अनोखी रात्र कथा संपली! संपली एकदाची असं वाचणाऱ्या बहुतेक सर्वांनी म्हटलं असणार! कायच्या काय पकवतो हा असे ही काहीच्या मनात आलं असणार. आणि खरं तर एकाने प्रतिक्रिया लिहून कळवलं सुद्धा तसं! पण निनावी राहून त्याने / तिने प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न केला म्हणून ती प्रतिक्रिया मी प्रसिद्ध केली नाही. मग पुढचे भाग कृपया लिहू नका (बहुदा तिसऱ्या भागानंतर) असा सल्ला द्यायला तो अथवा ती विसरला /ली नाही. मी हल्ली प्रत्येक पोस्टविषयी जास्त भावुक व्हायचं टाळतो त्यामुळे ही प्रतिक्रिया तसं पाहिलं तर मला आवडली!
कंपनीत सध्या Gender Bias विषयी जाणीव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे ह्या परिच्छेदात मी ही प्रतिक्रिया देणारा केवळ पुरुषच असू शकतो असा पूर्वग्रह करून घेतला नाही. बाकी दीपिकाबाईच्या माझी निवड ह्या चित्रफितीनंतर महिलांच्या निर्णयस्वातंत्र्याच्या क्षितिजाच्या मर्यादेविषयी कोणतीही बंधनं मानायला मी तयार नाही. खट्याळपणा काय फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाही. असो मी ह्या मुद्द्यावर इथंच थांबतो नाहीतर माझ्यात कुठंतरी दडलेला पुरुषी सुप्त अहंकार एखाद्या वाक्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या परिवर्तित व्ह्यायचा!
इतके दिवस लांबणीवर पडलेला नवीन फोन घ्यायचा निर्णय शेवटी एकदाचा मागच्या आठवड्यात अंमलात आणला. मागचा फोन ब्लॅकबेरीचा! काहीसा निरस आणि केवळ ऑफिसच्या कामाला उपयुक्त असा. त्या आधीचा २००६ साली अमेरिकेत असताना घेतलेला फोन २ एप्रिल २०११ साली बसप्रवासात हरवला. त्याच दिवशी भारतानं विश्वचषक जिंकला. त्यामुळे ह्या विश्वचषकात सुद्धा हा ब्लॅकबेरी हरवेल आणि मग आपण हा ही विश्वचषक जिंकू अशी आशा मी बाळगून होतो. पण ऑस्ट्रेलियाने भारताची धूळधाण उडवत माझा मनसुबासुद्धा लयीस नेला. थोड्या गंभीरपणे बोलायला गेलं तर अँड्रोइड वर आधारित भ्रमणध्वनीची ऑपरेटिंग प्रणाली वापरत नसल्याने काळाच्या मागे पडत चालल्याची जाणीव होऊ लागली होती. आणि माझ्या सद्यव्यवसायात हे मागे पडणं महागात पडू शकत असल्याने शेवटी नवीन फोन घेतला. ह्या फोनवरून मोबाईल पेमेंट पासून सर्व काही वापरणं ही काळाची गरज!
जसा हा फोन आला तसंच मग व्हॉटसअप सुद्धा आलं. जवळच्या मित्र, नातेवाईक मंडळींनी विविध गटात सामील करून घेतलं. आणि मग दररोजचा विनोदाचा खुराक सर्वत्र सुरु झाला. ह्या विषयावर मी मागे एक पोस्ट लिहिली होती. एकाग्रचित्ताने काम, अभ्यास करताना ह्या व्हॉटसअपचे संदेश पाहण्याची सवय त्यात खंड निर्माण करते हा माझा मुख्य आक्षेप होता आणि अजूनही आहे. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न! बाकी मनुष्य समुहप्रिय प्राणी आहे. आधुनिक काळानुसार प्रत्यक्षात समुहाने राहणे जरी शक्य होत नसलं तरी ह्या हलक्याफुलक्या विनोदाद्वारे आपण एका गटाचे सदस्य असल्याची भावना निर्माण होण्यास / कायम राहण्यास मदत होते. काही जणांच्या बाबतीत दिवसात निर्माण होणारा तणाव, काहीसं नैराश्य, एकलेपणाची भावना दूर करण्यास हे मेसेज मदत करू शकतात.
ह्या विविध गटात विविध मनोवृत्ती दिसतात. काहींना आपण काळानुसार किती आधुनिक / खेळकर बनलो आहोत हे दाखवून देण्याची खुमखुमी असते. ती ते ह्या गटात पुरी करून घेतात. माझ्यासारखे काही लोक आपल्या गंभीरपणाचा आव इथेही कायम ठेवायचा प्रयत्न करीत असतात. शेवटी एक गोष्ट खरी की इथं तुमच्यावर दिवसभर व्हॉटसअपला चिकटून राहायचं बंधन नाही, जेव्हा केव्हा करमणूक करून घ्यायची इच्छा येईल तेव्हा जावं इथं! बाकी अधूनमधून तातडीने कोणाला मदत करण्याचे सत्कार्य इथं होऊ शकतं.
आपण बऱ्याच जणांना ओळखत असतो. काहींना बऱ्याच वर्षांपासून. आपल्या मनात त्या व्यक्तीची फार वर्षापासूनची प्रतिमा मनात असते. मग काय होतं की बऱ्याच वर्षांनी पुन्हा ही व्यक्ती आपणास भेटते. आपल्या मनातील प्रतिमेला काहीसा तडाही जातो. मग हीच व्यक्ती व्हॉटसअपच्या / सोशल मीडियाच्या रुपात भेटते आणि मग कधीकधी आपणास मोठा धक्का बसतो. जुनी प्रतिमा होती तीच बरी असे म्हणण्याची कधी कधी येते. प्रत्येकवेळा येते असं नाही म्हणायचं मला पण काही वेळा येतेच येते.
मी पूर्वी स्वतःला बराच आदर्शवादी मानत असे. आत्मपरीक्षणाची प्रक्रिया कार्यालयात सुरु होत मग ती वैयक्तिक जीवनात येऊन पोहोचली. आदर्शवादाची मानलेली बरीचशी पुटं(असा शब्द आहे का नाही ह्याविषयी काहीशी साशंकता!) गळून पडली. आत्मपरीक्षण करावं की नाही, केल्यास ते कितपत करावं? आत्मपरीक्षणाने आत्मसन्मान प्रत्येक वेळी गळून पडावाच का? हे माझ्या मनात घोळत असलेले सध्याचे काही प्रश्न!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा