मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १५ मार्च, २०१५

अनोखी रात्र - भाग २

मोहनचे विचारचक्र जोरात चालू झाले. शास्त्रीय दृष्टीकोनातून हे जे काही चाललं होतं ते स्पष्टीकरण देण्याच्या पलीकडच होतं. "समजा आपण दुसऱ्या एका विश्वात प्रवेश केला असेल तर तातडीने त्या विश्वाचे नियम समजावून घेणे आवश्यक आहे" त्या स्त्रीने खूण केलेल्या दिशेला असलेल्या मोरीत ठेवलेल्या तांब्यातील पाणी आपल्या चेहऱ्यावर हबकत तो विचार करू लागला. तो झोपडीच्या मुख्य भागात येतो तोवर त्याच्यासाठी पाट आणि पान घेऊन झालं होतं. आता पानावर बसणे इष्ट अशी मनाची समजूत घालीत तो पानावर बसला. पानात आधीच गरमागरम भाजी वाढलेली होती. आता ती स्त्री गरमागरम भाकरी घेऊन आली. भाकरी वाढायला ती जशी जवळ आली तसे तिच्या उलट्या पावलाच्या दर्शनाने त्याच्या काळजाचा ठोका चुकला. ह्या दुनियेतील खाण्याने आपला मानवसृष्टीशी उरलासुरला संबंध तुटणार तर नाही असा मोहन विचार करत होता तितक्यात झोपडीचे दार पुन्हा कलकलले.
दरवाज्यात मगाचाच म्हातारा होता. मोहनला बघताच त्याची चर्या पालटली. "रुही, हा परका कोण आहे इथं?" अगदी कर्कश आवाजात तो ओरडला. "माझा पाहुणा" ठामपणे रुही म्हणाली. तिच्या ह्या खंबीर पवित्र्याने आश्चर्यचकित होऊन एक क्षणभर तो म्हातारा थांबला. मग मात्र अचानक कापसाच्या पिंजाऱ्यात परिवर्तित होऊन मोहनच्या दिशेने जोरात झेपावला. त्याची ही हालचाल बहुदा रुहीला अपेक्षितच होती. तिनेही आपल्या पांढऱ्या साडीसहित हवेत झेप घेतली. 
दोघांच्या ह्या झटापटीत मोहनच्या डोळ्यापुढे अचानक काळोखी पसरली. क्षणभरातच सावरून त्याने डोळे उघडले. आजूबाजूचा सर्व परिसर बदलला होता. भोवताली अंधाराचं साम्राज्य होतं. काहीशा उंचीवरून आपला प्रवास सुरु आहे ह्याची त्याला जाणीव होऊ लागली होती. आकाशात वर चांदण्या दिसत होत्या पण त्या नेहमीप्रमाणे स्थिर दिसत नव्हत्या. त्या एखाद्या ठिबक्याप्रमाणे स्वैरपणे आकाशात वावरत होत्या. त्यातील काही झपाट्याने खालीसुद्धा यायच्या. अशीच एक अत्यंत वेगाने मोहनच्या दिशेने आली. मोहनने दचकून बाजूला व्हायचा प्रयत्न केला आणि तो एकदम दचकुन गेला. त्याचं शरीर अस्तित्वात नव्हतंच. अस्तित्वात होती ती फक्त मोहन नावाची एक जाणीव. इतक्या गंभीर परिस्थितीत सुद्धा आपल्या विचारांवर आपलाच ताबा आहे हीच एक काही ती जमेची बाजू होती. आता काहीसा वर्दळीचा भाग येत आहे अशी त्याला जाणीव होऊ लागली होती. पण प्रत्यक्ष काही दिसत नव्हते. मग त्याच्या दृष्टीला पडला तो एक वायूचा पुंजका. त्या वायूच्या पुंजक्यात कोणास ठाऊक कसे पण त्याला त्याच्या आजीचे अस्तित्व जाणवलं. तो पुंजका त्याच्या अगदी जवळून गेला तेव्हा मात्र त्याला "बाळ, कसा आहेस!" अशी अस्पष्टशी हाकही ऐकू आली. मग असे पुंजके येतच राहिले. अचानक आकाशात एका क्षणी त्याला थेट डोक्यावर खूप दूरवर त्याला एक चांदणी दिसली. आणि दुसऱ्या क्षणी तिच्या बाजूला असलेला एक वायूचा पुंजका अगदी स्पष्ट दिसला. मितीच्या सर्व संकल्पना धुळीस मिळत होत्या. ह्या अचानक दिसलेल्या पुंजक्यात त्याला काही वर्षापूर्वी अपघातात दगावलेल्या त्याच्या मित्राचा भास झाला. 
दुसऱ्या क्षणी त्याला काहीसा परिचित भाग दिसू लागला. तो आपल्या प्रवासाचाच भाग असावा असे त्याला वाटत होते. आणि अचानक त्याला तिथे त्याची बस अगदी वेगाने दिमाखात चालली होती. दुसऱ्या क्षणी त्याला त्या बसच्या आतल्या भागातील दृश्य दिसले आणि त्याची स्वतःची रिकामी सीट सुद्धा दिसली. त्याची नजर जिमीला शोधत होती आणि ती ही सीट रिकामी होती. 
अचानक पुन्हा काळोख्या अंतराळातून त्याचा प्रवास सुरु होता. काही क्षण असा प्रवास चालू असताना अचानक आकाशातून मोठा प्रकाशझोत आला आणि त्यात मोहन खेचला गेला. अगदी वेगानं खेचलं जात असताना आपलं सर्व अवयव अगदी जोरात खेचले जायचा त्याला भास होऊ लागला. हे कसं शक्य आहे, कारण आपण तर शरीरविरहीत स्थितीत आहोत असा तर्कशुद्ध विचार त्याच्या मनात आला. ह्या विचारात जास्त गढून जायच्या आधीच तो आपल्या पूर्ण देहासहित पुन्हा एकदा त्या झोपडीत त्या पाटावर बसला होता. "अजून एक भाकरी देते हं!" रुही त्याला आग्रह करीत होती. तिच्या उलट्या पावलांकडे पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही. इतक्यात "मी जातो" अशा काहीशा कर्कश आवाजानं त्याचं लक्ष वेधलं गेलं. पुन्हा एकदा म्हाताराच होता तिथं. तो पूर्ण देहानिशी असला तरी केव्हाही तो कापसाच्या पुंज्यामध्ये रुपांतरीत होईल हा त्याचा अंदाज दुसऱ्या क्षणी खरा ठरला. 
दोघांची जेवण एव्हाना आटपली होती. जी गोष्ट इतका वेळ त्याच्या लक्षात आली नव्हती तिच्याकडे त्याचं लक्ष गेलं. तो आता झोपडीत नसून एक राजेशाही प्रासादात होता. रुहीचं अस्तित्व त्याला खटकत असलं तरी मघाच्या म्हाताऱ्याच्या रौद्र अवतारातून तिनंच आपली सुटका केली ह्याची मात्र त्याला मनोमन खात्री होती. बहुदा जेव्हा आपली  शरीरविरहित अवस्थेतील सफर चालू होती तेव्हा तिने म्हाताऱ्याचा राग शांत केला असावा अशी त्याने स्वतःचीच समजूत काढून घेतली. त्या अलिशान प्रासादातील हिरेजडीत मंचकावर असले विचार करीत तो बसला होता आणि अचानक रुही त्याच्या बाजूला येऊन बसली. निसर्गाच्या नियमानुसार तिला आपल्याविषयी काही प्रमाणात तरी सहानभूती असणार अशी त्याने स्वतःची भाबडी समजूत करून घेतली होती. "तो म्हातारा मला पाहून इतका का खवळला होता?" आपण त्या म्हाताऱ्याचा असा एकेरी शब्दात उल्लेख केलेला हिला चालेल ना अशी भीती मनात बाळगतच त्याने रुहीला प्रश्न केला. रुहीचे डोळे पुन्हा एकदा मांजराप्रमाणे चमकले. "ज्यांनी मनुष्यजन्मात आणि त्याच्या पलीकडे सुद्धा आपल्या लाडक्या मुलीची इतकी काळजी घेतली; तिला आपल्यापासून कोणी दुरावून घेत आहे ही कल्पनाच मुळी त्यांना सहन होत नाही! प्रत्येक वेळी असेच वागतात ते! आणि मग मी मात्र राहते एकटीच! ह्या वेळी मात्र मी त्यांना त्यांच्याच प्रकारे समजावलं " रुही बोलून गेली. "प्रत्येक वेळी असेच वागतात ते!" ह्या वाक्याने हादरलेला मोहन रूहीने बिछान्यावर आपले उलटे पाय ठेवले तेव्हा अजूनच हादरला… 

(क्रमशः)




 

















 

 पलीकड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...