मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ४ जुलै, २०२०

मराठी - पुढील प्रवास !




एका मराठी उदयोन्मुख लेखकांच्या गटावर काही महिन्यांपुर्वी मला आमंत्रित केलं गेलं. ह्या गटावरील वास्तव्य मला मनापासुन आनंद देऊन जात आहे. विविध विषयांवरील लिखाण, त्यावरील अभ्यासपुर्ण आणि थोड्या प्रमाणात मिश्किलतेकडं झुकणाऱ्या प्रतिक्रिया वाचण्यात एक समाधान आहे. आपापल्या क्षेत्रात यशस्वी आणि मराठीत व्यक्त होण्याची क्षमता बाळगुन असलेली व्यक्तिमत्वं इथं आहेत ! इथले ऍडमिन लोक जबरदस्त आहेत, आठवड्याभरात प्रसिद्ध केल्या गेलेल्या लेखांचं अभ्यासपुर्ण विश्लेषण ते नियमितरित्या प्रसिद्ध करतात. 

ह्या गटाचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे हा गट तुम्हांला तुमच्या लेखावर टिप्पण्या देऊन सदैव प्रोत्साहन देतो. मी ह्या बाबतीत आळशी किंवा काहीसा स्वकेंद्रित आहे. आपलं लिहुन झालं की मी मोकळा असा काहीसा स्वार्थी दृष्टिकोण मी बाळगतो. त्याचं समर्थन करावयास कामाची सबब आहेच. 

आज ह्या गटाचा  चौथा वाढदिवस ! त्यानिमित्त एक झुम बैठक आयोजित करण्यात आली आहे. तिथं य धमाल केली जाईल ह्याविषयी मी निःशंक आहे ! कारण मंडळी आहेतच उत्साहाचा झरा म्हणुन ओळखली जाणारी ! 
ह्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्यासमोर काहीसा गंभीर विषय मांडत आहे ! (नाहीतरी माझ्याकडुन दुसरी काय अपेक्षा करावी? ) प्रारंभ मराठी भाषेपासून करत उगाचच व्यावसायिक जगात चक्कर मारुन मी अखेरीस त्या गटाकडं येईन ! त्या समुहापुढं मांडलेलं हे मनोगत ! 

सुरवात करुयात ती पुढील पन्नास वर्षानंतर मराठी साहित्याचं काय  चित्र असेल ह्या मुद्द्यापासुन ! दहा वर्षांपुर्वी मराठीत काही चांगलं नवीन लिहिलं जात नाही म्हणुन एक खंत व्यक्त केली जात होती आज तो प्रश्न नाहीय . कारण गुणवंत मराठी लोकांना लिहिण्याचं माध्यम माहितीमायाजाळाने, ब्लॉग्सने उपलब्ध करुन दिलं आहे. लोक ही माध्यमं आत्मविश्वासानं वावरत सुद्धा आहेत ! 

पन्नास वर्षानंतरची  (२०७० साल) मराठी मंडळी इतक्या मोठ्या संख्येनं, विविध विषयांवर मराठीत व्यक्त होतील का?  प्रश्नाचे दोन पैलु आहेत. मराठी भाषेत व्यक्त होऊ शकणारी मंडळी त्यावेळी अस्तित्वात असतील पण त्यांचा आत्मविश्वास दांडगा असेल का? आणि आत्मविश्वास दांडगा असणारी मराठी मंडळी मराठीतुन व्यक्त होण्याची क्षमता बाळगुन असतील का ? ह्यामागं मराठी माध्यमातील शिकणाऱ्या मराठी मुलांचं कमी होणारं प्रमाण हा कळीचा मुद्दा ! मराठी माध्यमातुन शिकणं ही समस्या नाही, सोबत गुणवान मुलांचा सहवास न मिळणं आणि पुर्वीइतके दर्जेदार शिक्षक उपलब्ध नसणं ही मुळ समस्या आहे. 

आता वळूयात ते Definition of Success म्हणजे समाजाने मान्य केलेल्या यशस्वितेच्या व्याख्येकडे ! International School मध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देणाऱ्या पालकांची मानसिकता कोणती असावी?  आपल्या पाल्याने एक यशस्वी कारकीर्द बनवावी, त्यासाठी अनुकूल व्यक्तिमत्व बनवावं  ह्यासाठी ह्या International School मदत करतील हा ह्यामागचा  प्रामुख्यानं विचार असतो. माझा जो काही अनुभव आहे त्यावरून ह्या शाळा तुमच्या मुलांना एक उत्तम बाह्यरूपी पॅकेज बनविण्यासाठी उपयुक्त आहेत. पण संकल्पनांचा जो उत्तम गाभा विकसित करावा लागतो त्यात मात्र ह्या शाळा बऱ्याच अंशी कमी पडतात असं माझं वैयक्तिक मत आहे. हा उत्तम गाभा एकतर नैसर्गिकरित्या तुमच्यात असावा लागतो आणि त्यावर तुमच्या पालकांनी सुरुवातीच्या जडणघडणीच्या वर्षांत संस्कार करायला हवेत. अशी गुणवान  मुलं ज्यावेळी ह्या शाळांच्या नजरेत सातवी - आठवीत येतात  त्यावेळी ह्या शाळा त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतात कारण त्यानंतर येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी  ,  संभाषणकला विकसित करणे वगैरे गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक सक्षम यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध असते. परंतु ह्या इयत्तांपर्यंत जर तुमच्याकडं पाया विकसित झाला नसेल तर मात्र तुमची मुलं दहावी, बारावी ह्या टप्प्यांत हरवु शकतात कारण ह्या केवळ बाहयरूपी अस्तित्वात असलेल्या आकर्षक पॅकेजचा पर्दाफाश ह्या स्थितीत होतो. 

साधारणतः १९८० च्या आसपास बनविलेल्या यशस्वितेच्या व्याख्येचे पुनर्परीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी अभियंता, डॉक्टर ह्या पासुन सुरु झालेली यशस्वितेची व्याख्या मध्यंतरीच्या काळात माहिती आणि संगणक क्षेत्रातील करियरपर्यंतच विस्तारली गेली.  माहिती आणि संगणक क्षेत्रातील करियर ४० -४५ च्या वयोगटापलीकडं टिकविण्यात केवळ २० -२५ % टक्के लोकांनाच यश येते हे आजचे सत्य आहे. ह्यास काही अंशी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षांनंतर व्यवस्थापकीय भुमिकांकडे धाव घेण्याची मनोवृत्ती कारणीभुत आहे. २०२० सालातील घटनांमुळं एक वलयांकित नसलेलं पण मनःशांती देऊ शकणारं  करियर, एक नेकीनं करता येण्यासारखा उद्योगधंदा ह्या गोष्टी यशस्वितेच्या व्याख्येत समाविष्ट व्हायला हव्यात. ह्या गोष्टी समाविष्ट झाल्या की त्या पिढीचे संसार सुखाचे होतील, त्यांना आपल्या मुलांवर संस्कार करायला वेळ मिळेल ही माझी भोळीभाबडी आशा ! 

आता ह्यात हा उदयोन्मुख मराठी लेखकांचा गट काय करु शकतो? २२२२ साली (हो २२२२ साली ) ज्या वेळी मागील दोन शतकांतील मराठी साहित्याचा आढावा घेतला जाईल त्यावेळी ह्या गटानं  मराठी भाषेत जी मोलाची भर घातली असेल त्याची नोंद घेतली जावी. मराठी साहित्यातील सद्यकाली अस्तित्वात असणारे साहित्यप्रकार अधिक सुदृढ करणे, नवीन साहित्यप्रकारांची निर्मिती करणे ह्यासारख्या गोष्टींमध्ये ह्या गटानं मोलाचा वाटा उचललेला असावा ! सर्वांत महत्वाचं म्हणजे मराठी संस्कृतीत तुम्ही कितीही यशस्वी असलात तरी नम्रतेची कास धरुन राहण्याची जी वृत्ती कित्येक पिढ्या अस्तित्वात आहे.  तिला कसं टिकवुन धरावं ह्यासाठी ह्या गटानं कामगिरी बजावलेली असावी! हे शक्य होण्यासाठी मराठी माध्यमातील शिक्षणात कालानुरूप बदल घडवत ते कसं टिकविता येईल आणि यशस्वितेच्या नव्या व्याख्येत बसणारी मुलं मराठी माध्यमाच्या शाळा कशा प्रकारे घडवु शकतील ह्यावर किमान चिंतन तरी घडवुन आणावं ! 

ह्या अपेक्षा त्या गटाकडुनच नव्हे तर प्रत्येक सुजाण मराठी नागरिकाकडून बाळगाव्यात असं मला वाटतं !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...