काही वेळ मोहन शांतपणे विचार करत बसला.
"मी तयार आहे!" त्याच्या तोंडच्या ह्या उद्गारांनी रुहीला फारसं आश्चर्य वाटलं नाही.
"पण तू साधना बनून राहणार म्हणजे नक्की काय?" आपल्या मनातील शंका त्यानं बोलून दाखवली.
"तिच्या शरीरात माझं वास्तव्य असणार. जोवर मी ठरवीन तोपर्यंत मी तिच्या शरीरात राहणार!" रुही थंडपणे म्हणाली.
मोहनने मनातल्या मनात साधनाची माफी मागितली.
मोहनचा होकार मिळताच रुहीने अजिबात वेळ दवडला नाही.
"हे बघ ह्या विश्वातून बाहेर कसं पडायचं हे केवळ ऐकून मला माहित आहे! ह्या प्रवासात अनंत अडचणी येऊ शकतात. सध्या तांत्रिकदृष्ट्या तुझं भुतलावरचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं नाही. त्या इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात तुझ्यावर उपचार अजूनही चालू आहेत ते तू पाहिलंच असशील!"
"आपल्या ह्या प्रयत्नात काहीही होऊ शकत. म्हणजे तू यशस्वीपणे भूतलावर परतशील आणि मी इथेच राहीन! ही झाली पहिली शक्यता. किंवा मी साधनाच्या देहात प्रवेश करीन पण तू इथेच अडकून बसशील!" ही झाली दुसरी शक्यता. ही शक्यता ऐकून मोहनच्या अंगावर काटा उभा राहिला. त्या नंतरच्या दोन्ही शक्यता तो जाणून होता.
"पण तू ह्या दुनियेत कशी काय अडकलीस?" मोहन विचारता झाला.
"नको त्या कटू आठवणी! माझ्या लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारी बस ५० मैलावरील दरीत पडून आम्ही सर्वजण दगावलो. पण बहुदा माझ्या मनात ज्या काही इतक्या अधुऱ्या इच्छा राहिल्या होत्या त्यामुळे माझं असं झालं असावं! आणि माझा बाप - त्याला आपल्या पोरीची इतकी काळजी की तो सुद्धा माझ्या मागोमाग इथंवर येऊन पोहोचला" रुही म्हणाली.
"चल आपल्याला बोलण्यात वेळ घालवून चालणार नाही. आपला प्रवास चालू करूयात आपण! प्रवास बराच अडथळ्यांचा असणार आहे. मनोनिग्रह कायम ठेव! आणि मलाही मनोनिग्रह कायम ठेवण्यासाठी शुभेच्छा दे!"
रुहीने तिचं बोलणं थांबवलं. आणि अचानक मोहनला कसंचच होऊ लागलं. एक वेगळीच जाणीव होती ती. एका अंधाऱ्या मार्गावरून त्याची वाटचाल सुरु होती. किट्ट अंधार होता. एखाद्या गुहेतून आपला प्रवास सुरु असावा असा त्याने कयास बांधला. आजूबाजूला पेटत्या मशाली भगभगत होत्या. भूतसदृश्य जीव बऱ्याच वेगाने आजूबाजूला उडत होते. कोणत्याही क्षणी ते आपल्या अंगावर येऊन आदळतील अशी भिती मोहनला वाटत होती.
"आजूबाजूला पाहू नकोस, पुढे चालत रहा!" अचानक आलेल्या रुहीच्या आवाजाने मोहन दचकला. पण रुही कोठे दिसत नव्हती. "मी तुला दिसत नसले तरी मी तुझ्या सोबतच आहे!" तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत मोहन पुढे निघाला. अचानक दूरवर उजेड दिसू लागला. मोहनची पावलं वेगानं पडू लागली. आणि दुसऱ्याच क्षणी तो एका मोकळ्या सपाट भागात खेचला गेला होता.
तिथं आजूबाजूला असंख्य अर्धपारदर्शक आकृत्या भिरभिरत होत्या. मोहनला देखील अचानक हलकं हलकं वाटू लागलं. दुसऱ्या क्षणी आपण एका उंच खांबाच्या टोकाला टांगून असल्याची त्याला जाणीव झाली. डोक्याच्या वरच्या भागात खिळा ठोकून आपल्याला टांगवलं गेलं आहे हे ज्या क्षणी त्याला समजलं त्या क्षणी त्याचा भितीनं थरकाप उडाला.
"घाबरू नकोस! सर्व भय केवळ तुझ्या मनात आहे. ह्या विश्वातील तुझे शरीर इजा होण्याच्या पलीकडंच आहे. तुझ्यासमोर अनेक भास निर्माण केले जातील, पण जोवर तू मनावर नियंत्रण ठेवून माझ्याशी संवाद साधत राहशील तोवर आपल्याला आशा बाळगता येईल!" त्याच्या बाजूलाच त्याच्याच खांबाइतक्या उंच खांबाला टांगवून ठेवलेल्या अर्धपारदर्शक आकृतीतून हे बोल येताच तो काहीसा आश्वस्त झाला. ही आकृती रुही नाही असा संशय घेण्याचं त्याला कोणतेच कारण दिसत नव्हतं आणि त्यापलीकडे त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्गही नव्हता.
साधना सर्व काही सोडून अतिदक्षता विभागातील मोहनच्या खोलीबाहेर बसली होती. दर पाच मिनिटांनी काचेतून मोहनकडे पाहिल्याशिवाय तिला चैन पडत नव्हतं. मध्यरात्र होऊन गेली होती. काही वेळ तिचा डोळा लागला असावा, अचानक जाग आली तेव्हा तिनं उठून पुन्हा मोहनच्या दिशेनं पाहिलं. मोहनचं शरीर अगदी जोरजोरानं हलत होतं.
"डॉक्टर, डॉक्टर - मोहनला काय होतंय पहा ना!" मोठ्यामोठ्यानं ओरडतच ती डॉक्टरांकडे गेली. झोपेतून उठवल्यामुळे वैतागलेले डॉक्टर तयार होऊन येईस्तोवर मोहन पुन्हा शांत झाला होता. अगदी काही घडलंच नाही अशा प्रकारे! साधनाकडे एक नजर टाकून डॉक्टर परतले.
साधना अगदी भयभीत झाली होती. मोहनची स्थिती बघता अपघातग्रस्त ठिकाणाहून मोहनला हलवणं योग्य ठरलं नसतं म्हणून त्याला जवळच्या गावातल्याच हॉस्पितळात ठेवलं होतं. साधना आणि अगदी जवळचे नातेवाईक तिथं तातडीने पोहोचले होते.
अचानक बाहेर आवाज आला म्हणून साधनाने बाहेर येऊन पाहिलं तर तिचा गावाकडचा मामा सुद्धा आला होता. मामाला पाहताच साधनाला बरं वाटलं तशी ती चिंतेतसुद्धा पडली. मामाने आयुष्य फक्त गावातच काढलं होतं. त्यामुळे त्याच्याशी बोलताना आपण कोणत्या जुन्या जमान्यातील माणसाशी बोलतो आहोत असा तिला सदैव भास होत असे. ह्या क्षणी त्याचं अस्तित्व काहीसं गरजेचं होतं.
मामाला घेऊन ती प्रतीक्षागृहात आली. तिथून मामानं मोहनकडे एक नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव अचानक पालटले. "झाड धरलंय! झाड धरलंय!" असं काहीसं तो पुटपुटला. तो जसा आला तसा दुसऱ्याच क्षणी वेगानं जवळजवळ धावतच बाहेर पडला.
आजूबाजूच्या अर्धपारदर्शक आकृत्या अचानक शांत होऊ लागल्याचं पाहताच मोहन आश्चर्यचकित झाला. त्यानं बाजूला पाहिलं तर बाजूची आकृती अगदी ताणली गेली होती.
"ह्या दुनियेतून बाहेर निघण्याचा विचार सुद्धा कसा मनात आणलास तू!" त्या पोकळीतील एका कोपऱ्यातून एक गंभीर आवाज आला. रुहीचं प्रतिनिधित्व करणारी आकृती शांतच होती. अचानक तिच्या अवतीभोवती दिवे पेटवले गेले. त्या दिव्यांच्या आगमनाने मात्र रुहीला असह्य असा त्रास होऊ लागल्याचं तिच्या विव्हळण्याच्या आवाजातून भासू लागलं.
"तुम्हां दोघांना असंच असंख्य वर्षे वेदनेत ठेवणार आहोत आम्ही!" तो आवाज जणू काही आपला निर्णय सुनावत होता.
मामा जसा वेगानं बाहेर पडला होता तसा काही मिनिटातच परतला. पण आता मात्र तो एकटा नव्हता. त्याच्या सोबत फक्त कमरेला वस्त्र गुंडाळलेला आणि अंगाला भस्म फासलेला एक मांत्रिक होता. त्या मांत्रिकाचे डोळे म्हणजे जणू काही आगीचे गोळे होते. त्या दोघांना आत येऊ देण्यास विरोध करणाऱ्या सुरक्षाकर्मींना मामाने आपल्या मजबूत बाहूप्रहारांनी केव्हाचंच जमीनदोस्त करून टाकलं होतं.
प्रतीक्षागृहातून अतिदक्षता विभागात शिरणाऱ्या ह्या दोघांना अडवायचा प्रयत्न करणाऱ्या साधनाचा प्रयत्न दोघांनी निष्फळ ठरवला. अतिदक्षता विभागाचे दार आतून घट्ट लावून घ्यायला मामा विसरला नाही.
मोहनला सुद्धा एव्हाना असह्य वेदना होऊ लागल्या होत्या. अतितप्त लोखंडी कांब डोळ्यात घुसवावी, तलवारीच्या धारदार पात्यांनी बनविलेल्या शय्येवर उघड्या पाठीवर झोपायला लावावं आणि उलटं टांगवून एखाद्या भट्टीवर लोंबकळत ठेवावं अशा सर्व प्रकारातील वेदना एकत्रपणे त्याला भोगायला लागत असल्याची जाणीव होत होती. रुहीचे बोलणे आठवत तो अजूनही भानावर राहायचा प्रयत्न करीत होता. "ह्या विश्वातील तुझे शरीर इजा होण्याच्या पलीकडंच आहे" हे वाक्य त्याला धीर देत होतं.
"मोहन, मी तुझी क्षमा मागते रे! ही शक्ती माझ्या कल्पनेपलीकडची आहे! मी ह्यांचा मुकाबला करू शकत नाही! आपल्याला अशा मानसिक वेदनेतच अनंत काळापर्यंत राहावं लागणार!" बाजूची अर्धपारदर्शक आकृती त्याची माफी मागत त्याला सांगत होती. तिच्या ह्या बोलण्यानं मोहनचा उरलासुरला धीर संपत चालला होता, तेल संपत आल्याने विझू लागलेल्या पणतीप्रमाणे!
दोन मिनिटातच मांत्रिकाने आपली मांडणी पुरी केली होती. दिवे पेटवायला व्यत्यय आणणारा पंखा आणि वातानुकुलीत यंत्र बंद करण्यास त्यानं मामाला केव्हाचच सांगितलं होतं.
"अगदी थोडा वेळ आहे!" चिंतीत स्वरात त्यानं मामाला सांगितलं.
(क्रमशः)
दाखवली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा