मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ९ मार्च, २०१५

क्षणभंगुर आनंदाच्या शोधात!!

सद्यकालीन समाजाचे निरीक्षण केले असता समाजाचा काही भाग हा अल्पकालीन कौतुकाच्या शोधात सदैव असल्याचे जाणवते. सोशल मीडियावर आपण जर का वावरत असाल तर अशा व्यक्तींचे प्रमाण जास्त असल्याचा भास होण्याची शक्यता असते. ह्यातही दोन वर्ग आहेत, एक वर्ग जो आपली कर्तव्ये व्यवस्थितपणे पार पाडून मग थोडा वेळ क्षणिक आनंद मिळविण्यासाठी ह्या सोशल मीडियावर येऊन जातो. परंतु काही व्यक्तींना ह्या पूर्ण चित्राचे आकलन होत नसल्याने ते आपल्या दिवसाचा बराच भाग ह्या क्षणिक आनंदाच्या शोधात घालवत असल्याचे चित्र दिसते. 

एकंदरीत आपला संपूर्ण समाजाचा बहुतांशी घटकसुद्धा दीर्घकालीन चित्र डोळ्यासमोर न ठेवता क्षणिक आनंद, प्रगती डोळ्यासमोर ठेऊन वागत असल्याची काही उदाहरणे खालील प्रमाणे 
१> खेळाडूंच्या खऱ्या कौशल्याची परीक्षा पाहणाऱ्या कसोटी सामन्यांना दुर्लक्षित करून IPL च्या जत्रेत सहभागी होणे. 
२> वैयक्तिक फायद्याच्या शोधात शहरांचा विपरीत वेगाने प्रसार करून निसर्गाची हानी करणे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता ह्या गोष्टी पोलिस, सरकार ह्यांच्या नियंत्रणापलीकडे जाणे.  
अ) गेल्या आठवड्यात वाचलेलं एक उदाहरण अगदी अंतर्मुख करून गेलं. ज्या लहान मुलांना घरी स्वच्छ स्वच्छतागृहांची सवय असते त्यांना शाळेत जर अस्वच्छ स्वच्छतागृह असतील तर ते त्यांचा वापर करण्याचे दिवसभर टाळतात. आणि त्यामुळे त्यांना Urine infection सारख्या व्याधींचा सामना करावा लागला. 
ब) मैदानांची संख्या कमी झाली म्हणून लहान मुलांनी मॉल, आयपॅड, मोबाईल सारख्या पर्यायी बैठ्या साधनांचा सहारा घेतला. त्यांच्यातील स्थुलत्वाचे प्रमाण वाढीस लागलं. 
क) प्रत्येक शहरात विशिष्ट ठिकाणी स्त्रियांनी एकटीने प्रवास करण्यासारखी ठिकाणे राहिली नाहीत.   
३> भारतराष्ट्राला पुढील पन्नास वर्षात किती अभियंते, डॉक्टर ह्यांची गरज आहे ह्याचा विचार न करता केवळ धनदांडग्या लोकांच्या हितासाठी वाटेल तितकी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये उघडणे. 
४> आधुनिकतेच्या खोट्या व्याख्येच्या मागे लागून वर्षोनवर्षे चालत आलेल्या गौरवशाली भारतीय कुटुंबसंस्थेचा पाया खिळखिळा करणे. 

उदाहरणे अनेक आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा की . जोवर आपल्यात जोष आहे तोवर आपण हवा तसा आनंद घेऊ शकतो, पण एका क्षणी आयुष्यातील जबाबदाऱ्या आपल्यासमोर उभ्या होऊन ठाकतात. त्यावेळी त्यांच्यापासून पळणे शक्य नसते. प्रत्येकाला आयुष्य हे पूर्ण जगावेच लागते आणि त्यातील बहुतांशी भाग हा जबाबदारीने व्यापलेला असतो, त्यामुळे महत्वाचा मुद्दा असा की क्षणिक आनंदाच्या शोधाची व्याप्ती क्षणिक काळभरच ठेवा!!

आपण काळाच्या एका अशा टप्प्यावर आहोत जिथे आपण भारतीयांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे गोडवे गात आहोत. 
ह्या प्रगतीच्या आधारावर आपण परदेशात जाऊन स्थिरस्थावर होत आहोत. 
मुख्य कारण काय तर भारतात आमच्या गुणवत्तेला योग्य तसा न्याय मिळत नाहीत. 
भारतात गुणवत्तेला योग्य असा न्याय मिळत नाही कारण भारतात गुणवत्ता भरपूर उपलब्ध आहे. 
भारतात गुणवत्ता भरपूर उपलब्ध का आहे तर आमची लोकसंख्या बेफाट आहे आणि आपला पारंपारिक कृषीव्यवसाय सोडून आम्ही सर्वजण शिक्षणक्षेत्राच्या मागे धावत सुटलो आहोत. 

जोवर बेफान वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि कृषीक्षेत्राला योग्य संधी ह्या दोन मुलभूत समस्यांचा आपण रोखठोकपणे सामना करत नाही तोवर एक राष्ट्र म्हणून आपण क्षणभंगुर आनंदाच्या शोधात आहोत असेच म्हणावं लागेल!
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...