग निर्माण होणाऱ्या परिस्थितीस जबाबदार कोण? भारतीय समाजात आपण आईवडील ह्या दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांना समान प्राधान्य देतो. ह्या एकल पालकत्वात मात्र बालक एका बाजुच्या नातेवाईकांना पुर्णपणे मुकतो.  


काही गैरसमज नकोत मी स्पष्ट करु इच्छितो की इथं वैयक्तिकरित्या तुश्शार कपूरविरुद्ध मला काहीही म्हणायचं नाही!  त्यानं सद्य कायद्याच्या चौकटीत राहून हे सर्व काही केलं आहे. ज्या माणसाला आपलं चांगलं नाव सुद्धा काही विशिष्ट कारणांमुळं बदलावंस वाटलं त्याच्या मनःस्थिरतेविषयी मात्र माझ्या मनात थोडी शंका निर्माण झाली आहे हे मात्र मी मान्य करतो. एक समाज म्हणून सरोगसीमार्फत एकल पालकत्वाला सामोरे जाव्या लागणाऱ्या बालकांच्या मानसिकतेचा आपण विचार करणे आवश्यक आहे हाच मुद्दा आजच्या ह्या पोस्टचा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...