शनिवार सकाळी माझ्या मनात आदर्शवाद ओसंडून वाहवत असतो. आपल्याकडं देवानं दिलेलं पुढील बारा तास आहेत, त्यांचं आपल्या आयुष्यातील विविध जबाबदाऱ्यांमध्ये संतुलित विभाजन करून आपल्या आयुष्यात एक समाधानी दिवसाची नोंद करता येईल असले विचार मनात घोळत असतात. आयुष्य असो वा दैनंदिन दिवस असो, गोष्टी वेळेवर झाल्या की त्यात समाधान असतं. कोणत्याही निर्णयात वेळेचं गणित आणि परिपुर्णता ह्या दोघांची सांगड घालता येणं ही तारेवरची कसरत असू शकते.
साप्ताहिक सुट्टीत कार्यालयीन कामासंबंधी सखोल वाचन करण्याचा छुपा विचार मी सदैव बाळगून असतो. पण ते प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. घरकामात थोडीफार मदत, दोन्ही दिवस घरात येणाऱ्या जाडजूड पेपरांतील लेखांचं वाचन, त्यातून काही डोक्यात विचार आला तर एखादी पोस्ट आणि लोकांना कंटाळून सोडण्यासाठी गायन अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याचा माझा मनसुबा असतो. त्याचबरोबर दुपारी मस्त ताणून देणं ही सुप्त इच्छा देखील मनात असते.
दिवस जसजसा उलगडत जातो तसतसा आदर्शवाद माझा निरोप घेऊन गायब होतो. इच्छित ध्येयांपैकी केवळ मोजक्या ध्येयांचा आपण पाठपुरावा करू शकतो हे सत्य काही काळानं मी स्वीकारतो. बऱ्याच वेळा ह्याला शनिवार, रविवारी येणारी जाडजूड वर्तमानपत्रं कारणीभुत असतात. त्यातील लेख वाचून मी माझ्या बाकीच्या ध्येयांपासून भरकटला जातो. इथं महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्या बाबतीत सकाळी सखोल अभ्यास करण्याची शक्यता महत्तम असते. एकदा का ती वेळ गेली की बाकीच्या वेळात मी माझ्या सर्वोत्तम मनस्थितीत नसतो. म्हणायला गेलं तर नाटकं !
हल्ली खरं तर साप्ताहिक सुट्टीच्या वेळी वर्तमानपत्रात येणाऱ्या लेखांतील विषयात तोचतोचपणा आला आहे. विषयात नावीन्य नसलं तरी विषय कशा प्रकारे मांडला गेलाय ह्यावरून लेखाच्या वाचनीयतेमध्ये चढउतार होऊ शकतो. आता वळूयात काल आणि आज आलेल्या पुरवण्यांतील आणि काही बाबतीत मुख्य वर्तमानपत्रातील माझं लक्ष वेधून घेतलेल्या काही लेखांचा आढावा !
कालच्या इंग्लिश पेपरात एका जोडप्याची गोष्ट होती. आपल्याभोवती जाणवणारी! नवरा कामानिमित्त विविध ठिकाणी फिरणारा, काहीसा आपल्या कोषात आनंद मानणारा. तर पत्नीला आपल्या नवऱ्याच्या व्यावसायिक जीवनाचा भाग होण्याची मनापासून इच्छा, त्याचप्रमाणं सामाजिक समारंभांत पतीनं आपल्यासोबत आपल्याइतक्याच उत्साहानं सहभागी व्हावं असंही तिला वाटतं. लेखकानं सांगितल्याप्रमाणं दोघंही आपापल्या भुमिकेत योग्य! त्या दोघांचे मूळ स्वभाव, कौटुंबिक जडणघडण आणि आयुष्यानं तुम्हांला कसे अनुभव दिले ह्या सर्व घटकांचा परिपाक किंवा परिणाम (ह्यातील योग्य शब्द कोणता ?) म्हणजे ह्या दोघांचं सध्याचं वागणं! दोघांचं एकमेकांविषयी असणारं प्रेम ह्या घटकाविषयी शंका नाही पण ते कशा प्रकारे, किती वारंवारतेने प्रदर्शित व्हायला हवं ह्याविषयी मतभेद असू शकतात. लेखाच्या शेवटी लेखकानं उल्लेखलेले दोन मुद्दे - संपूर्ण विश्वासासहित एकमेकांना समजून घेणं; अनुकंपा दाखविताना प्रत्येकाला अपेक्षित असणारं स्वातंत्र्य देणं !
ह्या लेखाच्या प्रभावाखाली असतानाच आज सकाळी लग्न करून आनंदी असणाऱ्या पण विविध कारणांस्तव एकमेकांपासून दूर राहणाऱ्या जोडप्यांविषयी लेख वाचनात आला. बऱ्याच वेळा दोघांची करिअर हा कळीचा मुद्दा ! पण काही वेळा बाकी मुद्दे सुद्धा ह्यास हातभार लावू शकतात. हल्ली बऱ्याच वेळा संकुचित विचारसरणीचा ठप्पा आपल्यावर लागू नये म्हणून योग्य आणि अयोग्य काय ह्याविषयी आपली मतं बासनात गुंडाळून ठेवावी लागतात. हे देखील कदाचित त्यातील उदाहरण! कदाचित आता लग्नाच्या सुद्धा विस्तृत श्रेणी बनल्या असाव्यात. सदैव एकत्र राहणारी जोडपी, आठवड्यातून एकदा भेटणारी जोडपी, वर्षातून एकदा भेटणारी जोडपी वगैरे वगैरे ! ह्या सर्व जोडप्यांतील समान दुवा म्हणजे अधुनमधून होणारी भांडणं ! त्यामध्ये विस्तृत श्रेणी कोणांस माहिती असतील तर मला सांगाव्यात ! बाकी सदैव एकत्र राहणारी जोडपी मनानं एकत्र आहेत का असले गहन प्रश्न आपल्याजवळच ठेवावेत !
कालच्या लोकसत्तेत वीणा पाटील ह्यांचा 'कमी करूया' हा एक हलकाफुलका पण महत्त्वाचा संदेश देणारा लेख वाचला. आपण भारतीयांच्या सद्य मनोस्थितीशी निगडीत असा हा लेख! आवड म्हणून नव्हे तर केवळ आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी आपण चंगळवाद स्वीकारला आहे की काय ही शंका यावी अशी आपली एक समाज म्हणून स्थिती आहे. ह्या लेखातील अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. लेखाची सुरुवात वीणाताईंनी ज्या उदाहरणाद्वारे केली आहे ते अत्यंत योग्य असे उदाहरण ! पंधरा दिवसाच्या प्रवासासाठी किती वैविध्यपूर्ण सामान घेऊन जावं हा इथला मुख्य प्रश्न ! ह्या पंधरा दिवसात एक तासाच्या भारतीय लोकांच्या स्नेहसंमेलनाला हजेरी लावायची आहे म्हणून कुर्ता, कोल्हापुरी चपला वगैरे सामान घ्यावं की पंधरा दिवसात दोन किंवा तीन फॉर्मल पँट्स आणि एकमेव लेदर शूजवर सर्व ठिकाणी हजेरी लावणं ह्या पर्यायाची निवड करावी इथून सुरुवात होते. विमानतळावर चेकइन काउंटरवर भल्यामोठ्या सामान ऊतू जाणाऱ्या बॅग्स घेऊन कसरत करणारे भारतीय बांधव पाहिले की ह्याची प्रकर्षानं जाणीव होते.
त्याच पुरवणीत लग्नप्रसंगी, हॉटेलात अन्नाची नासाडी करणाऱ्या आपल्या काही समाजबांधवांचं उदाहरण देण्यात आलं आहे. काही मान्यवर व्यक्ती ह्या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून आपल्या वर्तनातुन कसा आदर्श घालून देतात ह्याची चांगली उदाहरणं दिली आहेत. 'कमी करूया' आणि ह्या लेखातुन एक समान धागा जाणवतो तो म्हणजे तुमच्याकडे क्रयशक्ती असली तरी तिचा वापर करताना सामाजिक बांधिलकी दाखवा! तुमच्या क्रयशक्तीचा बेबंद वापर ह्या जगाच्या संतुलनाला बिघडवण्यात हातभार लावत आहे हे लक्षात असू द्यात.
ह्या पोस्टमध्ये वापरलेलं चित्र हे आजच्या पेपरातील मुलं घर सोडून गेल्यानंतर स्त्रियांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या पोकळीविषयी आहे. आपल्या मुलांभोवती आपलं विश्व उभारणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात मुलं शिक्षणासाठी परदेशी निघून गेल्यानं कशी पोकळी निर्माण होते आणि ह्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी विविध छंदांचा उदाहरणार्थ चित्रकला शिकण्याचा कसा उपयोग होऊ शकतो ह्याविषयी हा लेख आहे. मी खास डोकावून पाहिलं तेव्हा ह्या लेखाच्या शेवटी पुरुषांची उदाहरणं सुद्धा दिली आहेत हे पाहून आनंद झाला. माझ्या मनात थोडा वेगळा विचार आला. हल्ली दहावी बारावीनंतर मुलं खरंतर घरात असून देखील स्वतःच्याच विश्वात मग्न असतात. पालकांनी आयुष्यातील येऊ घातलेल्या नव्या टप्प्याची मानसिक तयारी तेव्हापासूनच करायला हवी. बहुतांश मुलांनी उच्चशिक्षणासाठी बाहेरगावी जायला हवं का हा एक वेगळ्या लेखाचा मुद्दा! इथं पन्नाशीनंतरची जोडपी घरात बसून कितपत सुसंवाद साधू शकतात हा कळीचा मुद्दा ! सद्यकाली भोवतालच्या माणसांविषयी, त्यांच्या मनःस्थितीविषयी अनुकंपा दाखवून निरपेक्ष भावनेनं आवश्यक प्रसंगी त्यांच्यासाठी उपलब्ध असण्याची कला आपण सर्वांनी अवगत करणं आपल्या, आपल्या आप्तजनांच्या आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे !
शनिवार - रविवारच्या पेपरमुळं कार्यालयीन कामाला पुरेसा वेळ देता न येणं ही झाली माझी आजची सबब! दुपार अजून बाकी असली तरी रविवारी वामकुक्षी ही हवीच!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा