मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १४ मार्च, २०१५

अनोखी रात्र - भाग १

 
त्या अगदी निर्जन रस्त्यावर अवेळी बंद पडलेल्या त्या बसमधून खाली उतरण्याचे धाडस फक्त मोहनच करू शकत होता. ठरलेल्या मार्गापासून हे भलतेच वळण घ्यायचा निर्णय त्या आगाऊ गटाने ज्यावेळी घेतला होता त्यावेळी मोहनने त्याला कडाडून विरोध केला होता. पण त्यांच्या बेबंदशाही वागण्याला काहीसं घाबरून त्याला कोणी पाठिंबा दिला नाही आणि आता ही वेळ आली होती. 
काही वेळापूर्वी मावळलेल्या भास्कराची काही किरणे आकाशात अगदी उंचावर दिसत होती. त्या किरणांनी गुलाबी छटा प्रदान केलेले काही मोजके ढगच मोहनला ह्या सर्व वातावरणात जिवंतपणाचे लक्षण दर्शवित  
होते.  बसमधून उतरताना त्याने सोबतीला कोणी येत आहे का ह्यासाठी आशेने सर्वांकडे पाहिले होते पण सर्वांनीच नजरा फिरवल्या होत्या. अर्ध्या तासाआधी बस बंद पडल्यावर ह्यातील काहीजण खाली उतरले होते पण ज्यावेळी बसचालकाने बस चालू होण्याची शक्यता नसल्याचे जाहीर केले त्यावेळी मात्र सर्वजण चुपचाप बसमध्ये येऊन बसले होते. त्या आगाऊ 
गटाचा म्होरका सनी अजूनही काहीसा जोशात होता. "काही लोकांनी ह्या रस्त्याने येताना कटकट केली म्हणून ही परिस्थिती उद्भवली, नाहीतर लेण्यांचे दर्शन व्यवस्थित झालं असतं " असे काहीसं तो पुटपुटत होता. त्याच्याशी पुन्हा एकदा हुज्जत घालण्याची उबळ महत्प्रयासाने मोहनने दाबून ठेवली. 
बसमधून उतरल्या उतरल्या थंड हवेचा एक झोत त्याच्या अंगावर आला होता. त्यामुळे मन काहीसं प्रसन्न झालं होतं. आकाशात चंद्राचा मागमूसही नव्हता आणि मग त्याला अचानक त्याला आठवलं की आज अमावस्या होती. भय नावाचा प्रकार त्याला माहित नसल्याने किंवा त्याचा तसा समज असल्याने त्याने थोडं पुढे जायचं ठरवलं. आकाशात एव्हाना चांदण्यांनी बराच जम बसवला होता. थोडंसं पुढे चालता चालता रस्त्याच्या आजूबाजूची झाडी वाढत आहे ह्याची त्याला जाणीव होऊ लागली होती. 
अजूनही भय वाटत नसलं तरी उगाच पुढे जाण्यात काही अर्थ नाही ह्याची जाणीव होऊन परत फिरण्याचे त्याने ठरवलं. 
चालता चालता त्याने एक वळण घेतलं होते. एव्हाना तो परत त्या वळणावर आला होता. आणि समोरचे दृश्य पाहून त्याची दातखीळ बसली. त्याच्या बसच्या मागून एक घोंगडे पांघरलेल्या म्हाताऱ्याची आकृती येताना त्याला दिसत होती. म्हातारा त्याच्या वयाला न शोभणाऱ्या वेगानं चालत होता. ह्या अशा निर्जन भागात असा चपळ म्हातारा पाहून मोहनच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तिथेच आडोश्याची जागा पाहून तो लपून पुढे काय होतेय ते पाहू लागला. तो म्हातारा एव्हाना बसपाशी पोहोचला होता आणि खिडकीतून डोकावून पाहत होता. बसमधल्या लोकांचं एव्हाना त्याच्याकडे बहुदा लक्ष गेले होते आणि बसमधून किंचाळ्याचा जोरदार आवाज येऊ लागला होता. म्हातारा एव्हाना बसच्या पुढे गेला आणि त्याने बस एका धक्क्याने लोटली होती.  ती बस मागे ढकलली जाऊ लागली होती. आणि काही क्षणातच ती बस दिसेनाशी झाली होती. दरी वगैरे नसताना देखील बस दिसेनाशी झाली आणि हो म्हातारा सुद्धा दिसेनासा झाला होता. 
शास्त्रशुद्ध विचारसुद्धा काही काळ बाजूला ठेवावे लागतात ह्याची मनाला समजूत घालत मोहनने दुसऱ्या दिशेला धाव ठोकली ती त्या दिशेला असलेल्या गर्द झाडीचे भय न बाळगता! काही मिनिटे भरधाव वेगानं धावता धावता धाप लागल्याने मोहनने वेग कमी केला. अचानक त्याच्या पायाला थंड पाण्याचा स्पर्श झाला. डोळे अगदी मोठे करून त्याने पाहिलं तर एका बऱ्यापैकी मोठ्या तळ्याच्या काठी तो उभा होता. 
क्षणभर विचार करून मोहनने त्या पाण्याची ओंजळ भरली आणि मनसोक्त पाणी प्याला. चेहऱ्यावर सुद्धा त्याने पाण्याचे तीन चार हबके मारले. भयात ताजातवाना होण्याची भावना जाणवत नसल्याचे त्याला समजून चुकले.  
हा रस्ता इथेच संपला हे त्याला कळून चुकलं. त्याने सभोवताली नजर फिरवली. उजव्या दिशेला एक झोपडी त्याच्या नजरेस पडली. खरंतर अंधारात ही झोपडी दृष्टीस पडणे कठीण होते. पण त्या झोपडीच्या मोडक्या भिंतीतून येणाऱ्या मंद दिव्याच्या ज्योतीने त्याचे लक्ष तिथे वेधलं गेलं होतं. 
दुसरा कोणताही पर्याय नसल्याने वास्तववादी आपलं मन आपल्या पावलांना त्या झोपडीच्या दिशेनं घेऊन जात आहे की एखादी कोणती शक्ती आपल्याला तिथे घेऊन जात आहे हे त्याला समजत नव्हते. झोपडीच्या दाराशी येऊन उभं राहिल्यावर क्षणभर त्याने विचार केला. एका क्षणात त्याला गेल्या तासाभरातील घटना आठवल्या. आपल्या मनावर अजूनही आपलंच नियंत्रण आहे ही जाणीव त्याला काहीशी सुखावून गेली. सगळा धीर एकवटून त्याने झोपडीचं दार लोटलं. आतमधून चुलीवर भाजल्या जाणाऱ्या गरमागरम भाकऱ्याच्या वासाने तो सुखावला. चुलीवर एक बाई पाठमोरी बसून भाकऱ्या थापीत होती. त्याची चाहूल लागताच ती लगेचंच उठून उभी राहिली. "धनी, आज इतका उशीर केलासा! या लवकर मी पानं घेतलीसा!" तिच्या ह्या उद्गारांनी मात्र शास्त्रीय बुद्धीचा मोहन नक्कीच चकित झाला. 

(क्रमशः)     

४ टिप्पण्या:

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...