मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

जीवनगाणे!


 
 मोठं होत असताना शाळेत तर शिकण्याची प्रक्रिया चालूच होती पण प्रत्यक्ष जीवनातसुद्धा अधूनमधून जाणवायचं की अरे हे तर नवीनच काहीतरी आज शिकायला मिळालं. त्यावेळी पूर्ण जगाकडे पाहण्यासाठी उपलब्ध असलेली खिडकी फारच किलकिलती उघडल्यामुळे बाह्य जगताचा म्हटलं तर मर्यादित भाग दृष्टीस पडायचा. आजच जरी मी मोठा  तत्त्वज्ञ बनण्याचा आव आणून ह्या पोस्ट्स टाकत असलो तरी अजूनही जगाचा अगदी अगदी मर्यादित भाग मी प्रत्यक्ष पाहिला / अनुभवला आहे. आपल्या मातापिता, पत्नी आणि तान्हुल्याला गावी मागे सोडून सीमारेषेवर शत्रूशी लढावयास आलेला सैनिक शत्रूशी लढताना जेव्हा आपल्या सर्व साथीदारांपासून एकटा पडतो आणि शत्रू त्याला घेरतो त्यावेळी त्याच्या मनात येणाऱ्या भावनांची व्याप्ती मला समजू शकते असे विधान मी इथं सुखात बसून करू नये. मनाची कल्पनाशक्ती इतकी प्रगल्भ असू शकते का ज्यामुळे एखादा प्रसंग प्रत्यक्ष न अनुभवता सुद्धा त्यातील भावनांची अनुभूती एखादा माणूस घेऊ शकेल; हा चर्चेचा विषय. 
 
माणसाची जीवनाविषयीची आसक्ती जोवर शाबूत असते तोवरच्या माणसाच्या भावना आणि एका परिस्थितीनंतर माणूस सर्व आशा सोडून देतो त्यानंतरच्या भावना ह्यात आमुलाग्र फरक असतो. केवळ मरण समोर ठाकलं म्हणून माणसाची जीवनआसक्ती संपते असं नाही. आणि जीवनआसक्तीच्या केवळ शून्य आणि शंभर अशा दोनच स्थिती असतात असंही नाही. भोवतालच्या परिस्थितीने हतबल झालेली आणि जीवनआसक्ती कमी होत चाललेली अनेक माणसं आजूबाजूला दिसतात. पैशाची चणचण, आरोग्याच्या अडचणी, नात्यांतील क्लिष्टता अशी अनेक कारणे ह्या ढळलेल्या आशेला कारणीभूत असतात. 

लहानपणचे दिवस आठवून पाहा. शाळेतील स्नेहसंमेलन, वार्षिक क्रीडादिवस, स्वातंत्र्यदिनाची परेड अशा दिवशी सकाळी घरून निघताना मन कसं उत्साहाने पुरेपूर ओथंबून भरलेलं असायचं. पहिल्या परदेशवारीला पण खरतर असंच भरून यायला हवं. पण माझ्यासारखा चिंतातुर जंतू आपल्याला तिथलं काम झेपेल की नाही ह्या प्राथमिक विचारातच गढून गेला तर कसं होणार. 

आयुष्याची दिशा सर्वसाधारणपणे तिशीच्या आसपास ठरून जाते असा आपण ग्रह करून घेतो. ह्याच्याही पुढे जाऊन आपण ह्या पृथ्वीवरील आनंद, जीवनातील क्षण टिपण्याच्या आपल्या क्षमतेविषयी आपणच एक सीमारेषा आखून घेतो. ह्या सीमारेषा बऱ्याच वेळा ऐकीव माहितीच्या आधारे आणि समाजाच्या रूढीवर आधारित असतात. अहो जगातील सर्वात सुखाचा क्षण तुम्हांला अगदी चैनीच्या प्रवास कंपनीतून केलेल्या युरोप सहलीतून मिळतो असं नाही; तो अगदी साध्या रेल्वेने केलेल्या केरळच्या प्रवासाने सुद्धा मिळू शकतो. श्रीमंती युरोप सहल तुमच्या शरीराला सुख नक्कीच देते पण मनाचे सुख मात्र तुमच्या हाती आहे. 

बदलत्या काळानुसार किंवा वाढत्या वयानुसार म्हणा जीवनातील क्लिष्टता वाढत जाते. लहानपणी प्रश्नांची उत्तरे फक्त दोनच असतात आणि ती काळानुसार सुद्धा कायम राहतात. पण हळूहळू पूर्ण बरोबर किंवा चूक असे उत्तर नसणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची हळूहळू सवय होते. आयुष्याच्या विविध टप्प्यावर घेतलेल्या निर्णयाचे दायित्व स्वीकारून आयुष्याला सामोरे जावे लागतं. हे सर्व घडत असलं म्हणून जीवनाकडे पाहायची खेळकर वृत्ती सोडायची नाही. हा पण सार्वजनिक जीवनात आपल्या प्रफुल्लित चित्तवृत्तींचे कितपत प्रदर्शन करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न!

दहावी बारावीच्या वेळी वाक्य कानावर पडायचं. "हे वर्ष अभ्यास कर! एकदा चांगले गुण मिळाले की मग काही चिंता नाही!" त्यावेळी मोठ्या श्रद्धेने मी वाक्य ऐकलं. नंतर जाणवलं की साधारणतः आठवीनंतर आयुष्यातील निखळ मजेची वर्षे संपतात. मग उरते ती जीवनरगाड्यातून अचानकपणे सामोऱ्या येणाऱ्या काही आनंदी क्षणाची प्रतीक्षा ! ह्या क्षणांना आगंतुकपणे सामोरे येऊन द्यावे की त्यांना निर्माण करणाऱ्या प्रसंगांचे आयोजन करण्यात पुढाकार घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...