मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २३ मार्च, २०१५

अनोखी रात्र - भाग ३


 
 साधना आपल्या पुण्यातील घरात टीव्हीवर उगाचच चॅनेलशी चाळा करत बसली होती. चुकून मराठी बातम्यांची वाहिनी लागली. अंगावर काही कीटक वगैरे पडल्यावर जितक्या वेगानं आपण दूर होतो त्या वेगानं तिने ते चॅनेल बदलण्याचा प्रयत्न केला. जरा दोन सेकंद वेळ लागला तितक्यात एक बातमी पाहून तिची नजर खिळून राहिली. एका बसच्या अपघाताची बातमी दाखवली जात होती आणि अपघातग्रस्त बस मोहन ज्या बसने गेला होता त्याच कंपनीची होती. तिच्या मनात एका क्षणात नको त्या शंका चमकून गेल्या. तिने आपल्या भ्रमणध्वनीला हातात घेतलं. 
रुहीला अगदी जवळ येताना पाहून मोहन दचकला. "ही कोणती दुनिया आहे, मी कोणत्या रुपात आहे." त्याला काही कळेनासं झालं होतं. त्याला असं भांबावलेला पाहून रुही क्षणभर थांबली. 
"अगदी गोंधळून गेलास ना?" तिनं मोठ्या  आपुलकीने मोहनला विचारलं. "हो काही कळेनासं झालं आहे! तू कोण आहेस आणि माझं पृथ्वीवरील अस्तित्व संपलं की अजूनही मला परत जायची संधी आहे? हेच कळेनासं झालं आहे!" मोहनने आपल्या मनातील सर्व विचार बोलून टाकले. नाहीतरी ह्या सर्व प्रकारात रुही आता त्याला काहीशी माणसाळलेली वाटू लागली होती. इथून बाहेर पडायची शक्यता असेल तर त्यातून फक्त हीच आपल्याला मदत करू शकेल  असा पक्का ग्रह त्याच्या मनाने केला होता. आताच्या आपल्या देहाला त्याने हात लावून पाहिला. मघाचा शरीरविरहीत अवस्थेत केलेला प्रवास अजूनही त्याला छळत होता. 
"हो तुला अजूनही परत जायची संधी आहे! डोळे बंद करून एक क्षणभर बघ!" रुही म्हणाली. 
तिच्या सांगण्यानुसार मोहनने डोळे बंद केले. एका इस्पितळात त्याचा अजून एक देह अतिदक्षता विभागात होता. त्या खोलीच्या बाहेर त्याच्या सर्व नातेवाईकांची गर्दी जमली होती. आणि त्यात रडून रडून डोळे सुजलेली साधना सुद्धा होती. 
"ही तुझी खास मैत्रीण का रे?" रूहीच्या प्रश्नाचा रोख कोणाच्या दिशेने होता हे मोहनला तात्काळ कळलं. 
"हो!" डोळे उघडता उघडता तो म्हणाला. 
"बघ तुझ्या इच्छेविरुद्ध तुला ह्या दुनियेत डांबून ठेवायची माझी इच्छा नाहीये! पण तुला त्या दुनियेत परत पाठवायचं झालं तर ह्या दुनियेतील भल्या भल्या शक्तींचा सामना तुला करावा लागणार. आणि त्यांचा सामना करण्याइतका तू समर्थ नाहीये! तुला कोणाची तरी मदत लागणारच!" रुही एका दमात बोलून गेली. 
हळूहळू मोहनला तिच्या बोलण्याचा रोख लक्षात येऊ लागला होता. रूहीने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. 
"तू ह्या दुनियेत राहिलास तर माझा राहणार, पण तो तुझ्या इच्छेविरुद्ध! तुझी इच्छा तर त्या दुनियेत परत जायची आहे! आणि त्यासाठी तुला माझी मदत लागणार! पण त्यात माझा फायदा काय?" रुही म्हणाली. 
"तुझा फायदा?" तिच्या प्रश्नाचा रोख न समजल्याने मोहनने विचारलं. 
"अरे तू इतका साधाभोळा आहेस की साधेपणाचे ढोंग आणतो आहेस!" वैतागून रुही म्हणाली. 
"मला साधना बनून तुझ्या दुनियेत राहायचं आहे! तसं म्हटलं तर त्यासाठी तुला विचारायची सुद्धा मला गरज नाही! पण तुझ्या साधनावर जसं प्रेम करतोस तसं माझ्यावर मी त्या दुनियेत आल्यावर केलं पाहिजे!" रूहीने आपलं बोलणं चालूच ठेवलं. 
मोहनच डोकं गरगरायला लागलं होतं. आपल्या स्वार्थासाठी साधनाचे अस्तित्व मिटून टाकायचं का हा प्रश्न त्याच्यासमोर होता!

(क्रमशः)

 

२ टिप्पण्या:

  1. katha chaan aahe. pan farch choti aslya karnane link lagat nahi aahe.
    sarkha ras bhang hoto aahe. katha vachta na rangat aali ki sampun jare.
    jamat asel tar motha baag liha.

    उत्तर द्याहटवा
  2. कुणाल, प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद! आपलं म्हणणं अगदी पटतंय! पण कामाच्या वाढत्या ताणामुळे जास्त वेळ मिळत नाही आणि मोठा भाग लिहून व्हायची वाट पाहेपर्यंत कथेतील पात्रांशी असलेलं नात काहीसं दुरावतं! तरीसुद्धा पुढचे भाग लवकर लिहायचा प्रयत्न करीन.

    उत्तर द्याहटवा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...