मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १२ जुलै, २०२०

जुन्या आठवणी!



सध्या लॉकडाऊन मध्ये वसईला राहण्याची संधी मिळाली आहे. घरी ज्येष्ठ मंडळींसोबत बैठक बसली की जुन्या आठवणी ऐकायला मिळतात. त्यातील ह्या काही नोंदी !

बर्मा टाईम  
ही दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची आठवण ! त्यावेळी इंग्रज लोकांनी भारतात बर्मा टाइम अंमलात आणला होता. म्हणजे आपली घड्याळं बहुदा एक तास पुढं गेली असावीत. म्हणजे सकाळी सहा वाजण्याऐवजी सात वाजत असत. त्यामुळं मोठीआईच्या वडिलांना, नानांना आपल्या कामकाजासाठी बाहेर पडण्यासाठी घाई करावी लागत असे ही मोठी आईनं सांगितलेली आठवण !

हवाई हल्ल्याचं भय 
ह्या अनुषंगानं तिनं सांगितलेली अजुन एक आठवण म्हणजे काही लोकांनी जमिनीखाली आडोसा घेण्यासाठी बनविलेल्या संरचना ! 

रात्रीच्या वेळी नागरी वस्ती कुठं आहे हे शत्रूपक्षाच्या विमानांना कळू नये ह्यासाठी एकतर दिवे लावण्यास मनाई असे किंवा दिव्यांचा प्रकाश बाहेर जाऊ नये ह्यासाठी खिडक्यांची तावदाने काळ्या कागदाने झाकुन ठेवली जात असत ! 

भारताच्या ह्या भागापर्यंत हवाई हल्ले होण्याची शक्यता कमीच असल्यानं लोकांनी हा खटाटोप का केला असावा हे समजत नाही. 

खिडक्यांची तावदाने काळ्या कागदाने झाकुन ठेवण्याचा प्रकार १९७१ सालच्या पाकिस्तान सोबतच्या युद्धात सुद्धा ऐकिवात होता. त्यावेळी म्हणे लोकल गाड्यांच्या पुढे सुद्धा अशी कागद लावली जात असत !

१९४७ चे वादळ 
१९४७ साली महाभयंकर वादळ आले होते. त्यानं मोठीआईंच्या मुळगावच्या घराची बहुतांशी कौले उडुन नेली होती. घराच्या छोटया भागात कौलं शिल्लक राहिली होती तिथं मोठी आई आणि लहान भावंडं आसऱ्यासाठी एकत्र आली होती. नानांनी मग त्यांच्या मुलांना एका मजबुत पलंगाखाली लपविले होते अशी माहिती प्रकाश मामा ह्यांनी दिली !
दुसऱ्या दिवशी गावातील मंडळी कुऱ्हाडी घेऊन बाहेर आली आणि त्यांनी सर्वप्रथम कुऱ्हाडींनी रस्त्यात पडलेली झाडं कापुन काढुन रहदारी सुरु केली होती. 

अग्निहोत्री - इंग्रजांच्या काळात एक अग्निहोत्री नावाचा अधिकारी होता. त्याला इंग्रजांनी गोळीबाराचे आदेश जरी करण्याची सुचना दिली होती. ती पाळावी लागु नये म्हणुन त्यानं आजारी असल्याचा बहाणा करुन परिचितांकडे आसरा घेतला होता. 

मद्यधुंद मासे 
शेजारच्या  काकूची गावठी दारुची भट्टी होती. जमिनीत खड्डे करुन त्यात किण्वन प्रक्रियेने (fermentation) प्रकियेने दारु बनवली जात असे. बाहेरुन कोणाला कळु नये म्हणुन त्यावर केळीची पाने (खोले) वगैरे टाकुन हा सर्व प्रकार झाकला जात असे. परंतु इतक्या कडेकोट बंदोबस्त असतानाही एकदा पोलिसांची धाड पडणार अशी बातमी आली. त्यामुळं नाताळ काकूने सर्व पिंप बावखलात रिती केली. त्या रात्री बावखलातील मासे बसले! आणि त्यांनी जोरदार पार्टी केली. परंतु मदिरेचा इतका डोस त्यांना सहन होऊ शकला नाही, सकाळी ते सारे झिंगलेल्या अवस्थेत बावखलाच्या किनाऱ्याला लागले. छोट्या दाजींना आजीनं ते पकडुन आणायला सांगितले.  ते मासे खाऊन समस्त पाटील कुटुंबियांवर काय परिणाम झाला ह्याची नोंद उपलब्ध नाही !  

मावटी 
पुर्वीच्या काळी सर्व पुरुष मंडळी बैलगाडीनं गावंढयाला (मुंबई अहमदाबाद मार्गावरील आणि अन्य वसई बाहेरील परिसरात असणाऱ्या शेतजमिनी) जात असत. इथं जायला सोयीचं पडावं म्हणुन ही पुरुषमंडळी गटागटानं जात. रात्री तिथल्या बेण्यावर वास्तव्य केलं जाई. आजुबाजुला असणारा झरा पाण्याची सोय भागवत असे. तिथं चुल पेटवुन रात्रीचा स्वयंपाक केला जाई ! हा स्वयंपाक करण्यास सोयीचं पडावे म्हणुन महिला वर्ग त्यांना एक छोट्याशा टोपलीत स्वयंपाकासाठी लागणारी सर्व सामुग्री देत असे. ह्यात प्रामुख्यानं कांदा, बटाटे, सुके बोंबील, वांगी, आगपेटी वगैरे जिन्नसांचा  समावेश असे ! त्या काळातील पुर्ण नैसर्गिक वातावरणातील झऱ्याच्या पाण्यात, चुलीवर शिजवलेलं अन्न किती रुचकर असेल ह्याची कल्पना करुनच जिभेला पाणी सुटतं! पण एकंदरीत ते जीवन खुप कष्टदायक होते. रात्री त्या मोजका आडोसा देणाऱ्या बेड्यात थंडी पावसात वास्तव्य करणे हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे ! 

वसईचे वास्तव्य अजुन काही काळ असल्यानं अजुन ज्या काही आठवणी गोळा होतील तशा इथं मांडत जाईन !


ही पोस्ट ऐकीव माहितीवर आधारित असल्यानं चूक भुल द्यावी घ्यावी ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...