मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १९ एप्रिल, २०१५

IPL च्या मोहमयी विश्वात!


 
मागच्या दोन तीन वर्षांत भारताने कसोटी सामन्यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ह्या सारख्या संघांकडून दारूण पराभव स्वीकारला. भारताला कसोटी सामन्यात खेळता येत नाही ह्याचे मुख्य कारण IPL असल्याचा मनोग्रह मी करून घेतला असल्याने मला ह्या स्पर्धेविषयी मनात काहीसा राग आहे. 
मन काहीसं द्विधा परिस्थितीत सापडतं. अगदी कर्मठपणे विचार करता IPL विषयीचा राग कायम राहतो, पण नवीन युगाचा प्रतिनिधी असणारा सोहम ज्या आवडीने IPLचे सामने पाहतो ते पाहून मग हा राग काहीसा कमी होतो. 
आयुष्य आपणासमोर गंभीर, हलकेफुलके आणि अनेक विविधरंगी क्षण घेऊन येतं. आयुष्यात अनुभवलेला एखादा हलकाफुलका, सुखाचा क्षण तुम्हांला किती काळ पुरतो ह्याची समीकरणे व्यक्तीनुसार बदलतात. तशी ही समीकरणे मागची पिढी ते ह्या पिढीपर्यंत सुद्धा बदललेली आहेत. हल्ली आपल्याला दररोज हलकेफुलके क्षण लागतात. अशा क्षणांचा नियमित डोस मिळाला नाही तर मग नैराश्य वगैरे येतं. मग उगाचच मानसोपचारतज्ञ वगैरे लागतात. पूर्वी जुन्या पिढीकडून उपदेश, टोमणे ऐकायची इतकी सवय असायची की उगाचच नैराश्य वगैरे यायचं नाही. पण कालाय तस्मे नमः! 
असो अशाच एका हलक्याफुलक्या क्षणाच्या शोधात आम्ही मागच्या रविवारी मुंबई इंडियन विरुद्ध पंजाब किंग्स एलेव्हन हा रात्रीचा ८ वाजताचा सामना पाहावयास गेलो. आमच्या सोबत अजून दोन कुटुंब असल्याने एकूण १० जण होतो. वानखेडेची प्रवेशद्वारे साधारणतः सामन्याच्या तीन तास आधी उघडतात अशी बातमी होती. अगदी तीन तास नसलं तरी दीड दोन तास लवकर पोहोचावं ह्या हिशोबाने आम्ही नियोजन केलं होतं. 
ह्या सामन्याची तिकिटे बुक माय शो ह्या संकेतस्थळावरून नोंदवली होती. ती नोंदवल्यापासून तीन ते चार दिवसात घरी पोहोचली सुद्धा! ही तिकिटे जनांनी सांभाळून ठेवावीत. ती फाटली किंवा खराब झाली तर स्टेडीयम मध्ये प्रवेश मिळणार नाही अशी धमकीवजा सूचना देण्यात आली होती. 
सहाच्या सुमारास आम्ही सर्वजण चर्चगेट स्थानकात पोहोचलो. आपण पश्चिम रेल्वेच्या नावाने अधूनमधून खडे फोडत असलो तरी मला मात्र ह्या रेल्वेचे आणि ती इतक्या नियमितपणे चालवणाऱ्या कर्मचारी वर्गाचे सदैव कौतुकच वाटत आले आहे. 
१० जणांत काही वयानुसार आणि काही मनानुसार बालके असल्याने चर्चगेट स्थानकात अल्पोपहाराचा कार्यक्रम रंगला. साधारणतः साडेसहाच्या सुमारास आम्ही स्थानकाबाहेर पडलो. मग मुंबई इंडियन्सचे निळे झेंडे आणि पंजाब किंग्स एलेव्हनचे लाल झेंडे विकणाऱ्या विक्रेत्यांनी आम्हांला घेरलं. त्यांच्या विक्रीकलेचा मान राखत आम्ही थोडे पुढे सरकलो तेव्हा चेहऱ्यावर लाल, निळी रंगकला करून देणारे भेटले. त्यांनाही आमच्यातील काहीजणांनी संधी दिली. मग मलिंगाच्या पुंजक्यारूपी केसांच्या निळ्या रंगातील आवृत्या विकणारे भेटले. त्यांनाही आम्ही निराश केले नाही. शेवटी मग टी शर्टस विकणारे भेटले. सुदैवाने त्यांच्या किमती फारच अवास्तव वाटल्याने आम्ही पुढे सरकलो. 
चर्चगेट स्थानकाच्या बाहेरूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसत होता. आमची तिकिटे ही विजय मर्चंट कक्षातील असल्याने आम्हांला स्टेडीयमच्या पश्चिमेकडे असलेल्या प्रवेशद्वारातून शिरणे आवश्यक होते. प्रथम आमची तिकिटे तपासून पाहण्यात आली. दक्षिण बाजूला ज्यांचे स्टैंड होते त्यांना तात्काळ प्रवेश मिळाला. आमच्यातील तीन बालकांनी ऑस्ट्रलियन खेळाडूंच्या प्रभावाखाली येऊन पंजाबच्या संघाला पाठींबा जाहीर केला होता. काळ कसा बदलला आहे पाहा, पूर्वी आपला संघ कितीही कमकुवत असला तरी परक्या संघाला पाठींबा देण्याचा विचार चुकुनही मनाला शिवायचा सुद्धा नाही. आणि हल्लीची मुले पहा - जिथलं पारड जड तिथे त्यांची निष्ठा! बायकोचे हे शब्द ऐकून मी धन्य, अंतर्मुख वगैरे वगैरे झालो. शेवटी एकदाचे आम्ही पश्चिम दिशेला असणाऱ्या गेटपाशी पोहोचलो. तिथे आमची तिकिटे पुन्हा तपासण्यात आली. आणि अर्धा भाग फाडून घेण्यात आला. इथे आपल्यासोबत असणाऱ्या सर्व बैग्स सोडून द्यायची वेळ आली होती. अगदी पाण्याच्या बाटल्या सुद्धा! आता सुरक्षिततेच्या नावाखाली पाण्याची बाटली सुद्धा आत नेऊ न देणे हे खचितच योग्य नाही. पण बाजार मांडला पैशाचा तिथं वाद कोणाशी घालणार! भ्रमणध्वनी आत नेता येणार की नाही ह्याविषयी थोडी संदिग्धता होती पण नशिबाने त्याला परवानगी मिळाली. स्कॅनरमधून जायच्या आधी खिशात रुमाल सोडून काहीच नसावं अशी सक्त ताकीद देण्यात आली. त्यामुळे मोबाईल, पाकीट वगैरे हातात पकडून स्कॅनरमधूनमी प्रवेश केला. तरीही खिशातील घराची चावी कुरकुरलीच. ती ही मग बाहेर काढण्यास सांगण्यात आली. तिचीही कठोर परीक्षा करून मग आम्हांला आत सोडण्यात आले. आता जिन्याने दोन मजले  वर जाऊन आम्ही स्थानापन्न होणार होतो. वातावरणात अगदी जोष होता. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच तिथल्या दृश्याने आम्ही अगदी प्रसन्न झालो. 

 

आमच्या समोरच बालकांचा दैवत असलेला पंजाब एलेव्हनचा संघ वॉर्म अप करीत होता. 

त्यात मॅक्सवेल आणि जॉन्सन ही मंडळी दिसताच ह्या बालकांना स्वर्ग दोन बोटे उरला. अवतीभोवती मुंबई इंडियन्सच्या निळ्या सागरात ही तीन बालके आणि त्यांचे लाल टी शर्टस नक्कीच उठून दिसत होते. थोड्या वेळाने वॉर्म अप संपताच मग संजय बांगर ह्यांनी हवेत उंच चेंडू उडवून झेलांचा सराव देण्यास सुरुवात केली. त्यात मॅक्सवेलला त्याने आमच्या दिशेला पाठवलं. बहुदा ह्या उठून दिसणाऱ्या तीन टी शर्ट त्यालाही दिसले असावेत. आणि एका क्षणी त्याने ह्या तीन बालकांकडे पाहून त्याने स्मितहास्य केले. ही तीन मंडळी अगदी गारद झाली. हा क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा लक्षात राहील. 
आमचा मुंबई इंडियन्सचा संघ पलीकडच्या बाजूला दिसत होता. त्यात मलिंगाचा केसांचा पिंजारा शोधून काढण्यात आम्हांला यश मिळालं. मग थोड्यावेळानं नाणेफेकीसाठी रवि शास्त्री आणि दोन्ही कप्तान मैदानात आले. काहीही सनसनाटी घडत नसताना उगाच नाट्यपूर्णरित्या ओरडून काहीतरी घडतंय असा आभास निर्माण करण्याची हल्ली सर्वत्र पद्धत निर्माण झाली आहे. त्यानुसार रवी शास्त्री ह्यांनी जोरात ओरडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. रोहित शर्मा ह्यांनी नाणेफेक जिंकून पाहुण्या संघास प्रथम फलंदाजीस बोलावलं. समोरच्या मोठ्या पडद्यावर अगदी मोठ्या रुपात दिसणारे हे लोक नक्की कोठे आहेत हे शोधण्यात आमचे काही क्षण गेले. ते आम्हांला लगेचच दिसले खरे पण प्रीती झिंटा मात्र नक्की कोठे बसल्या आहेत हे आम्हांला समजत नव्हते. १९९८ सालच्या जिया जले जां जले गाण्यापासूनचे त्यांचे आम्ही भक्त! त्यांना ह्याची देही ह्याची डोळा बघण्याचे भाग्य आम्हांला लाभले नाही. मध्येच मग सचिनवर कॅमेरा आला आणि मग स्टेडीयम मध्ये नवचैतन्य पसरलं.




सामना सुरु होण्याची वेळ जशी येऊ लागली तशी सराव करणारी मंडळी आत परतली आणि मैदान मोकळं झालं. खेळपट्टीवर विविध रेखा आखणारा कर्मचारी एक शेवटची तपासणी करत होता. परीक्षा असो की IPL सामना शेवटच्या क्षणीची तयारी ही हवीच! 



बाकी एकंदरीत पोस्टचा सूर काहीसा नकारात्मक वाटण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट मात्र सांगू इच्छितो. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचा अनुभव मात्र जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा घ्यावाच. ज्या पद्धतीने हे खेळाडू गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करतात त्याचा प्रत्यक्ष खेळ पाहताना आनंद टीव्हीवर पाहण्याच्या आनंदाच्या अनेक पटीने असतो. वेगवान गोलंदाजाचा चेंडू ज्या वेगाने यष्टीरक्षकाकडे पोहोचतो, फलंदाजाने जोरात टोलावलेला चेंडू ज्या सफाईने क्षेत्ररक्षक अडवतात हे प्रत्यक्ष बघण्यात नक्कीच आनंददायी असते. विशेष करून लहान मुलांनी हा प्रत्यक्ष खेळ पाहिल्यास त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ह्या तिन्ही गोष्टीतील आपला दर्जा कोणत्या पातळीवर असावा ह्याचा अंदाज बांधण्यास मदत होते. 

यंदाचा रणजी हंगाम ज्याने आपल्या कर्नाटक संघासोबत गाजवला त्या विनयकुमारने गोलंदाजीची सुरुवात केली. समोर भारतातर्फे आंतरराष्ट्रीय सामने गाजवलेले मुरली विजय आणि सेहवाग हे होते. ह्या दोघांनी विनयकुमारला झोडपून काढलं. पहिल्या तीन षटकात विनयकुमारने ३५ धावा मोजल्या. सेहवागची फलंदाजी तंत्रशुद्ध जरी नसली धावगती शाबूत ठेवण्यासाठी प्रभावी होती. दुसऱ्या बाजूने सुयल हा गोलंदाजी करीत होता. त्याने मात्र आपल्या पहिल्या दोन षटकात दहाच धावा मोजल्या. मला सुयलची गोलंदाजी आवडली. हा गडी भविष्यात चांगली गोलंदाजी करेल अशी मला आशा वाटते. विनयकुमारला दोन षटकात फटकावल्यावर तिसरं षटक द्यायचा रोहितचा निर्णय चुकीचा होता असं वाटून गेलं. मुंबई इंडियन्सचा एक मुख्य प्रश्न म्हणजे त्यांच्याकडे खूपच जास्त वैयक्तिक महान खेळाडू आणि मार्गदर्शक आहेत. परंतु सामने जिंकण्यासाठी खेळाडू आणि मार्गदर्शक ह्यांची जी लय जुळून यावी लागते ती मात्र बऱ्याच वेळा जुळत नाही. तेंडूलकर, कुंबळे, पॉन्टिंग, जॉटी ऱ्होडस इतकी रथी महारथी मंडळी मार्गदर्शनासाठी उपलब्ध असताना ह्या हंगामातील मुंबई इंडियन्सची केविलवाणी कामगिरी ह्याच मुद्द्यावर बोट ठेवते. 





मलिंगाच्या पहिल्या षटकात ११ धावा फटकावल्यावर मात्र मग रोहितने भज्जीला गोलंदाजीस पाचारण केलं. त्यानेसुद्धा पहिल्याच षटकात धोकादायक अशा विरूला माघारी धाडून कर्णधाराचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविला. सेहवाग बाद झाल्यावरसुद्धा आमच्यातील पंजाब एलेव्हनचे खंदे समर्थक इतके का खुश झाले हे आम्हांला कळेना. पण मॅक्सवेल साहेबांना प्रवेश करताना पाहून सर्व शंकाचे निरसन झाले. सोहमशी अधूनमधून क्रिकेटवर माझी चर्चा होते. त्यातही त्याला फंडे द्यायची संधी मी सोडत नाही. मॅक्सवेलची अजून महान खेळाडूंत गणना व्हायला वेळ का आहे हे मी त्याला समजावून देत होतो. केवळ तीन चार मोठे फटके मारून तुम्ही त्यावेळेपुरता लोकांच्या लक्षात राहू शकता पण महान खेळाडू बनायचं असेल तर तुम्हांला मोठ्या खेळी कराव्या लागतात आणि अशा खेळ्या तुम्हांला अनेक मोसमात कराव्या लागतात. माझे हे बोल ऐकून सोहम थोडासा विचारात पडला खरा! बाकी मग अजूनही मॅक्सवेलला कसोटी संघात का घेतलं जात नाही ह्याचही बहुदा त्याला उत्तर मिळालं. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या सुचींथ त्याने एक चौकार मारला खरा पण दुसऱ्याच चेंडूवर एक उंच फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. ह्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चांगले झेल घेतले हे मात्र खरं. मध्येच प्रेक्षकांना लहर आली आणि त्यांनी मेक्सिकन वेव सुरु केली. पूर्ण स्टेडीयमभर हे लाट तीन चार वेळा फिरली. 

आमच्या बाजूला तगडा कोरी एण्डरसन क्षेत्ररक्षण करत होता। का कोणास ठाऊक पण हा अंग राखून क्षेत्ररक्षण करीत आहे असंच मला वाटत होतं. चौकार जात असेल तर गडी विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे प्रयत्न करीत नसे. शेवटी देश आणि क्लब ह्यांच्यासाठी खेळण्यातला फरक तर येणारच ना! आणि जेव्हा तुम्ही दीड महिन्यात तीन दिवसाला एक ह्या वेगानं भारतासारख्या खंडप्राय देशात प्रवास करीत १४ सामने खेळणार असाल तेव्हा तुम्हांला स्वतःची थोडी काळजी घ्यायलाच हवी.


झिंटाबाईं दिल चाहता है निमित्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रवासानंतर त्या देशाविषयीच्या प्रेमाने भारून गेलेल्या असाव्यात. म्हणूनच की काय त्यांच्या संघात सर्वात जास्त परकीय खेळाडू ऑस्ट्रेलियाचेच भरले आहेत. मॅक्सवेल गेला आणि मिलर आला. भज्जी फॉर्मात होता. त्याने विजयलाही परत पाठवलं. मी सोहमच्या दिशेने तोंड वळवून जोरदार आरोळी ठोकली. सोहमला श्रीश आणि मृण्मयी ह्यांची साथ होती. त्या तिघांनी माझी ही प्रतिक्रिया फारच मनावर घेतली. मला ही पुढे महागात पडणार आहे ह्याचा अंदाज नव्हता.पंजाब ३ बाद ८८. आता बेली आला. दोघेही ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानात होते. 

बेलीवरून आठवलं की आमच्या आजूबाजूला फिरणाऱ्या विक्रेत्यांकडील पिझ्झा, सैंडवीच ह्या सारखे पदार्थ पाहून आमच्या बेलीमधील कावळे ओरडत असत. सुरक्षेच्या नावाखाली कोणताच खाद्यपदार्थ आत नेता न आल्याने आम्हांला हे अतिशय महागडे पदार्थ खाण्याशिवाय पर्यायच नव्हता. इथे बऱ्याच गोष्टी न पटण्यासारख्या होत्या. खाली विकली जाणारी पाण्याची बाटली वर स्टेडीयममध्ये आणण्यास परवानगी नव्हती. केवळ पेप्सी घ्या आणि तीही पन्नास रुपयाच्या चढ्या भावात! 

पुढची ३ -४ षटक बेली आणि मिलर ह्यांनी डावाला स्थैर्य देण्यात घालवली. त्या वेळात माझे लक्ष आजूबाजूच्या स्टेडीयमकडे गेलं. स्टेडीयमला अगदी सुंदर रूप देण्यात आलं होतं. समोर दिसणारा पत्रकारकक्ष देखील अतिआरामदायी वाटत होता. दुसऱ्या बाजूला अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठींचा कक्ष देखील सुंदर होता.



डावाच्या शेवटी मात्र बेलीने धुंवाधार फलंदाजी करत धावसंख्या १७७ पर्यंत पोहोचवली. मधल्या पंधरा मिनिटाच्या विश्रांतीच्या कालावधीत खाली स्वच्छतागृहात जाण्यासाठी आणि पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. स्वच्छतागृहाची स्थिती अगदीच वाईट नव्हती! माझ्या नशिबाने मला पाण्याची बाटली वरती आणण्यास कोणी मज्जाव केला नाही. 

मी आणि सोहम स्थानापन्न होत नाही तोवर मुंबईच्या डावाचे पहिलं षटक सुरूही झालं होतं आणि दुसऱ्याच चेंडूवर कप्तान रोहित पायचीत झाला. डावाची अशी निराशाजनक सुरुवात पुढेही कायम राहिली. माझे नामबंधू तरे सुद्धा लगेचच तंबूत परतले. पाच षटकात २ बाद १७ ही अगदी निराशाजनक परिस्थिती होती. दुष्काळात तेरावा महिना ह्या उक्तीनुसार मग मिचेल जॉन्सन गोलंदाजीस आले आणि त्यांनी आपले देशबंधू फिंच ह्यांना त्रिफळाचीत केले. क्षेत्ररक्षणात आळशीपणा करणारा कोरी मग फलंदाजीस आला. आणि त्याला अक्सर पटेलने यष्टीचीत केलं. अक्सरला विश्वचषकात एक तरी सामना धोनीने खेळावावयास हवा होता ह्या माझ्या विचाराने पुन्हा उचल घेतली. एव्हाना मुंबई ९ षटकात ४ बाद २७ अशा दयनीय परिस्थितीत होती. पोलार्ड आणि रायडू खेळपट्टीवर असले तरी काही जणांनी स्टेडीयम सोडण्यास सुरुवात केली होती. मध्येच रायडूविरुद्ध यष्टीचीतचे जोरदार अपील करण्यात आले. तो नाबाद असल्याचे मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आल्यावर प्रेक्षकांनी जल्लोष केला पण त्यात जान नव्हती. 



दोन चौकार मारून रायडू बाद झाला आणि एक षटकार मारून पोलार्ड. होता. सर्व प्रेक्षक अगदी शांत झाले होते. "पोलार्ड गया तो जायेंगे!" अशी घोषणा करणारा माझ्या बाजूचा गट देखील काढत पाऊल घेता झाला. 


आमच्या पंजाब एलेव्हनच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून जात होता.


१४ षटकात ६ बाद ६०, ही मुंबईची दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर पंजाब दा पुत्तर असलेल्या भज्जीने आपली करामत दाखविण्यास सुरुवात केली. हिमाचलच्या मंडी इथल्या ऋषी धवन, जॉन्सन, अनुरीत सिंग ह्यांची इथेच्छ धुलाई करीत त्याने आणि सुचींतने एक अविश्वसनीय अशी भागीदारी केली. भज्जीची फलंदाजी खरोखर बघण्याजोगी होती. प्रेक्षकांनी मैदान अगदी डोक्यावर घेतलं होतं. पण खरं नुकसान आधीच होऊन गेलं होतं. शेवटी ह्या दोघांची झुंज १८ धावांनी कमी पडली. जवळपास ३० हजार प्रेक्षकांसोबत एकत्र बाहेर पडताना अगदी गर्दी होईल म्हणून आम्ही थोडे आधीच बाहेर पडलो. 
भर उन्हाळ्यातील अगदी हिरव्यागार गालीच्यासारखे वानखेडे पाहून आपण कोठे परदेशी असल्याचाच भास होत होता. पण त्याच वेळी देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मात्र अगदी घोटभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं आणि आपल्या देशाने जर IPL इतकी शक्ती प्रत्येक गावात तलावनिर्मिती करून गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात व्यतीत केली तर किती बरं होईल हा विचार मात्र मनात डोकावला. केवळ हा विचार मनात आला म्हणून धन्य मानणारी माझ्यासारखी मंडळी ह्या देशात आहेत  म्हणूनच IPL इथं फोफावत हे मात्र खरं! 

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...