मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

अनोखी रात्र - भाग ५

 
आपल्या केविलवाण्या नजरेतून रुही मोहनला हा मुकाबला संपला असल्याची जाणीव करून देत होती. त्या शक्तीने तिचं त्या विश्वातील अस्तित्व संपवत आणलं होतं. ती शक्ती मोहनच काय करणार हा प्रश्न तिला भेडसावत होताच. आपल्या अनुपस्थितीत मोहनचे अतोनात हाल होणार हा विचारच तिला सहन होत नव्हता. 
मांत्रिकाची बराच वेळ धडपड चालली होती. त्या विश्वाशी संपर्क होतच नव्हता. अचानक त्याला नजरेच्या एका कोपऱ्यात क्षणभर दोन मिणमिणते दिवे दिसले. त्याला एका दिव्याच्या अस्तित्वाची जाणीव होतीच. पण दुसरा दिवा कोणता ह्याची शंका त्याच्या मनात निर्माण झाली. ह्यातील एक दिवा पूर्ण विझत चालला होता पण दुसऱ्याचे अस्तित्व अजून व्यवस्थित होतं. हे सर्व त्याला दिसलं ते क्षणभरच! पुन्हा संपर्क खंडित झाला. मामा मांत्रिकाची ही धडपड अगदी चिंतीत नजरेने पाहत होता. अचानक मांत्रिकाच्या नजरेत मामाला वेगळीच चमक दिसू लागली.
रुहीला अचानक एक झटका बसला. तसा तो मोहनला सुद्धा बसला पण मोहनला त्याचं महत्त्व समजलं नाही. रुही मात्र आपली उरलीसुरली शक्ती एकवटून पुन्हा एका झटक्याची वाट पाहू लागली. आणि काही क्षणातच तो दुसरा झटका आला. रुहीला अचानक जोश आला. पोकळीतील अंधाऱ्या कोपऱ्यातील शक्तीशी मुकाबला करण्याइतपत! मोहनला सुद्धा काहीतरी बदलत आहे हे समजू लागलं होतं. अचानक एक क्षणभर त्याच्या नजरेसमोर इस्पितळातील भिरभिरता पंखा दिसला. पण केवळ क्षणभरच!

मांत्रिक आता पूर्णपणे तल्लीन झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याचा संपर्क झाला हे मामाला कळून चुकलं होतं. काहीतरी गल्लत होत आहे हे मांत्रिकाला कळून चुकलं होतं. त्याच्या अपेक्षेपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात शक्ती खेचली जात होती. केवळ मोहनलाच परत आणायचं असतं तर इतकी धडपड करावी लागली नसती. अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मोहनसोबत अजून कोणीतरी ह्या दुनियेत यायचा प्रयत्न करत होतं आणि मांत्रिकाला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. 

मोहन अगदी जीव मुठीत धरून रुहीची आणि त्या अदृश्य शक्तीची झटापट पाहत होता. दोन अर्धपारदर्शक आकृत्या अचानक पुढे मागे येत होत्या आणि एकमेकाला झोंबत होत्या. सुरुवातीला ह्या झटापटीत मागे पडणाऱ्या रुहीचे पारडं हळूहळू वरचढ होऊ लागलं होतं आणि एका क्षणी तिनं त्या दुसऱ्या आकृतीचा पुरता बिमोड केला. 
"चल मोहन पळ इथून लवकर!" विजयी झालेल्या रुहीच्या अगदी उत्साहित स्वरांनी मोहन भानावर आला. त्यालाही एव्हाना अगदी बळ चढलं होतं. पुढे निघताना थोड्याच वेळात त्या काळोख्या भागाला त्या दोघांनी मागे टाकलं. आणि मग त्यांना अचानक प्रकाश दिसू लागला. एका नव्या जोमानं ते दोघंही त्या दिशेने तिथं निघाले. 

मांत्रिकाला दोन बिंदू येताना दिसत होत्या. मोहनच ह्या विश्वातील शरीर आता बरंच सचेतन दिसू लागलं होतं. एका क्षणी मांत्रिकाला एका बिंदूत मोहनच अस्तित्व जाणवलं आणि त्याने त्याला प्रवेश दिलाही. एका मोठ्या झटक्यानिशी मोहनच त्या आधीच्या विश्वातील अस्तित्व संपलं होतं. मोहनने डोळे उघडलेले पाहताच साधनाचे डोळे पाणावले. "मोहन!" अशी बऱ्यापैकी जोरात हाक मारत ती मोहनला बिलगली. 

मोहन तर त्या विश्वात यशस्वीपणे शिरला पण आपल्याला प्रवेश करायला कोणीतरी अडवत आहे ही गोष्ट तिला अजिबात खपली नाही. मांत्रिक पुऱ्या जोशात तिला अडवायचा प्रयत्न करत होता. पण कित्येक वर्षे परतायची आस धरून बसलेली रुही सहजासहजी हार मानायला तयार नव्हती. 

मामाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. साधनाच्या अंगात अगदी कोणीतरी शिरल्याप्रमाणे ती हलत होती. मांत्रिकाचा देह मोठ्या धडपडीनंतर निश्चेतन होऊन पडला होता. साधनाचे डोळे अगदी वेगळेच दिसत होते. आणि मामाच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. आपली वाचा गेली की काय असे भय त्याला वाटू लागलं होतं. 

(क्रमशः)  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...