मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

अनोखी रात्र - भाग ६


 
आपल्या अगतिकतेने मामाला अगदी वैफल्य येत असे. साधनाच्या शरीरात दुसरीच कोणी शिरली आहे हे माहीत असून सुद्धा तो कोणाला सांगू शकत नव्हता. हे सगळे प्रकरण सहन न होत असल्याने तो आपल्या गावी परतला. 

साधनाचं वैफल्य तर कल्पनेच्या पलीकडे होतं. काही दिवसानं तिचा आणि मोहनचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. लौकिकार्थाने मोहनचे आणि तिचं लग्न लागलं खरं, पण आपल्या मनावरचा ताबा तिनं केव्हाचाच गमावला होता. आपल्याच शरीरात कोठतरी अगदी क्षुल्लक अस्तित्व राखून जीवन जगण्याची तिच्यावर वेळ आली होती. तिचा राग उफाळून यायचा पण तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. आपल्या मोहनला दुसऱ्या कोणाचा स्वामी बनून जीवन कंठताना पाहताना तिला अतोनात दुःख होत असे. 

खरा धक्का तर तिला तेव्हा बसला जेव्हा आपल्या मनावर वर्चस्व गाजविणाऱ्या स्त्रीने स्वतःचा रुही म्हणून परिचय करून दिला. आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे मोहनने सुद्धा तिचं रुही म्हणूनच अस्तित्व स्वीकारलं. दिवस असेच पुढे जात राहिले. मोहन - साधनाच्या नव्हे मोहन रुहीच्या संसारवेलीवर फुलं सुद्धा उमललं. सर्वजण कसे आनंदी होते शिवाय एकट्या साधनाच्या! आणि हो मामा देखील होता. पण त्याला रूहीने हे बिंग फोडल्यास मी आत्महत्या करीन अशी धमकी दिली होती. त्या शरीरातील साधनाचे अस्तित्व जरी रुहीला माहीत नसलं किंवा त्या अस्तित्वाची तिला पर्वा नसली तरी मामाला आपल्या लाडक्या साधनाच्या अस्तित्वाची इतकीशी खुण सुद्धा पुरेशी होती. त्यामुळं त्यानं गप्प राहायचंच स्वीकारलं. 

"डॉक्टर, डॉक्टर! साधनाला नक्की काय झालंय ते सांगा ना!" अगदी घाबऱ्या घुबऱ्या स्वरात मोहनने त्यांना विचारलं. "आय ऍम सॉरी मोहन! ती कर्करोगाच्या शेवटच्या स्थितीत आहे. केवळ शेवटचे काही दिवस बाकी आहेत!" डॉक्टरांच्या ह्या शब्दांनी मोहनच्या पायातील त्राणच निघून गेले.

रुहीला केव्हातरी सायंकाळी जाग आली. "मला नक्की काय झालंय मोहन? सांग ना! मला अगदी कसंचच होतंय!" मोहनचा तिच्यापासून हा आजार लपवून ठेवायचा प्रयत्न फार काळ यशस्वी ठरला नाही. हॉस्पिटलात आलेल्या साधनाच्या भावाच्या तोंडून हे सत्य अभावितपणे बाहेर पडून गेलं. ह्या सत्याचा मुकाबला करणे त्याला त्या क्षणी शक्य न झाल्याने तो तसाच रात्री घरी परतला. 

काहीशा अपराधी भावनेने दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मोहन  हॉस्पिटलात परतला. खिडकीची मोडलेली काच पाहून त्याला धक्काच बसला. धावतच तो साधनाच्या जवळ गेला. तिची नजर त्याला काहीशी वेगळीच वाटली. त्याला धक्काच बसला. ही नजर तो पक्की ओळखत होता. 

"मोहन, तू माझ्याशी असं का वागलास! माझ्या खऱ्या प्रेमाला तू कसा विसरलास!" खऱ्या साधनाच्या ह्या प्रश्नाला मोहनकडे उत्तर नव्हतं. "बघ तुला ती गतजन्मीच्या आठवणी सांगणारी रुही, कर्करोगाची बातमी ऐकताच कशी माझा देह सोडून गेली!" मोहनला पुन्हा एक धक्का बसला. 
ह्या विश्वात परतण्यासाठी आपण केलेल्या स्वार्थीपणाची कबुली साधनाकडे देण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय दिसत नव्हता. फरशीवर पडलेल्या फुटक्या काचांकडे पाहत, रुहीची आठवण काढत असताना त्याचा शब्दांची जुळवाजुळव करायचा प्रयत्न चालू होता. इतक्यात घाईघाईने डॉक्टर प्रवेश करते झाले. त्यांच्या चेहऱ्यावर पराकोटीचे अपराधीपणाचे भाव पाहून मोहनला आश्चर्य वाटलं. "आय ऍम रियली सॉरी. आमच्या हातून अक्षम्य चूक घडली आहे. बाजूच्या खोलीतील पेशंटचा रिपोर्ट तुम्हांला आम्ही काल तुमचा म्हणून दिला. साधनाला काही मोठा आजार झालेला नाही! होईल बरी ती पुढच्या दोन आठवड्यात!"

डॉक्टरच्या ह्या शब्दांनी मोहन पुरता हवालदिल झाला. हॉस्पिटलच्या खोलीची फुटकी काच तर लगेच जुळवता येणार होती, पण दुभंगलेली मने जोडायचा प्रयत्न करीत पुरतं आयुष्य काढण्याचं मोठं धनुष्यबाण आपल्याला पेलवेल की नाही हे त्याला समजत नव्हतं. त्यानं शेवटी कसबसं साधनाकडे पाहिलं. तिची उशी रडूनरडून पुरती ओली झाली होती. मागे काही घडलं त्याची तिला अजिबात पर्वा नव्हती. आपला मोहन आपल्याला आयुष्यात उशिरा का होईना पण मिळाला ह्याचाच पुरता आनंद तिच्या नजरेतून ओसंडून वाहत होता.

(समाप्त)






1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...