मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २८ जुलै, २०१८

गुंतागुंत



आयुष्यातील मोठेपण (वय आणि जबाबदारी ह्या दोन्हींचं ) तुमच्यासमोर तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे अनेक घटक आणुन ठेवत असतं.  
काही घटक केवळ एकतर्फी परिणाम करत असतात तर काही घटक आणि तुम्ही ह्या दोघांचं एकमेकांशी दुतर्फी नातं असतं. हे घटक म्हणजे तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, व्यावसायिक सहकारी,समाज वगैरे वगैरे!

प्रारंभ करुयात व्यावसायिक आयुष्यापासून! व्यावसायिक आयुष्यात तुमच्यासमोर असणारे दोन पर्याय म्हणजे केवळ तग धरत राहणं किंवा दुसरा म्हणजे सतत प्रगतीचा ध्यास धरणं! 

हल्ली व्यावसायिक यश या विषयावर बरंच काही बोललं आणि लिहिलं जातं! काही वेळा ह्या विश्लेषणामध्ये एका विशिष्ट ज्ञातीमध्ये एक विशिष्ट गुण असतो या दिशेने विचाराची मांडणी केलेली दिसून येते. इथं ज्ञात म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात प्रदीर्घ काळ वास्तव्य केलेला समाज असा अर्थ प्रामुख्यानं अभिप्रेत आहे.  पुर्वी आपल्या समाजाला धरुन राहण्याची आणि त्या समाजातच वावरण्याची वृत्ती दिसुन यायची. त्यामुळे या विचारसरणीला अनुसरुन प्रत्येक समाजाचं वागणं काही प्रमाणात दिसुन यायचं. सध्या या बाबतीत परिवर्तनाचा काळ दिसुन येत असला तरी अजुनही काही ज्ञाती आपले काही गुण बाळगून असल्याचं आढळून येतं. 

एक उदाहरण देत आहे की समजा तुम्हाला व्यावसायिक ठिकाणी प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ही प्रतिकुल परिस्थिती अनेक प्रकारची असू शकते. यामध्ये नोकरीसाठी लांबचा प्रवास करावा लागणे, सतत तुमच्या कामगिरीचं विश्लेषण चारचौघात होत राहणे आणि त्या अनुषंगाने येणारे काहीसे अपमानास्पद असे बोल चार-चौघात ऐकावे लागणे अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो.  

तुम्ही या परिस्थितीला कसे तोंड देता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबुन असतात. तुमच्यामध्ये जर चिकाटी असेल तर तुम्ही या गोष्टीचा सामना करु शकता. कोणतीही गोष्ट कायम राहात नाही असे आपण लहानपणापासून ऐकत आलो असतो. परंतु त्यावर माझा आधी फारसा विश्वास नसायचा. परंतु हल्ली मात्र खूप विश्वास बसू लागला आहे. बऱ्याच मोठाल्या वित्तीय संस्थांमध्ये झपाट्याने बदल होत असतात. जर तुम्ही अशा वातावरणात कार्यरत असाल तर काहीवेळा तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती तर काहीवेळा परिस्थिती प्रतिकुल बनते. या दोन्ही स्थितीत स्थिर डोक्याने वावरणारी माणसे व्यवस्थितपणे तग धरु शकतात. 

प्रतिकुल परिस्थितीत चिकाटीपणा दाखवणं ह्या बाबीचं प्रशिक्षण लहानपणापासुन मिळायला हवं. सर्व प्रकारची यशं सहजगत्या साध्य होणं शक्य नसतं आणि बऱ्याच वेळा हितकारक सुद्धा नसतं. एक विशिष्ट यश मिळविण्यासाठी किंवा लक्ष्य साध्य करण्यासाठी वर्षोनुवर्षे तपस्या करावी लागणं ही केवळ जुन्या काळात घडणारी घटना नव्हे. हे सद्यकाळातील सुद्धा सत्य आहे.  

काही काळानंतर व्यावसायिक जीवन एक तपस्या सुद्धा बनू शकते किंबहुना बहुतांशी वेळा बनतेच. तिथल्या वातावरणात तग धरुन राहण्यासाठी किंवा प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या
कौशल्याची आणि व्यावसायिक वर्तणुकीची अपेक्षा असते. ही आवश्यक कौशल्यं किंवा अपेक्षित व्यावसायिक वर्तणुक लिखित स्वरुपात केव्हाच उपलब्ध नसतात. त्या वातावरणातील तुमच्या अस्तित्वामुळं तुम्हांला अनुभवातून आणि आकलनशक्तीद्वारे ह्या सभोवतालच्या 
Ecosystem ला जाणुन घेऊन त्याप्रमाणे आपलं वागणं आणि कौशल्य विकसित करणं हे अपेक्षित असते. 

ह्या अपेक्षेचं भान प्रत्येकाला समजतंच असं नाही.  ज्या काही जणांना समजतं त्यातील प्रत्येकाला ते आपल्या वागण्यात अंमलात आणणं आवश्यक वाटतं असेही नाही. आणि ज्या कोणाला हे परिवर्तन करण्याची इच्छा असते त्यातील सर्वांना लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेले भोवतालचे घटक साथ देतील असंही नाही . 

आता इथे विचारात घेण्यासाठी एक महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे तुमच्या आयुष्यातील किती वेळ तुम्ही तुमच्या व्यावसायिक आयुष्यासाठी देऊ शकता. कारण एक मुलगा, एक पती / पत्नी, एक पालक आणि एक समाजातील जबाबदार नागरिक ह्या विविध रुपातील जबाबदाऱ्या तुमच्या समोर असतात. त्यातील किती जबाबदाऱ्या कोणत्या प्रमाणात स्वीकारण्याचं तुम्ही ठरवता यावर तुमचा बाकीच्या जबाबदारींचा उपलब्ध वेळ अवलंबून असतो. 
इथं एक काहीसा लक्ष वेधुन घेणाऱ्या घटनांचा क्रम सुरु होऊ शकतो.  तुम्हाला एखाद्या व्यावसायिक ठिकाणी प्रगती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचा उलगडा झाला तर तुम्ही मनातल्या मनात खुश होता. आणि तिथे अधिकाधिक यशप्राप्तीच्या हव्यासापायी प्रयत्नशील होत जाता. हे होत असताना तुम्हाला अजुन यश मिळतं आणि त्यामुळं तुमच्या जबाबदाऱ्या अधिक वाढतात आणि मग तुम्ही पुन्हा त्याहून अधिक प्रयत्नशील होता. हे चक्र सुरूच राहतं. 

या सर्व बाबींमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातील बाकीच्या सर्व घटकांपासुन दुर दुर जाऊ लागता. परंतु तुमचे डोळे हे तुमच्या स्वतःच्या यशाने दिपुन गेले असल्यामुळे तुम्हाला बाकीच्या वास्तवाची जाणीव होणं तसं म्हटलं तर कठीण असतं. अचानक असा एक दिवस उजाडू शकतो कि ज्या दिवशी काही कारणास्तव तुमचं ते व्यवसायिक दुनियेतील जग अचानक भंग पावते.  मग अशावेळी मात्र तुम्हांला बाकीच्या घटकांची गरज भासु लागते.   त्या घटकांकडे तुम्ही धाव घेतात परंतु यातील सर्वच घटक तुमच्यासाठी काही वाट बघत थांबलेले नसतात. त्यामुळे होतं काय की तुम्ही एकटेपणाच्या गर्तेत जाऊ शकता.  

आता दुसऱ्या बाजुनं विचार करुयात. जर काही कारणास्तव तुम्ही व्यावसायिक ध्येयं प्राध्यान्यक्रमावर स्वतःहुन ठेवली नाहीत किंवा परिस्थितीनं तुम्हांला ती प्राध्यान्यक्रमावर ठेवू दिली नाहीत तर तुमचं आयुष्य बाकीच्या घटकांमध्ये प्रामुख्यानं व्यतित होत असतं. ह्यात काही वेळा काही न करता वेळ घालवणं ह्या शक्यतेचा सुद्धा समावेश होऊ शकतो. जसं पहिल्या शक्यतेत व्यावसायिक जगातील अपेक्षाभंगामुळं बाकीच्या घटकांची गरज भासु शकते त्याचप्रमाणं ह्या शक्यतेत आयुष्याच्या एका वळणावर तुमच्यातील व्यावसायिक महत्वाकांक्षा जागृत होऊ शकतात. आयुष्यातील एका विशिष्ट वळणानंतर तुमची इच्छा कितीही दुर्दम्य असली तरी तुम्ही तुमचं व्यावसायिक जीवन मार्गावर आणु शकत नाहीत.  

थोडक्यात पहायला गेलं तर तुम्ही पुर्णपणे समाधानी असण्याची शक्यता तसं पाहिलं तर नगण्यच असते. काही माणसं हे स्वतःहून हे सत्य कबुल करतात तर काही प्रकारची माणसं हे सत्य दडवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्या मनातील सर्व काही मनमोकळेपणाने कोणाला तरी सांगायचं का हा एक पहिला प्रश्न असतो. जर त्याचं होकारार्थी उत्तर आला तर ज्याच्यासमवेत हे सारं शेअर करायचं असतं त्या माणसाची खरी खुरी ओळख आपल्याला पटायला हवी. 

जाता जाता सांगणं एकच! ह्यातील आपला प्रकार कोणता हे प्रत्येकानं ओळखावं आणि त्या सत्याचा स्वीकार करुन आनंदानं जीवन जगावं. पण हे करत असताना दुसऱ्या प्रकारातील व्यक्तींचा आदर बाळगण्याचं भान दाखवावं.  

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...